बचतगटातील महिलांसोबत आपल्या नव्या वर्षाची सुरुवात करताना
आलेले अनुभव अपूर्वा घुगे (निर्माण ५) च्या शब्दांत...
“नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे उत्साहाचं वातावरण असतं.
उत्साहासोबतच ‘पुढं काय?’ हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. माझ्या नवीन वर्षाची
सुरुवात खूप वेगळी होती. या काळात मूल तालुक्यातील (जि. चंद्रपूर) दंत व मुख
आरोग्य तपासणी शिबिराला जाण्याची मला संधी मिळाली. शासकीय दंत रुग्णालय व
महाविद्यालय (GDCH), नागपूर येथील ६
डॉक्टरांचा आमचा चमू शिबिरासाठी रवाना झाला आणि वाटेत मला कळले की आम्ही SEARCH ला जातोय. मग काय माझ्या उत्साहाला पंखच फुटले.
‘निदान आणि जाणीव जागृती’ असं
शिबिराचं स्वरूप होतं. GDCH आणि SEARCH यांच्या चामूंना विभागून २ गट करण्यात आले आणि २ जानेवारीला आम्ही मूल
तालुक्यातील गावांकडे रवाना झालो.
बचतगटाच्या
स्त्रियांमधील कॅन्सरपूर्व चट्ट्याचे प्रमाण मोजण्यासाठी सर्व्हे करणे हे शिबिराचं
मुख्य उद्दिष्ट होतं. दोन दिवसांच्या शिबिरात आम्हाला लक्षात आलं की तंबाखूची सवय
असणाऱ्या जवळपास सर्वच स्त्रियांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती नव्हती.
साधारण ९०% स्त्रियांच्या व्यसनाची सुरुवात दुसरे खात आहेत म्हणून झाली होती.
साधारण १०% स्त्रियांना कॅन्सरपूर्व चट्टे होते. त्यातल्या साधारण निम्म्या
स्त्रियांना तंबाखू सोडण्याची इच्छा होती.
माझ्यासाठी
हे शिबीर विशेष महत्त्वाचे ठरले. पुन्हा एकदा मुख आरोग्य आणि मुख स्वच्छता
पद्धतींच्या जागरूकतेची गरज प्रकर्षाने जाणवली आणि माझ्या वाटचालीची दिशा निश्चित
झाली.”
No comments:
Post a Comment