'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 5 April 2013

महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशनतर्फे आयोजित जलसंधारणावर आधारित कार्यशाळेत निर्माणच्या तरुणांचा सहभाग


MKCLच्या महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशन (MKF) तर्फे दुष्काळावर काम करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या फेलोशिप उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण या विषयावर जालना जिल्ह्यातील खरपोडी येथे विजयअण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तीन दिवसांच्या या कार्यशाळेत संतोष गवळे, जयश्री कलंत्री आणि ग्रामविकासात काम करणारे जालना, नंदुरबार जिल्ह्यांतील ३० कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शेताच्या प्रत्येक छोट्या तुकड्याच्या पातळीवर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या तत्त्वाने जलसंधारण कसे साधता येईल हा कार्यशाळेचा प्रमुख विषय होता. भूजलपातळी वाढवण्यात मातीचे महत्त्वाचे योगदान असते. त्यामुळे जमिनीचा उतार, पावसाचे प्रमाण यांचा विचार करून शास्त्रशुद्ध पद्धतीने शेतात पाणी अडवण्यासाठी मातीचे बांध कसे घालावेत या अनुषंगाने उपस्थितांना मार्गदर्शन केले गेले. यानंतर पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असताना मातीचे बांध घालून द्राक्षाचे भरघोस पीक घेणाऱ्या कडवंची गावात भेटीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या अखेरीस प्रत्येकास आपापल्या गावातील किती शेतकरी अशा प्रकारचा बांध घालायला तयार आहेत, किती मोठा बांध घालायचा व त्यासंबंधीची आवश्यक आकडेवारी कार्यशाळेच्या आयोजकांकडे सुपूर्त करण्याची जबाबदारी देण्यात आली.
संतोष आणि जयश्री ग्रामविकासाच्या, विशेषतः पाणीप्रश्नावर यवतमाळ जिल्ह्यातील आपल्या मन्याळी गावात मागील दोन ते तीन वर्षे काम करत आहेत. या कामाचा एक पुढचा टप्पा म्हणून या दोघांना या कार्यशाळेचा त्यांच्या गावाला नक्कीच उपयोग होईल. 

No comments:

Post a Comment