'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 4 April 2013

पुस्तक परिचय


The Great Indian middle class- Pavan K Varma

पुस्तकाची सुरूवात पवन वर्मा मेकॉलेने १८३५ साली ब्रिटीशांनी भारतीयांसाठी सांगित-लेल्या शिक्षणाचे धोरण काय होते हे सांगून करतात. याचा परिणाम म्हणून एक असा वर्ग भारतात उद्याला आला जो शिक्षित होता पण ब्रिटीशांच्या संस्कृतीने व विचारधारेने, जगण्याच्या पद्धतीने प्रभावित होता. मुख्यत: हा वर्ग म्हणजे भारतातील मध्यम वर्ग. या भारतीय मध्यम वर्गाला केन्द्रस्थानी ठेउन वर्मांनी पुस्तक लिहिले आहे.  
            उदय झाल्यानंतर हा वर्ग अनेक ट्प्प्यांमधून गेला. स्वातंत्र्य लढा, १९४७ ला मिळालेले स्वातंत्र्य, नेहरू सलग पंतप्रधान असतानाची १७ वर्षे, १९६२ चे चीनसोबतचे युद्ध, नेहरुंचा मृत्यू, मृत्यूनंतर इंदिरा गांधी व आणीबाणीचा काळ, जे.पी. यांची चळवळ, मंडल समितीचा अहवाल व त्याची अंमलबजावणी, १९९० नंतर स्वीकारलेले आर्थिक धोरण व त्याचा प्रसाराचा ९० नंतरचा काळ.
            या स्थित्यंतरातून जाताना या वर्गावर काय परिणाम झाले व बदल घडले, या वर्गाची विशेषता काय, यांच्या मान्यता, दृष्टीकोन व मूल्यव्यवस्था काय, विदेशी संस्कृतीचा व इंग्रजी भाषेचा या वर्गावरचा प्रभाव, या वर्गाचा विचार व आचार यामधील फरक, या वर्गाच्या अनेक पातळीवरील निर्णायक स्थितीमुळे सामान्य व गरीब भारतीयांवर यांच्या निर्णयांचा व कृतींचा काय परिणाम पडतो, भारतात केन्द्र-सरकारी नोकरीत जातीनिहाय अधिकृत आरक्षण करण्याचे मांडल्यावर या वर्गाने त्याला का व कोणता प्रतिसाद दिला, हा वर्ग आपले हित साधण्याच्या प्रयत्नात दुसऱ्या वर्गाचे अहित तर करीत नाही ना, मध्यमवर्ग आज फक्त ग्राहक (Consumer) बनून राहिला आहे का, अशा मुद्द्यांवर वर्मा यांनी अनेक ठिकाणी आकडेवारी, लिखित निरिक्षणे, पुस्तके यांचा आधार घेउन टिप्पणी केली आहे.
            वर्मा यांनी मध्यम वर्गावर कडक टीका केली आहे. भारताला घडविण्यासाठी हा वर्ग महत्वाचा हातभार लावू शकतो. भारतात कुपोषण, गरिबी, भ्रष्टाचार, श्रीमंत-गरीब यातील वाढता फरक, शेतीसमस्या अशा अनेक अडचणी असताना हा वर्ग स्वत:च्या स्वार्थापलीकडे बघत नाही अशी ‘वर्मा’वर घाव घालणारी टीका ते करतात. मध्यमवर्गीयांना ते आपल्या स्वार्थापलिकडे जाण्याचे सूचित करणारा उपदेशही देतात की - No society can survive if it is only an aggregation of personal wants.
            पुस्तक वाचताना अचानक आपल्या लक्षात येते की आपणही याच मध्यम वर्गातील व मेकॉलेप्रणित शिक्षण घेतलेले मध्यमवर्गीय आहोत ! थोडक्यात, वर्मा आपल्याला आरसा दाखवून जातात.
            पुस्तकाच्या सुरूवातीलाच कवी इक्बाल यांच्या काही ओळी लिहिल्या आहेत. या ओळी आपल्याला येणाऱ्या वादळाचे भाकित करतात व या ओळींचा संदर्भ पुस्तक संपल्यावर लक्षात येतो -
वतन की फिक्र कर नादान,
मुसीबत आने वाली है,
तेरी बरबादियों के मश्वरे है आसमानों में,
ना समझोगे तो मिट जाओगे ए हिन्दोस्थानवालो,
तुम्हारी दास्तान तक भी ना होगी दास्तानोमें !

वैभव आगवणे

No comments:

Post a Comment