'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 10 January 2013

तिनका तिनका जर्रा जर्रा


मित्रहो.
          जरा मोठी गोष्ट लिहितो. आहे 'गोष्ट'च, पण 'गहिरी' आहे. रिचर्ड फाईनमन या भौतिकशास्त्रज्ञाची बीबीसीचा एक वार्ताहर मुलाखत घेत होता, फाईनमनला नोबेल पारितोषिक मिळाले तेव्हा. दोन लोहचुंबके एकमेकांना ढकलतात तेव्हा नेमके काय होते, असा प्रश्न होता. आता फाईनमन----
"असे पाहा, तुम्ही जेव्हा विचारता की अमुक का होते, तेव्हा कसे उत्तर द्यायचे? उदाहरण पाहा,
मिनीमावशी इस्पितळात आहे. का?
बर्फावर गेली. घसरली. कंबरडे मोडले.
माणसांना हे पुरते. पण परग्रहावरील कोणी आले, तर?
'का' हे समजावून सांगायला काही चौकट लगते, की हे हे, अमुक अमुक खरे मानलेले आहे.
नाहीतर तुम्ही सतत 'का' विचारात राहता आणि चहुबाजूंनी खोलात शिरत जाता.
आता बर्फावर का घसरली?
बर्फ निसरडा असतो म्हणून.
बर्फ का निसरडा असतो? इतर घन पदार्थ तर नसतात निसरडे?
कारण तुम्ही बर्फावर उभे राहिलात की त्या दाबाने बर्फ वितळते.
एका क्षणी तुम्ही पाण्यावर उभे असता.
पण हे बर्फावरच का होते?
कारण पाण्याचे बर्फ होताना प्रसरण होते. हे प्रसरण दाबामुळे नाहीसे होते.
मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत नाही आहे. 'का'ची उत्तरे देणे किती कठीण असते, ते सांगतो आहे.
तुम्हाला काय समजू शकते आणि काय नाही, हे नीट समजायला हवे.
बरे, मी जितक्या खोलात जातो, तितकी उत्तरे मजेदार होत जातात.
आता तुम्ही विचारलेत, की चुंबके का ढकलतात. याच्या अनेक पातळया आहेत.
तुम्ही भौतिकी शिकला आहात की तुम्हाला काहीच येत नाही, यावर बरेच अवलंबून आहे.
तुम्हाला काहीच येत नसेल, तर मी एवढेच सांगू शकतो, या दोन चुंबकामध्ये चुंबकीय बल असते.
तुम्ही म्हणाल, हे विचित्रच आहे. मला इतर कुठे असे बल जाणवत नाही.
तुम्ही खुर्चीवर हात टेकता, आणि ती तुम्हाला आधार देते तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटत नाही.
आम्हाला मात्र नीट तपासून समजले आहे, की खुर्चीने आधार देणे हाही चुंबकीय बळाचा प्रकार आहे.
हे समजायला तुम्हाला इतर बरेच काही सांगावे लागेल.
तर काय, मी तुम्हाला चुंबके का ढकलतात हे नीटसे सांगू शकत नाही आहे.
सांगूच शकत नाही आहे.
तुम्हाला ज्यांची सवय आहे अशा कल्पनांमध्ये चुंबकीय बल समजावून देता येईल, असे मला काही माहीतच नाही आहे."

तर, यार लोग, प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी मुळात आपल्याला थोडं तरी ज्ञान लागतं!
वरचा उतारा जेम्स ग्लाईकच्या "जीनियस" या फाईनमनच्या चरित्रातून घेतला आहे.

नंदा

पुस्तक परिचय: Siddhartha- Hermann Hesse


साधारणत: वर्षभरापूर्वी प्रचंड कंटाळा आला होता म्हणून आणि त्या क्षणी काहीही करायची इच्छा होत नव्हती म्हणून स्वत:च्या संग्रहात बरेच दिवस धूळ खात पडलेले हे पुस्तक हाती लागलं. तसं त्या रात्रीच ते वाचून झालं. मात्र ते डोक्यात ‘क्लिक’ झालं काही दिवसांनी पुन्हा चाळतांना!

सिद्धार्थ आणि गोविंद हे दोन मित्र आपल्यासारखेच जगण्याच्या प्रयोजनाच्या शोधात असतात. शोधाच्या सुरवातीला ते काहीसे भरकटतात. ‘सापडला’ असा वाटलेला मार्ग नंतर त्यांना अधूरा वाटू लागतो. योगायोगाने ते गौतम बुद्धाच्या सानिध्यात काही दिवस राहतात. बुद्धांच्या तेजपुंज व्यक्तीमत्त्वाने आणि ओघवत्या वाणीने गोविंद भारावून जातो. बुद्धांनी सांगितलेला संदेश आचरण्यातूनच आपल्याला जगण्याचे प्रयोजन सापडेल ह्याविषयी त्याच्या मनात तिळमात्र शंका उरत नाही. म्हणून गोविंद बुद्धाच्या धम्म जीवनाला शरण जातो. सिद्धार्थ मात्र हे नाकारतो. ते नाकारण्याचे कारण बुद्धांसोबतच्या त्याच्या भेटीत तो सांगतो.

सिद्धार्थ पुन्हा पण आता एकटाच त्याच्या आत्मशोधास सुरुवात करतो. सर्व प्रकारचे जीवनानुभव यथेच्छ घेतो. प्रयोजनाच्या शोधास त्याज्य किंवा घातक मानण्यात आलेले अनुभव सुद्धा स्वत: घेतो. त्याच त्याच चुका हजार वेळा करतो. मात्र तरीही शेवटी तो क्षण येतो...  

सिद्धार्थचा आता ‘बुद्ध’ झाला आहे. योगायोगाने त्याचा मित्र गोविंद त्याला भेटतो. गोविंदने आपल्या आयुष्याचा मधला काळ गौतम बुद्धाचा संदेश कायावाचामने आचरण्यात घालवलेला असतो. मात्र तरीही गोविंदाचा ‘कोरडा पाषाण’ झालेला आहे.

नोबेल विजेता हर्मन हेस ची सगळ्यात प्रसिद्ध अशी ही कादंबरी – “सिद्धार्थ”!

ह्या पुस्तकाने माझ्या जगण्यात काय फरक पडला? त्याआधी माझी एक समज तुम्हाला सांगतो.                      आयुष्याच्या त्या त्या टप्प्यावर काही विशिष्ट दृष्टीकोन आपली सोबत करत असतात. स्वत:विषयी, कामासंबंधी, आजूबाजूच्या लोकांविषयी आणि इतर अनेक (खरं तर सर्वच) बाबतीत ते असू शकतात. कालांतराने काही दृष्टीकोन मागे पडतात तर काही आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनतात. त्यामुळे घडलेल्या घटनांइतकेच त्यामागचे आपले दृष्टीकोन सुद्धा महत्त्वाचे असतात. किंबहुना घटनांची गाडी तेच ड्राइव्ह करत असतात. माझ्या या समजेमागे काही मानसशास्त्रीय सिद्धांतांचा आधार सुद्धा आहे.

तर ह्या पुस्तकाने माझ्या आत्ताच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेला एक अनमोल दृष्टीकोन मला दिला. पुस्तक वाचले तेव्हा कवितेच्या रुपात तो मला स्फुरला होतात. आता निखिलच्या सूचनेनुसार ही प्रस्तावना लिहून काढली इतकंच. कधी भेटलात तर किंवा फोनवर सुद्धा यावर अधिक बोलायला मला आवडेल.
 

इथे एक बाजार भरला आहे
सत्याची दुकाने, शहाणपणाच्या पाणपोया
नैतिकतेची गाईडं विकणारे चतुर सेल्समन
बाजारभर भटकत आहेत आकर्षक जाहिराती करत
वाटसरुला योग्य वाटेला लावण्यासाठी 

इथे एक शाळा भरली आहे
सत्यमार्गाचे तयार नकाशे भिंतींना टांगलेले
शिकवले जातायेत नैतिकतेचे धडे
सुनावले जातायेत शहाणपणाचे बोल
शिकणार्‍याला शहाणं करुन सोडण्यासाठी

इथे एक दवाखाना चालू आहे
चाललंय सत्याचे लसीकरण
नैतिकतेचे दोन थेंब पाजणं
शहाणपणाची प्रिस्क्रिप्शन्स लिहिणं 
रुग्णाचा रोग कायमचा मिटवण्यासाठी
माझ्या वाटेने जातांना लागलेले हे विसावे
क्षणभर वाटलं मुक्काम करावा इथेच
पण रस्ता सापडल्यासारखं दिसेना
ज्ञान मिळाल्यासारखं वाटेना
रोग कायमचा मिटता मिटेना 

म्हणून मी पुन्हा वाटेला लागलोय
आता बाजारातले चतुर सेल्समन नकोत
सत्यमार्गाचे तयार नकाशे नकोत
शहाणपणाचे ठरलेले प्रिस्क्रिप्शन्स नकोत
रेडीमेड गोष्टींवरचा माझा विश्वास उडालाय

आता मला माझीच वाट प्यारी आहे
रस्ते चुकल्यामुळेच रस्ते सापडायत
रोगी शरीरामध्येच उपचार दिसतायत
अज्ञानातूनच ज्ञानाची दारं खुलतायत
सत्य, शहाणपण, नैतिकता, वगैरे अनुभवातनं कळतायत  


गोपाल महाजन

व्यंकचित्र, डिसेंबर २०१२


Tuesday, 4 December 2012

कर के देखना है?


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
२ वर्षांपूर्वी २०१० च्या डिसेंबर महिन्यात नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एका आगळ्यावेगळ्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. सुमारे ५००० ग्रामीण स्त्रिया व पुरुष, आपली रोजी चुकवून आलेले, चिमूर ते नागपूर मधील तब्बल १३५ किमी अंतर कापून, चालत चालत. कपडे मळलेले, ऐन थंडीत घामाच्या धारा, मात्र उत्साहात कुठेच कमी नाही. त्यांच्या तार सप्तकातल्या घोषणांनी उभे नागपूर दणाणून गेले. श्रमिक एल्गार व गुरुदेव सेवा मंडळाने श्रीमती पारोमिता गोस्वामींच्या नेतृत्वाखाली काढलेला चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीची मागणी करणारा हा मोर्चा. दारूच्या झळा सोसलेल्या सामान्य महिलांना तोंड देताना सर्वच नेतृत्वाची तारांबळ उडाली. खुद्द मुख्यमंत्र्यांना पारोमिता ताई, डॉ. राणी बंग (अम्मा) व सहकाऱ्यांसोबत चर्चा करण्यावाचून पर्याय उरला नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना २ महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तज्ञांची समितीही नेमली. समितीने फेब्रुवारी २०१२ मध्ये आपला अहवालही सादर केला. मात्र अजूनही दारूबंदीबाबत कोणताही निर्णय नाही.
पण चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी का? साधी सोपी आकडेवारी पाहू. मागील वर्षी चंद्रपूर जिल्ह्यात साधारणपणे तब्बल ४०० कोटी रुपयांची दारू विकली गेली. चंद्रपूरची लोकसंख्या २० लाख, म्हणजेच साधारणपणे ४ लाख कुटुंबे. याचा अर्थ दारूमागे प्रत्येक कुटुंबाचे दर वर्षी १० हजार रुपये खर्च होतात! मग चंद्रपुरात दारूचा पूर आलाय असं म्हणायला हरकत नाही, नाही का?
आपल्याला काय फरक पडतो? येऊ दे की चंद्रपुरात पूर...
चंद्रपूरच्या पूर्वेला गडचिरोलीत दारूबंदी आहे, छत्तीसगढमध्ये दारूबंदीची प्रक्रिया सुरू आहे. दक्षिणेला आंध्रात अंशतः दारूबंदी आहे (देशी दारूवर बंदी). पश्चिमेला वर्ध्यात दारूबंदी आहे तर यवतमाळमध्ये दारूबंदीची मागणी जोर धरू लागली आहे. म्हणजे चंद्रपूरच्या भोवती दारूबंदीची भिंत! मात्र या दारूबंद प्रदेशात चंद्रपुरातून बेकायदेशीर दारूची विक्री होते. इथल्या वैनगंगेला गंमतीने ‘वाईन’गंगा म्हटले जाते. एकेक सुटा दारूबंद जिल्हा असला की अवैध दारूची वाहतूक रोखणे कठीण, मात्र एक लांब दारूबंद झोन असला तर ही वाहतूक रोखणे तुलनेने सोपे होऊन जाते. मग करूयात का चंद्रपूर दारूबंदीची मागणी?
काय म्हणता? तुम्ही चंद्रपूरचे नाही, वर्धा, गडचिरोली, छत्तीसगढ, आंध्राचेही नाही?
उभ्या महाराष्ट्रात मागच्या वर्षी ३० हज्ज्जार कोटी रुपयांची दारू खपली. म्हणजे जवळजवळ दीड तेलगी स्टँप घोटाळा किंवा अर्धा सिंचन घोटाळा एका वर्षात, एकट्या महाराष्ट्रात! बरं दारू म्हणजे काही दूध नव्हे. Cancer, liver cirrhosis या शारीरिक आजारांसोबतच नैराश्य, वेडेपणा इ. मानसिक आजार, त्यातून घडणाऱ्या आत्महत्या, अपघात, घराबाहेरचे व घरात घडणारे गंभीर गुन्हे, ही सर्व दारूचीच पिलावळ. २०% शेतकऱ्यांच्या आत्महत्या दारूमुळे (इति मा. नारायण राणे) व ५०% अपघात दारूच्याच नशेत! मग हा चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या नवऱ्याकडून मार खाणाऱ्या एका महिलेचा प्रश्न का आपणा सर्वांचा प्रश्न?
मग लढूयात का दारूविरुद्ध? पण कसे?
  • १२-१२-२०१२ रोजी हिवाळी अधिवेशनात पारोमिता ताईंच्या नेतृत्वाखाली चंद्रपूरच्या दारूबंदीची मागणी करणारा मोर्चा पुन्हा निघणार आहे. येणार का नागपुरात? आम्ही जात आहोत.
  •  दारूप्रश्न, दारूचे दुष्परिणाम, दारूमागचे अर्थशास्त्र, नीतीशास्त्र, राजकारण समजून घ्यायचे का? नायनांचे दारूसंबंधी ४ लेख आपण येथे वाचू शकतो: 
          http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/2/Letter_to_CM_Against_Alcohol.pdf
          http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Daru_Vishai_Aadhunik_Paschyaatya_Chintan.pdf
          http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/Daru_Mukti_Dhoran.pdf
          http://nirman.mkcl.org/Downloads/Articles/3/Dhayapasoon%20Darula%20Virodh_Dr%20Abhay%20Bang.pdf
  • आपल्या जिल्ह्यात दारूचा प्रश्न किती मोठा आहे? RTI टाकून जाणून घ्यायचं का?
  •  सह्यांची मोहीम हाती घ्यायची का? चंद्रपूरच्या दारूबंदीची मागणी करणाऱ्या १० हजार जणांची नावे व सह्या मुख्यमंत्र्यांना पाठवायच्या का? (१० हजार लोकांच्या १० हजार प्रश्नांना उत्तरे देताना आपलीही समज वाढत जाईल.)
  • चंद्रपूर दारूबंदीची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री व शरद पवारांना पाठवायचे का?
  • महाराष्ट्रात ज्या ठिकाणी निर्माणींचा गट असेल तेथे प्रत्येकी १ चर्चासत्र घ्यायचे का?
  • अजून काय करता येईल? तुम्ही सुचवा ना...

चारुता गोखलेचे Indian council of medical research द्वारा आयोजित कॉन्फरन्समध्ये ‘मलेरिया’वरील संशोधनाचे सादरीकरण


निर्माण १ च्या चारुताने मदुराई येथे Indian council of medical research द्वारा आयोजित कॉन्फरन्समध्ये ‘मलेरिया’ या विषयावर सादरीकरण केले. Medical arthopodology (आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍य़ा कीटकांचे शास्त्र) असा या कॉन्फरन्सचा विषय होता.
चारुता गेली दीड वर्षे सर्च संस्थेबरोबर मलेरिया नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत काम करत आहे. राधिका सुंदराराजन या हार्वर्ड विद्यापीठाच्या डॉक्टरसोबत सर्चने नुकतेच एक संशोधन पूर्ण केले. या संशोधनाअंतर्गत आदिवासी लोकांच्या मलेरियासंबंधीच्या समजुती, मलेरिया प्रतिबंधात्मक उपाय तसेच सरकारी अधिकार्‍यांच्या दृष्टीने राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रमातील त्रुटी, त्यातील संभाव्य सुधारणा याचा खोलवर अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून पुढे आलेले निष्क़र्ष चारुताने या दोन दिवसीय कॉंन्फरन्सदरम्यान तज्ञांपुढे मांडले. उपस्थितांमध्ये देशभरातील कीटकशास्त्रज्ञ, सामाजिक आरोग्य क्षेत्रातील शास्त्रज्ञ तसेच सरकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि पीएचडी विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
कॉंन्फरन्समध्ये प्रामुख्याने रोग ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे कीटक जे जंतुंचे वाहक असतात अशा  मलेरिया, फायलेरिया, डेंगी याविषयी लोकांनी सादरीकरण केले. यातील काही अभ्यास हे प्रयोगशाळेपुरते मर्यादित होते तर काही अभ्यासामधून बाहेर आलेली निरीक्षणं ही राष्ट्रीय कार्यक्रमांमधील सुधारणांच्या द्ष्टीने महत्त्वाची होती.
चारुताला कॉंन्फरन्सदरम्यान या अभ्यासासंबंधी अनेक सुझाव मिळाले. या अभ्यासाचे पुढे होणारे परिणाम, अभ्यास अधिक प्रभावी होण्यासाठी आवश्यक असणार्‍या सुधारणा, शोधनिबंध लिहिताना घ्यायची काळजी या मुद्यासंबंधी अनेक तज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. सर्चच्या मलेरिया नियंत्रण कार्यक्रमालाही या अभ्यासाचा फायदा होईल अशी आशा आहे

अशीही एक दिवाळी


रामानंद जाधवची जाराबंडी वैद्यकीय पथकात आगळीवेगळी दिवाळी
गडचिरोली जिल्ह्यातील जाराबंडी प्राथमिक आरोग्य पथकात वैद्यकीय अधिकाऱ्याची जबाबदारी सांभाळणारा रामानंद जाधव दिवाळीला घरी जात असताना त्याला जाराबंडीच्या ग्रामसेवकाचा फोन आला. जाराबंडीजवळ झालेल्या पोलीस व नक्षलवाद्यांच्यात झालेल्या चकमकीत ३ पोलीस जखमी झाल्याचे वृत्त रामानंदला समजले. आपत्कालीन परिस्थितीत कधीही वैद्यकीय अधिकाऱ्याची गरज लागू शकते हे समजून घेऊन जाराबंडीपासून १५० किमी. आलेला रामानंद त्वरित मागे फिरला व आपल्या वैद्यकीय पथकात रुजू झाला. वरवरची जखम असणाऱ्या २ पोलीसांवर आवश्यक ते उपचार केले. त्याच्या आईवडिलांनीही घाबरून न जाता उलट रामानंदला धीर दिला व दिवाळीत स्वतःच जाराबंडीला आले. आपले कर्तव्य बजावल्याचे, गरज असताना आईवडिलांचा आधार मिळाल्याचे व दिवाळीत वैद्यकीय पथकात राहिल्यामुळे मलेरियाच्या एका गंभीर रुग्णाला बरे करू शकल्याचे रामानंदला नक्कीच समाधान वाटत असेल.