Prime Minister’s Rural
Development Fellow म्हणून छत्तीसगढ मधील दंतेवाडा प्रशासनासोबत कार्यरत
असणाऱ्या आकाश बडवे (निर्माण ४) याने दंतेवाड्याच्या शेतकऱ्यांसोबत एक आगळावेगळा
प्रयोग नुकताच पूर्ण केला. या प्रयोगाची थोडक्यात पार्श्वभूमी अशी: दंतेवाड्यात सिंचनाची
अनुपलब्धता, तसेच चराईबंदी नसल्यामुळे फक्त खरीप हंगामात पावसाच्या भरवशावर मुख्यतः
भाताची शेती केली जाते. छिडकावा (broadcasting) किंवा रोपा (transplantation) पद्धतीने भात लावला जातो. मात्र या दोन्ही पद्धतींनी उत्पादन खूप कमी येते. यावर
उपाय म्हणून खात्रीने उत्पादन वाढवणाऱ्या SRI (System of Rice
Intensification) पद्धतीचा प्रयोग या खरीप हंगामात करण्यात आला.
या प्रयोगांतर्गत कृषी विभागाच्या
कर्मचाऱ्यांना या पद्धतीने लागवड करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या
कर्मचाऱ्यांनी गावागावात शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीरे घेतली. ही पद्धती
वापरण्यास प्रोत्साहन म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत शेतकऱ्यांना तारांचे कुंपण देण्याची
घोषणा करण्यात आली. या पद्धतीने लागवड करण्यास तयार २७० शेतकऱ्यांना कृषी
विभागामार्फत प्रत्यक्ष शेतावर मार्गदर्शन करण्यात आले. या शेतकऱ्यांनी हायब्रीड
बियाणे न वापरता पारंपारिक बियाणे वापरावे, तसेच रासायनिक खते / कीडनाशके वापरू
नयेत म्हणून प्रोत्साहन देण्यात आले. याचबरोबरीने जैविक खते / कीडनाशके कसे
बनवावेत याचेही प्रशिक्षण देण्यात आले. या पद्धतीचा खूपच सकारात्मक परिणाम
झाल्याचे निरीक्षण आकाश नोंदवतो. बहुतेक शेतांमध्ये दरवर्षीपेक्षा ५०%-१००%
उत्पादन वाढल्याचे, तसेच छिडकावा पद्धतीच्या तुलनेत हे उत्पादन खूपच वाढल्याचे
आकाश नमूद करतो. दंतेवाड्यातील बहुतेक शेतकरी स्वतःपुरते धान पिकवतात, मात्र ज्या
शेतकऱ्यांना धान विकण्याची इच्छा आहे त्यांना बचत गटांमार्फत मार्केटिंगसाठी
प्रशासन मदत करणार आहे. या उत्पादन वाढीचा दाखला देऊन येत्या खरीपमध्ये ही पद्धत
जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रशासन प्रयत्न करणार आहे. आकाश आणि
त्याच्या टीमचे हार्दिक अभिनंदन !
No comments:
Post a Comment