'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 28 February 2015

आरोग्य स्वराज्य दर्शन

(निर्माण ६ ची डॉ. ऐश्वर्या रेवाडकर, सप्टेंबर २०१४ पासून सर्च, शोधग्रामच्या मां दंतेश्वरी दवाखान्यात सक्रीय आहे. गेल्या ६ महिन्यातील कामादरम्यान आलेला एक हृद्य अनुभव तिच्याच शब्दात...)
सर्चने गावांचे आरोग्य त्यांच्या हाती सोपवण्यासाठी त्यांच्यातीलच काही व्यक्तींना निवडून त्यांना आरोग्य प्रशिक्षण दिले आणि ते सर्चचे आरोग्यदूत म्हणून गावां-गावांमध्ये आरोग्यसेवा देतात. मी आणि अमेरिकेहून काही महिन्यांसाठी इथे आलेली हेदर गार्डनर, त्यांचे काम पाहण्यासाठी शनिवारी आणि रविवारी एका गावात एका जाऊन राहणार असे ठरले. त्यानुसार आम्ही शनिवारी संध्याकाळी 'पोर्ला' या गावी तिथल्या आरोग्यदूत 'अरुणाताई' यांच्या घरी राहायला गेलो. तिथे जो अनुभव मिळाला आणि जे माझे जीवन शिक्षण झाले ते मला बरेच विचारप्रवृत्त करणारे ठरले.
 त्यादिवशी आम्ही अंधार पडल्याने प्रत्यक्ष काम करायला जाणार नव्हतो. म्हणून त्यांच्या घरातच आम्ही त्यांच्या कामाविषयी चर्चा करत होतो. मी स्वतः स्त्रीरोग तज्ञ असल्याने मी त्यांना प्रश्न विचारून त्यांचे ज्ञान पाहत होते आणि अरुणाताई त्याची इतकी व्यवस्थित आणि सखोल उत्तरे देत होत्या की मी चाटच पडले. कारण अरुणाताई त्या गावातील विधवा बाई. शिक्षण किती तर सातवी पास. लग्नानंतर एक मुलगी झाली आणि ती एका वर्षाची असतानाच नवरयाचे १९९२ मध्ये निधन झाले. १९९३ मध्ये सर्चने आरोग्यदूत म्हणून काही निकषांच्या आधारे स्त्रिया निवडल्या त्यात शिक्षणामुळे त्यांचीही निवड झाली. तेव्हापासून त्या या कामात सक्रीय आहेत. त्यांची त्यांच्या कामाविषयीची सखोल माहिती, जे काम करू ते जीव लावूनच करू हा दृष्टीकोन आणि समाजाच्या आरोग्याविषयीची तळमळ या सार्यांचा सुंदर संगम त्यांच्यामध्ये पाहून मी थक्क झाले.
            Women empowerment च्या नुसत्या गप्पा मारणे आणि सावित्रीबाई फुले जयंतीला भाषणे देणे, यापेक्षा एकटी स्त्री कंबर कसून स्वतःच्या पायावर उभी राहते आणि आरोग्यसेवा देते हे मला जास्त सुंदर आणि आशादायी चित्र वाटले.
            खेड्यातील त्या घरात राहण्याचा अनुभव तर खूप सुंदर होता. त्या सतत कामात मग्न असायच्या ते पाहून मला स्वतःच्या आळशीपणाची जाणीव झाली. मग मी मस्त स्वयंपाक पण बनवला त्या छोट्याश्या पण जिव्हाळ्याच्या सुबक खोलीमध्ये. थंडीमध्ये पहाटे उठून चुलीवरच्या गरम पाण्याने अंघोळ करणे ही तर माझ्यासाठी Luxury होती. बाहेर पडल्यावर आजूबाजूला पाहणे, लोकांशी गप्पा मारणे, अरुणाताई सोबत त्यांच्या कामाचा अनुभव घेणे यातून भरपूर शिकणे झाले.
  
          मी बऱ्याच वेळा ऐकले होते की चार भिंतींच्या शाळेपेक्षा निसर्गाची मोकळी उघडी शाळा सहजपणे आणि जास्त शिकवून जाते.” ते मी आयुष्यात प्रथम अनुभवले. मला हे उघडे आणि मोकळे जग आवडले. असे वाटले आपण आयुष्यामध्ये स्वतःभोवती चार भिंती बांधतो, त्यात चैनीच्या वस्तू गोळा करतो, आपली म्हणून समजणारी माणसे साठवतो आणि मग बंदिस्त करून घेतो स्वतःला. त्यात मग आपल्याला खूप सुरक्षित वाटते, इतर जगापासून तोडून स्वतःला त्या भिंतीमध्ये कैद करण्यात स्वतःला आपण सुरक्षित म्हणवतो आणि त्याला म्हणतो "Settlement.." Isn't it so much weird..? खरेच किती मुकतो आपण निसर्गाच्या आनंदाला ? समाजाच्या सहवासाला ? समाज म्हणजे काय ते जाणवूच देत नाही आपण स्वतःला आणि हरवून जातो Ego च्या छोट्याश्या डबक्यामध्ये.
आत्तापर्यंतचे सारे आयुष्य मला आठवले. टी.व्ही. पाहण्यात आणि अभ्यासाच्या चार पुस्तकांत डोके घालून मी मनाचे दरवाजे बंद करून टाकले आणि आयुष्यातील कितीतरी आनंदाला आणि खऱ्या शिकण्याला गमावून बसले. All those years, when i enclosed myself in four walls of my so called home, I missed life.
 तिथे आम्ही काळी चहा पीत होतो, बिनदुधाचा. म्हटले सवय करू. पण रात्री झोपताना असा त्रास झाला, वाटले मला दुधाचा चहा हवा आहे by hook or crook. मग जाणवले की किती घट्ट विळखा आहे मला चहाच्या व्यसनाचा. आणि आम्ही त्यांना तंबाखूचे व्यसन सोडा सांगत होतो. या स्वतःच्या निरीक्षणाने मलाच विचारात पाडले.
 रात्री आजूबाजूच्या बायांना जमवून बसलो गप्पा मारायला. मग त्यांनी बोलून आणि प्रश्न विचारून मस्त भंडावून सोडले. जेवढी माहिती मला त्यांना देता आली तेवढी दिली आणि त्यांना बोलते करायचा प्रयत्न करून त्यांची माहिती, त्यांचे समज, त्यांचा दृष्टीकोन समजून घ्यायचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळी परत निघालो तेव्हा अरुणाताईना सोडून येताना मन भरून आले होते. काही वर्षांपूर्वी मी मेळघाटात आरोग्याच्या कामासाठी गेले होते तेव्हा अगदी वेगळा अनुभव आला होता. मी तिथल्या अंगणवाडी सेविकेच्या घरी राहिले होते. तिचा भोंगळ कारभार आणि कामाबद्दलची अनावस्था आणि तिचे शून्य काम, आम्ही घेतलेल्या सभेमध्ये लोकांची तडफड, तिच्याबद्दलच्या तक्रारी हे सर्व पाहून मला रडू कोसळले होते. सरकारच्या योजनांवरचा विश्वास संपून गेला होता. ते गाव सोडताना मनात उदासी आणि दु:ख पसरले होते. आज इथे मात्र उलट अनुभव आला. गावातून बाहेर पडताना मन एका नव्या आशेने आणि उमेदीने भरून पावले होते. या खेड्यात इतकी समर्थपणे काम करणारी बाई आहे याचा आनंद आणि तिला घडवणाऱ्या 'सर्च' चा अभिमान यांनी मन भरून पावले होते. अशी स्त्री प्रत्येक खेड्यामध्ये घडली तर माझ्या भारताची आरोग्य व्यवस्था नक्कीच सुधारू शकेल अशी आशा तेवली मनामध्ये. I felt so much empowered for my community and proud of Search..!! प्रकाशाने वाट उजळावी तसे काहीसे जाणवले. आत कुठेतरी प्रकाशाची तिरीप उमटते आहे आणि मनाला उभारी देते आहे.
असाच एक वेगळा अनुभव पालखीच्या निमित्ताने आला. सर्चने मां दंतेश्वरी या आदिवासींच्या देवीला आरोग्याची देवता यादृष्टीने लोकसंस्कृतीमध्ये मांडले आहे. दरवर्षी सर्च मध्ये मां दंतेश्वरीची यात्रा भरते. यात सर्व गावातील लोक तर येतातच, पण त्यांचे पुजारी (Traditional healers) देखील येतात व पूजा बांधतात. पण मुख्य हेतू असतो तो म्हणजे लोकांचे आरोग्य शिक्षण. या निमित्ताने एक मोठी व्यापक आरोग्य संसदच सर्चमध्ये भरवली जाते आणि त्याद्वारे लोकांचे आरोग्यप्रश्न समजून घेतले जातात आणि विशिष्ट विषय निवडून त्यावर लोकांचे आरोग्य शिक्षणही केले जाते. या यात्रेच्या आधी दर आदिवासी गावात देवीची पालखी जाते. महाराष्ट्रात जशी ग्यानबा तुकारामाच्या गजरात पालखी निघते तशीच इथे मां दंतेश्वरीच्या नावाने निघते. एका दिवशी २-३ गावे होतात.
आम्ही संध्याकाळी ६ वाजता शोधग्रामपासून १० किलोमीटरवर असलेल्या गट्टेपायली या गावात पालखी पहायला गेलो. आपली MMU ची टीम व नाजुकभाऊ आणि देवलाताई हे पालखीसोबत ७ दिवसांपासून गावोगावी आरोग्यशिक्षण करत फिरत होते. त्यांना भेटून त्यांचे अनुभव ऐकले. तोपर्यंत हळूहळू बाया ताटात दिवा, उदबत्ती, तांदूळ घेऊन जमू लागल्या. सर्व स्त्री पुरुष आणि गोटूलमध्ये दिवा लावणाऱ्या कुमारिका जमल्या की मग तेथील आरोग्यदूत परसे यांच्या हस्ते पूजेची सुरुवात केली गेली. मग सर्वांनी ओळीने पूजा केली. त्यावेळेस इकडे आपल्या सर्चच्या कार्यकर्त्यांनी दन्तेश्वरी देवीच्या आरत्या गायला सुरुवात केली. त्यामध्ये दंतेश्वरी देवी आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी शोधग्राममध्ये वसली असून आपण आरोग्याचा वसा घ्यावा असा आशय होता. सर्व लोक भक्तिभावाने पूजा करत होते.
तो सर्व देखावा पाहून मी खूपच थक्क झाले होते. लोकांच्या श्रद्धेला चांगल्या हेतूने कशी योग्य दिशा देता येऊ शकते याचा तो अभिनव व यशस्वी प्रयोग माझ्या डोळ्यांसमोर घडत होता. नायनांनी एकदा बोलताना सांगितले होते की लोकांच्या जीवनात चांगली सुधारणा घडवून आणायची असेल आणि जर ती त्यांच्या संस्कृतीमध्ये योग्यप्रकारे आणली गेली तर ती सहजपणे यशस्वी व जास्त काळ टिकणारी होते. त्याचे प्रत्यक्ष उदाहरण माझ्या डोळ्यांसमोर होते. इतके दिवस मी पालखीबद्दल फक्त ऐकले होते पान प्रत्यक्ष पाहून वेगळाच feel आला. पूजेनंतर सर्चच्या कार्यकर्त्यांनी आरोग्यशिक्षण केले. तरुण मुला-मुलींकडून प्रश्नावली भरून घेतली गेली. मग आपले कार्यकर्ते पुरुषांना जमवून Focussed group discussion घेत होते, की त्यांना स्त्रीच्या प्रसुतीबद्दल किती माहिती आहे. अंधार पडला होता आणि आमची परतायची वेळ झाली होती.

परत येताना जंगलातील रस्ता, डोक्यावर चमचमणारे लक्षावधी तारे आणि सर्चचे तुषारभाऊ व ज्ञानेश्वरभाऊ यांच्या सोबतच्या त्यांच्या अनुभवाच्या गप्पा सारेच वातावरण मंतरलेले होते. आता वाट पाहत आहोत मार्च मध्ये सर्चमध्ये होणाऱ्या “मां दंतेश्वरी जत्रेची”. सर्चमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे.
स्रोत: ऐश्वर्या रेवाडकर, zerogravity8686@gmail.com

No comments:

Post a comment