'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 27 June 2016

स्वाभिमान रोजगार योजना....

नरेगा (रोजगार हमी योजना) मधून करता येणा-या जलसंधारणाच्या कामांपैकी एक काम म्हणजे शेततळे. शेतकऱ्याचा दृष्टीने एक महत्वाचे साधन. पावसाळ्यामध्ये जर पाऊस अनियमित झाला तर याच शेततळ्याच्या मदतीने शेतकरी आपल्या पिकाला पाणीपुरवठा करू शकतो. त्याचबरोबर पावसाळ्यानंतर काही महिने शेततळ्यामध्ये साठवलेल्या पाण्याच्या मदतीने तो शेतामध्ये अन्य पीक घेऊ शकतो. या शेततळ्यामध्ये मासेपालनासारखा जोडधंदा करून अधिक उत्पन्न घेता येते. जमिनीमध्ये पाणी मुरवण्याचे कामही शेततळे करते. विहीरींच्या वरील भागात जर शेततळी झाली असतील तर विहीरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे आढळून आले आहे.
अशा प्रकरे शेतकऱ्यासाठी उपयुक्त असणाऱ्या शेततळ्याची कामे नरेगा मधून मात्र फार कमी प्रमाणात घेतली जातात. शेततळे घेण्यासाठी योग्य अशी जमीन नसणे, त्याचप्रमाणे लोकांना पडणारा कमी रोज अशी अनेक कारणे यासाठी दिली जातात. 'मागेल त्याला शेततळे' या शासनाच्या योजनेमध्येसुद्धा काही तालुक्यांमध्ये दिलेले उदि्दष्ट पूर्ण झाले नसल्याची बातमी वाचण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आपला मित्र मकरंद दीक्षित, त्याचे काही सहकारी व प्रगती अभियान, यांनी खाजगी निधीतून शेततळे करण्याचा एक उपक्रम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये राबवण्याचे ठरवले. या उपक्रमाचे वैशिष्ठ्य असे की, जरी खाजगी निधीमधून काम होत असले तरी त्याचे कामाचे निकष हे नरेगा प्रमाणे होते; म्हणजेचहोणारे काम हे नरेगाच्या नियमाप्रमाणे होईल, मात्र निधी खाजगी वापरला जाईलअशी उपक्रमाची आखणी होती.

आम्हा सर्वांसाठीच हा एक वेगळा अनुभव होता. कारण आत्तापर्यंत केवळ शासनाने केलेली कामे बघत आलो होतो, तर आता योग्य प्रकारे कामाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आमची होती. नरेगाच्या नियमाप्रमाणे जागा निश्चित करुन शेतकऱ्यांची परवानगी घेण्याच्या कामापासून ते वेळेवरती मजूरीची रक्कम देण्यापर्यंत सर्व कामे आम्हाला करावयाची होती.
हे काम म्हणजे आमच्यासाठी एक परीक्षाच होती. काम योग्य प्रकारे आणि विनाअडथळा करून दाखवणे आवश्यक होते. कारण यातून प्रशासनासमोर त्याचसोबत तालुक्यातील सर्व गावांसमोर एक उदाहरणच प्रस्थापित होणार होते. शेततळ्याची कामे करण्याची आदर्श पद्धत समोर येणार होती. नियोजनपूर्वक काम केल्यासनरेगा मधून शेततळ्याचे काम चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतेहे यातून दिसून येणार होते आणि त्याचा परिणाम तालुक्यातील इतर गावांमध्ये दिसण्याची शक्यता होती.
या प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायतीशी सुसंवाद साधणे, मजूर व रोजगार सेवक यांना मार्गदर्शन करणे, कामावरती देखरेख करणे, काही अडचणी आल्यास त्या सोडवणे अशा प्रकारची कामे ठराविक वेळेत पार पाडावी लागतात. गावातील गरजू व्यक्तीचा शोध घेणे हे यातील महत्वाचे काम होते. कारण व्यक्ती निवडताना अशी निवडायची होती की ती व्यक्ती खरच गरजू असावी आणि त्या व्यक्तीचे नाव नरेगाच्या कृती आराखड्यामध्ये नसले पाहीजे. (‘ज्याला शेततळ्याची गरज आहे पण त्याचे नाव नरेगाच्या आराखड्यामध्ये नाहीअसा माणूस आम्हाला मिळणे म्हणजे कृती आराखडा अपूर्ण असण्याचा एक प्रकारे दाखलाच होता. असो..)
ऊत्स्फूर्त सामाजिक सहकार्याअंतर्गतस्वाभिमान रोजगार योजनाया नावाने देवगाव, चिंचओहोळ, हिर्डी व कोटमवाडी या चार गावांमध्ये प्रत्येकी एका शेततळ्याचे काम यशस्वीरित्या करण्यात आले. यातील प्रत्येक शेततळे हे 10*10*3 मी. (10 मीटर लांब 10 मीटर रुंद 3 मीटर खोल ) या मापाचे होते. या चार शेततळ्यांच्या कामातून जवळपास 102 मजूरांना एक आठवड्याचा रोजगार उपलब्ध झाला आणि सरासरी २०० ते २१५ रूपयांपर्यंत रोज मिळाला. हिर्डी या गावातील मजूरांना २८४ रुपये तर कोटमवाडी येथील मजूरांना ३०० रुपये रोज मिळाला. नरेगामध्ये कामानुसार रोज मिळतो. त्याचनुसारच प्रत्येक कामाचे मोजमाप होऊन त्याप्रमाणे मजूरी दिली गेली.
जलसंधारणाच्या दृष्टीने विचार केला तर वरील मापाच्या एका शेततळ्यामध्ये अंदाजे १ लाख ७५ हजार लिटर पाण्याची साठवण होवू शकते. चार शेततळी मिळून अंदाजे ७ लाख लिटर पाणी, म्हणजे लातुरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका वेळेस जेवढे पाणी नेले जाते तेवढे पाणी या शेततळ्यांत साचणार आहे. लातुरला एका वेळी पाणी वाहून नेण्याचा खर्च कोटीच्या घरात आहे आणि ही शेततळी बांधाण्यास आलेला खर्च मात्र १ लाख २७ हजार रुपये एवढा आहे.
पावसाळ्यानंतर अर्धा एकर जमिनीवरती शेतकरी उत्पन्न घेऊ शकतो, शिवाय मासेमारी सारखा व्यवसाय करू शकतो. किंवा येथील जनावरांना पिण्यासाठी हे पाणी पुरणार आहे. शिवाय ही निरंतर वापरता येणारी संसाधने आहेत ज्यात हे पडणारे पाणी हे दरवर्षीच्या पावसाळ्यात कमी अधिक प्रमाणात साचणार आहे, जमिनीत मुरणार आहे.

लोकांनी लोकांचा लोकांसाठी राबवलेलाहा एक उपक्रम आहे. ही कामे बघून अजून शेततळी करण्याची मागणी गावांमधून येण्यास सुरूवात झाली आहे. शेततळ्यांसोबतच इतर कामेसुद्धा करता येतील का? अशी विचारणा गावातील रोजगार सेवकच करू लागले; हेही या उपक्रमाचे यशच म्हणता येईल.
यातून एक गोष्ट मात्र अधोरेखित झाली, की गावातील मजूर आणि रोजगार सेवक यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास नरेगा चांगल्या प्रकारे राबवता येवू शकते!
निखिल अरुण मुळ्ये (निर्माण ५), 

मकरंद दीक्षितने या कामाबद्दल लिहिलेला विस्तृत लेख 'लोकप्रभा'मध्ये प्रसिद्ध झाला आहे. तो येथे वाचू शकता - http://www.loksatta.com/vishesha-news/private-rojgar-hami-yojana-1242519/

No comments:

Post a Comment