'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday 13 February 2013

निर्माण ५ च्या युवांची मुक्तांगणला भेट


२६ जानेवारीला, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मुक्तांगणला भेट देण्याचा योग आला. इथे औचित्याचे काही विशेष दिवस आहेत. उदा. १० फेब्रुवारी हा स्व. अनिता अवचटांचा स्मृतिदिन, १० मार्च सहचारी दिन, २६ जून Anti Narcotics Day इ. बुधवारी व्यक्तीस उपचारासाठी दाखल केले जाते, त्यानंतर ५ आठवड्यांनी सोमवारी त्यास डिस्चार्ज मिळतो. डिस्चार्ज च्या आधीच्या शनिवारी व्यक्तीचा वाढदिवस साजरा केला जातो आणि त्यास मेडल दिले जाते. व्यसनमुक्तीचा संकल्प केल्यामुळे त्या व्यक्तीचा नवीन जन्म झाला आहे अशी भूमिका त्यामागे आहे.
या २६ जानेवारीला शनिवार होता आणि आम्ही वाढदिवसालाउपस्थित होतो. व्यसनमुक्त झालेले मित्रखुर्चीवर बसलेले होते. २१ ते ६५ वयोगटातील या व्यक्तींपैकी कोणी व्यसन मुक्तीची २१ वर्ष साजरे करत होते, कोणी २०, कोणी १५, कोणी १२, कोणी पहिले वर्ष साजरे करत होते. समोर येऊन भाषण करत होते, मेडल घेत होते, खाली बसलेल्या त्यांच्या मित्रांनाप्रेरणा देत होते. प्रत्येक व्यक्तीच्या पत्नीला आणि इतर कुटुंबियांना सुद्धा मनोगत व्यक्त करायला बोलावले गेले. बहुतांश स्त्रिया काही बोलू शकल्या नाहीत. त्यांना अश्रू अनावर झाले. पण त्या अश्रूंतून दिसला तो आपल्या पतीविषयीचा अभिमान, आदर आणि मुक्तांगणप्रती कृतज्ञभाव...!
स्त्रियांमधील वाढती व्यसनाधीनता आणि उपचाराची गरज लक्षात घेऊन निशिगंधनावाचे फक्त स्त्रियांचे, स्त्रियांनी, स्त्रियांसाठी चालवले जाणारे स्वतंत्र केंद्र मुक्तांगण ने ४ वर्षापूर्वी सुरु केले आहे. (फारसे आश्वासक आणि भूषणावह नसले तरी त्यास उदंड प्रतिसाद मिळतो आहे हे जाणवले.)
आपली संवेदनशीलता जपून, तत्वांवर निष्ठा ठेवून, वैयक्तिक कौशल्याच्या जोरावर आणि निरपेक्ष वृत्तीने प्रयत्न केल्यास किती रचनात्मक कार्य करता येते याचा आदर्श मुक्तांगणने निर्माण केला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
‘मुक्तांगण’बद्दल अधिक माहितीसाठी भेट द्या: http://www.muktangan.org/

No comments:

Post a Comment