'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 10 January 2013

निर्माण पाच करिता महाराष्ट्रा तील तरूणाई सर्च मधे दाखल



         २९ डिसेंबर २०१२ ला निर्माण पाच बॅचचे पहिले शिबिर सर्च शोधग्राम येथे जल्‍लोषात सुरू झाले आहे. ५७ अवैद्यकीय युवांचा सहभाग असणारे हे शिबिर दि. ६ जानेवारी २०१३ पर्यंत चालणार आहे.  प्रथमच निर्माण मध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या सर्वच्या सर्व ३५ जिल्ह्यांतून आलेले अर्ज तसेच शिबिरार्थ्यांमध्ये मुलांचे व मुलींचे असणारे समप्रमाण ही निर्माणच्या पाचव्या बॅचची वैशिष्ट्ये म्हणता येतील.
दिल्लीच्या सामूहिक बलात्काराची शिकार ठरलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू अशा पार्श्वभूमीवर शिबीराची सुरूवात झाली. ‘दीपप्रज्वलन करताना आज आपल्या आतही एक ज्योत पेटायला हवी’ तसेच ‘मी जन्माला आल्यावर जे जग होते त्यापेक्षा अधिक सुंदर जग मी मारताना असेल यासाठी युवांनी प्रयत्नशील राहायला हवे’ असे आवाहन डॉ. अभय बंग (नायना) यांनी केले. ‘स्व पासून समाजाकडे व समाजापासून सृष्टीकडे’ हे सूत्र केंद्रस्थानी असणाऱ्या या शिबिरात उंची, रूंदी, खोली, वृत्ती व कालातीतपणाचे  प्रतीक म्हणून वटवृक्षाचे आरोपण करण्यात आले.
निर्माण ५ च्या वैद्यकीय युवांचे पहिले शिबीर २ ते १० फेब्रुवारी २०१३ दरम्यान संपन्न होत आहे. 

चारुता गोखलेचा लोकसत्तेसोबत नवीन प्रवास सुरु


निर्माण १ ची चारुता गोखले, गेली ६-७ वर्ष पत्रकारिता एक छंद म्हणून जोपासत आहे. २००६ ते २००८ ही दोन वर्षे ती  मुंबईमध्ये लोकसत्ता या वृत्तपत्रात युथ बीट म्हणजेच तरूणाईला वाहिलेल्या सदरासाठी काम करत होती. त्यानंतर तिने पुण्यातून पत्रकारितेची पदवी घेतली. लोकसत्तेच्या या युथ बीटचे स्वरूप आता बदलले असून लोकसत्तेच्या ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकामधून हे सदर नव्याने सुरु होत आहे. दर महिन्याला या सदरात लिहिण्याची तिला पुन्हा संधी मिळाली आहे. या टीममध्ये तिच्याबरोबर पाच सहकारी काम करतील. तरुणांमधील सध्याचे Trends, काहीतरी नवीन करू पाहणाऱ्या युवकांची धडपड, सद्य सामाजिक, राजकीय घटनांवरील त्यांची भूमिका याविषयी गंभीरस्वरूपाचे पण तरुणांना रुचेल असे लेखन हे या सदराचे वैशिष्ट्य असेल. यात इतर विषयांबरोबरच Youth and innovations या मथळ्याखाली ती दर महिन्याला महाराष्ट्रातील, देशातील किंवा जगभरातील विविध तरुण जे एखाद्या क्षेत्रात जगावेगळ्या किंवा कल्पक शोधांवर काम करत आहेत त्यांचे काम वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे. जानेवारी २०१३ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेत Science & Technology Innovation Policy जाहीर होणार असून या पार्श्वभूमीवर हे सदर सुरु केले जाणार आहे.

            गेल्या तीन चार वर्षात निर्माणच्या निमित्ताने तिचा अनेक धडपड्या तरूणांशी परिचय झाला आहे. या उपक्रमासाठी तिला या युवकांची नक्कीच मदत होईल.

रंजन पांढरेचा तरुण भारत सोबत नवीन प्रवास सुरु


निर्माण ४ चा रंजन पांढरेला तरूण भारत या दैनिक वृत्तपत्राने नुकतीच त्यांच्या युवा पुरवणी ‘फुल ऑन’ मध्ये लिहिण्याची संधी दिली आहे. ही  पुरवणी आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी प्रकाशित होते. या मध्ये त्याला एक स्तंभ (युवा बीट) लिहायचा आहे. आजचे युवक त्यांच्या समस्या, त्यांच्या आजूबाजूचे प्रश्न, एक युवा म्हणून त्यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत, प्रत्यक्षात काम सुरु केलेले युवा यांच्याविषयी या स्तंभामध्ये मांडणी असेल. तसेच या स्तंभामध्ये तात्कालिक ताज्या घडामोडींविषयी लिखाण होईल. इतर युवांना प्रेरणा मिळावी हे हा स्तंभ लिहिण्यामागचे प्रयोजन आहे. येत्या १० जानेवारीला विदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या ‘फुल ऑन’ पुरवणीत या स्तंभाअंतर्गत गडचिरोलीत काम करणारे निर्माणचे तरुण डॉक्टर्स डॉ. विक्रम सहाने, डॉ. शिवप्रसाद थोरवे व डॉ. रामानंद जाधव यांच्यावरील लेख प्रसिद्ध होणार आहे.

कुपोषणाच्या साखळीतील कमजोर कडी कोणती?


            गडचिरोली जिल्ह्यातील तुडमेळ या आदिवासी गावात सर्चच्या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून रुग्ण तपासणी करत असताना ३ महिन्याचे एक बाळ कुपोषित असल्याचे (वजन: २.४१० किग्रॅ) डॉ. सुजय काकरमठच्या लक्षात आले. भाताच्या कापणीचे काम सुरू असल्यामुळे ५० किमी दूर जिल्हा रुग्णालयात बाळाला भरती करण्यास पालकांनी नकार दिला. जिल्हा रुग्णालयातील Nutritional Rehabilitation Center (NRC) मध्ये कुपोषित बाळाला पोषणतत्वे देऊन त्याचे वजन वाढवण्याची सोय आहे. तिथे भरती केल्यास खर्च तर येणार नाहीच उलट तेवढ्या काळात आईची बुडणारी रोजी सरकारतर्फे दिली जाईल याची शाश्वती देऊन सुजयने पालकांचे समुपदेशन केले. पालक तयार झाल्यानंतर सुजयने बाळ व आईला गडचिरोलीत NRC मध्ये पोहोचवले. डॉ. मनोज तालापल्लीवार या तरुण व उत्साही सरकारी डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली बाळाला पोषणतत्वे दिली गेली. १३ दिवसांत बाळाचे वजन वाढून २.९३० किग्रॅ झाले. मात्र पुढच्याच महिन्यात तुडमेळ गावाला सुजयने दिलेल्या भेटीदरम्यान NRC मधून सुट्टी होताच अवघ्या १५ दिवसांत बाळाचे वजन तब्बल ४०० ग्रॅ. कमी झाले आहे असे लक्षात आले. दुर्गम गावात आरोग्यसुविधा पोहोचवण्यासाठी फिरते वैद्यकीय पथक पोहोचणे, वैद्यकीय अधिकाऱ्यांना गावातले कुपोषित बाळ निदर्शनास येणे, बाळाला जिल्हा रुग्णालयात वेळेत पोहोचवणे, जिल्हा रुग्णालयात उत्तम सुविधा, आकर्षक सरकारी योजना व उत्साही डॉक्टर यांची उपलब्धता इतके सारे होऊनही कुपोषित बाळाची स्थिती ‘जैसे थे’ का? कुपोषणाच्या किंवा एकूणच आदिवासींच्या अनारोग्याच्या साखळीतील कमजोर कडी कोणती असे प्रश्न या बाळाच्या निमित्ताने निर्माण झाले आहेत.

डॉ. शिवप्रसाद थोरवे आता भामरागडमध्ये


मूळचा परभणीचा आणि औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. झालेला शिवप्रसाद गेले आठ महिने गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील पेंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवा देत होता. त्याच्या कार्यकाळात तेथील ओ.पी.डी. पेशंट्सची संख्या ही महिन्याला सुमारे 1200 पर्यंत पोहोचली होती. ऑक्टोबर महिन्यात मात्र त्याच ठिकाणी शासकीय सेवेतून कायमस्वरुपी वैद्यकीय अधिका-याची नेमणूक झाल्याने शिवप्रसादला त्याची जागा सोडावी लागली. पण आपल्या एक वर्षाच्या बंधपत्रित वैद्यकीय सेवेचे चार महिने उरले असल्याने शिवप्रसादने पुन्हा जिथे जागा आणि गरज असेल तेथे सेवा द्यायचे ठरवले. गडचिरोली सारख्या मागास भागात काम करायला डॉक्टर्स राजी नसताना शिवप्रसादला मात्र लगेच “वर्क ऑर्डर” न मिळता शासकीय लालफीतशाहीचा आणि दिरंगाईचा सामना करावा लागला. एक महिना सतत प्रयत्न केल्यानंतर त्याला जिल्ह्यातील सर्वात मागास आणि दुर्गम अशा भामरागड तालुक्यात नियुक्ती देण्यात आली आणि डिसेंबर पासून शिवप्रसाद तेथे रुजू झाला. रुजू झाल्यानंतर एका महिन्यात त्याने संपूर्ण तालुका फिरुन तेथील आरोग्य व्यवस्थेची सद्यस्थिती समजून घेण्यास सुरुवात केली आहे आणि स्वत: सेवा देण्यास आरंभ केला आहे. हेमलकसाच्या निकट असल्याने डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या सोबत त्याची ओळख झाली आहे आणि त्यांचेही मार्गदर्शन त्याला मिळते आहे. 

डॉ. विक्रम सहाने ‘सर्च’ मध्ये रुजू


गडचिरोलीतील आदिवासी भागातील गट्टा व धानोरा येथील सरकारी रुग्णालयांत एक वर्ष वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेतून सेवा दिल्यानंतर निर्माण ४ चा डॉ. विक्रम सहाने पुढील प्रवासासाठी ‘सर्च’ या संस्थेत रुजू झाला आहे. सर्चमध्ये होणाऱ्या असंसर्गजन्य रोग, बाळांच्या न्युमोनियाचे गावातल्या गावात उपचार, मृत्यूची कारणे इ. संशोधनात विक्रमचा सक्रीय सहभाग असेल.

‘सर्च’ बद्दल अधिक माहितीसाठी:
http://searchgadchiroli.org/

अमोल वाकलेला 'बायफ' या संस्थेची शिष्यवृत्ती प्रदान


 निर्माण २चा अमोल वाकले याने आपले मास्टर्स माइक्रोबायोलॉजी या विषयात पूर्ण केले. नुकतीच 'बायफ' या  संस्थेची शिष्यवृत्ती त्याला प्राप्त झाली. याअंतर्गत जैविक खतांसंबंधीचे  विविध प्रयोग, जैविक खतांसाठी  वापरण्यात येणार्या  सूक्ष्म जीवांचा अभ्यास तसेच, त्यांच्या वापर प्रक्रियेमध्ये सुधार या विषयांवर संशोधन  करायची संधी अमोलला मिळेल. त्याच्या या  यशासाठी निर्माण परिवारतर्फे त्याचे हार्दिक अभिनंदन आणि  पुढील  कामगिरीसाठी शुभेच्छा! 

‘बायफ’ च्या SPARK Fellowship Programme बद्दल अधिक माहितीसाठी: http://www.baif.org.in/spark_fellowship_prog_12_13.asp