वक्तशीर मुलगा
पाठीवर दप्तर घेऊन
शाळेत वेळेवर पोचतो
तसा येऊन पोचला पाऊस ,
एखादं आदिम तत्त्वज्ञान
रुजवावं
तसं शेतकऱ्यानं बी पेरून
दिलं
जमिनीच्या पोटात ,
मग भुरभुर वारा सुटला...
छोट्या स्टेशनवर न
थांबता
एक्स्प्रेस गाडी
धाड धाड निघून
गेल्याप्रमाणे
काळे ढग नुस्तेच तरंगत
गेले ,
वाटचुकल्या भ्रमिष्ट
माणसासारखा
बियांच्या पोपटी अंकुरानं
जमिनीला धडका मारून
वर येण्यासाठी रचलेले मनसुभे
दिवसागणिक वाळून गेले ,
जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप
दवाखान्यातल्या व्हरांड्यात
विमनस्क फेऱ्या मारतो
तसा शेतकरी धुऱ्यावर उभा ,
लांबवर टाळ-मृदंगाच्या गजरात
पंढरपुराकडे निघालेली दिंडी
आणि इथं काळ्या शेतात
मरून पडलेला हिरवा पांडुरंग!
No comments:
Post a Comment