साधारणत: वर्षभरापूर्वी प्रचंड कंटाळा आला होता म्हणून आणि त्या क्षणी काहीही
करायची इच्छा होत नव्हती म्हणून स्वत:च्या संग्रहात बरेच दिवस धूळ खात पडलेले हे
पुस्तक हाती लागलं. तसं त्या रात्रीच ते वाचून झालं. मात्र ते डोक्यात ‘क्लिक’
झालं काही दिवसांनी पुन्हा चाळतांना!
सिद्धार्थ आणि गोविंद हे दोन मित्र आपल्यासारखेच जगण्याच्या प्रयोजनाच्या
शोधात असतात. शोधाच्या सुरवातीला ते काहीसे भरकटतात. ‘सापडला’ असा वाटलेला मार्ग
नंतर त्यांना अधूरा वाटू लागतो. योगायोगाने ते गौतम बुद्धाच्या सानिध्यात काही
दिवस राहतात. बुद्धांच्या तेजपुंज व्यक्तीमत्त्वाने आणि ओघवत्या वाणीने गोविंद
भारावून जातो. बुद्धांनी सांगितलेला संदेश आचरण्यातूनच आपल्याला जगण्याचे प्रयोजन
सापडेल ह्याविषयी त्याच्या मनात तिळमात्र शंका उरत नाही. म्हणून गोविंद बुद्धाच्या
धम्म जीवनाला शरण जातो. सिद्धार्थ मात्र हे नाकारतो. ते नाकारण्याचे कारण
बुद्धांसोबतच्या त्याच्या भेटीत तो सांगतो.
सिद्धार्थ पुन्हा पण आता एकटाच त्याच्या आत्मशोधास सुरुवात करतो. सर्व
प्रकारचे जीवनानुभव यथेच्छ घेतो. प्रयोजनाच्या शोधास त्याज्य किंवा घातक मानण्यात
आलेले अनुभव सुद्धा स्वत: घेतो. त्याच त्याच चुका हजार वेळा करतो. मात्र तरीही
शेवटी तो क्षण येतो...
सिद्धार्थचा आता ‘बुद्ध’ झाला आहे. योगायोगाने त्याचा मित्र गोविंद त्याला
भेटतो. गोविंदने आपल्या आयुष्याचा मधला काळ गौतम बुद्धाचा संदेश कायावाचामने
आचरण्यात घालवलेला असतो. मात्र तरीही गोविंदाचा ‘कोरडा पाषाण’ झालेला आहे.
नोबेल विजेता हर्मन हेस ची सगळ्यात प्रसिद्ध अशी ही कादंबरी – “सिद्धार्थ”!
ह्या पुस्तकाने माझ्या जगण्यात काय फरक पडला? त्याआधी माझी एक समज तुम्हाला
सांगतो. आयुष्याच्या
त्या त्या टप्प्यावर काही विशिष्ट दृष्टीकोन आपली सोबत करत असतात. स्वत:विषयी,
कामासंबंधी, आजूबाजूच्या लोकांविषयी आणि इतर अनेक (खरं तर सर्वच) बाबतीत ते असू
शकतात. कालांतराने काही दृष्टीकोन मागे पडतात तर काही आपल्या जगण्याचा अविभाज्य
भाग बनतात. त्यामुळे घडलेल्या घटनांइतकेच त्यामागचे आपले दृष्टीकोन सुद्धा
महत्त्वाचे असतात. किंबहुना घटनांची गाडी तेच ड्राइव्ह करत असतात. माझ्या या
समजेमागे काही मानसशास्त्रीय सिद्धांतांचा आधार सुद्धा आहे.
तर ह्या पुस्तकाने माझ्या आत्ताच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेला एक अनमोल
दृष्टीकोन मला दिला. पुस्तक वाचले तेव्हा कवितेच्या रुपात तो मला स्फुरला होतात.
आता निखिलच्या सूचनेनुसार ही प्रस्तावना लिहून काढली इतकंच. कधी भेटलात तर किंवा
फोनवर सुद्धा यावर अधिक बोलायला मला आवडेल.
इथे एक बाजार भरला आहे
सत्याची दुकाने, शहाणपणाच्या पाणपोया
नैतिकतेची गाईडं विकणारे चतुर सेल्समन
बाजारभर भटकत आहेत आकर्षक जाहिराती करत
वाटसरुला योग्य वाटेला लावण्यासाठी
इथे एक शाळा भरली आहे
सत्यमार्गाचे तयार नकाशे भिंतींना टांगलेले
शिकवले जातायेत नैतिकतेचे धडे
सुनावले जातायेत शहाणपणाचे बोल
शिकणार्याला शहाणं करुन सोडण्यासाठी
इथे एक दवाखाना चालू आहे
चाललंय सत्याचे लसीकरण
नैतिकतेचे दोन थेंब पाजणं
शहाणपणाची प्रिस्क्रिप्शन्स लिहिणं
रुग्णाचा रोग कायमचा मिटवण्यासाठी
माझ्या वाटेने जातांना लागलेले हे विसावे
क्षणभर वाटलं मुक्काम करावा इथेच
पण रस्ता सापडल्यासारखं दिसेना
ज्ञान मिळाल्यासारखं वाटेना
रोग कायमचा मिटता मिटेना
म्हणून मी पुन्हा वाटेला लागलोय
आता बाजारातले चतुर सेल्समन नकोत
सत्यमार्गाचे तयार नकाशे नकोत
शहाणपणाचे ठरलेले प्रिस्क्रिप्शन्स नकोत
रेडीमेड गोष्टींवरचा माझा विश्वास उडालाय
आता मला माझीच वाट प्यारी आहे
रस्ते चुकल्यामुळेच रस्ते सापडायत
रोगी शरीरामध्येच उपचार दिसतायत
अज्ञानातूनच ज्ञानाची दारं खुलतायत
सत्य, शहाणपण, नैतिकता, वगैरे अनुभवातनं कळतायत
No comments:
Post a Comment