'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 13 June 2013

संजय पाटील व सहकाऱ्यांना बीज संवर्धनाच्या कामासाठी केंद्र सरकारचा मानाचा पुरस्कार !

निर्माणचे वरिष्ठ सहकारी श्री. संजय पाटील अनेक वर्षे ठाणे जिल्ह्यातील जव्हार या आदिवासी भागात बायफ-मित्र या संस्थांच्या कार्यक्रमांतर्गत लोकसहभागातून पारंपारिक बियाण्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहेत. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयामार्फत बियाण्यांच्या संवर्धनाबद्दल दिला जाणारा मानाचा पुरस्कार २०११-१२ वर्षातील कामगिरीबद्दल संजय पाटील यांच्या जव्हारमधील समूहाला मिळाला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी समूहाला पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाला आहे. नवी दिल्ली येथे २२ मे रोजी झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्री. तारिक अन्वर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दहा लाख रुपये व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. बीज संवर्धन क्षेत्रातला हा सर्वोच्च पुरस्कात मानला जातो.
बीज संवर्धनाच्या या उपक्रमांतर्गत संजय पाटील ठाणे व नंदुरबार जिल्ह्यांतील ११ गावांतल्या ७२४ शेतकऱ्यांसोबत काम करत असून भाताच्या १७०, नाचणीच्या २७, वरईच्या १० व कंदपिकांच्या विविध जातींचे संवर्धन करण्यात त्यांना यश आले आहे. जव्हार येथील बीज बँकेत आज भात, मका, कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला व कंद यांच्या सुमारे ४०० जाती संग्रहित आहेत.
            हा पुरस्कार देऊन केंद्राने त्यांच्या कामाला पावतीच दिली आहे. संजय पाटील व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन !

No comments:

Post a Comment