'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 10 January 2013

डॉ. शिवप्रसाद थोरवे आता भामरागडमध्ये


मूळचा परभणीचा आणि औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. झालेला शिवप्रसाद गेले आठ महिने गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील पेंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय सेवा देत होता. त्याच्या कार्यकाळात तेथील ओ.पी.डी. पेशंट्सची संख्या ही महिन्याला सुमारे 1200 पर्यंत पोहोचली होती. ऑक्टोबर महिन्यात मात्र त्याच ठिकाणी शासकीय सेवेतून कायमस्वरुपी वैद्यकीय अधिका-याची नेमणूक झाल्याने शिवप्रसादला त्याची जागा सोडावी लागली. पण आपल्या एक वर्षाच्या बंधपत्रित वैद्यकीय सेवेचे चार महिने उरले असल्याने शिवप्रसादने पुन्हा जिथे जागा आणि गरज असेल तेथे सेवा द्यायचे ठरवले. गडचिरोली सारख्या मागास भागात काम करायला डॉक्टर्स राजी नसताना शिवप्रसादला मात्र लगेच “वर्क ऑर्डर” न मिळता शासकीय लालफीतशाहीचा आणि दिरंगाईचा सामना करावा लागला. एक महिना सतत प्रयत्न केल्यानंतर त्याला जिल्ह्यातील सर्वात मागास आणि दुर्गम अशा भामरागड तालुक्यात नियुक्ती देण्यात आली आणि डिसेंबर पासून शिवप्रसाद तेथे रुजू झाला. रुजू झाल्यानंतर एका महिन्यात त्याने संपूर्ण तालुका फिरुन तेथील आरोग्य व्यवस्थेची सद्यस्थिती समजून घेण्यास सुरुवात केली आहे आणि स्वत: सेवा देण्यास आरंभ केला आहे. हेमलकसाच्या निकट असल्याने डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या सोबत त्याची ओळख झाली आहे आणि त्यांचेही मार्गदर्शन त्याला मिळते आहे. 

No comments:

Post a Comment