मित्रांनो,
३० मे च्या दुपारी व्हॉट्सअॅप पाहत असताना एका तंबाखू विरोधी कार्यक्रमाचं निमंत्रण
दिसलं, पण मी तिथे वेळेत पोहोचू
शकलो नाही. त्यामुळे मनात ही खंत बाळगून
मी फेसबुकवर तंबाखूविरोधी पोस्ट्सना लाईक व शेअर करण्याचा सपाटा सुरू ठेवला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे
दुसऱ्या दिवशी दोन मित्र म्हणाले “आम्ही कॉलेजमध्ये व्यसन विरोधी काहीतरी कृती करण्याचा विचार करतोय, आपण पेशंटच्या नातेवेकांसाठी
एक तंबाखूविरोधी नाट्य व सादरीकरण करूया का?” मी लगेच होकार दिला.
आम्ही चर्चा करत असताना
व हॉस्पिटल अधीक्षकांची परवानगी घेईपर्यंत अजून तिघे सोबत आले. हॉस्पिटल अधीक्षकांनी वॉर्डाच्या
समोरील प्रतीक्षलायाची जागा सुचवली. तेथे भिंतीचे कोपरे लोकांनी खर्रा थुंकून रंगवून टाकले असल्यामुळे आमाच्यासाठी
आधीपासूनच 'रंगमंच' तयार होता! अवघ्या एक तासात नाटक बसवलं, तसेच कार्यक्रमात दाखवण्यासाठी
खर्रा-तंबाखू विरोधी व्हिडीओ शोधला. कार्यक्रमामध्ये कोणत्या
व्यक्तीचे स्वागत, हार-तुरे असा प्रकार नव्हता. वॉर्डातील खुर्ची, त्यावर एक लॅपटाप, स्पीकर, हॉस्पिटलमधील जुने तंबाखूविरोधी
फलक एवढी जमवाजमव झाल्यावर, लोकांना एकत्र जमवण्यासाठी आम्ही व्हिडीओ सुरु केला व प्रत्येक वॉर्डमध्ये दवंडी
देवून नातेवाईकांना कार्यक्रमाच्या जागेवर घेऊन आलो.

मित्राच्या प्रभावामुळे व्यसनाकडे ओढ, वडिलांमुळे व्यसनाबद्दल आकर्षण, मुलीला पटवण्याकरिता मर्दानगीसाठी तंबाखू सेवन आणि ताणतणाव दूर
करण्यासाठी मित्राने दिलेला सल्ला अशा चार प्रसंगांमधून व्यसन कसं लागतं हे दाखवलं. नंतर सूत्रधाराने व्यसनांच्या
फुटकळ कारणांविषयी, तसेच व्यसनामुळे होणाऱ्या शारीरिक दुष्परिणामांविषयी व आर्थिक हानीबद्दल सांगितले. तंबाखू-खर्रा या विषयी प्रबोधन करणारा एक व्हिडीओ
दाखवला. नाटकाच्या उर्वरित भागात
व्यसनामुळे नायकाची झालेली दुर्दशा दाखवली. शेवटी नायकाचा मित्र त्याला व्यसनाचे दुष्परिणाम व धोके पटवून
देण्यात यशस्वी होतो आणि दोघेही जण आयुष्यभर निर्व्यसनी राहून मैत्री टिकवण्याची शपथ
घेतात, असा सकारात्मक व उद्बोधक
संदेश देऊन नाटकाचा शेवट झाला.

सरकार कधी तंबाखू बंद करेल किंवा आरोग्य व्यवस्था समाजाला जागरूक करण्यात कधी यशस्वी
होईल, माहीत नाही. पण वेळेवरचे नियोजन, नाटक, लोकांसोबतचा संवाद शिकत आम्ही
या ३१ मे ला ‘जागतिक तंबाखू विरोधी दिवस’ साजरा करत आमची भूमिका मांडली.
- रोहीत गणोरकर, (निर्माण ६)
No comments:
Post a Comment