'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday 12 February 2013

पुस्तक परिचय: गोष्ट मेंढा गावाची- मिलिंद बोकील


या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे हे पुस्तक लिहिण्यास देण्याचा, ते लिहून झाल्यावर त्याचे वाचन करुन त्यातील लेखनास मान्यता देण्याचा आणि सरतेशेवटी हे पुस्तक प्रकाशित करण्याचा ठराव मेंढा गावच्या ग्रामसभेने सर्वसहमतीने मंजूर केलेला आहे.एक पुस्तक अशा प्रक्रियेतून निर्माण व्हावे हे महाराष्ट्राच्या किंबहुना भारताच्या साहित्यिक इतिहासातील पहिलेच उदाहरण असावे. अर्थात मेंढा गावाने अशी उदाहरणे घालून देण्याची सुरवात फार पूर्वीपासूनच केली आहे .


“दिल्ली मुंबईत आमचे सरकार
आमच्या गावात आम्हीच सरकार”
अशी घोषणा देऊन आणि ती प्रत्यक्षात उतरवून लोकशाही व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याचे उदाहरणदेखील या गावाने घालून दिलेले आहे.
मेंढा(लेखा) हे गडचिरोली जिल्हयाच्या धानोरा तालुक्यातील एक छोटे गाव.वनहक्क कायदा -२००६मधील तरतुदींनुसार आपल्या गावच्या भोवतालच्या सुमारे १८०० हेक्टर जंगलावर आणि त्यातील वनौपजावर सामूहिक हक्काचा दावा करणारे आणि तो मान्य करून घेणारे भारतातील पहिले गाव ठरल्यानंतर मेंढा गाव चर्चेत आले. पण ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले तत्कालीन केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी २७ एप्रिल २०११ रोजी स्वतः जातीने गावात येऊन, मुख्यमंत्री, गृहमंत्री, इतर वरिष्ठ मंत्री आणि नोकरशहांच्या उपस्थितीत या कायद्यान्वये बहाल करण्यात आलेल्या वनहक्क व्यवस्थापनाची परवाना पुस्तिका प्रदान केली त्या घटनेनंतर !
वरील परिस्थिती निर्माण होण्यास काय पार्श्वभूमी होती आणि मेंढा गावातील लोकांनी कोणत्या प्रकारे अहिंसक, लोकशाही मार्गाने संघर्ष करून आपला भोवतालच्या जंगलावरील परंपरागत व नैसर्गिक हक्क मान्य करवून घेतला त्याचे चित्रण या पुस्तकात आहे .परंतु हे परीक्षण फार ढोबळ मानाचे होईल.
हे पुस्तक म्हणजे गोष्टीच्या रूपाने जाणारे समाजशास्त्रीय लेखन, चिंतन आहे असे म्हणले तरी ते वावगे ठरणार नाही, कारण यात आदिवासी समूह आणि निसर्ग यातील परस्पर संबंध, आदिवासींमधील पारंपारिक चालीरीती, शिक्षणपद्धती, आदिम-अभिजात जीवनशैलीने तिच्यावर अतिक्रमण करू पाहणाऱ्या यंत्रणांशी केलेला संघर्ष, सामुहिक सर्वसहमतीने घडवून आणलेला आणि म्हणूनच स्थायी स्वरुपातला विकास, लोकशाही विकेंद्रीकरण इ.विषयांवर विस्तृत विवेचन मेंढा गावातील घडामोडींच्या अनुषंगाने केलेले आहे.
पुस्तकाचे नाव जरी गोष्ट मेंढा गावाचीअसे असले तरी ही एक गोष्ट नसून ते एक कथानक आहे आणि मुख्य म्हणजे ते एक सत्य कथानक आहे. वर उल्लेखलेली घटना ही या कथानकाची एक उपकथा आहे.अशा अनेक उपकथा या कथानकाला आहेत. मेंढा गाव, या गावाने आपले नैसर्गिक आणि घटनेने बहाल केलेले अधिकार प्रत्यक्षात मिळवण्यासाठी केलेला संघर्ष हा या पुस्तकाचा केंद्रबिंदू असला तरी हा संघर्ष आसूयेचा, जीवघेणा असा नाही, तो रक्तरंजितही नाही, पण तो रोमहर्षक नक्कीच आहे .
मेंढा गाव हे इतर पुरस्कार प्राप्त आदर्श गावांपेक्षा वेगळे आहे याचे कारण आपल्या आसपासच्या परिस्थितीत सकारात्मक बदल घडवण्यासाठी,आपले जीवन सुखमय करण्यासाठी आणि सामूहिक विकास करण्यासाठी राजकीय परिस्थितीत अमुलाग्र बदल घडवून आणण्याची असलेली निकड या गावाने ओळखली आणि त्या दिशेने अभ्यासपूर्ण आणि निश्चयपूर्वक वाटचाल केली. वर उद्धृत केलेली दिल्ली मुंबईत आमचे सरकार - आमच्या गावात आम्हीच सरकारही घोषणा जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतितील सिंहासन खाली करो...जनता आयी हैया घोषणेशी साधर्म्य सांगणारी आहे. ही नुसती घोषणा नसून ते एक तत्त्व आहे. या तत्त्वात मेंढावासीयांना अभिप्रेत आहे ते स्थानीय पातळीवर सरकारच्या अधिकारांचे केलेले विकेंद्रीकरण आणि कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेतून येणारी जबाबदारी आणि कर्तव्यांची जाणीव सुद्धा! मेंढा गावाने या तत्त्वाचा अविष्कार कुठे आणि कसा केला याचे विवेचन म्हणजे हे पुस्तक.
मिलिंद बोकिलांची कोणत्याही विषयावर लिहिण्यापूर्वी त्या विषयाच्या खोलात शिरण्याची, त्या विषयाच्या परिघातील प्रत्येक बाब विचारात घेण्याची, निरनिराळ्या तपशीलांची छाननी करण्याची, गरज पडेल तिथे ऐतिहासिक, राजकीय, आर्थिक आणि तात्त्विक संदर्भ देण्याची, समोर आलेली तथ्ये निष्पक्षपणे स्वीकारण्याची आणि असे करत असताना कोणत्याही परिस्थितीत वास्तवाशी फारकत न घेता(ही) संवेदनशीलता जपण्याची शैली या पुस्तकाच्या जडणघडणीस उपयुक्त ठरली आहे .
आज आधुनिक म्हणवणाऱ्या शहरी समाजात विविध समूहांचे परस्पर संबंध ताण-तणावाचे, संशयाचे बनलेले आहेत. नातेसंबंधांना व्यावहारिक स्वरूप आले आहे. स्वार्थी वृत्ती, दांभिकता, चंगळवाद बळावतो आहे. स्पर्धा निकोप राहिलेली नाही. ‘सर्वेत्र सुखिनः संतू | सर्वे संतू निरामयःअशी शिकवण देणाऱ्या समाजातूनच सहजीवनाची संकल्पना लोप पावते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या समाजास मेंढा गावाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
एकूणच काय तर भ्रष्टाचार, अनैतिकता, विधिनिषेधशून्यता इ. दुराग्रहांमुळे एकूणच राजकीय प्रक्रियेपासून दुरावत चाललेल्या, संसदीय लोकशाही व्यवस्थेकडून भ्रमनिरास झालेल्या सामान्य माणसांस आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मेंढा गावचा प्रवास आशादायक आणि उत्साहवर्धक ठरेल.
आज विकासाच्या मूलभूत संकल्पनेची फेरतपासणी करण्याची आणि विकासाची प्रक्रिया, त्याची प्रारूपे यांमध्ये अमुलाग्र बदल करण्याची वेळ आलेली आहे. अशा वेळी मेंढा गावाची गोष्ट निश्चितच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल.
प्रकाशक : ग्रामसभा, मेंढा
वितरक : मौज प्रकाशन गृह, मुंबई
टीप : या पुस्तकाच्या छपाई आणि इतर तांत्रिक बाबींचा खर्च वगळता, पुस्तकाच्या विक्रीतून येणारी सर्व रक्कम ग्रामसभा मेंढा यांच्या सार्वजनिक फंडात जमा होणार आहे.

मकरंद गजानन दीक्षित, meetmak23@gmail.com

No comments:

Post a Comment