आपण सर्वच निर्माणी
ठराविक काळाच्या अंतराने आपल्या सामाजिक क्षेत्रात काम करण्याच्या प्रेरणा तपासत
असतो. आणि त्याबद्दल कधी कधी असुरक्षितही असतो. निर्माण ७.१ अ शिबिरात एका
शिबिरार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना नायनांनी ‘जीवन निष्ठा’ म्हणजे काय, ती
कशी येते याबद्दल सांगितलं.
मी लहानपणी ज्या शाळेत शिकलो, सेवाग्रामच्या शाळेमध्ये,
तिथे एक पद्धत होती. विनोबांचा जो जन्मदिन असायचा त्याला ‘भूमी-क्रांती दिन’
म्हणायचे. का, कारण ज्याला अजिबात भूमी नव्हती, जमीन नव्हती, जगण्याचं कोणतंच साधन
नव्हतं, त्याच्या उद्धारासाठी विनोबांनी आंदोलन केलं. तर त्यादिवशी आमच्या
शाळेमध्ये, आश्रमामध्ये, एक प्रयोग व्हायचा की मजुराचं जीवन समजून घेतलं पाहिजे.
त्याचं जीवन समजून घ्यायचं असेल तर त्याचं जीवन अनुभवायला पाहिजे. ते फक्त
बौद्धिकरित्या नाही समजणार. त्यादिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला अन्नाचा एकही
कण मिळायचा नाही. शेतामध्ये दिवसभर आम्ही मजुरासारखं काम करायचो. जेवढे काही
पन्नास साठ लोकं आम्ही होतो, शिक्षकही आमच्याच सोबत. आणि दिवसाच्या शेवटी आमच्या
कामाचं मोजमाप व्हायचं. किती जमिनीतलं गवत कापलं, किती ज्वारीची कापणी केली, किती
माती ओढली, असं काम असायचं. मग त्या कामाचं आम्हाला शेतमजुरीच्या रेटने पैसे
मिळायचे. आणि जे कितीक आणे मिळायचे, त्यातून संध्याकाळचा आमचा स्वयंपाक व्हायचा. फक्त
तेवढ्याच पैशांवर. आणि बस्स, त्याच स्वयंपाकात आम्हाला जेवायला लागायचं. अर्धी-मुर्धी
भाकरी यायची हाती. तीच खाऊन आम्ही झोपायचो. भूक लागलेली असायची, रडूही यायचं. पण
तरीही, मजुराची भूक काय असते, गरीबाची भूक काय असते, ह्याचा प्रत्यक्ष अनुभव
कोणत्याही पुस्तकातल्या ज्ञानापेक्षा जीवनभर कायमचा सोबत राहिला.
ज्यांच्या गरजा अजिबातच पूर्ण होत नाहीत, जगण्यालाही जी
किमान अपेक्षा असते तेही ज्यांना मिळत नाही अशा लोकांच्या जितक्या जवळ जाता येईल
तितकी तुमची सामाजिक प्रश्न सोडवण्याची प्रेरणा मजबूत होत जाईल. मग ती प्रेरणा
केवळ बौद्धिक राहत नाही, बौद्धिकतेच्या खोल जाते. ‘हे बघा आकडे, पर्यावरणाचा किती
ऱ्हास होतोय’ फक्त असं राहत नाही, तर आकड्यांच्या पलीकडे जाते. तो माझा, जीवनाचा, वास्तववादी
अनुभव बनून जातो. तर काही गोष्टी अनुभवाच्या पातळीवरती स्वतः जगल्या पाहिजेत आणि
त्या जगत असलेल्या लोकांच्या जवळदेखील गेलं पाहिजे. आपण फक्त बघतो, खरं म्हणजे
बघणे हे अनुभवाला substitute नाहीये. ते अप्रत्यक्षच राहतं. मी त्याची भूक पाहिली, म्हणजे
मला समजते का त्याची भूक? नाही. भूक काही बघून समजण्याची गोष्ट नाही. ती
अनुभवण्याची गोष्ट आहे. तर तो अनुभव जितका मला घेता येईल, तितकी मला त्याची गरज
कळते. म्हणून माझ्या गरजा कमी करण्याला, त्याचा प्रश्न सोडवण्याला एक पक्का मानवी
आधार मिळतो.
गांधीजींनी एकदा विनोबांना एक जबाबदारी दिली. त्यावेळी लोकं
चरख्यावर सुत कातायचे. कातणारे मजूर, त्यांना मजुरी मिळायची. मग किती मीटर कातलं, त्याचे
रेट ठरलेले असायचे. त्यावर ज्याची त्याची मजुरी मिळायची. त्यावेळी मीटर वैगेरे भानगड
नव्हती, यार्न होतं. ६४० यार्नचं एक युनिट होतं आणि त्याच्या आधारावर मजुरी
मिळायची. भारतामध्ये असे लाखो कातणारे मजूर होते, त्यांची गांधीजींकडे एकदा तक्रार
आली, की ही मजुरी अपुरी पडतीये. आणि खादी विकणारे जे मॅनेजर्स होते, खादी भांडारातले,
ते म्हणत होते की आधीच खादी महाग आहे, विकता विकता नाकी नऊ येतात. लोकांना समजावून
सांगायला कठीण जात आम्हाला. तुम्ही याच्याहून जास्त मजुरी द्याल मजुरांना, तर खादी
इतकी महाग होईल की विकणं अजून अवघड होऊन बसेल. तर गांधीजींनी विनोबांना याचं
न्यायाधीश म्हणून नेमलं. गांधीजी, “मला सांग की किती मजुरी ठेवावी.” विनोबांनी
त्या विषयावर तीसेक वर्ष काम केलेलं होतं, म्हणायला गेलं तर विनोबा त्या विषयाचे
खरंच महर्षी होते. त्यावर विनोबा म्हणाले की “मला ६ महिन्याचा वेळ पाहिजे”.
गांधीजी म्हणाले, “अरे घाई आहे. तिकडे मजुरांना उत्तर द्यायचंय”. “नाही मला ६
महिने पाहिजे. तसं नाही उत्तर देऊ शकत मी” विनोबा. “ठीके घे”. ६ महिने विनोबांनी
गांधीजींशी काहीच संपर्क केला नाही. ६ महिन्यांनंतर विनोबा आले गांधीजींना भेटायला
तर ३० पौंड वजन कमी झालेलं, शरीर अगदीच किडकिडीत झालेलं. ते पाहून गांधीजींनी
विचारलं, “काय झालं रे तुला?” त्यावर विनोबा उत्तरले “काही नाही. तुम्ही मला काम
दिलं होतं की कातणीची मजुरी किती असावी. तेव्हापासून गेली ६ महिने मी रोज ८ तास
कातण्याचंच काम करतोय. आणि त्या कातण्यातून मजुरीच्या रेटने ६ पैसे इतकी मजुरी
मिळवता येते. ६ महिने मी जगून पाहिलं ६ पैश्यांमध्ये. तर माझा निष्कर्ष एवढाच की
आज जी मजुरी आपण देतो कातणाऱ्यांना त्यातून अशी स्थिती होते. त्यामुळे मजुरी
वाढवली पाहिजे.” ह्या उत्तरात गांधीजींना कुणाच्या दुसऱ्या तर्काची गरजच नाही
पडली. सगळ्या खादीच्या मॅनेजर्सचा विरोध बाजूला ठेऊन, गांधीजींनी मजुरी तिप्पटीने
वाढवली. तर स्वतः प्रत्यक्ष ते जगणं किंवा करणं किंवा अनुभवणं हे महत्त्वाचं ठरतं.
आपल्या कामामध्ये, मतामध्ये निष्ठा आणि विश्वासार्हता मिळवण्यासाठी.
पण काही अनुभव
घेताही येत नाहीत, उदाहरणार्थ बालमृत्यूचा अनुभव. माझं मुल काही कधी मेलं नाही,
त्याची गरजही नाही मला. पण बालमृत्यू मी माझ्या उघड्या डोळ्यांनी इतक्या जवळून
पाहिले की तेच पुरेसे होते मला हलवून टाकायला. २०-३० वर्ष माझी ती प्रेरणा टिकली
कारण अतिशय हादरवून टाकणारे अनुभव गाठीशी होते. तर प्रत्यक्ष अनुभव घेणं म्हणजे ती
जी निष्ठा आहे, ती जी प्रेरणा आहे, ती निव्वळ एक हॉबी किंवा एक adventurous अनुभव
किंवा एक intellectual asset राहत नाही. त्याच्या पलीकडे जाते. आणि ती जेव्हा जाते, तिला
आपण ‘जीवन निष्ठा’ म्हणतो. बौद्धिकतेच्या पलीकडे जाणारी आणि मला दुसऱ्याच्या
तर्काची, अर्ग्युमेंटची गरज राहणार नाही अशी ती माझ्या जीवनामध्ये उतरली पाहिजे.
अशी ‘जीवन निष्ठा’ आपण मिळवली पाहिजे.
आपल्या आजूबाजूच्या समाजात दिसणाऱ्या अनेक सामाजिक
प्रश्नांना, समाज घटकांना समजून घेण्यासाठी आणि त्यासोबतच आपला ‘स्व’ अधिक उन्नत
व्हावा व आपल्या जीवननिष्ठा अधिक दृढ व्हाव्या या उद्देशाने आपण ‘निर्माण’ अंतर्गत
कृती शिक्षणाचा उपक्रम सुरु केला आहे. ज्यात गेल्या दोन वर्षात आपण दुष्काळ हा
प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्यासोबत दुष्काळामुळे होरपळणारा समाज घटकही
जवळून पाहिला. हा प्रयत्न म्हणजेच नायनांनी सांगितलेल्या जीवननिष्ठा दृढ करण्याचा
भाग होता, असं म्हणता येईल. इथून पुढेही अशाच प्रकारे सामाजिक प्रश्नांच्या, वंचित
समाज घटकांच्या अधिकाधिक जवळ जाऊन आपल्या निष्ठा, प्रेरणा समृद्ध करूयात.
No comments:
Post a Comment