गडचिरोली जिल्ह्यातील तुडमेळ या आदिवासी गावात सर्चच्या फिरत्या
दवाखान्याच्या माध्यमातून रुग्ण तपासणी करत असताना ३ महिन्याचे एक बाळ कुपोषित
असल्याचे (वजन: २.४१० किग्रॅ) डॉ. सुजय काकरमठच्या लक्षात आले. भाताच्या कापणीचे
काम सुरू असल्यामुळे ५० किमी दूर जिल्हा रुग्णालयात बाळाला भरती करण्यास पालकांनी नकार
दिला. जिल्हा रुग्णालयातील Nutritional
Rehabilitation Center (NRC) मध्ये कुपोषित बाळाला पोषणतत्वे देऊन
त्याचे वजन वाढवण्याची सोय आहे. तिथे भरती केल्यास खर्च तर येणार नाहीच उलट
तेवढ्या काळात आईची बुडणारी रोजी सरकारतर्फे दिली जाईल याची शाश्वती देऊन सुजयने
पालकांचे समुपदेशन केले. पालक तयार झाल्यानंतर सुजयने बाळ व आईला गडचिरोलीत NRC मध्ये पोहोचवले. डॉ. मनोज तालापल्लीवार या तरुण व उत्साही सरकारी
डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली बाळाला पोषणतत्वे दिली गेली. १३ दिवसांत बाळाचे वजन
वाढून २.९३० किग्रॅ झाले. मात्र पुढच्याच महिन्यात तुडमेळ गावाला सुजयने दिलेल्या
भेटीदरम्यान NRC मधून सुट्टी होताच अवघ्या १५ दिवसांत बाळाचे
वजन तब्बल ४०० ग्रॅ. कमी झाले आहे असे लक्षात आले. दुर्गम गावात आरोग्यसुविधा
पोहोचवण्यासाठी फिरते वैद्यकीय पथक पोहोचणे, वैद्यकीय अधिकाऱ्यांना गावातले
कुपोषित बाळ निदर्शनास येणे, बाळाला जिल्हा रुग्णालयात वेळेत पोहोचवणे, जिल्हा
रुग्णालयात उत्तम सुविधा, आकर्षक सरकारी योजना व उत्साही डॉक्टर यांची उपलब्धता इतके
सारे होऊनही कुपोषित बाळाची स्थिती ‘जैसे थे’ का? कुपोषणाच्या किंवा एकूणच
आदिवासींच्या अनारोग्याच्या साखळीतील कमजोर कडी कोणती असे प्रश्न या बाळाच्या
निमित्ताने निर्माण झाले आहेत.
'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...
समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...
'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!
निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth
Thursday, 10 January 2013
डॉ. शिवप्रसाद थोरवे आता भामरागडमध्ये
मूळचा परभणीचा आणि औरंगाबाद शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. झालेला शिवप्रसाद गेले आठ महिने गडचिरोली
जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील पेंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय
सेवा देत होता. त्याच्या कार्यकाळात तेथील ओ.पी.डी. पेशंट्सची संख्या ही महिन्याला
सुमारे 1200 पर्यंत पोहोचली होती. ऑक्टोबर महिन्यात मात्र त्याच ठिकाणी शासकीय
सेवेतून कायमस्वरुपी वैद्यकीय अधिका-याची नेमणूक झाल्याने शिवप्रसादला त्याची जागा
सोडावी लागली. पण आपल्या एक वर्षाच्या बंधपत्रित वैद्यकीय सेवेचे चार महिने उरले
असल्याने शिवप्रसादने पुन्हा जिथे जागा आणि गरज असेल तेथे सेवा द्यायचे ठरवले.
गडचिरोली सारख्या मागास भागात काम करायला डॉक्टर्स राजी नसताना शिवप्रसादला मात्र
लगेच “वर्क ऑर्डर” न मिळता शासकीय लालफीतशाहीचा आणि दिरंगाईचा सामना करावा लागला.
एक महिना सतत प्रयत्न केल्यानंतर त्याला जिल्ह्यातील सर्वात मागास आणि दुर्गम अशा
भामरागड तालुक्यात नियुक्ती देण्यात आली आणि डिसेंबर पासून शिवप्रसाद तेथे रुजू
झाला. रुजू झाल्यानंतर एका महिन्यात त्याने संपूर्ण तालुका फिरुन तेथील आरोग्य
व्यवस्थेची सद्यस्थिती समजून घेण्यास सुरुवात केली आहे आणि स्वत: सेवा देण्यास
आरंभ केला आहे. हेमलकसाच्या निकट असल्याने डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या सोबत
त्याची ओळख झाली आहे आणि त्यांचेही मार्गदर्शन त्याला मिळते आहे.
डॉ. विक्रम सहाने ‘सर्च’ मध्ये रुजू
गडचिरोलीतील आदिवासी भागातील गट्टा व धानोरा येथील सरकारी रुग्णालयांत एक वर्ष
वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेतून सेवा दिल्यानंतर निर्माण ४ चा डॉ. विक्रम सहाने
पुढील प्रवासासाठी ‘सर्च’
या संस्थेत रुजू झाला आहे. सर्चमध्ये होणाऱ्या असंसर्गजन्य रोग,
बाळांच्या न्युमोनियाचे गावातल्या गावात उपचार, मृत्यूची कारणे इ. संशोधनात विक्रमचा सक्रीय सहभाग असेल.
‘सर्च’ बद्दल अधिक माहितीसाठी: http://searchgadchiroli.org/
अमोल वाकलेला 'बायफ' या संस्थेची शिष्यवृत्ती प्रदान
निर्माण २चा अमोल
वाकले याने आपले मास्टर्स माइक्रोबायोलॉजी या विषयात पूर्ण केले. नुकतीच 'बायफ' या संस्थेची शिष्यवृत्ती त्याला प्राप्त झाली.
याअंतर्गत जैविक खतांसंबंधीचे विविध
प्रयोग, जैविक खतांसाठी
वापरण्यात येणार्या सूक्ष्म
जीवांचा अभ्यास तसेच, त्यांच्या वापर प्रक्रियेमध्ये सुधार
या विषयांवर संशोधन करायची संधी अमोलला
मिळेल. त्याच्या या यशासाठी निर्माण
परिवारतर्फे त्याचे हार्दिक अभिनंदन आणि
पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा!
‘बायफ’ च्या SPARK Fellowship Programme बद्दल अधिक
माहितीसाठी: http://www.baif.org.in/spark_fellowship_prog_12_13.asp
तिनका तिनका जर्रा जर्रा
मित्रहो.
जरा मोठी गोष्ट लिहितो. आहे 'गोष्ट'च, पण 'गहिरी' आहे. रिचर्ड फाईनमन
या भौतिकशास्त्रज्ञाची बीबीसीचा एक वार्ताहर मुलाखत घेत होता, फाईनमनला नोबेल पारितोषिक मिळाले तेव्हा. दोन लोहचुंबके एकमेकांना ढकलतात तेव्हा
नेमके काय होते, असा प्रश्न होता. आता फाईनमन----
"असे पाहा, तुम्ही
जेव्हा विचारता की अमुक का होते, तेव्हा कसे उत्तर द्यायचे?
उदाहरण पाहा,
मिनीमावशी इस्पितळात आहे. का?
बर्फावर गेली. घसरली. कंबरडे मोडले.
माणसांना हे पुरते. पण परग्रहावरील कोणी आले, तर?
'का' हे समजावून सांगायला काही चौकट लगते,
की हे हे, अमुक अमुक खरे मानलेले आहे.
नाहीतर तुम्ही सतत 'का' विचारात राहता आणि
चहुबाजूंनी खोलात शिरत जाता.
आता बर्फावर का घसरली?
बर्फ निसरडा असतो म्हणून.
बर्फ का निसरडा असतो? इतर घन पदार्थ तर नसतात निसरडे?
कारण तुम्ही बर्फावर उभे राहिलात की त्या दाबाने बर्फ वितळते.
एका क्षणी तुम्ही पाण्यावर उभे असता.
पण हे बर्फावरच का होते?
कारण पाण्याचे बर्फ होताना प्रसरण होते. हे प्रसरण दाबामुळे नाहीसे होते.
मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत नाही आहे. 'का'ची उत्तरे देणे किती कठीण असते, ते सांगतो आहे.
तुम्हाला काय समजू शकते आणि काय नाही, हे नीट
समजायला हवे.
बरे, मी जितक्या खोलात जातो, तितकी उत्तरे मजेदार होत जातात.
आता तुम्ही विचारलेत, की चुंबके का ढकलतात. याच्या अनेक पातळया
आहेत.
तुम्ही भौतिकी शिकला आहात की तुम्हाला काहीच येत नाही, यावर बरेच अवलंबून आहे.
तुम्हाला काहीच येत नसेल, तर मी एवढेच सांगू
शकतो, या दोन चुंबकामध्ये चुंबकीय बल असते.
तुम्ही म्हणाल, हे विचित्रच आहे. मला इतर कुठे असे बल
जाणवत नाही.
तुम्ही खुर्चीवर हात टेकता, आणि ती तुम्हाला
आधार देते तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटत नाही.
आम्हाला मात्र नीट तपासून समजले आहे, की
खुर्चीने आधार देणे हाही चुंबकीय बळाचा प्रकार आहे.
हे समजायला तुम्हाला इतर बरेच काही सांगावे लागेल.
तर काय, मी तुम्हाला चुंबके का ढकलतात हे नीटसे
सांगू शकत नाही आहे.
सांगूच शकत नाही आहे.
तुम्हाला ज्यांची सवय आहे अशा कल्पनांमध्ये चुंबकीय बल समजावून देता येईल, असे मला काही माहीतच नाही आहे."
तर, यार लोग, प्रश्नांची
उत्तरं मिळण्यासाठी मुळात आपल्याला थोडं तरी ज्ञान लागतं!
वरचा उतारा जेम्स ग्लाईकच्या "जीनियस" या फाईनमनच्या चरित्रातून
घेतला आहे.
नंदा
पुस्तक परिचय: Siddhartha- Hermann Hesse
साधारणत: वर्षभरापूर्वी प्रचंड कंटाळा आला होता म्हणून आणि त्या क्षणी काहीही
करायची इच्छा होत नव्हती म्हणून स्वत:च्या संग्रहात बरेच दिवस धूळ खात पडलेले हे
पुस्तक हाती लागलं. तसं त्या रात्रीच ते वाचून झालं. मात्र ते डोक्यात ‘क्लिक’
झालं काही दिवसांनी पुन्हा चाळतांना!
सिद्धार्थ आणि गोविंद हे दोन मित्र आपल्यासारखेच जगण्याच्या प्रयोजनाच्या
शोधात असतात. शोधाच्या सुरवातीला ते काहीसे भरकटतात. ‘सापडला’ असा वाटलेला मार्ग
नंतर त्यांना अधूरा वाटू लागतो. योगायोगाने ते गौतम बुद्धाच्या सानिध्यात काही
दिवस राहतात. बुद्धांच्या तेजपुंज व्यक्तीमत्त्वाने आणि ओघवत्या वाणीने गोविंद
भारावून जातो. बुद्धांनी सांगितलेला संदेश आचरण्यातूनच आपल्याला जगण्याचे प्रयोजन
सापडेल ह्याविषयी त्याच्या मनात तिळमात्र शंका उरत नाही. म्हणून गोविंद बुद्धाच्या
धम्म जीवनाला शरण जातो. सिद्धार्थ मात्र हे नाकारतो. ते नाकारण्याचे कारण
बुद्धांसोबतच्या त्याच्या भेटीत तो सांगतो.
सिद्धार्थ पुन्हा पण आता एकटाच त्याच्या आत्मशोधास सुरुवात करतो. सर्व
प्रकारचे जीवनानुभव यथेच्छ घेतो. प्रयोजनाच्या शोधास त्याज्य किंवा घातक मानण्यात
आलेले अनुभव सुद्धा स्वत: घेतो. त्याच त्याच चुका हजार वेळा करतो. मात्र तरीही
शेवटी तो क्षण येतो...
सिद्धार्थचा आता ‘बुद्ध’ झाला आहे. योगायोगाने त्याचा मित्र गोविंद त्याला
भेटतो. गोविंदने आपल्या आयुष्याचा मधला काळ गौतम बुद्धाचा संदेश कायावाचामने
आचरण्यात घालवलेला असतो. मात्र तरीही गोविंदाचा ‘कोरडा पाषाण’ झालेला आहे.
नोबेल विजेता हर्मन हेस ची सगळ्यात प्रसिद्ध अशी ही कादंबरी – “सिद्धार्थ”!
ह्या पुस्तकाने माझ्या जगण्यात काय फरक पडला? त्याआधी माझी एक समज तुम्हाला
सांगतो. आयुष्याच्या
त्या त्या टप्प्यावर काही विशिष्ट दृष्टीकोन आपली सोबत करत असतात. स्वत:विषयी,
कामासंबंधी, आजूबाजूच्या लोकांविषयी आणि इतर अनेक (खरं तर सर्वच) बाबतीत ते असू
शकतात. कालांतराने काही दृष्टीकोन मागे पडतात तर काही आपल्या जगण्याचा अविभाज्य
भाग बनतात. त्यामुळे घडलेल्या घटनांइतकेच त्यामागचे आपले दृष्टीकोन सुद्धा
महत्त्वाचे असतात. किंबहुना घटनांची गाडी तेच ड्राइव्ह करत असतात. माझ्या या
समजेमागे काही मानसशास्त्रीय सिद्धांतांचा आधार सुद्धा आहे.
तर ह्या पुस्तकाने माझ्या आत्ताच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेला एक अनमोल
दृष्टीकोन मला दिला. पुस्तक वाचले तेव्हा कवितेच्या रुपात तो मला स्फुरला होतात.
आता निखिलच्या सूचनेनुसार ही प्रस्तावना लिहून काढली इतकंच. कधी भेटलात तर किंवा
फोनवर सुद्धा यावर अधिक बोलायला मला आवडेल.
इथे एक बाजार भरला आहे
सत्याची दुकाने, शहाणपणाच्या पाणपोया
नैतिकतेची गाईडं विकणारे चतुर सेल्समन
बाजारभर भटकत आहेत आकर्षक जाहिराती करत
वाटसरुला योग्य वाटेला लावण्यासाठी
इथे एक शाळा भरली आहे
सत्यमार्गाचे तयार नकाशे भिंतींना टांगलेले
शिकवले जातायेत नैतिकतेचे धडे
सुनावले जातायेत शहाणपणाचे बोल
शिकणार्याला शहाणं करुन सोडण्यासाठी
इथे एक दवाखाना चालू आहे
चाललंय सत्याचे लसीकरण
नैतिकतेचे दोन थेंब पाजणं
शहाणपणाची प्रिस्क्रिप्शन्स लिहिणं
रुग्णाचा रोग कायमचा मिटवण्यासाठी
माझ्या वाटेने जातांना लागलेले हे विसावे
क्षणभर वाटलं मुक्काम करावा इथेच
पण रस्ता सापडल्यासारखं दिसेना
ज्ञान मिळाल्यासारखं वाटेना
रोग कायमचा मिटता मिटेना
म्हणून मी पुन्हा वाटेला लागलोय
आता बाजारातले चतुर सेल्समन नकोत
सत्यमार्गाचे तयार नकाशे नकोत
शहाणपणाचे ठरलेले प्रिस्क्रिप्शन्स नकोत
रेडीमेड गोष्टींवरचा माझा विश्वास उडालाय
आता मला माझीच वाट प्यारी आहे
रस्ते चुकल्यामुळेच रस्ते सापडायत
रोगी शरीरामध्येच उपचार दिसतायत
अज्ञानातूनच ज्ञानाची दारं खुलतायत
सत्य, शहाणपण, नैतिकता, वगैरे अनुभवातनं कळतायत
Subscribe to:
Posts (Atom)



