अज्ञात गांधी
(मूळ लेखक – नारायणभाई
देसाई, मराठीत रुपांतर - सुरेशचंद्र वारघडे)
नारायणभाई देसाई यांचे वडील महादेवभाई देसाई हे बापूंचे खाजगी सचिव होते. तसेच नारायणभाई यांनी स्वतः गांधीजींबरोबर
वीस वर्षे घालवली. गांधीजींच्या जीवन प्रवासाबद्दल आज समाजात तर्क वितर्क लावले जातात.
गांधीजींबद्दल (आजच्या) समाजात
असलेली अपूर्ण, विकृत आणि चुकीची
समजूत दूर करण्याचा प्रामाणिक
प्रयत्न नारायणभाई यांनी कित्येक वर्ष त्यांच्या व्याख्यानांतून केला.
अज्ञात गांधी या कथेच्या रचनेमध्ये गांधीजींच्या जन्मापासून ते अखेर पर्यंतच्या जीवन प्रवासातील काही निवडक पण अतिशय महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला गेला आहे. पुस्तक वाचताना गांधीजींच्या आणि कस्तुरबा गांधी यांच्या जीवनातील खऱ्या अर्थाने अज्ञात गोष्टींचा उलगडा होतो.
उदाहराणार्थ १९२१ साली गांधीजींचा बिहार, ओरिसा, आंध्र प्रदेश व तामिळनाडू या
प्रदेशांमधून प्रवास
चालू होता. समाजात दिसणारं दारिद्र्य त्यांना अस्वस्थ करत होत. गांधीजींच्या सभेला उपस्थित राहण्याची इच्छा गावातील लोकांना होती पण एक घरात कस्तुरबांना असे आढळले की घरातील तीन महिला एकच लुगड वापरतात आणि त्या तिघीतील एक ते लुगड नेसून बाहेर गेली होती.
अंग झाकायला कपडे नाही म्हणून या बायका सभेला उपस्थित राहू शकत नाहीत
हे जेव्हा बापूंना कळले तेव्हा त्यांना खूप दुःख झाले. त्यांनी त्यांच्या सभेत साध्या जीवन शैलीवर भर दिला. ते म्हणाले, "गरीब माणसाला अंग झाकण्यासाठी पुरेसे वस्त्र मिळत नाही. अशा वेळी किंमती कपडे घालणं मला योग्य वाटत नाही. आपण साधे कपडे घातले पाहिजेत,
साधं जीवन जगल पहिजे." आणि बापूंच
चिंतन सुरू झालं.
पुढच्या मदुराई इथल्या भाषणावेळी
त्यांनी फक्त गुडघ्यापर्यंतच आखूड धोतर घातलं होतं. त्यावेळीही
त्यांनी भाषणात साधे जीवन जगण्याबद्दल लोकांना सांगितले. अशा प्रकारे लोकांना त्यांच्या वेषांतराचं रहस्य
समजलं. या प्रसंगातून बापूंच्या साध्या जीवन शैलीबद्दल असलेल्या मूल्यांबद्दल शिक्षण झाले. माझ्या आजूबाजूच्या समाजात आर्थिक विषमता असताना मी माझं जीवन अधिक साधं आणि गरजेपुरत कसं जगू शकतो याबद्दल विचार करायला मला मदत झाली. त्या दृष्टीने माझे प्रयत्नही
सुरु झाले.
कस्तुरबा गांधी यांच्याबद्दल नारायणभाई यांनी काही प्रेरणात्मक प्रसंग नमूद केले आहेत. पूर्वी दक्षिण आफ्रिकेत नाताळ, ट्रान्सवाल, कॅम्प कॉलनी आणि ऑरेंज स्टेट अशी चार स्वतंत्र राज्ये होती.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात
जाण्यासठी सरकरी परवानगी काढावी लागे. कस्तुरबांनी आपल्या पंधरा साथीदारांसह सत्याग्रहाचा
शुभारंभ केला आणि विनापरवानगी सरहद्द पार करून कायदेभंग केला. त्यांना ३ महिन्यांची शिक्षा
झाली. सुटका झाल्यावर जेव्हा त्यांना घेण्यासाठी आलेल्या त्यांच्या छोट्या देवदासला
पंधरा जणांमध्ये आपली
आई दिसलीच नाही. तेव्हा एका कृषकाय महिलेकडे बोट दाखवून एकीने, "ये तेरी बा" अस देवदासला सांगितलं. कस्तुरबांनी तुरुंगात फलाहाराची मागणी केली व त्यासाठी उपवासाचा
सत्याग्रह केला होता. त्यांची तब्येत इतकी खालावली की त्यांचा मुलगाही त्यांना ओळखू शकला नाही. सत्याग्रहाच्या या अनुभवत त्या मरता मरता वाचल्या होत्या. कस्तुरबा या तुरुंगात जाण्याचा व उपवासाचा निर्धार
करणाऱ्या पहिल्या सत्याग्रही महिला होत्या.
केपटाऊनला बापू हिंदू मुस्लिम पद्धतीने झालेले विवाह सरकारने बेकायदा ठरवल्यामुळे तेथील लोकांनी केलेल्या आंदोलनाबद्दल जनरल स्मट्स यांच्याशी चर्चा करत होते. त्याच वेळी त्यांना कस्तुरबा आजारी असल्याची तार मिळाली. तार वाचून बापू अस्वस्थ झाले. बापूंबरोबर असणारे रेवेरंड अॅंड्र्यूज यांनी बापूंना कस्तुरबांकडे जाण्याबद्दल सांगितले. त्यावेळी करारावर सह्या झाल्या नव्हत्या. तेव्हा बापू अॅंड्र्यूजना म्हणाले, 'सह्या झाल्याशिवाय मी कसा जाऊ? करारावर सह्या घेतल्याशिवाय गेलो तर लोकांना धोका दिल्याचं पाप माझ्या हातून घडेल.' शेवटी बापू सही घेऊनच कस्तुरबांना भेटायला रवाना झाले व आजारपणात त्यांची
मनापासून सेवा केली. इथे बापूंनी समाजाबद्दलचा आणि नात्यांबद्दलचा आपला स्वधर्म पूर्ण निष्ठेने अंमलात आणला. सामाजिक क्षेत्रात काम करताना असे प्रसंग बहुतेक वेळा समोर उभे राहतात, त्यावेळी माझा स्वधर्म काय व तो मी
कसा पूर्ण करू हे मला यातून समजून घेण्यास मदत झाली.
एकंदरीतच अज्ञात गांधी ही एक must read बापू कथा आहे. बापूंच्या आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टींबद्दल आज समाजात जे काही समज-गैरसमज आहेत
त्यांबद्दल स्पष्टता देण्यास
हे पुस्तक मदत करते. आईनस्टाईन
यांनी म्हटलं होत की, "महात्मा गांधी नावाचा हाडामांसाचा एक (विलक्षण) माणूस
या पृथ्वीवर होऊन गेला, यावर पुढील पिढ्या कदाचित विश्वासही
ठेवणार नाहीत." त्या दृष्टीने नारायणभाई यांची गांधी कथा ही खूपच महत्वाची आहे. लेखक म्हणतो, ही गांधीकथा केवळ गांधीजींचं चरित्र सांगणारी नाही तर गांधीजींचं 'जीवनसत्य' सांगणारी आहे व गांधीजी आजही
प्रस्तुत आहेत, हे अधोरेखित करणारी आहे.
No comments:
Post a Comment