'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth
Saturday, 9 March 2013
निर्माण 5 च्या शिबीरमालिकेत वैद्यकीय मित्र सामील
निर्माण 5 शिबीरमालिकेतील दुसर्या गटाचे
पहिले शिबीर 2 ते 10 फेब्रुवारी, 2013 या दरम्यान यशस्वीरित्या पार पडले. या गटात
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आरोग्य क्षेत्रात काम करु इच्छिणार्या 56
तरुण-तरुणींचा सहभाग होता.
निर्माणच्या प्रत्येक पहिल्या शिबिराप्रमाणे ‘तारुण्यभान
ते समाजभान’ व ‘स्वत:ची ओळख’ या शिबिराच्या मध्यवर्ती संकल्पना होत्या. याशिवाय आरोग्ययंत्रणेत
हितसंबंध असणाऱ्या विविध घटकांच्या दृष्टीने ‘सर्वांत चांगला डॉक्टर कोण?’ या
छोट्या स्वाध्यायाची आखणी करण्यात आली होती. विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या
मुलांनी सादरीकरण केले व संपूर्ण आरोग्ययंत्रणेचं चित्र उभे राहिले. यादरम्यान
डॉ.अभय बंग (नायना), डॉ. योगेश काळकोंडे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
Nero’s Guest या शेतकऱ्यांच्या
आत्महत्यांवर आधारित लघुपटाने शिबिरार्थ्यांना हलवून सोडले. त्याचा परिणाम होऊन शेतकर्यांच्या
संवेदना जाणण्यासाठी सर्वांनी एक वेळेचा उपवास केला. या वेळेचा सदुपयोग करून
स्वतःच्या जीवनशैलीत बदल करण्याचे संकल्प अनेकांनी केले, तसेच या प्रश्नाचा अभ्यास
करून त्यावर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
निर्माणच्या शिबिरांतून समाजाप्रती जबाबदारी
व त्या साठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते. याची सुरुवात कशी करावी याचे
उदहारण काही जणांच्या प्रवासातून समोर आले. त्यामध्ये डॉ. अभय बंग (नायना) यांच्या
‘सेवाग्राम ते शोधग्राम’ बरोबरच आनंद बंग, सुजय काकरमठ यांनी देखील आपला प्रवास
सर्वांसमोर मांडला.
पुढील ६ महिन्यांत आपण प्रत्यक्ष काय करु
शकतो- याचे सर्वांनी व्यक्तिगत व सामजिक पातळीवर नियोजन केले. शेवटी ‘हम होंगे
कामयाब...’ गुणगुणत या शिबीराची समाप्ती व प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली.
गोपाल महाजन व अजय होले करताहेत रोजगार हमीच्या परिणामकारकतेचा अभ्यास
भारतात २००५ मध्ये रोजगार हमीचा कायदा झाला. तेव्हापासून ग्रामीण भागात
रोजगार निर्मिती व त्याबरोबर नैसर्गिक संसाधनांची निर्मिती, संवर्धन व व्यवस्थापन या प्रमुख उद्देशांनी रोजगार हमी
योजनेची (रोहयो) कामे सुरु आहेत. 'रोहयो द्वारा होणाऱ्या
कामांची गुणवत्ता व उपयोग' असा अभ्यास नाशिकमधील ‘प्रगती
अभियान’ या संस्थेच्या वतीने करण्यात आला. गोपाल महाजन आणि अजय होले यांनी हा
अभ्यास केला. नाशिकमधील इगतपुरी, त्र्यंबक आणि पेठ
तालुक्यातील एकूण ९ आदिवासी गावातील ४० कामांचे त्यांनी प्रत्यक्ष सर्व्हेक्षण
केले. यात रोहयोच्या कामांद्वारे तेथील लोकांच्या जीवनात झालेले बदल, उत्पन्न, स्थलांतराचे प्रमाण तसेच कामाची तांत्रिक
गुणवत्ता, शेतीवरील परिणाम इ. चा समावेश होता. तसेच रोहयोचे
गाव पातळीवरील नियोजन व अंमलबजावणी या दोन्ही प्रक्रियांचाही त्यांनी सखोल अभ्यास
केला. हा अभ्यास व त्याच्या विश्लेषणातून मिळालेले निष्कर्ष खूपच महत्वपूर्ण आणि
पुढील कामासाठी उपयोगी आहेत असा त्या दोघांचा अनुभव आहे.
‘प्रगती अभियान’बद्दल अधिक माहितीसाठी: http://www.pragatiabhiyan.org/index.htmlअटकेची पर्वा न करता, अल्पवयीन मुलीला न्याय मिळण्यासाठी धुळे गटाचा मोर्चा
२९ जानेवारीला नाशिकमधील एका १४ वर्षीय मुलीला धुळ्यातील कुंटणखान्यात डांबून
ठेवल्याची घटना समोर आली. त्या अल्पवयीन मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा व
आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी, धुळ्यातील निर्माणच्या गटाने प्रतिभा शिंदे ह्यांच्या नेतृत्वाखाली २
फेब्रुवारी २०१३ रोजी मोर्चा काढला आणि जिल्हाधिकारी व एस.पीं.ना निवेदन सादर केले.
ह्या प्रकरणी पोलिसांनी ४ लोकांना त्वरित अटक केली, मात्र
गुन्ह्यातील मुख्य आरोपी विजय ताटीया याचे वरपर्यंत लागेबांधे असल्यामुळे त्यांना
अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करत होते.
ह्यावर पुन्हा एकदा धरणे आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली असता
ती नाकारण्यात आली. मात्र विरोधाला न जुमानता निर्माण गटाने ४ फेब्रुवारीला धरणे
आंदोलन केले. ह्यावर प्रतिक्रिया म्हणून पोलिसांनी १४ लोकांना अटक केली. ह्यात
निर्माणचे संदीप देवरे, पूजा वारुळे, माधुरी मगर, जागृती बोरसे ह्यांचा समावेश होता. ह्या
सर्वांवर कलम १६८, १६९ खाली गुन्हा नोंदवून त्यांना दीड
तासाने सोडण्यात आले.
अटकेने घाबरून न जाता या गटाने प्रतिभा शिंदेंच्या नेतृत्वाखाली विधानभवनात
नीलम गोऱ्हेंची भेट घेतली व श्री. आर. आर. पाटील ह्यांना निवेदन सादर केले. यानंतर
काही दिवसांतच धुळे पोलिसांनी २ आरोपींना अटक केली व फरारी विजय ताटीयावर १०,००० रुपयांचे पारितोषिक जाहीर केले. तसेच धुळ्यातील महिला
सुरक्षेबद्दल एक समिती स्थापन करून त्यात निर्माण सदस्यांचाही समावेश करण्याचे
आश्वासन धुळे पोलिसांनी दिले. बलात्कार झालेल्या मुलीचा जबाब पोलिसांनी कलम १६४
अंतर्गत न्यायाधीशांसमोर लिहून घेतला.
त्या अल्पवयीन मुलीच्या पुनर्वसनाचे काम सध्या निर्माण गट पुढे नेत असून
त्यासाठी जिल्हाधिकारी व महिला बालकल्याण
विभागाशी चर्चा सुरु आहे.
झारखंडच्या बालमृत्यूदरावर नजर ठेवण्यासाठी अतुल-अश्विनचे सॉफ्टवेअर
‘Home Based Newborn Care (HBNC)’ या सर्चच्या कार्यक्रमामार्फत
बालमृत्यूदरातील नवजात बाळाचा टक्का व एकूणच बालमृत्यूदर वेगाने कमी झाला आहे. या
कार्यक्रमाला मान्यता मिळाली असून वेगवेगळ्या ठिकाणी बालमृत्यू कमी करण्यासाठी
त्याची अंमलबजावणी सुरू आहे. झारखंडमध्ये या सराईकेला भागातील १७४ गावांत हा
कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी झारखंड सरकार, Tata Steel Rural Development
Society व America India Foundation यांनी घेतली आहे. झारखंडमधील गावागावांत आरोग्यदूतांनी जमा
केलेली बाळांविषयी माहिती कॉम्प्युटरमध्ये फीड करणे (data entry) व या माहितीच्या आधारे आवश्यक ते
मासिक अहवाल तयार करणे यासाठी सर्चचे इंजिनियर्स निर्माण ३ चे अश्विन भोंडवे व
अतुल गायकवाड यांनी एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरचा वापर करून
झारखंडच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना एका क्लिकवर ठराविक भागात व ठराविक काळात
जन्मलेल्या बाळांपैकी किती बाळे मरण पावली, किती अपुऱ्या महिन्याची/कुपोषित आहेत व
किती बाळांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे हे वेळच्यावेळी कळू शकणार आहे. तसेच
त्यांना गावपातळीवरील सर्व आरोग्यदूत व त्यांच्या कामाचे पर्यवेक्षण करणारे
पर्यवेक्षक यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणे व कार्यक्रम सुरळीत चालू आहे का यावर
लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
या सॉफ्टवेअरचा user interface विकसित करण्यासाठी अतुल व अश्विनने
गडचिरोलीच्या स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांचे सक्षमीकरण केले होते. या
सॉफ्टवेअरसाठी अतुल-अश्विनला सर्चच्या संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख श्री. महेश
देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
लोकसहभागातून कामाविषयी डॉ. सुजय काकरमठचे ज्युनिअर्सना मार्गदर्शन
निर्माण ४ चा सुजय काकरमठ गेले ९
महिने सर्च येथे फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून गडचिरोलीच्या ४४ आदिवासी
गावांना आरोग्यसेवा देत आहे. मुंबईच्या लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयातून
त्याने MBBSची पदवी घेतली असून त्याच्या महाविद्यालयाने नुकतेच आयोजित केलेल्या ‘TRINITY’ परिषदेत त्याने एका परिसंवादात भाग
घेतला. ‘वैद्यकीय शिक्षणाचा प्रत्यक्षात काम करताना किती उपयोग होतो?’ याविषयी
मांडणी करण्यासाठी वेगवेगळया भूमिकांमध्ये कार्यरत व्यक्तींना परिसंवादात
निमंत्रित केले गेले होते. त्यात नुकतेच वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर
वैद्यकीय काम करणाऱ्या डॉक्टरची भूमिका सुजयने मांडली. याच परिषदेत डॉ. अभय बंग
(नायना) यांना ‘Research with the people’ याविषयी बोलण्यासाठी निमंत्रित केले गेले होते. नायनांनी
युवा डॉक्टरांना ‘Go where the problems are and not where you are a problem’ असा मंत्र दिला. सामाजिक योगदान
देण्याच्या दृष्टीने त्यांनी ‘निर्माण’ची तोंडओळख करून दिली व याच महाविद्यालयाचा
सध्या आदिवासींना आरोग्यसेवा देत असलेला निर्माणी म्हणून सुजयला आपले अनुभव
मांडण्याची संधी दिली. सुजयने वैद्यकीय शिक्षण व internship दरम्यान त्याला पडलेले प्रश्न,
त्यांची उत्तरे शोधण्यासाठी त्याची धडपड व आदिवासींना आरोग्यसेवा देताना आलेले
अनुभव आपल्या भाषणातून मांडले. याच परिषदेच्या निमित्ताने नायना व सुजयने
मुंबईतल्या निर्माणींसोबत संवाद साधला.
महाविद्यालयात बरेचदा प्रवाहाची
दिशा आपली स्वप्ने ठरवत असतो. मात्र आव्हानात्मक, तरीही समाधान देणाऱ्या मार्गाचा प्रत्येकाला
शोध असतो. महाविद्यालयात होणाऱ्या परिषदा, संमेलने ही अस्वस्थ तरुणाईसोबत संपर्क
साधण्यासाठी उत्तम माध्यमे असल्याचे सुजयच्या अनुभवातून समजते.
स्मिता तोडकर व केदार आडकर ‘सर्च’मध्ये रुजू
केदारने Hospital management मध्ये पदविका घेतली असून त्यानंतर Human
Resources या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सर्चच्या
प्रशासकीय विभागाला तो अतिथीगृहे, मेस व विविध प्रशिक्षणांच्या व्यवस्थापनात मदत
करेल. पहिल्या महिन्यात त्याने श्रमदानाच्या माध्यमातून सर्चमधील प्रक्रियांचे
निरीक्षण करण्यास सुरुवात केलेली आहे. याशिवाय सर्चमधील प्लास्टिकची विल्हेवाट कशी
लावता येईल यासाठी तो प्रयत्नशील आहे.
Subscribe to:
Posts (Atom)


