'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 13 February 2013

वटवृक्षाच्या सावलीत...



ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि सर्वोदयी व रचनात्मक कार्याला वाहून घेतलेले निष्ठावान अर्थतज्ञ प्रा. ठाकूरदास बंग (पिताजी) यांचे २७ जानेवारी, २०१३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. पिताजी ९५ वर्षांचे होते.
गरीब वडिलांच्या संसारासाठी सुवर्णपदके विकून टाकणारे पिताजी, आय.सी.एस. वा बॅरिस्टर होण्याची योग्यता व संधी असताना राष्ट्रीय विचारांच्या कॉलेजात प्राध्यापकी करणारे पिताजी, बेचाळीसच्या भारावलेल्या वातावरणात ‘करो या मरो’च्या हाकेला साद देऊन आंदोलनात सहभागी होणारे पिताजी, आंदोलनात २ वर्षे आनंदाने सक्तमजुरी भोगणारे पिताजी, तुरुंगातून सुटून आल्यानंतर गांधीजींचे “अर्थशास्त्र सीखना है तो अमरिका के बजाय भारत के देहातों में जाओ” एवढे एक वाक्य ऐकून ओहायो विद्यापीठातील प्रवेश नाकारून वर्ध्याजवळच्या बरबडी व नंतर महाकाळ या खेड्यात राहणारे पिताजी, ग्रामीण अर्थशास्त्र समजून घेण्यासाठी रोज शेतीत राबून त्यानंतर वर्ध्याच्या कॉलेजात अर्थशास्त्र शिकवणारे पिताजी, त्रेपन्न साली विनोबांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्राध्यापकी सोडणारे व त्यानंतर भूदानयज्ञ व सर्वोदय कार्यासाठी ‘जीवनदान’ देणारे पिताजी, भूदान यज्ञाच्या निमित्ताने उभा भारत चालत व रेल्वेच्या तृतीय श्रेणी डब्यातून पालथा घालणारे पिताजी, बिहार आंदोलन व संपूर्ण क्रांती आंदोलनात जे.पीं.चा डावा हात असणारे पिताजी, आणीबाणीच्या काळात आपल्याच देशात पुन्हा तुरुंगवास भोगणारे पिताजी, गुलामीच्या काळात गांधीजींच्या फोटोला फ्रेम करून केवळ सहा आण्यात लग्न करणारे पिताजी, तीन कपड्यांचे जोड व चरखा एवढी ज्यांची संपत्ती, ज्यांच्या नावावर ना घर ना जमीन, स्वातंत्र्य सैनिकाचा ताम्रपटही ज्यांनी स्वीकारला नाही, पुरस्कारांची सर्व रक्कम ज्यांनी सामाजिक संस्थांना दिली असे पिताजी आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांच्या संस्कारांचा वटवृक्ष आपल्याला शांतपणे सावली देत आहे. या वटवृक्षाच्या पारंब्या होण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. आपली मुळे जमिनीत खोल रुजवून घेऊया!

No comments:

Post a Comment