भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहराची
फुफ्फुसे म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ओळखले जाते. अतिशय विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या या राष्ट्रीय
उद्यानात विविध प्रकारच्या अनेक वनस्पती आहेत. वर्षानुवर्षे ही वने पर्यावरणाचा समतोल राखण्यास
मदत करत आहेत. पण आजूबाजूला मानवी वस्तीचा सुळसुळाट वाढल्यानंतर
या जंगलांमध्ये अनेकदा नको त्या घटना घडायला लागल्या. महाशिवरात्रीच्या निमित्ताने अशा घटनांना आळा
घालण्यासाठी विवेक पाटील आणि मित्रमंडळींनी एक छोटासा प्रयत्न केला...
मुलुंड जवळील शंकर टेकडी परिसरात दर वर्षी महाशिवरात्रीच्या
वेळी लाखो भाविक श्रद्धेने टेकडीवरच्या मंदिराचे दर्शन घेण्यास येतात. या वेळी
जंगलामध्ये अनेक वेळा घुसखोरी होते. शेकोट्या केल्या जातात आणि जळते निखारे तसेच सोडून देण्यात येतात. अशा वेळी
लागणारी आग ही खूपच भयाण असते. जंगलात नशेचे पदार्थ नेऊन त्यांचे बेकायदेशीररित्या सेवन केले
जाते. प्लास्टिक आणि इतर कचरा इइतरस्तः टाकला जातो. तेव्हा
पर्यावरणाची होणारी हानी ही न भरून निघणारी असते. मोठमोठ्याने
गाणी लावली जातात, ज्यामुळे वन्य जीव आणि पक्षी यांना अतोनात त्रास होतो.
हे सर्व रोखण्यासाठी जंगलात प्रवेश करण्याच्या मार्गावरच पहारा
देण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास १० ते १२ स्वयंसेवक आणि वनरक्षक विभागाचे काही अधिकारी
यांच्या पहाऱ्यात ५ पोती भरून प्लास्टिकचा कचरा, २ पोटी
भरून नशेचे पदार्थ आणि बऱ्याच प्रमाणात ज्वलनशील वस्तू जप्त करण्यात आल्या. दिवसाच्या
शेवटी एवढ्या प्रमाणात जप्त केलेल्या वस्तू पाहून आम्ही सुद्धा विचारात पडलो...
भक्तीच्या मार्गावर असताना या सर्व गोष्टींची गरज का बरं पडावी? की देवाच्या
भेटीला जाणे ही सोयीस्कर रीतीने नशेमध्ये बुडवून घेण्याची एक संधी समजली गेली आहे? आपल्या
खिशात असणाऱ्या मद्याच्या बाटल्या जप्त केल्या जातात म्हणून आपल्या लहान मुलांच्या
खिशात त्या बाटल्या टाकून त्यांना पुढे पाठवणारे महाभाग आम्हाला दिसून आले. देवासाठी
नेण्यात येणाऱ्या फुलांच्या खाली सिगारेट आणि तंबाखूची पाकिटे पण सापडली. नक्की कोणत्या
भावनेने ह्या वस्तू देवाच्या दारी घेऊन जाण्याचे धाडस या भक्तांना सुचले? १६-१७ वर्षाच्या मुलांच्या
खिशात मिळणारी चरस गांजाची पाकिटे पाहून त्यांना काय बोलावे हेच कळत नव्हते. शेवटी ती
पाकिटे जप्त करून त्यांना या गोष्टींपासून दूरच राहण्याचा सल्ला देण्यापलीकडे काही
करू शकलो नाही.
या सर्व उपक्रमात एका दिवसात होणारी जंगलाची हानी काही प्रमाणात
रोखण्यात आम्हाला यश आले. इतर दिवसांच्या
तुलनेत या एका दिवसातील कचरा, अंमली पदार्थांचे सेवन, निष्काळजीपणामुळे
वणवा लागण्याची शक्यता हे सर्व बरेच जास्त असल्याने ते रोखणे महत्त्वपूर्ण ठरले. जंगलात
एकदा गेलेला कचरा पुन्हा बाहेर काढणे जवळपास अशक्यच असते. तो कचरा, जर प्लास्टिकच्या
स्वरुपात असेल तर तेथील पर्यावरणाचा एक भाग म्हणून तेथील सजीवसृष्टीला नेहमीच त्रास
देत राहणार. शहरांमध्ये होणाऱ्या कचऱ्याला उपाय शोधेपर्यंत
निदान नैसर्गिक जीवसृष्टी टिकवणाऱ्या जंगलांना तरी त्यांच्या परीने जगू द्या, असेच आवाहन
या कृतीमार्फत केले गेले.
आम्हाला सुद्धा या एका दिवसभराच्या कृती मधून बरेच काही शिकायला
मिळाले. शिस्त आणि कायद्याचे पालन ही समाजातील आणि पर्यावरणातील समतोल
राखण्यासाठीची प्राथमिक गरज आहे. पण त्याची अंमलबजावणी करणे हे किती कठीण असते हे यातून कळले. वेळ प्रसंगी
अतिशय कठोर होऊन, माणसांचा रोष झेलून सुद्धा कायद्याची बाजू घ्यावी लागते. कधी कधी
पर्यावरणाच्या रक्षणाला लोकांच्या भावनांपेक्षा जास्त महत्त्व द्यावे लागते. अशा वेळी
लोकांना प्रेमाने समजावणे, त्यांना आपल्या बाजूला करून घेणे, समस्येची
पूर्णतः जाणीव करून देऊन योग्य ती कृती करण्यास उद्युक्त करणे अशा अनेक कामांतून अनुभव
पक्का होत गेला. ‘लोकांविरुद्ध आम्ही’ असा पवित्रा
न घेता ‘समस्यांविरुद्ध लोक आणि आम्ही’ असा विचार
लोकांच्या मनात बिंबवण्याने बराच सकारात्मक प्रतिसाद मिळत गेला.
धैर्य आणि धाडस दाखवण्याची प्रवृत्ती बळकट झाली. व्यायाम
शाळेत होणाऱ्या शरीराच्या व्यायामासारखा हा धाडस आजमावण्याचा मनाचा व्यायाम खूप काही
देऊन गेला. अशा या धैर्याच्या परीक्षेचा अनुभव समाज परिवर्तनाच्या कार्यात
असणाऱ्या प्रत्येकाने घ्यावा असे वाटले...
No comments:
Post a Comment