'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 11 June 2013

प्रिय नायना...


“शहरातील सुखवस्तू रुग्णाला ‘आराम कर’ हा सल्ला सहज देता येतो आणि तो ते करूही शकतो. पण शेतकऱ्यांना असा सल्ला कसा देणार? ‘आराम कर’ म्हटलं तर त्यांच्या पोटापाण्याचं कसं होणार? हे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. किती दिवस गोळ्या इंजेक्शनं घेणार? वर्षानुवर्षे चुकीच्या स्थितीत वाकून बसून हे लोक कष्ट करत आहेत. त्यामुळे शरीराच्या मूळ रचनेत अनेक बदल होऊन गेले आहेत. कितीही गोळ्या इंजेक्शनं घेतली तरी दुखणं परत येणारच आहे. यावर उपाय काय?” गौरी चौधरी मूळची फ़िजिओथेरपिस्ट (व्यायामाची डॉक्टर). गडचिरोलीच्या खेड्यांतील शेतकरी/मजूरांच्या पाठकंबरदुखीवर तिने दीड वर्ष काम केलं. गावकऱ्यांना दुखण्यावर व्यायाम/उपचार शिकवता शिकवता त्यांच्याकडूनच खूप काही शिकत गेली. आपल्या शिक्षणाबद्दल नायनांना तिने लिहिलेलं हे पत्र, नायनांच्या सूचनेनुसार आणि गौरीच्या परवानगीने सादर करीत आहोत.प्रिय नायना,

शोधग्राममधील दीड वर्षांत माझं झालेलं शिक्षण आणि फीडबॅकविषयी हे पत्र. खरं तर हे पत्र पाठवायला मी खूप वेळ घेतला. जेव्हा जेव्हा मी हे पत्र लिहायला बसायचे, तेव्हा तेव्हा शोधग्राम, तेथील लोक, जागा याविषयी इतक्या आठवणी यायच्या आणि त्या आठवणींच्या गर्दीत नेमकं काय लिहायचंय हे बाजूला राहून जायचं, किंवा कधी कधी लिहिता लिहिता खूप रडू यायचं. शोधग्राममधून मनाने बाहेर यायला खूप वेळ घेतला. या पत्रात मी वैयक्तिक आणि प्रोफेशनल लर्निंगविषयी लिहायचा प्रयत्न करत आहे.
फ़िजिओथेरपी ही तशी शहरी वैद्यकीय शाखा. शहरातही लोकांना त्याविषयी अजून नीटसं माहित नाही. सुरुवातीला पुण्यात काम करत असताना अनेक प्रश्न सतावत होते. मी काय करत आहे? कशासाठी करत आहे? मला नेमकं काय करायचं आहे? हे प्रश्न घेऊन हेमलकसा आणि आनंदवनला पोचले. आनंदवनातील विविध पेशंट आणि गरज बघून तिथे येऊन काम करण्याचा निर्णय घेतला. इथे येऊन लोकांचे दुःख जवळून पाहिलं. ही दुःखे पाहताना माझ्यात आतून काहीतरी बदलत गेलं. स्वतःच्या सुखाची जाणीव झाली. व्यायामाची डॉक्टर यापेक्षा एक बहीण, मैत्रीण म्हणून मी तिथल्या मुलींसोबत आपोआपच वागू लागले. आणि मग एक हात कोपरापासून तुटलेल्या मुलीने प्रेमाने शिवून दिलेला कुर्ता घालण्यातही आनंद व समाधान वाटू लागलं. पुढे काम वाढलं, पुन्हा कमी झालं. कामाची दिशा दिसेनाशी झाली. काही कारणांमुळे मी तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एव्हाना मला नेमकं काय करायचंय याचं उत्तर मिळू लागलं होतं, पण ते कसं-कुठं हे समजत नव्हतं. अशातच शोधग्रामची संधी समोर आली. सर्चबद्दल खूप ऐकलं होतं. पहिल्यांदा मनात विचार आला, मला जमणार आहे का?पण मनातली ही भीती थोडी बाजूलाच ठेवत मी सर्चला पोचले. आनंदवन ते सर्च प्रवासात अनेक प्रश्न, अनेक विचार मनात येत होते. पहिल्याच दिवशी योगेश दादा, अम्मा, सिंधू, चारुता आणि दोनच दिवसांनी झालेली तुमची भेट यानंतर मनातली भीती निघून गेली. पहिल्याच दिवशी इतके मित्रमैत्रिणी भेटले की अनेक दिवसांचा एकटेपणा निघून गेला. काही कळायच्या आतच शोधग्राम परिवाराची मी एक सदस्य होऊन गेले होते.
‘सहभागी पद्धत’ म्हणजे काय याचा अभ्यास सुरू झाला. पण ऑफिसमध्ये बसून प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. डिसेंबर २०११ ला मी पोर्ल्याला अरुणा ताईंकडे दोन दिवस गेले होते. गावात एका आजीला frozen shoulder चा त्रास होता. तिला प्रचंड वेदना होत होत्या. तिला तपासून उपचार देताना जाणवलं की गावात गेल्याशिवाय आणि पाहिल्याशिवाय काय करता येईल हे समजणारच नाही. पण कसं, कुठे, का हे प्रश्न होते. योगेश दादा आणि सिंधूसोबत चर्चा करून सावरगावला व्यायामाचे क्लास घेऊन बघायचे असं आपण ठरवलं. गावात मी पहिल्यांदाच गटचर्चा घेणार होते. मनात प्रचंड भीती होती. पहिली गटचर्चा झाली आणि लोक व्यायाम क्लासला येण्यासाठी तयार झाले होते. आश्चर्य वाटत होतं. क्लास सुरू झाल्यानंतर आठच दिवसांत लोकांचं येणं हळूहळू कमी आणि मग बंदच होऊन गेलं. एक ना अनेक समस्या समोर येत होत्या. नवरा पाठवत नाही, जेवण झालं, एक दिवस व्यायाम केला पण बरं वाटलं नाही इ. कारणं समजू लागली. ग्रामीण फ़िजिओथेरपीचं चित्र मला थोडसं दिसू लागलं होतं. ताबडतोब आराम देणारा एकही उपचार माझ्याकडे नव्हता. लोकांना घरोघरी जाऊन बोलावणं, दोन-दोन तास वाट पाहणं, दोन-दोन तास वाट पाहूनही कुणी न येणं, तरीही पुन्हा दुसऱ्या दिवशी जाणं हे सगळं करत असताना माझी सगळी शहरी inhibitions गळून पडत होती. कधीकधी खूप हताश वाटायचं, चिडचिड व्हायची, पण पुन्हा एक दिवस प्रयत्न करून पाहू असं म्हणून सिंधू आणि मी जात राहिलो. लोक तर आले नाहीत, पण या क्षेत्राकडे बघण्याची माझीच नजर बदलली होती. लोकांसाठी ही पद्धत नवीन होती. खरंतर त्यांना गरजही नव्हती. पण त्रास तर होत होता. मग गरज कशी नाही? हा प्रश्न पडू लागला. फक्त व्यायाम क्लास गावात चालणार नाही हे तेव्हा कळून चुकले होते.
पुढे काही दिवसांनी सहभागी पद्धतीने गावात घ्यायच्या गटचर्चांवर काम सुरू झाले. गोष्टी, चित्रे तयार करायचा अनुभव नसल्यामुळे सुरुवातीला थोडं कठीण गेलं. मात्र हे करत असताना गावातील लोकांच्या नजरेतून त्यांचा त्रास बघणे सुरू झालं होतं. दवाखान्यात पेशंट बघतानाही हा अनुभव येत होता. शहरातील सुखवस्तू रुग्णाला ‘आराम कर’ हा सल्ला सहज देता येतो आणि तो ते करूही शकतो.  घरी काळजी घेणारी अनेक माणसे असतात. पण शेतकऱ्यांना असा सल्ला कसा देणार? ‘आराम कर’ म्हटलं तर त्यांच्या पोटापाण्याचं कसं होणार? हे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. किती दिवस गोळ्या इंजेक्शनं घेणार? वर्षानुवर्षे चुकीच्या स्थितीत वाकून बसून हे लोक कष्ट करत आहेत. त्यामुळे शरीराच्या मूळ रचनेत अनेक बदल होऊन गेले आहेत. कितीही गोळ्या इंजेक्शनं घेतली तरी दुखणं परत येणारच आहे. यावर उपाय काय हा प्रश्न आहेच.
सुपरवायझरसोबत काम करत असताना छान अनुभव आला आणि शिक्षणही झाले. लोकांची पाठ-कंबरदुखी, त्यावर ते करत असलेले उपचार, लोकांच्या कामाच्या वेळा, गटचर्चेला ते बसतील की नाही इ. अनेक गोष्टी समजायच्या. गोष्टी लिहिताना, चित्र काढताना ते नेमकं कसं हवं, त्यात मुख्य काय दिसले पाहिजे, गोष्टीत कोणते मुद्दे आले पाहिजे अशा अनेक बाबी शिकत होतो. कुसुमताई आणि आनंदकाका यांची खूप मदत झाली.
सावरगाव व्यायाम क्लासच्या वेळी ‘वेळ नाही’ अशी लोकांची तक्रार आली होती. त्यावेळी काम करता करताच काही व्यायाम करता येऊ शकतात का याचा विचार आपण सुरू केला. त्यासाठी रोवणीच्या मोसमात रोवणी करायला सिंधू आणि मी गेलो. खरंतर रोवणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे १०-१२ दिवस माझी मानसिक तयारी व्हायलाच लागले. कारण फक्त भीती होती. चिखलात पाय घातल्यावर साप, विंचू असतील तर? पण एके दिवशी ठरवलंच जायचं म्हणून. इतर बायका करतातच की. मलाच काय होणार आहे? आपल्या आणि टोल्यावरच्या शेतात रोवणी करताना तेथील बायांच्या गप्पा ऐकताना मजा यायची. त्याही आमची मजा घ्यायच्या, आमच्यावर हसायच्या. प्रेमाने जेवू घालायच्या. पण काम करत असताना त्यांची शिस्त, त्यांच्यासमोर असलेलं दिवसाचं टारगेट, आणि त्यानुसार त्यांच्या कामाची गती यातून खूप काही शिकण्यासारखं होतं. पाऊस, वारा, थंडी या कशाचीही चिंता न करता त्या अखंड काम करायच्या. पहिल्या दिवशी रोवणी करून आम्ही जेव्हा परत आलो, तेव्हा मला सरळ होऊन चालणेही कठीण झाले होते. पण मनातली भीती निघून गेली होती. त्यांच्यासोबत वाकून काम केल्यानंतर या लोकांची कंबरदुखी नेमकी काय असते हे समजू लागलं होतं. तिथे काम करता करता कंबरेच्या काही सोप्या हालचाली त्यांना शिकवण्याचा आम्ही प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांना हसू आलं. करायला लाज वाटत होती, वेळ नसतो अशा अनेक गोष्टी झाल्या. पण खरंतर त्यांना व्यायाम शिकवता शिकवता आणि काम करता करता आम्हीही व्यायाम करणं विसरून जाऊ लागलो होतो. शारीरिक श्रम करण्याची थोडीफार सवय शोधग्राममध्ये आल्यावर लागली होती, पण शेतात काम केल्यानंतर हे काम करणाऱ्यांविषयी मला आदर वाटू लागला. हे काम सोपं नाही. खूप अंग दुखायचं, आजारी पडले, पायात काटे घुसले, मधूनमधून अंगावर येणारा पाऊस-वारा, धानाची इवलीशी रोपं आणि शेतात कष्ट करणारे लोक हे सगळं असलं की शरीराची सगळी दुखणी बाजूला रहायची आणि हात आपोआपच कामाला लागायचे. मी जे अन्न खाते ते मला मिळवण्यासाठी कुणीतरी शेतकरी स्वतःला किती झिजवत असतो हे मला समजले. काम करण्याची पद्धत, शिस्त समजली. माझ्यातली व्यायामाची डॉक्टर मी पूर्णपणे विसरून गेले होते आणि कदाचित त्यामुळेच लोकांनीही आमचं त्यांच्या शेतात घुसणं मान्य केलं होतं. लोकांमधली एक होऊन राहणं हे तेव्हापासून सहज जमू लागलं. स्वतःला अती जपण्याचा स्वभाव नव्हता, पण जो काही होता तोही पूर्णपणे कमी झाला. या कामांमुळे लोकांना किती त्रास होतो हे समजत होते, पण कितीही त्रास झाला तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान दिसायचं. पण, त्यांचा त्रास कसा कमी करावा यावर उत्तर काही अजूनही सापडत नाहीये. उपाय आहेत, परंतु ते गावपातळीवर कसे अंमलात आणायचे हे कुठेतरी काळात नाहीये. पुढे आपण चातगाव टोला आणि कुडकवाही येथेही गटचर्चा घेतल्या. हे सगळं करत असताना patience प्रचंड वाढत होता. खूप शिकायला मिळत होतं. नवनवीन गोष्टी करून बघत होतो. चुका करत करत त्या सुधारण्याचा प्रयत्न करत होतो. रोवण्यांना गेल्यामुळे त्यां ओळखीचा फायदा गावात गटचर्चा घेताना नक्कीच झाला. लोक चर्चांना येत होते. आम्ही त्यांच्या घरातलेच होऊन गेलो होतो. त्यामुळे एक comfort level होती. या गटचर्चांनंतर आपण संपूर्ण plan पुन्हा बदलून कुरखेडा येथे गटचर्चा घेण्याचे ठरवले. तेव्हा पुन्हा नव्याने सुरुवात करताना थोडी भीती वाटली होती. पण एक प्रकारचा आनंदही होता, उत्साह होता. सर्च पुन्हा पुन्हा प्रयोग करण्याची संधी देतं.झालेल्या चुका सुधारण्याची आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी देतं. त्यामुळे काम करतानाही एक उत्साह आणि आत्मविश्वास वाटतो. ‘करके देखो’ हे सूत्र मी पहिल्यांदा सर्चमध्येच अनुभवलं.
नायना, गेल्या दीड वर्षांत माझं काय शिक्षण झालं याबद्दल लिहिण्याचा प्रयत्न केला. खूप काम करायचे आहे. आता कुठे सुरुवात झालीये. फक्त तुमचे आशीर्वाद हवे आहेत.
तुमची,
गौरी
गौरी चौधरी

No comments:

Post a comment