'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday 28 February 2015

चारुता गोखलेच्या संशोधनाला प्रथम पारितोषिक !


Preconception care हा विषय भारतात तुलनेने नवीन! Preconception care म्हणजे गर्भधारणेपूर्वी किमान ३ महिने बाईने स्वत:च्या शरीराची घ्यायची काळजी. गर्भधारणेपूर्वी लोह, Folic acid आणि जीवनसत्त्वांची कमतरता, मधुमेह, रक्तदाब यासारखे आजार, लैगिक संबंधांतून पसरणारे रोग, कीटकनाशकांशी जवळचा संबंध गर्भाच्या वाढीला घातक ठरू शकतात हे गेल्या १०-१५ वर्षात जगभरात झालेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. गर्भधारणेपूर्वी या सर्व घटकांवर उपाय योजना न केल्यास कमी वजनाचे बाळ जन्माला येऊ शकते. तसेच त्यात जन्मजात व्यंगही आढळू शकते. यावर विकसित देशांमध्ये मुबलक संशोधन झाले असले तरी भारतात मात्र यावर कोणताही अभ्यास झालेला नाही. चारुता गोखलेने (निर्माण १) PhDसाठी हा  विषय निवडला असून गर्भधारणेपूर्वी काही निवडक घटकांवर (risk factors) उपाययोजना केल्यास त्याचा गर्भाच्या वाढीवर परिणाम होतो का हा तिच्या अभ्यासाचा विषय आहे. या संशोधनाचा एक छोटा भाग म्हणून चारुता आणि तिच्या सहकार्यांनी मिळून पुण्याच्या काही गावांमध्ये  Preconception care विषयी बायकांना काय माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी ५ गटचर्चा घेतल्या. यात गर्भधारणेपूर्वी शरीरातील घटक बाळाच्या वाढीवर परिणाम करतात ही संकल्पना बायकांना नवीन होती हे निरीक्षण समोर आले. गरोदरपणात घेतली जाणारी काळजी पुरेशी असते असे सर्वांचे मत होते. परंतु गर्भ राहण्यापूर्वी बाई जाड असल्यास, तिला मधुमेह-रक्तदाब किंवा झटके यापैकी रोग असल्यास व त्यावर उपचार न केल्यास बाळात विविध प्रकारचे व्यंग तयार होऊ शकते अशीही काही निरीक्षणे बायकांनी नोंदवली. या सर्व अभ्यासातून बायकांना Preconception care विषयी अत्यल्प माहिती आहे हा महत्वाचा निष्कर्ष काढला गेला. हे संशोधन IPHA- IAPSM (Indian Public health Association and Indian Association of Preventive and Social Medicine) च्या कॉन्फरन्समध्ये सादर केले गेले. यामध्ये चारुताच्या गटाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या अभ्यासातून पुढे आलेल्या निष्कर्षांवर आधारित बायकांसाठी आरोग्यशिक्षणाचे साहित्य निर्माण करणे हा चारुताच्या संशोधनातील पुढचा टप्पा असेल.

स्त्रोत: चारुता गोखले, charutagokhale@yahoo.co.in

No comments:

Post a Comment