सध्याची शिक्षण व्यवस्था ही माहिती पुरवणे व काही प्रमाणात कौशल्यांचा विकास करणे यापुरती मर्यादित आहे. परंतु व्यक्तीचा आंतरिक विकास, समाजाप्रती कर्तव्यांची जाणीव आणि जीवनाचं ध्येय याकडे मात्र शिक्षण व्यवस्थेचं दुर्लक्ष होतं. याला पर्याय म्हणून महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावेंनी 'नई तालीम' या शिक्षण प्रक्रियेचा विचार मांडला. नेमकी काय आहे ही 'नई तालीम' शिक्षण प्रक्रिया? आणि शिक्षण व्यस्था कशी असावी? जाणून घेऊयात डॉ. अभय बंग यांचे मत.
‘Schooling system is for sake of schooling system’ असं आहे का? Schooling System ही शिक्षकांसाठी रोजगार हमी योजना आहे का? आई बाबांना पोरांची ८ तास कट कट नको म्हणून आहे का? खरं म्हणजे या तीनही प्रश्नांचं उत्तर हो आहे. वास्तव जर पाहिलं तर आजची Schooling System ही या तीनच गोष्टींवर चालते. व्यक्तीच्या आंतरिक क्षमता यांच्या प्रती असलेलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी शिक्षण असतं. दुसरं – ज्या समाजामध्ये आणि निसर्गामध्ये माणूस वाढतो त्या सृष्टीचे अनेक परिणाम त्याच्यावर होतात. आणि त्या समाज आणि सृष्टीच्या प्रती त्याचं काही उत्तरदायित्व देखील असतं. या दोन गोष्टी पूर्ण करायला खरं म्हणजे शिक्षण व्यवस्था असायला हवी. आजची Schooling System हे करत आहे का? काही प्रमाणात करत आहे. पण बहुतेक वेळा मात्र मुलांना मदत करायच्या ऐवजी मारक जास्त ठरत आहे.
नई तालीम शिक्षण प्रक्रिया
महात्मा गांधी आणि विनोबांनी नई तालीम या नावाच्या शिक्षण प्रक्रियेचे खूप खोल आणि प्रगल्भ विचार मांडलेले आहेत. या नई तालीम पद्धतीची मान्यता नक्की काय आहे? एक उदाहरण समजून घेऊया. आपल्यापैकी किती लोकांना सायकल चालवता येते? तर जवळपास सर्वांना येते. सर्वांनी कोणत्या शाळेत शिकली होती का? कोणती ट्युशन लावली होती का? कसे शिकलो आपण? सायकल शिकायच्या आधी ग्रॅव्हिटी, फोर्स, व्हेलॉसिटी हे सर्व माहिती नव्हतं. बस चालवायला लागलो आणि शिकलो. अशिक्षित लोकसुद्धा कोणत्याही थिअरी किंवा क्लासशिवाय हे शिकतात. तर जीवन हे माणसाला शिकायची संधी देत असतं. सायकल आपल्याला कोणत्या शाळेत किंवा ट्यूशन क्लासमध्ये नाही शिकवली गेली. प्रत्येक मुलात ती प्रेरणा, ती इच्छा असते ती विशिष्ट गोष्ट करायची. का असते ती प्रेरणा व इच्छा हे देवालाच ठाऊक. आपले आजी-आजोबा म्हणतात की आपण पडू शकतो, लागू शकतं, तरी आपण धोका पत्करतो. ती एक प्रबळ प्रेरणा आहे जी माणसाला शिकायची संधी देते. आपण बोलायला चालायला तसेच शिकतो. बालपणी आपण बोलायला कधी शिकलो हे आपल्याला आठवत पण नसेल. बस आपण शिकलो. या देशात असंख्य महिला आहेत ज्या गवत कापतात. त्या हे काम कोणत्या शाळेत शिकल्या आहेत – तर जीवनाच्या शाळेत शिकल्या आहेत.
जीवन ही सर्वात मोठी शाळा आहे. त्यामूळे आजच्या शाळेची कमतरता ही आहे की ती जीवनापासून तोडून शिकवते. म्हणून ती अपयशी ठरते. ती अपयशी ठरते हे लोकांना दिसू नये म्हणून विद्यार्थ्यांना ९९% गुण देतात. विद्यार्थ्यांना काही येत नाही हे कळू द्यायचं नाही म्हणून शिक्षक ९९% गुण देतात आणि मग बाहेर आल्यानंतर हे दिसतं की इंजिनीयर पदवीधरांपैकी ७०% लोकांना इंजिनीयरींग येत नाही! जीवनाच्या शाळेत असं कधी घडत नाही. जीवनाच्या शाळेत सायकल शिकलो म्हणजे शिकलो! असं तर नाही ना की त्यातले ७०% मुलं सायकल शिकूनही सायकल शिकले नाहीत? ही जीवनाची शाळा मोठी सुंदर आहे आणि म्हणून नई तालीमचा विचार शिक्षणाच्या बाबतीत हा आहे की जीवन आणि शिक्षण यात फारकत नसावी.
तर नई तालीम म्हणजे काय? सरळ जीवनावर उडी घेत जीवन जगता जगता जे काही तुम्ही काम करता त्यातून शिकणे. यामुळे उलट चांगलं शिक्षण घडतं. सध्या मात्र जीवन आणि शिक्षण हे दोन कप्पे केले आहेत – पहिले २० वर्ष नुसतं शिक्षण, जीवनाचा पत्ताच नाही आणि मग एकदा शिक्षण संपले आणि पदवी हातात आली, IIT असो की TISS ची असो, मग शिक्षण बंद. मग फक्त काम करा. विनोबांच्या शब्दांमध्ये जीवनाची विभागणी अशी आहे – ‘कर्महीन शिक्षण म्हणजे आळशी शिक्षण आणि दुसरं बिनडोक कर्म म्हणजे कामच काम कर्म नाही’. म्हणून नई तालीम असं म्हणते की ‘जीवन हेच शिक्षण’ आणि जीवन जगता जगता तुम्ही अतिशय सुंदर शिक्षण मिळवू शकता. तर जसं चालायला शिकलो, बोलायला शिकलो, हे तसंच आहे.
शिक्षण व्यवस्था कशी असावी?
आता प्रश्न असा आहे की शाळा असाव्यात की असू नये? तर आजच्या स्वरूपात नाही. शिक्षण प्रक्रिया असावी की असू नये? तर जरूर असावी. पण अशी की जी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या नैसर्गिक शिक्षणाच्या क्षमतेला आणि इतर ज्या त्यांच्यामध्ये क्षमता असतील त्या जोपासेल. कल्पना करा तेंडुलकर जर चुकून IIT मध्ये गेला असता तर काय झालं असतं? विचार करा तेंडुलकर in IIT. अयोग्य माणूस अयोग्य जागीच्या शिक्षण प्रक्रियेत गेला तर काय होतं? तेंडुलकरने त्या ऐवजी सरळ हातात बॅट घेतली. त्याला आठवीमध्येच लक्षात आलं की हेच माझं जीवन आहे. त्याने तेच केलं आणि आपल्याला माहिती आहे काय झालं. बिल गेट्स यांनी काय केलं? ते हार्वर्डमध्ये होते. हार्वर्डच्या एका कॉनव्होकेशन सोहळ्यात त्यांना बोलवलं होत. तर तिथे भाषण देताना ते म्हणाले, “कदाचित पहिल्यांदा घडत असावं की हार्वर्डच्या एका ड्रॉप-आऊटला तुम्ही कॉनव्होकेशनला बोलवलं आहे.” त्यांनी BSC देखील पूर्ण केलं नव्हतं. ड्रॉप-आऊट झाले आणि “मला सरळ कॉम्पुटर बनवायचा आहे आणि यात शिक्षकांची काही गरज नाही” म्हणाले. त्यांनी Microsoft Windows तयार केलं. एडिसन ने काय केलं? त्यांच्या नावावर आज जितके पेटंट आहेत तेवढे दुसऱ्या कोणाच्या नावावर या इतिहासात नाहीत.
तर शिक्षण अश्या प्रकारच्या कर्तुत्वाला, विकासाला, Problem Solving ला तुमच्यामध्ये असलेल्या नैसर्गिक क्षमतेला, त्या कसल्याही असोत, जोपासणारं हवं. ते करता करता त्याचे कौशल्य प्राप्त करणं ही जीवनामध्ये चांगली संधी असते.
आजची शिक्षण व्यवस्था ते होऊ देत नाही. मग अश्या Institutional Education ऐवजी De-Schooling बरं. तर शाळा आणि स्वतःच्या बाहेर सरळ जीवनात कर्तव्य आणि कर्म करता करता शिक्षण घेता येईल का? तर जरूर घेता येईल. हेच नई तालीम ही शिक्षण प्रक्रिया म्हणते. म्हणून नई तालीम ही शाळा नाही तर शिक्षण प्रक्रिया आहे.
No comments:
Post a Comment