'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 1 May 2017

जिंदगी वसूल...

चिंतलपेठ (ता. अहेरी जि. गडचिरोली) या एका लहानश्या गावातून आलेल्या रवींद्रने चंद्रपूर येथून इंजिनिअरींगच शिक्षण घेतलं. त्यानंतर गेलं वर्षभर तो जव्हार जि. पालघर मध्ये काम करणाऱ्या ‘वयम’ या संस्थेसोबत काम केले. त्याचा हा अनुभव त्याच्याच शब्दात...  

हाय मित्रांनो.. आज तुम्हाला मी गेल्या वर्षभरात लुटलेल्या जीवनाच्या आस्वादाबद्दल थोडक्यात कहाणी सांगणार आहे. मी वयम ला भेट देण्यापूर्वी सर्च, आनंदवन, हेमलकसा प्रामुख्याने ह्याच संस्था बघितल्या होत्या, म्हणून अशी कल्पना करत होतो की या ठिकाणी खूप कर्मचारी असतील, राहण्याची वगैरे उत्तम सोय असेल, जेवणाकरिता भारी मेस असेल ई. एकदाचा जव्हारला पोहोचलो आणि स्तब्धच झालो. सगळ्या कल्पना इज इक्वल टू झिरो झाल्या. एका तीन रुमांची कौलारू भाड्याची खोली म्हणजेच “वयम्” च ऑफिस, सकाळी ६ ला उठून पाणी भरले नाही तर पिण्याचे व अंघोळीचे हाल, अगदीच जर्जर व जुनी इमारत, आणि तेच ऑफिस कम घर. दिवसभर तिथेच काम करायचं व रात्री तिथेच झोपायचं. माझे कम्फर्ट झोन मला चिमटे घेऊ लागले. मी स्वतःशीच म्हणालो की माझी प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची तयारी आहे पण इतक्याही नाही... छे यार नको करायला आणखी संस्था शोधूया काम करायला असे ठरवले. वयम मध्ये काय प्रकारचे काम चालते, आपली भूमिका काय, आपल्या काम करण्याच्या पद्धती काय ई. ऐकून मला काम आवडलं होतं, पण तेथील संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता मी तिथे काम न करण्याचे ठरवलं. पण नंतर जेव्हा मी परत घरी यायला निघालो तेव्हा माझ्यातला मी मला टोचून-टोचून विचारात होता की मी का या संस्थेत काम करायचं नाकारतोय, तिथे मोठमोठ्या बिल्डींग नाही म्हणून, की जास्त लोक नाही म्हणून, की सकाळी उठून पाणी भरावे लागते म्हणून, की खाली झोपावे लागते म्हणून मी स्वतःलाच समर्पक उत्तर नाही देऊ शकलो, रात्रभर विचार सुरु होते आणि जेव्हा मी चंद्रपूर च्या स्टेशन वर उतरलो तेव्हा माझ फिक्स झाल होत की मी वयम् मध्ये काम करायला जातोय.
   मी १ जून २०१६ ला जव्हार ला वयम् मध्ये गेलो. वयम् मध्ये काम करणे यापेक्षा काम शिकायला गेलो असे म्हणेन. मला निर्माण ची “कर के देखो” फेलोशिप ही मिळाली.
दुसऱ्याच दिवशी मिलिंद दादांनी मला खैरमाळ नावाच्या गावात पाठवलं, पूर्ण आदिवासी गाव, गावात फक्त १३-१४ घर, पाण्याची भीषण अवस्था, गावातील एका मित्रांनी अंघोळीला एका कुव्या मध्ये घेऊन गेला ते गढूळ पाणी पाहून जनावर सुधा त्यात पाय टाकणार नाही इतक खराब, माझी हिम्मतच झाली नाही त्यात अंघोळ करण्याची. गावात लाईट नव्हती आयुष्यात पहिल्यांदा मी नाचणी हा प्रकार पहिला व त्याच्या भाकरी खाल्या, त्या रात्री गावातील मुलांनी मला टेकडी वर घेऊन गेले रात्री झोपायला, मी रात्र भर चांदणे मोजत होतो मला एक मिनिट सुधा झोप लागली नाही. अनोळखी गाव अनोळखी लोक आणि त्यातल्या त्यात जंगलातील टेकडी झोपायला, छे कशी लागणार झोप. हळू–हळू नकारार्थी विचार मनात येऊ लागले, हे सगळ जमेल की नाही मला, यात मला खरच रस आहे की नुसताच फसवतोय स्वताला. १५-२० दिवस इथे राहून बघूया जर जमल तर राहू नाहीतर जाऊया वापीस, त्यात काय एवढे. निसर्ग नेहमी परीक्षाच पाहत असतो. तेथील वातावरणाशी जुळवायला वेळ लागत होता म्हणून कदाचित माझी तब्बेत फार बिघडली मी १८ दिवसच झाले होते येऊन आणि मला दवाखान्यात भरती कराव लागलं, ३-४ दिवस होतो तिथे, घरच्यांना या बद्दल काही सांगितले नाही कारण त्यांनी जर या अवस्थेत बघितलं तर वापीस पाठवणार नाहीत, मग त्यापेक्षा इथेच राहून ठरवूया की समोर हे काम करायचं की नाही. नंतर मी हळू हळू रुळायला लागलो.


माझा मुख्य काम होतं - पाच पाड्यामधील मुलांसोबत ‘बिन बुक या शिका’ हा उपक्रम. ‘मुल त्याचं तेच शिकू शकतात त्यांना फक्त योग्य वातावरण उपलब्ध करून द्यायला हवे’ या थीमवर काम करत होतो. हा उपक्रम शाळाबाह्य वेळात म्हणजे शनिवारी आणि रविवारी होता. मग बाकीचे दिवस वयमच्या इतर कामात (आदिवासी हक्क व कायदे) सहभाग घ्यायचो. गावात गेल्यानंतर कुणाच्याही घरी जाऊन सांगायचे की मी तुमच्याकडे राहायला व खायला येणार आहे ते जे बनवता तेच खायचं ते जसे राहतात तसेच राहायचं त्यामुळे मुलांसोबत रुळायला मला फार वेळ लागला नाही.
हळूहळू काम समजू लागल काम करताना मजा येऊ लागली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी सामाजिक कामाची व्याख्या बदलली. तिथे जाऊन मला समजल की समाजसेवा, सामाजिक काम वगैरे म्हणजे खूप काही वेगळ नसतच. मला लोकांसोबत काम करायला आवडते, मला खुशी होते, शांत झोप लागते आणि त्याचा मोबदला म्हणून मला पगार देखील मिळतो. प्रत्येक दिवशी काही तरी नविन शिकायला मिळायचं. बिऱ्हाड तर नेहमीच पाठीवर असायचं, कोणत्या गावात सकाळ होईल कुठे जेवण होईल कुठे झोपणार हे काहीच ठरल नसायचं मी प्रत्येक दिवस एन्जॉय करू लागलो. प्रत्येक गावात काही खूप जीव लावणारी माणसे मिळाली माझी ते वाटच बघायचे की मी कधी त्यांच्याकडे जातो. यात मी हेच विसरून गेलो की मी तिथे एकच वर्ष राहण्याच्या उद्देशाने गेलो होतो. त्यांच्यातीलच एक बनून राहिल्या मुळे जुळवा जुळवी चा प्रश्नच नव्हता.
वयम् च्या कामातून फार समाधान मिळायचं वनहक्काच्या अपील अर्जांसाठी आम्ही अख्खा जव्हार तालुका पिंजून काढला, लोकांना त्यांचा हक्क मिळावा म्हणून काम करताना फार आनंद व्हायचा आणि जिंदगी वसूल झाल्यासारखी वाटायची! तिथून परत येताना मुले रडत होती, जितक त्यांना अवघड गेल नाही तितक मला जात आहे. आयुष्यात खूप दिवसांनी हुंदके देऊन कुणा दुसऱ्यांसाठी रडायला मिळालं. जीवनात कधी कधी खूप कठोर निर्णय घ्यावे लागतात त्यापैकी एक हे आहे.
मी तिथे काही खूप करून आलो असे नाही पण मी खूप शिकून आलो. या कामाचा आणि अनुभवांचा उपयोग मला आता मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलो म्हणून काम करताना नक्कीच होईल. मला माणसं शिकायला मिळाली. परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आली. जो मी पहिल्या दिवशी टेकडी वर झोपायला घाबरलो होतो तो मी नंतर झोपण्यासाठी टेकड्या शोधात होतो. खूप मोठा बद्दल घडला माझ्यात, गरजा डिफाईन करता येऊ लागल्या. एक विश्वास वाटायला लागला की मी एक चांगला माणूस नक्कीच बनेन!

रवींद्र चुनारकर, निर्माण ६

No comments:

Post a Comment