गेल्या ४ वर्षापासून आकाश (निर्माण ६) बीजोत्सावामध्ये
सहभागी होत आहे. प्रत्येकाच्याच रोजच्या जगण्यात अन्नाचे इतके महत्त्व असूनही
याबाबत सगळे का बर इतके उदासीन असावेत? हा प्रश्न त्याला पडायचा. आपल्या
परिसरात, आजूबाजूला इतके शेतकरी सेंद्रीय शेती करतात, तरी यांना
हवा तसा प्रतिसाद का बर मिळत नसेल? सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ का होत नाही? Monsanto सारख्या
मोठमोठाल्या बीजोत्पादक कंपन्या अन्न सुरक्षा आणि सार्वभौमत्वाशी का बर खेळत असतील? असे प्रश्न
त्याला सतावत होते.
माझ्या ताटात येणारं अन्न कुठून येत आहे? त्यावर
काय काय प्रक्रिया होत आहे? माझे अन्न पिकवणारा शेतकरी कुठल्या अवस्थेत आहे? या प्रश्नांची
उत्तरं बहुतेक लोकांना देता येत नाहीत. अन्न पिकवणारा आणि अन्न खाणारा यामधील
ही दरी कमी करायची या अंगाने आकाशने नागपूरमध्ये “अन्न साक्षरता” या विषयावर
काम करायचे ठरवले आहे.
लोकांना अन्न आणि शेतकरी याबद्दल जागरूक करणे असे त्याच्या कामाचे
स्वरूप असेल. याअंतर्गत आकाश आणि त्याची टीम शेतावर प्रत्यक्ष काम करायला
गेले. शेतातील कामे केली. कामाचा
आर्थिक मोबदला किती? हे जाणून घेतले. आणि कशाप्रकारे शेतकऱ्याची पिळवणूक होत
आहे याबद्दल समजून घेतले. अश्या छोट्या छोट्या अभ्यास सहलींचे नियोजन आकाश करतो. ज्याद्वारे
लोकांना या सगळ्या गोष्टींचा नव्याने अनुभव मिळण्यास मदत होते. सोबतच नागपूर
मध्ये सेंद्रीय शेतमाल आणि शुद्ध अन्न याबद्दल रविवारी सकाळी आणि सायंकाळी बागेसमोर
जाऊन लोकांशी संवाद साधणे, विषमुक्त अन्न, अन्नातील भेसळ, GMO याबद्दल
प्रश्न विचारून त्यांना जागरूक करणे अशी कामेही चालू असतात. येत्या २१ मे ला नागपूर मध्ये आकाश व टीम Monsanto कंपनी विरोधात विशाल मोर्चा काढतो आहे आणि त्याच दिवशी सेंद्रिय शेतमाल
वितरण केंद्राचे उद्घाटन पण होणार आहे. असा मोर्चा काढणारे नागपूर हे देशातील
तिसरे तर आशिया खंडातील पाचवे शहर आहे.
तुम्हीही नागपुरात असाल तर आकाशाला भेटून ‘अन्न साक्षरता’ या विषयाबद्दल
अधिक जाणून घेऊ शकाल आणि त्याच्या या कामात जमेल ती मदत करू शकाल...
आकाशला त्याच्या पुढील कामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!
No comments:
Post a Comment