'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 28 February 2015

ई – प्रशासन गावोगाव पोहोचवताना . . .


            साधना गुलदगड (निर्माण ६) जानेवारी २०१४ पासून ‘पुकार’ या मुंबईस्थित सामाजिक संस्थेसोबत रिसर्च असोसिएट म्हणून काम करते आहे. पुकारबद्दल आणि तिच्या कामाबद्दल थोडेसे...
            पुकार (www.pukar.org.in) ही मुंबईतील सामाजिक विषयांवर संशोधन करणारी संस्था आहे. २००२ सालापासुन पुकारने मुंबईतील विविध भागात तरूणांना संशोधन करायला शिकवून त्यांच्या वस्त्यांच्या प्रश्नाबाबत जागरुकता निर्माण करण्याचे काम केले आहे. २०१४ पासून पुकार ग्रामीण भागातही युवकांना संशोधनाच्या आणि ई – प्रशासनाच्या माध्यमातून जागरूक नागरीक घडविण्याचे काम करत आहे. पुकारच्या सर्व प्रोजेक्ट मध्ये Community Based participatory approach असतो. सध्या पुकार पालघर जिल्हातील, पालघर तालुक्यातील तीन अदिवासी गावांमध्ये Research On Internet Access ( RIA) हा प्रकल्प करत आहे.

            याअंतर्गत साधना आणि पुकारची टीम गावातील युवकांना एकत्रीत करून त्यांना संशोधनाचे आणि ई-प्रशासनाचे प्रशिक्षण देत आहे. हे युवक ई-प्रशासनाचे प्रशिक्षण घेतल्यावर गावातील लोकांना जाऊन शिकवतील.
            कामाच्या सुरवातीला साधनाच्या टीमने गावातील ग्रामपंचायतींना भेटी देऊन पंचायतीला हा प्रकल्प काय आहे ते सांगितले व त्यांची या प्रकल्पासाठी मान्यता मिळवली. त्याबरोबर घरोघरी जाऊन युवकांना हा प्रकल्प समजावून त्यांनादेखील एकत्रित केले. गावातील लोकांना प्रकल्पाची माहिती देणे त्यांचे काय प्रश्न असतील तर ते हाताळणे, वेगवेगळे प्रशिक्षणाचे Module बनवणे, युवकांचे प्रशिक्षण घेणे, युवकांच्या मिटिंग घेणे, त्यांचे प्रश्न व अपेक्षा समजुन घेऊन त्यावर काम करणे असे साधनाच्या कामाचे एकंदरीत स्वरूप आहे. या व्यतिरिक्त प्रोजेक्टचे Account संभाळणे, पुकार मध्ये होणाऱ्या सर्व मीटिंग्सना उपस्थित राहणे, मीटिंग्सचे मह्त्वाचे मुद्दे लिहणे, प्रोजेक्ट अहवाल लिहण्यासाठी लागणारी माहिती देणे इ. कामांमधून प्रोजेक्टच्या प्रशासकीय आणि नियोजनातील बारकावे शिकायला मिळत असल्याचे साधना सांगते.
            ग्रामीण / आदिवासी भागातील युवकांना केवळ माहितीच्या आभावामुळे त्यांच्यासाठीच सुरू असलेल्या विविध योजनांपासून कसे वंचित राहावे लागते या स्वानुभवातूनच साधनाने या भागातील य़ुवकांसाठी काम करायचं असं ठरवलं. गेल्या वर्षी लग्न झाल्यानंतर देखील साधना हे काम चालू ठेवू शकली याचे तिला समाधान वाटते. साधना सांगते “पुकारच्या माध्यमातून अदिवासी भागातील युवकांना संशोधनाचे आणि ई-प्रशासनाचे प्रशिक्षण देत असताना मनामध्ये समाधानाची भावना आहे. आता या आदिवासी पाड्यातील युवकदेखील आम्हांला ऑनलाईन लाईट बिल कसं भरतात ते शिकवा असं विचारू लागले आहेत. आपण त्यांच्या गरजेला उपयोगी पडत आहोत हा आनंद वेगळाच!”

            साधनाला तिच्या कामासाठी शुभेच्छा!
स्रोत: साधना गुलदगड, sadhana.guldagad@gmail.com

No comments:

Post a Comment