निर्माण ५ चा डॉक्टर दिग्विजय बंडगर एप्रिल २०१६ पासून गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहे. सोलापूर GMC मधून MBBS चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने MOship करायचा निर्णय घेतला आणि गडचिरोली जिल्ह्यात काम करायचे ठरवले. तिथे काम करताना त्याला आलेला अनुभव त्याच्याच शब्दात...
मन्नेराजाराम सारख्या दुर्गम आरोग्य केंद्रात काम करताना स्वतःच्या ज्ञानाचा कस लागत होता. मला काम करताना अजून खूप काही शिकण्याची नितांत गरज जाणवत होती. पुस्तकातून वाचून वाचून उपचार चालू होते. तपासणी कक्षात पुस्तकांचा खच पडला होता. लोकांनाही केलेले उपचार चांगले वाटत असावेत, त्यामुळे ओपीडीतील (Out Patient Department) सुरवातीची चार पाच संख्या आता चाळीस पन्नास वर पोहोचली होती. प्रसूतीसाठी महिला आरोग्य केंद्रात येऊ लागल्या. माझ्याकडून होत असलेले सगळे उपचार मी करत होतो. लहान सहान गोष्टींपासून दुर्धर आजारांपर्यंत लोक माझ्याकडे येऊ लागले. मला शक्य नसल्यास हेमलकशात अनघा ताईकडे (अनघा आमटे) रेफर करत होतो. मी काही दिवस ओपीडी व काही दिवस गावांमध्ये फिरायचो, उपकेंद्रांना भेटी द्यायचो. दवाखान्यात “पोट्टासा डॉक्टर” आला आहे, अशी माझी प्रतिमा आसपासच्या गावात होती. एक दिवशी अशी घटना घडली मी एका रात्रीत हिरो वैगरे झालो.
संध्याकाळी ओपीडी संपल्यावर घरी जात असताना एका पेशंटला खाटेवर टाकून बांबूने उचलून लोक माझ्याकडे घेऊन आले. त्यांना मी त्याला दवाखान्यातील खाटेवर घ्यायला सांगितले. वीस पंचवीस लोक पाहून काहीतरी गंभीर असल्याची कल्पना मला आली होती. फुलाबाईला पेशंटचे नातेवाईक काय सांगत आहेत ते विचारले (फुलाबाई आरोग्य केंद्रातली सफाई कामगार आहे, दुभाषी म्हणून काम करते). दोन दिवसांपासून पेशंट झोपून असल्याचे त्यांनी सांगितले. काही प्रतिसाद देत नाही, शुद्ध नाही, श्वास सुरु नाही असे वाटतंय. तर तो मरण पावला आहे की नाही, असेल तर आम्ही अंत्यविधी करू का, या गोष्टीसाठी ते आले होते. येचली या त्यांच्या जवळच्या गावी त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना अंत्यविधीसाठी निरोप पाठवला होता. मी पेशंटची तपासणी केली असता पेशंट जिवंत असल्याची लक्षणे (हृदयाचे ठोके, डोळ्यांची बाहुली) दिसत होती. पेशंट जिवंत असल्याचे मी त्यांना सांगितले पण त्याचे निदान मात्र मला होत नव्हते. मी त्यांना तसे सांगितले व रुग्णवाहिका घेऊन हेमलकसाला जाण्यास सांगितले. त्यांनी पेशंटला पुढे नेण्यास नकार दिला. “तुम्हीच काही तरी करा नाहीतर, आम्ही अंत्यसंस्कार करतो.” असे त्यांनी मला सांगितले आणि माझ्यावर मोठी नैतिक जबाबदारी आली.
मी खूप विचार केला, हिस्टरी अजून एकदा विचारली. त्यातून एक गोष्ट कळाली की तो दोन दिवसापूर्वी खूप मोहाची दारू पिऊन होता. तीन चार दिवस जेवण केले नव्हते. मग मला माझ्या इंटर्नशिपच्या मेडिसनच्या पोस्टिंगमध्ये हायपोग्लायसेमियाची केस आठवली. रक्तामधली साखर ४० पेक्षा कमी झाल्यावर देखील अशी सेमी कोमाची अवस्था होते, बेशुद्धी येते. उपचारांनी पूर्णपणे बरा झालेला पेशंटही मी पाहिला होता. मग लगेचच सिस्टरने रक्तातील साखर ग्लूकोमीटरने तपासली आणि मला एकदम माझं निदान मिळालं. रक्तातील साखर होती १५ ग्रॅम/डी.एल. त्याच्यामुळेच त्याची ही स्थिती होती. मी लगेचच आमच्यकडे उपलब्ध असलेली Dextrose 10% I.V. Drip लावायला सांगितली. आर्धी बोटल जाते न जाते तोच पेशंट उठून बसला आणि बडबडायला लागला. लोकांच्या आश्चर्याला सीमाच राहिली नाही. मेलेला माणूस जिवंत झाला म्हणून सगळ्या लोकांमध्ये चर्चा सुरु झाली. दवाखान्यात पेशंटला बघायला गावातील लोक येऊ लागले. मलापण माझ्या उपचारावर विश्वास बसत नव्हता. हसूही येत होतं. त्यानंतर “पोट्टासा डॉक्टर”चा भाव वधारला. तेव्हापासून ओपीडी वाढली आणि प्रसुतींची संख्यादेखील!
त्या दिवशी मला मी पी.जी.च्या अभ्यासाच्या मागे न लागता लक्षपूर्वक इंटर्नशिप केल्याचा अभिमान वाटला आणि करत असलेल्या कामाचा देखील!
दिग्विजय बंडगर (निर्माण ५)
No comments:
Post a Comment