'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 5 April 2013

नागपूर गट विविध उपक्रमांद्वारे कृतीशील


विविध शैक्षणिक पार्श्वभूमीच्या ७० युवांचा स्थानिक निर्माण गट नागपूरात हळूहळू सक्रीय होत आहे. समाजाच्या वेगवेगळ्या समस्यांना भिडण्याची सुरुवात म्हणून त्या समस्या समजून घेण्याच्या दृष्टीने नुकतेच या गटाने शोधग्राम- ला भेट दिली. २ दिवसांच्या या भेटीमध्ये सर्चचे व तेथे काम करणाऱ्या निर्माणींचे काम समजून घेणे हा मुख्य उद्देश होता. त्याकरिता सर्चचे तुषार खोरगडे, डॉ. आनंद बंग, निर्माण ४ चा निखिल जोशी व निर्माण २ चा डॉ. वैभव आगावणे यांनी गटासोबत संवाद साधला. अमृत बंग याने निर्माणची सुरुवात व आजवरचा  प्रवास शेअर केला. नंदा खरे (नंदा काका), डॉ. अभय बंग (नायना) व डॉ. राणी बंग (अम्मा) यांनीही सर्वांसोबत संवाद साधला. तत्पूर्वी या गटाने सर्चमध्ये येत असताना वाटेवरच्या आरमोरीतील उपजिल्हा रुग्णालयाला व तेथील निर्माणच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती देशमुख व डॉ. युगंधरा काटे यांना भेट दिली.
होळीमध्ये होणा-या पाण्याचा अतिवापर व सध्याची दुष्काळाची स्थिती यावर जनजागृती करण्यासाठी या गटाने नुकतेच नागपूरच्या प्रसिद्ध ट्रॅफिक पार्क येथे पथनाट्य सादर केले. यावेळी सुमारे २००-२५० प्रेक्षक हजर होते.
याशिवाय निर्माण ५ च्या पल्लवी बापटने आपल्या इंटर्नशिपच्या काळामध्ये सर्व निर्माणींसाठी रक्तदान मोहीमेचे आयोजन केले होते. या मोहीमेलाही सर्व निर्माणींनी चांगला प्रतिसाद दिला.
नागपूर गटाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 

महामार्ग ग्रस्तांना न्याय मिळण्यासाठी ‘लोकसंघर्ष मोर्चा’ प्रांत कार्यालयावर



चौपदरीकरणात भूसंपादन करताना राष्ट्रीय महामार्गाच्या जागेवरील भोगवटाधारक, इमला मालक अतिक्रमण धारक आणि पुनर्वसन धारकांच्या नुकसान भरपाईबाबत हरकतीसह इतर मागण्यांसाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी दि. ११ रोजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले.
महसूल विभाग भुसावळच्या हद्दीतील प्रास्तावित राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात जाणाऱ्या सामूहिक आणि गावठाण तसेच सार्वजनिक वापरात असणाऱ्या जमिनी व शेती मोठय़ा प्रमाणात भूसंपादन झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही निवेदनाद्वारे पुढील मागण्या केल्या आहेत:
१.  भूसंपादन करताना शेतकरी, जमीन मालक, पक्षकार यांना संसदेत मंजूर होणाऱ्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार जास्तीत जास्त अधिग्रहण करताना भूमी अधिकार मिळावे आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई दलाल, एजंट व मध्यस्थाशिवाय मिळण्याचा मार्ग सुकर करावा
२.    उपविभागातील भुसावळसह इतर गावांना टोल मधून सूट मिळावी
३.    महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग संघ, एस.टी. महामंडळ इ. स्वरुपाच्या सर्वाजिनक वापराच्या जागा संपादन करताना त्यांचा वापर तेथे करुन त्या परिसरांचा विकास करुन प्रकल्पग्रस्तांना मदत करावी
४.  उपविभागातील ज्या गावातील गावठाण भूसंपादन करताना त्यांची सर्व भरपाई स्थानिक ग्रामपंचायतीला विकासासाठी मिळावी

आदिवासींना बोलते करण्यासाठी चर्चेऐवजी नाटक


आदिवासी जत्रेत सुमारे ४० गावांचे प्रतिनिधी एकत्र येऊन सर्चच्या कार्यक्रमाचा मागील वर्षाचा आढावा व पुढील वर्षाच्या नियोजनाविषयी चर्चा करतात. त्याआधारे पुढील वर्षाचा कृती-कार्यक्रम ठरवला जातो. मात्र गेल्या काही वर्षांच्या निरीक्षणानुसार मूलतः अबोल असणारे आदिवासी या चर्चेत म्हणावे तसे खुलत नाहीत. त्यामुळे  यावर्षीच्या जत्रेत कलाप्रिय आदिवासींचा सहभाग वाढण्याच्या दृष्टीने चर्चेऐवजी दोन interactive संगीत-नाटकांचे आयोजन करण्याची कल्पना नायनांनी सुचवली. सर्चमधील निर्माणींनी यात सहभाग नोंदवला. नाटकांमध्ये आदिवासींच्या आवडत्या चालींवर गाणी, विनोद, कलाकारांचा प्रेक्षकांच्यामधून व्यासपीठावर प्रवेश, कलाकारांचा प्रेक्षकांसोबत संवाद, आदिवासी गावात घडणारे प्रवेश (उदा. ग्रामसभा) इ. तंत्रांचा वापर करण्यात आला. आदिवासींसोबत कामाचा प्रदीर्घ अनुभव असणारे तुषारभाऊंनी नाटकाचे दिग्दर्शन केले.
आदिवासी भागातील सर्चच्या उपक्रमांचा आढावा हा पहिल्या नाटकाचा विषय होता, तर आदिवासींना नुकत्याच मिळालेल्या अधिकारानुसार बांबूकटाई व विक्रीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांचा विनियोग हा दुसऱ्या नाटकाचा विषय होता. नंतर झालेल्या गटचर्चेत आदिवासी मागील वर्षांपेक्षा जास्त खुलाल्याचे निरीक्षण आदिवासी नेते श्री. हिरामण वरखडे यांनी नोंदवले.

Thursday, 4 April 2013

‘बाजार’



बाजारपेठ लोकांसाठी महत्त्वाची तर आहे पण तिच्याद्वारे होणारं त्यांचं शोषण कसं थांबवावं? खेड्यांपासून शहरांकडे आणि गरीबांपासून श्रीमंतांकडे वाहणारा पैश्यांचा ओघ कसा थांबवावा? बाजारपेठेमध्ये आणि आर्थिक व्यवहारांमध्ये व्यवस्थेच्या खालच्या थरात असलेल्या आदिवासी, छोटे शेतकरी आणि इतर  उत्पादक वर्गाला महत्त्वाचं आणि समान स्थान कसं मिळेल?


नाशिकला दर बुधवारी गंगेकाठी आठवडे बाजार भरतो. लहानपणी बाबांच्या मागे स्कूटरवर बसून अनेकदा मी बाजाराला जायचो. पण खरं सांगायचं तर मला मजा वाटण्यापेक्षा बाजारात कंटाळाच जास्ती यायचा. गर्दी-गोंधळात बाबांमागे भाजीची पिशवी घेऊन फिरताना हाताला कळ लागे आणि पायही दुखत. नाशिक सारख्या शहरात जिथे अनेक प्रकारच्या दुकानांनी आणि नानाविविध वस्तूंनी बाजारपेठ कायमच सजलेली असते तिथे आठवडे बाजाराचं ते काय कौतुक!

महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात बाजारपेठ बरीच विकसित झालेली आहे. अगदी गल्ली-बोळात सुद्धा दुकानं असतात; दारावर विकायला भाजीवाले आणि सेल्समन येतात; फोनवर ऑर्डर दिली की होम-डिलिव्हरीही केली जाते, आणि आजकाल तर ऑनलाईन शॉपिंग मुळे वस्तू विकणे आणि विकत घेणे सगळंच घरी बसल्या सहज होतं. थोडक्यात, ‘बाजार किंवा इंग्रजीत आणि अर्थशास्त्रात आपण ज्याला मार्केट म्हणतो, त्यात आपलं जीवन इतकं आकंठ बुडलेलं आहे. तरीही सकाळी कोपऱ्यावरच्या दुकानातून चहासाठी दुध आणायला आपल्याला पायी जायचा कंटाळा येतो आणि आपण पटकन गाडी काढतो! त्यामुळे बाजारपेठेचा access असणं ही एखाद्या समाजाच्या आर्थिक विकासासाठी किती आवश्यक गोष्ट आहे हे कदाचित लगेच लक्षात येणार नाही. 

बाजारासाठी नदी ओलांडताना आदिवासी
दंतेवाडात आल्यावर मात्र बाजारपेठेचा access महत्वाचा का; आठवडे बाजार म्हणजे काय आणि त्याचं एवढं कौतुक का, हे हळू हळू कळायला लागलं. छत्तीसगढ मधला हा जिल्हा आदिवासी प्रबळ आणि जंगलांनी वेढलेला. इथे लोकसंख्येच्या ७०% आदिवासी तर क्षेत्रफळाच्या ६७% जंगल आहे. गावं, पाडे आणि घरं एकमेकांपासून दूरदूर अंतरावर वसलेले आहेत. अजूनही अनेक गावं आणि पाड्यांपर्यंत पक्का रस्ता पोहोचलेला नाही. कुठल्याही आतल्या गावात छोटंसं दुकान सापडणंही दुर्मिळ. अशा दुर्गम ग्रामीण भागात आठवडे बाजारचं महत्त्व खूपच जास्ती. इतकं, की जिथे दळणवळणाचं काहीच साधन उपलब्ध नाही अशा ठिकाणाहूनही माणसं-बायका-मुलं २५-३० किलोमीटर अंतर पायी चालत जवळच्या गावच्या बाजाराला जातात. सकाळी सकाळी बाजाराला पोहोचता यावं म्हणून मध्य रात्रीच चालायला सुरुवात केली जाते. आपल्या जवळचं जास्त असलेलं उत्पादन विकण्यासाठी आणि दैनंदिन गरजेला पडणाऱ्या वस्तू विकत घेण्यासाठी दर आठवड्याला भरणारा बाजार हे इथे एकमेव साधन.

आदिवासींचं जगणं कितीही स्वावलंबी असलं, गरजा खूप कमी असल्या आणि गरजेच्या बऱ्याच गोष्टी आजूबाजूच्या निसर्गातूनच उपलब्ध होत असल्या तरीही कपडे-लत्ते, मीठ-मिरची-मसाल्यासारख्या अनेक गोष्टींसाठी पैसा लागतोच. मोल मजुरी करणे किंवा शेतीतलं थोडाफार उत्पादन आणि जंगलात फिरून गोळा केलेलं वनोपज विकणे हीच पैसा कमावण्याची साधनं इथे उपलब्ध आहेत. हा माल विकण्यासाठी गरज पडते ती बाजाराची. आर्थिक उत्पन्नासाठी बाजार हे एक अत्यावश्यक मध्यम आहे. आणि म्हणून आर्थिक विकासासाठी बाजारपेठेचा access महत्वाचा.

बाजार जर नसता किंवा बाजारपेठेचा access नसता तर काय झालं असतं?- वस्तूंच्या देवाण-घेवाणीची जागाच नाहीशी झाली असती. आपल्या जवळच्या वस्तू विकणं आणि गरजेच्या पण स्वतःजवळ नसलेल्या वस्तू मिळवणं अवघड झालं असतं आणि त्यासाठी लोकांना खूप धडपड, आटापिटा करावा लागला असता. दंतेवाड्यातल्या मारजुम नावाच्या गावात जायला रस्ता नाही. जिच्यावरून दुचाकीच फक्त मुश्किलीने चालू शकते अशी ७-८ किलोमीटर ची जंगलातून जाणारी पायवाट. या गावातल्या बचतगटाच्या बायकांशी बोलताना लक्षात आलं की त्या कोणत्याच प्रकारचं उत्पादन बनवू शकत नाहीत कारण ते विकायला बाजारात घेऊन जाणं खूपच अवघड आणि कष्टाचं काम आहे. दंतेवाडयातल्या पोटली ह्या दुसऱ्या अगदी interior मधल्या गावात पूर्वी बराच मोठा बाजार भरे. आजूबाजूच्या गावातले लोक त्या बाजाराला जात. पण काही वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे तिथे बाजार भरणं बंद झालं. आज त्या भागातले लोकं ३०-४० किलोमीटर अंतर चालून पालनार नावाच्या गावी बाजार करायला जातात. लोकांच्या दैनंदिन जीवनातली बाजाराची अनिवार्यता ही अशी. देशाची अर्थव्यवस्था जरी शेअर बाजारावर अवलंबून असली तरी इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे आठवड्याचा बाजार!

परंतु एकदा बाजारपेठेचा access लोकांना मिळाला की बाहेरच्या व्यापारी शक्तींनाही (Market Forces) लोकांचा आणि त्यांच्या नैसर्गिक साधन-संपत्तीचा access मिळतो. आणि मग बाजार नकळत होणाऱ्या लुटीचं माध्यमही बनू शकतो. बाजाराचं नियंत्रण जर एखाद्या विशिष्ट समूहाकडे किंवा काही व्यक्तींकडे आलं तर त्याच्या माध्यमातून सामान्य जनतेचं शोषणही होऊ शकतं. दंतेवाड्यातल्या बाजारांमध्ये प्रामुख्याने वर्चस्व असतं ते बाहेरून इथे स्थायिक झालेल्या गल्ला व्यापाऱ्यांचं. इथल्या महुआ, टोरी, चिंच, डिंक, कोसा सारख्या लघु वनोत्पादनाच्या व्यापारावर संपूर्ण नियंत्रण गल्ला व्यापाऱ्याचं असतं. बाजारामध्ये तराजू लावून बसलेल्या ह्या व्यापाऱ्यांकडे आदिवासी छोट्या-छोट्या टोपल्यांनी वनोपज आणून विकतात आणि मिळालेल्या पैश्याने बाजार करतात.

वनोपज विकत घेणारे गल्ला व्यापारी
वनोपजाची खरेदी किंमत किती असावी याचं नियंत्रण या व्यापाऱ्यांच्या हातात असतं. ही किंमत पटली नाही तरी दळणवळणाच्या साधनाभावी मैलो चालून पाठीवर वाहून आणलेलं सामान परत घेऊन जाणं परवडत नाही. बाकीच्या गरजेच्या वस्तू विकत घायलाही पैसे हवे असल्यामुळे आदिवासी मिळेल त्या किमतीला वनोपज विकून टाकतात. याशिवाय काटा मारून जी फसवणूक होते ती वेगळीच. 

बाजारात किरणा, कपडे, भांडी अशा वस्तू विकणारे व्यापारीही बाहेरूनच आलेले आणि बऱ्याचदा गल्ला व्यापाऱ्यांचेच सगे-सोयरे. वनोपज विकून कमवलेला पैसा खर्चून आदिवासी तेल-मीठ-साबण-सौंदर्य प्रसाधने-चपला-कपडे-भांडी अशा अनेक वस्तू विकत घेतात. अर्थातच ह्या सगळ्या वस्तू रायपुर-मुंबई-कलकत्ता-हैद्राबाद-अहमदाबाद सारख्या शहरांमध्ये असलेल्या कंपन्या आणि त्यांच्या कारखान्यांमध्ये बनून दंतेवाड्यातल्या लहान लहान गावांमध्ये भरणाऱ्या बाजारामध्ये विकायला येतात. त्या विकून व्यापारी नफा कमावतो आणि विकत घेऊन इथला आदिवासी आपल्या गरजा भागवतो. काळाच्या प्रभावामुळे बाहेरच्या बाजारपेठेची पोहोच जशी जशी दंतेवाडा सारख्या दुर्गम भागात वाढते आहे आणि इथल्या आदिवासींचा संबंध बाहेरच्या जगाशी जसा वाढायला लागला आहे तसं बदलत्या जीवनशैलीमुळे त्यांचं बाजारपेठेवरचं आणि पैश्यावरचं अवलंबित्व वाढू लागलं आहे.

बाजारातले मोठे व्यापारी
आठवड्याच्या बाजारात होणाऱ्या ह्या व्यवहारांचं जरा विश्लेषण केलं तर लक्षात येतं की एकूणच मोठ्या व्यापाऱ्यांचा एकाधिकार आणि वर्चस्व ह्या बाजारात असतं. या व्यापाऱ्यांच्या प्रत्येक बाजारात बसायच्या जागा सुद्धा ठरलेल्या असतात. मोक्याच्या ठिकाणी, सरकारने बांधून दिलेल्या सिमेंटच्या चौथऱ्यांवर ते आपली दुकानं थाटतात आणि आदिवासी मात्र बाजाराच्या कडेला, जिथे जागा मिळेल तिथे बसून आपल्या वस्तू विकतात. बाजारपेठेतल्या आर्थिक व्यावाराहारमध्ये आदिवासी आणि छोट्या शेतकऱ्याचं स्थान सगळ्यात खालच्या टोकाला आणि सुरुवातीच्या कडी मध्ये असतं. त्याने उत्पादन केलेल्या आणि गोळा केलेल्या मालाची त्याला योग्य किंमतही मिळत नाही. पण बाजारात मिळणाऱ्या प्रत्येक वस्तूची किंमत त्याला कंपनीचा आणि व्यापाऱ्याचा नफा, Overhead Expenses, वाहतुकीचा खर्च, विविध प्रकारचे कर यांच्या सकट मोजावी लागते. त्यामुळे एकूणच आठवड्याच्या बाजारातल्या देवाण-घेवाणी मध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचा आणि पैश्याचा ओघ आदिवासी किंवा छोट्या शेतकऱ्यांपासून व्यापारी आणि कंपन्यांकडे, खेड्यांपासून शहरांकडे आणि गरीबांपासून श्रीमंतांकडे वाहताना दिसतो. अर्थातच ह्याला अपवाद आहेत.       

ह्या निरीक्षणामध्ये खरंतर नवीन काहीच नाही. मी फक्त ते सध्या स्वतः पाहतो आहे एव्हडच. दंतेवाडातच नाही तर सगळीकडेच थोड्या-फार फरकाने हे निरीक्षण लागू पडेल. किंबहुना राष्ट्रीय आणि जागतिक स्तराच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा अशीच स्थिती आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही.

खरंतर आठवड्याच्या बाजाराकडे फक्त वस्तू विकण्याचं आणि विकत घेण्याचं ठिकाण म्हणून बघता येणार नाही. इथल्या बाजाराला सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टीने ही खूप महत्त्व आहे. आदिवासी जीवनात ते एक विरंगुळ्याचं मोठं साधन आहे; एकमेकांना भेटण्याचा, आसपासच्या गावची खबर घेण्याचा, इतकंच काय तर तरुण मुला-मुलींसाठी आयुष्याचा जोडीदार शोधण्याचा हा एक Platform सुद्धा आहे. पण बाजारात होणाऱ्या फक्त आर्थिक व्यवहारांकडे जरी काळजीपूर्वक लक्ष दिलं तरी खेड्यातल्या अर्थव्यवस्थेविषयी अशा अनेक गोष्टी आपल्याला शिकता येतील. शेवटी, हे सगळं बघून माझ्या मनात निर्माण होणारे काही प्रश्न तुमच्या समोर ठेवतो.

बाजारपेठ लोकांसाठी महत्त्वाची तर आहे पण तिच्याद्वारे होणारं त्यांचं शोषण कसं थांबवावं? खेड्यांपासून शहरांकडे आणि गरीबांपासून श्रीमंतांकडे वाहणारा पैश्यांचा ओघ कसा थांबवावा? बाजारपेठेमध्ये आणि आर्थिक व्यवहारांमध्ये व्यवस्थेच्या खालच्या थरात असलेल्या आदिवासी, छोटे शेतकरी आणि इतर  उत्पादक वर्गाला महत्त्वाचं आणि समान स्थान कसं मिळेल?

या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत. काही कल्पना जरूर आहेत. परत कधीतरी त्या तुमच्या बरोबर मी नक्कीच शेअर करेन. तोपर्यंत तुमचे काही विचार आणि कल्पना असतील तर जरूर शेअर करा!
आकाश बडवे
(आकाश छत्तीसगढमधील दंतेवाडा जिल्ह्यात Prime Minister’s Rural Development Fellow म्हणून काम पाहत आहे.)

निर्माणीच्या नजरेतून



छायाचित्र: प्रेरणा राउत


छायाचित्राबद्दल:
कोमकरखेड्यातील आरोग्यसेविका उच्च रक्तदाबाच्या रुग्णाचे बीपी मोजताना...
कोमकर घनदाट जंगलात वसलेले असून ग्रामीण रुग्णालयापासून ५३ किमी तर प्राथमिक आरोग्य केंद्रापासून २५ किमी लांब आहे. या दुर्गम भागात सार्वजनिक वाहतुकीची सोय नाही.
भारत आधीच न्यूमोनिया, हागवण, मलेरिया इ. साथीच्या रोगांपासून पीडित असताना हृदयविकार, लकवा, उच्च रक्तदाब, मधुमेह इ. असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढत आहे. सध्या हे रोग भारतातील एकूण मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यूंना कारणीभूत असून ग्रामीण भागातही मृत्यूच्या एकूण कारणांमध्ये हे प्रमुख कारण आहेत. या रोगांसाठी आयुष्यभर उपचार घेण्याची गरज असते. संसाधने व आरोग्यसुविधांची कमतरता असणाऱ्या खेड्यांमध्ये या रोगांमुळे गरीबीची नवी लाट येईल अशी भीती व्यक्त होत आहे. आपण या लाटेला तोंड द्यायला तयार आहोत का? कोमकरसारख्या दुर्गम गावांत आरोग्यसेवा पोहोचणं खरंच कठीण आहे. गावागावातल्या आरोग्यसेवकांनी आजवर गरोदरपणा, लहान मुलांच्या गंभीर आजारांचे व्यवस्थापन यशस्वीरित्या केले आहे. असंसर्गजन्य रोगांच्या व्यवस्थापनासाठी गावागावातले प्रशिक्षित आरोग्यसेवक हे उत्तर असू शकेल?

तिनका तिनका जर्रा जर्रा


सीमोल्लंघनच्या मागील अंकातील नंदा काकांचा स्तंभ वाचून अभिजीत सफईने त्यांना पाठवलेला मेल व त्यावर नंदा काकांचे उत्तर--

प्रिय नंदा काका,
सीमोल्लंघनमधील तुम्ही मांडलेल्या विचारांबद्दल धन्यवाद!
कविता (भावनांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या) आणि इतर साहित्यप्रकार (विचार/विवेकाचे प्रतिनिधित्व करणारे) याविषयीच्या तुमच्या लेखाबद्दल मला असे वाटते कारण मला चिन्मय युवा केंद्रात असे शिकवले गेले आहे की इतर साहित्यप्रकार (त्यांना विचार म्हणूयात) हे भावनांपेक्षा (कविता) वरच्या पातळीचे आहेत.
कारण, बुद्धी मनापेक्षा unbiased आहे. आपण मनाची मदत घेऊन निर्णय घेऊ तर तो भावनिक निर्णय होईल. याचा अर्थ असा नाही की निर्णय घेण्यासाठी मन वापरूच नये, फक्त ते बुद्धीच्या नियंत्रणाखाली असावे.
साम्यवादी कालखंडात कवितांची गुणवत्ता घसरते असं म्हटलं जातं. इथे आपल्याला सर्वसमावेशकता  व गुणवत्ता यांच्यात समतोल साधायला हवा. थोडक्यात, अपवाद असले तरी इतर साहित्यप्रकार (विवेकपूर्ण साहित्य) हे कवितेपेक्षा श्रेष्ठ आहेत असे मला वाटते.
अभिजीत सफई


प्रिय अभिजीत,
जरा वेगवेगळ्या तऱ्हांनी  भावना आणि विचार या जोडीला तपासू.
भावना उपजण्यावर आपलं नियंत्रण नसतं असा समज होतो, म्हणून "राग येतो", "भीती वाटते" इत्यादी. पण विचार "केला" जातो, कारण तो नियंत्रणात आहे असे वाटते. खरंतर हे सगळे ज्या मेंदूत होत असते, त्यात चेतापेशींची जंजाळे विद्युत-व्यवहारच फक्त करत असतात. मग भावना आणि विचार यांच्यात फरक काय? मला वाटतं की जिथे चेतापेशींचे व्यवहार ज्या तर्कक्रमाने होतात व तो क्रम आपल्याला समजतो, तिथे आपण "विचार केला" म्हणतो. पण चेताव्यवहार खूप गुंतागुंतीचे असतात. क्रम स्पष्टपणे सोडवणे सोपे नसते. त्यामुळे काही परिणाम आपण काही न करताच घडले असे वाटते. या झाल्या "भावना", आपण केल्या नाहीत, तर आपल्यात उपजल्या असे भासणाऱ्या. पण मुळात तर्कक्रमातली गुंतागुंत सोडली तर दोन्हीत फरक नाही.
बाय द वे, मुळात चेतापेशींचे विद्युतव्यवहार तर्कात चुकू शकतच नाहीत! अगदी radioactive, cosmic वगैरे किरणेच तर्क चुकवू शकतात.
 पण भावना हे क्रम न दिसणारे विचार असे म्हणण्यावर लोकांचा राग असतो. एकीकडे "कविमनाचे" लोक समजतात की विचार हे रुक्ष आणि भावना मात्र रसाळ. त्यामुळे "तू विचारी समजतोस न स्वतःला? मग तुला कविता समजणारच नाहीत!" अशी प्रतिक्रिया येऊ शकते. दुसरीकडे "कविता म्हणजे भावनिक तऱ्हेने घातलेला वैचारिक गोंधळ" असे मत येऊ शकते. मला वाटते की तू जे कविता वैचारिक साहित्याच्या खालीअसे समजतोस, तो असा दुसऱ्या प्रकारचा गैरसमज आहे. पण भावना म्हणजे न समजणारे विचार, आणि विचार म्हणजे समजू शकणाऱ्या भावना असे म्हटले, तर खराखुरा विवेक साधला जातो!
तर्कसंगती ओळखू न येण्याइतकी गुंतागुंतीची केव्हा होते? ती फार मूलभूत बाबींना स्पर्श करते तेव्हा. जीव वाचवणे, वंश वाढवणे ह्या उघडच मूलभूत बाबी आहेत. पण परोपकारही मूलभूत ठरू शकतो. तुम्ही Richard Dawkinsचं Selfish Gene पुस्तक वाचाल, किंवा Kin selection ही संकल्पना तपासाल तर तुम्हाला यावरच्या  काही संशोधनाची ओळख होईल. त्यामुळे एकूणच भावना आपल्याला काहीतरी करायला लावतात. पण अशी कृती करताना "आता काय करू?" असे प्रश्न पडतात. ते सोडवायला तर्कसंगत विचार लागतात, आणि असे वाटते की विचार हे भावनांचे नियंत्रण करताहेत. खरे तर विचार हे फक्त भावना समजून घेत असतात! (अभिजित! माझे तत्वज्ञ मित्र मला मारतील हे वाचले तर!)
असो. फार फिलोसॉफी झाडली!
नंदा

पुस्तक परिचय


The Great Indian middle class- Pavan K Varma

पुस्तकाची सुरूवात पवन वर्मा मेकॉलेने १८३५ साली ब्रिटीशांनी भारतीयांसाठी सांगित-लेल्या शिक्षणाचे धोरण काय होते हे सांगून करतात. याचा परिणाम म्हणून एक असा वर्ग भारतात उद्याला आला जो शिक्षित होता पण ब्रिटीशांच्या संस्कृतीने व विचारधारेने, जगण्याच्या पद्धतीने प्रभावित होता. मुख्यत: हा वर्ग म्हणजे भारतातील मध्यम वर्ग. या भारतीय मध्यम वर्गाला केन्द्रस्थानी ठेउन वर्मांनी पुस्तक लिहिले आहे.  
            उदय झाल्यानंतर हा वर्ग अनेक ट्प्प्यांमधून गेला. स्वातंत्र्य लढा, १९४७ ला मिळालेले स्वातंत्र्य, नेहरू सलग पंतप्रधान असतानाची १७ वर्षे, १९६२ चे चीनसोबतचे युद्ध, नेहरुंचा मृत्यू, मृत्यूनंतर इंदिरा गांधी व आणीबाणीचा काळ, जे.पी. यांची चळवळ, मंडल समितीचा अहवाल व त्याची अंमलबजावणी, १९९० नंतर स्वीकारलेले आर्थिक धोरण व त्याचा प्रसाराचा ९० नंतरचा काळ.
            या स्थित्यंतरातून जाताना या वर्गावर काय परिणाम झाले व बदल घडले, या वर्गाची विशेषता काय, यांच्या मान्यता, दृष्टीकोन व मूल्यव्यवस्था काय, विदेशी संस्कृतीचा व इंग्रजी भाषेचा या वर्गावरचा प्रभाव, या वर्गाचा विचार व आचार यामधील फरक, या वर्गाच्या अनेक पातळीवरील निर्णायक स्थितीमुळे सामान्य व गरीब भारतीयांवर यांच्या निर्णयांचा व कृतींचा काय परिणाम पडतो, भारतात केन्द्र-सरकारी नोकरीत जातीनिहाय अधिकृत आरक्षण करण्याचे मांडल्यावर या वर्गाने त्याला का व कोणता प्रतिसाद दिला, हा वर्ग आपले हित साधण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या वर्गाचे अहित तर करीत नाही ना, मध्यमवर्ग आज फक्त ग्राहक (Consumer) बनून राहिला आहे का, अशा मुद्द्यांवर वर्मा यांनी अनेक ठिकाणी आकडेवारी, लिखित निरिक्षणे, पुस्तके यांचा आधार घेउन टिप्पणी केली आहे.
            वर्मा यांनी मध्यम वर्गावर कडक टीका केली आहे. भारताला घडविण्यासाठी हा वर्ग महत्वाचा हातभार लावू शकतो. भारतात कुपोषण, गरिबी, भ्रष्टाचार, श्रीमंत-गरीब यातील वाढता फरक, शेतीसमस्या अशा अनेक अडचणी असताना हा वर्ग स्वत:च्या स्वार्थापलीकडे बघत नाही अशी ‘वर्मा’वर घाव घालणारी टीका ते करतात. मध्यमवर्गीयांना ते आपल्या स्वार्थापलिकडे जाण्याचे सूचित करणारा उपदेशही देतात की - No society can survive if it is only an aggregation of personal wants.
            पुस्तक वाचताना अचानक आपल्या लक्षात येते की आपणही याच मध्यम वर्गातील व मेकॉलेप्रणित शिक्षण घेतलेले मध्यमवर्गीय आहोत ! थोडक्यात, वर्मा आपल्याला आरसा दाखवून जातात.
            पुस्तकाच्या सुरूवातीलाच कवी इक्बाल यांच्या काही ओळी लिहिल्या आहेत. या ओळी आपल्याला येणाऱ्या वादळाचे भाकित करतात व या ओळींचा संदर्भ पुस्तक संपल्यावर लक्षात येतो -
वतन की फिक्र कर नादान,
मुसीबत आने वाली है,
तेरी बरबादियों के मश्वरे है आसमानों में,
ना समझोगे तो मिट जाओगे ए हिन्दोस्थानवालो,
तुम्हारी दास्तान तक भी ना होगी दास्तानोमें !

वैभव आगवणे