'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 1 May 2017

माणदेशी माणसांपर्यंत

पेशाने CA असणारी सारिका कुरनुरकर (निर्माण ५) छोट्या महिला व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र कसे बनवता येईल या शोधात ‘माणदेशी फौंडेशन’ पर्यंत पोचली. तिचा प्रवास तिच्याच शब्दांत...

“२०१२ मध्ये मी निर्माण ५.१ शिबिरात गेले आणि तेव्हापासून विचारांचा प्रवास चालू झाला. माझं शिक्षण आणि काम यांची सांगड कशी घालता येईल? मी Chartered Accountant (CA) आहे, त्यामुळे माझा clientele हा बहुतेक वेळा श्रीमंतच असतो. २०१६ मध्ये मी पुन्हा निर्माण शिबिरात गेले. यावेळेस मात्र मला कुठल्या प्रश्नावर काम करायचं आहे? काय करायचं आहे? ह्या गोष्टी clear होत चालल्या होत्या. महिलांना financially independent बनवण्याचं काम करायचे अस मी ठरवलं होत. ह्या कॅम्प दरम्यान नायनांसोबत सविस्तर बोलता आलं. त्याच वेळी मला त्यांनी चेतना गालांबद्दल (माणदेशी फौंडेशनच्या संस्थापिका) सांगितलं. पण काही कारणांमुळे मी लगेच तिथे रूजू झाले नाही. त्यादरम्यान मी सोलापूरलाच काही प्रयोग करून बघायचं अस ठरवलं.

            सोलापुरात जे छोटे छोटे व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांना भेटू लागले. उद्देश असा होता की त्यांच्यातील काही लोक निवडून त्यांना funding मिळवून द्यायचे आणि त्यांचा व्यवसाय वाढवायचा. रोज निदान ३ छोट्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना भेटणे असे महिनाभर करायचं ठरवलं. पण शेवटी अस लक्षात आले की प्रश्न funding पेक्षा market मिळण्याचा आहे. त्या महिनाभरात मी खूप जणांना भेटले. मी खूप कमी बोलते आणि नवीन माणसाशी तर अजूनच कमी. त्यामुळं अचानकपणे जाऊन ‘तुम्ही किती कमावता? अजून कमावण्यासाठी काय करणार?’ असं कसं काय विचारायचं अशी मनातून भीती वाटायची. मग मी एक छोटी प्रश्नावली तयार केली. समजा मी भाजीवाली सोबत बोलत असेन तर आधी भाज्यांबद्दल, भाववाढीबद्दल असं बोलत बोलत मला पाहिजे ते पण विचारायचे. नेहमीच मला सगळे प्रश्न विचारता यायचे नाहीत, पण अशा वेळेस मी समोरच्या माणसाचा कल बघून ठरवायचे. हे सगळं करत असताना एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे lower economy मधले माझे एकही मित्र किंवा मैत्रीण नाहीत. ब-याच वेळा मला यांना भेटण्यासाठी ड्रायव्हर किंवा कामवाली बाई यांची मदत घ्यावी लागली. नकळतपणे का होईना, पण जात-शिक्षण-पैसा हे बघून माझ्या मित्रमैत्रिणी झाल्या की काय असंही वाटून गेलं. या दरम्यान मी भाजीवाली, फळवाले, माठ विकणारे, बिडी कामगार यांना भेटले. या भेटींतून माझे झालेले शिक्षण असे-

१)     अशिक्षित माणसाला त्याच्या व्यवसायातील जाण आणि माहिती खूप जास्त असते.
२)     ही माणसे दिवसाला साधारणपणे ८-१० तास खूप मेहनतीचं काम करतात, पण त्याचा मोबदला साधारणपणे फक्त १००-१५० रुपये मिळतो.
३)     त्यांना जेवणाची किंवा TOILET ची वेगळी जागा अशी सुविधा नसते.
४)     १-२ दिवस सुट्टी घेतली तर त्यांचं उत्पन्न बुडते.
५)     कुटुंबातील २ व्यक्ती तरी एकाच व्यवसायावर अवलंबून असतात.
मी डिसेंबर २०१६ पासून ‘माणदेशी’ सोबत काम सुरू केलं. मी महिन्यातील काही दिवस तिथे जाऊन काम करते. साधारणपणे १९९४-९५ मध्ये चेतना गालांनी माणदेशी बँकदेखील चालू केली. व्यवसाय कसा सुरू करायचा? कसा वाढवायचा? skill develop कशा करायच्या? त्यांना लागणारं funding बँकेमार्फत कसे मिळवायचे? यावर माणदेशी काम करते. डिसेंबरमध्ये मी म्हसवड, वडूज, दहिवडी आणि सातारा या गावातील माणदेशीमुळे फायदा झालेल्या महिलांना भेटावं असं ठरलं होतं. मी ८ दिवस तिथे होते. ३० महिलांना भेटले. या दरम्यान मी परत परत वडापाव, भेळ, beauty parlor, खानावळ, चहा असे व्यवसाय करणा-या बायकांना भेटत होते. यावेळेस देखील निरीक्षण हेच होतं की त्यांना त्यांच्या व्यवसायातल जास्त कळतं. मी कधी कधी माझ्या विचारांप्रमाणे, किंवा खूप sophisticated पद्धतीने त्यांना सांगायचे. पण मी सांगत आहे ते कसं व्यावहारिक नाही हे मला त्या पटवून सांगायच्या. कधी कधी त्यांचे प्रश्नच मुळात किती वेगळे आहेत हे जाणवायचं. उदा. मी वडूज मध्ये एका किराणा दुकानदर महिलेला भेटले होते. मी तिला ५-७ मिनिटे तिने १० रुपये तरी दिवसाला बाजूला काढून ठेवायला पाहिजेत असं सांगत होते. तिने ऐकून घेतलं माझं, आणि म्हणाली, ‘अगं काय करू पैसे बाजूला ठेवून? ठेवले की ते दारूत जातात.’ यावर मला काहीच बोलता आले नाही.
जानेवारीपासून मला वेगळी जबाबदारी दिली गेली. नाशिक येथे माणदेशी आणि HUL Company या दोघांच्या माध्यमातून नवीन शाखेचं काम सुरू झालं होतं. त्याची project co-ordinaor म्हणून मी काम बघत आहे. तिथे मी महिन्यातील काही दिवस जाऊन काम करते. यादरम्यान अजून एक शिक्षण असं झालं की financially Independent असणं तर गरजेचं आहेच, पण त्याबरोबरच लोकांच्या हातात काम असणंही तेवढंच गरजेचं आहे.”
सारिकाला तिच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!
माणदेशी बद्दल अधिक माहितीसाठी - http://www.manndeshifoundation.org/

सारिका कुरनुरकर, निर्माण ५

No comments:

Post a Comment