आपल्या बॅचच्या बहुतेक मित्रमैत्रिणी जी गोष्ट हमखास टाळतात तीच निर्माणच्या ६
तरूण डॉक्टरांनी केली आहे. अमित, प्रथमेश, ज्योती, कल्याणी, शिवाजी, दिग्विजय, अविनाश या आपल्या मित्रांनी जेथे गरज आहे अशा ग्रामीण / आदिवासी भागात एक वर्ष
आरोग्यसेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. MOship च्या त्यांच्या या निर्णयाबद्दल त्यांच्याच
शब्दांत...
jyo1073@gmail.com |
ज्योती सदाकाळ (निर्माण ५), PHC, परिंचे, ता. पुरंदर, पुणे
“मी एका वर्षापूर्वीच Moship करायची हे ठरवले होते आणि त्यामुळे मी इंटर्नशिप मन लावून करत होते, आणि सोबत अभ्यास पण सुरु होता. मला काम करताना पाहून बरेच जण म्हणायचे, की PG
entrance मध्ये चांगला rank मिळणार नाही या
भीतीने Moship
करणे हा excuse आहे. मला रोज समजावीत
होते की तू जॉईन नको करू,
PG चा अभ्यास कर. पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते. घरचे
सुरवातीला थोडे संभ्रमात होते, पण त्यांनी परवानगी
दिली. त्यासोबत खूप साऱ्या अटी पण मान्य कराव्या लागल्या.
इथे जॉईन होऊन एक महिना झालाय, माझ्या MBBS च्या अभ्यासा व्यतिरिक्त खूप नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत.. नवीन जागा, नवीन लोक,
नवीन केसेस, राजकारण... खूप
चांगला अनुभव आहे”
***
prathamesh.hemnani@gmail.com
|
प्रथमेश हेमनानी
(निर्माण ६), PHC, पेंढरी, ता. धानोरा,
गडचिरोली
“तुझ डोक फिरलंय का? पुढ शिकायचं नाही का?
PG च काय?” मी MOship करण्याचा निर्णय घेतल्या नंतर मला ह्या प्रश्नांनी घेरलं. “माझ्या वैद्यकीय शिक्षणाचा खर्च सरकारने केला, आता मी वैद्यकीय सेवा पुरवून ते ऋण परत करणे ही माझी जबाबदारी आहे” माझा निर्णय पक्का झाला होता.
गडचिरोली सारख्या मागास जिल्ह्यात काम करणे आव्हानात्मक आहे. १८-२० घरांची
वस्ती असलेल्या गावात वीज नाही, पावसाळ्यात तर बाहेरच्या
जगाशी संपर्क तुटतो. अशा गावात प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवणे खूप गरजेचे आहे. या
वर्षभरात खूप काही शिकायचे आहे, जसे की स्वतंत्रपणे
वैद्यकीय प्रॅक्टिस,
PHC ची प्रशासकीय व्यवस्था पाहणे, जबाबदारी घेणे,
इ. अर्थात गोंडी भाषा (आदिवासींची) शिकणे ह्या यादीत
सर्वांत वर आहे...
***
kalyanipansare19@gmail.com
|
कल्याणी पानसरे (निर्माण
६), PHC, मूर्ती, ता. बारामती,
पुणे
मला या निर्णयापर्यंत येण्यात निर्माण प्रक्रियेची खूप मदत झाली. मला
स्वतःविषयी व कामाविषयी अधिक स्पष्टता आली. मी इंटर्नशिप करत असतानाच या MOship करण्याच्या दृष्टीने तयारी करायला सुरवात केली होती.
इथे अंतर्गत राजकारण खूप आहे, तरीपण मी इथेच रहायचा
निर्णय घेतला कारण इथे दुसरा कोणी वैद्यकीय अधिकारी नाही. स्वतः प्रॅक्टिस करणे, जबाबदारी घेणे,
सर्व स्टाफला सांभाळून काम करणे ह्या गोष्टी शिकायला
मिळतील. हे अनुभव मला वैयक्तिक व कामाच्या अशा दोनही पातळीवर अधिक सक्षम करतील अशी
खात्री वाटते.”
***
abdhage@gmail.com
|
अमित ढगे (निर्माण ६), PHC, जिमलगट्टा, ता. अहेरी, गडचिरोली
“गडचिरोली सारख्या मागास
जिल्ह्यात काम करणे गरजेचे आहे आणि अनुभव मिळण्याच्या दृष्टीनेही ते उपयुक्त ठरेल
या हेतूने मी गडचिरोली मध्ये MOship करण्याचा निर्णय घेतला.
माझ्या या निर्णयाला घरच्यांनी फारसा विरोध केला नाही. कामावर रुजू झाल्याच्या पहिल्या
दिवशी खूप एकटे वाटत होते,
पण मी हे आव्हान स्वीकारायचे ठरवले.
इथे येणारा प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येतोय. रुग्णांशी
बोलताना माझा आत्मविश्वास आता वाढला आहे. जिथे कमी पडतो तिथे पुस्तके आहेतच
सोबतीला... माझ्या कामाचा अभ्यासात आणि अभ्यासाचा कामात फायदा होतो आहे. मी जे
ठरवले होते ते प्रत्यक्ष करताना मला छान वाटत आहे.”
***
अविनाश गिरी (निर्माण ६), PHC, अशवी, ता. संगमनेर, अहमदनगर
avisai143@gmail.com |
इंटर्नशिप झाल्यानंतर मी PG करणार होतो, पण कोणत्या विषयात करू ते समजत नव्हतं. मी पुढे ग्रामीण भागात काम करणार अस
ठरवलं होत. त्यामुळे मला आवडणाऱ्या विषयात PG करण्यापेक्षा या
भागातील लोकांचे आरोग्याचे प्रश्न कोणते आहेत, त्यांची गरज काय
आहे त्यानुसार विषय निवडायचा असे ठरवले. इथे साखर कारखाना जवळ असल्याने ऊस तोड
कामगारांची संख्या जास्त आहे. प्रसूती साठी आलेल्या महिला दवाखान्यात १ तास आधी
येतात त्यामुळे कुठल्याही टेस्ट, हिस्ट्री शिवाय उपचार
करावे लागतात. काम करताना अनुभवातून खूप शिकतोय.
***
bdigvijay101@gmail.com |
दिग्विजय बंडगर (निर्माण
५), PHC, मन्ने राजाराम, ता. भामरागड, गडचिरोली
महाराष्ट्रात गडचिरोली दुर्गम, गडचिरोलीत
भामरागड तालुका दुर्गम आणि भामरागड तालुक्यात मन्ने राजाराम दुर्गम. मन्ने
राजारामला जायला चांगला रस्ता नाही, public transport नाही,
फोनला रेंज नाही, बहुतेक आदिवासी
लोकसंख्या,
गोंडी व तेलगु प्रमुख भाषा. मात्र आरोग्याच्या कठीण समस्या
येथे आहेत. आदिवासींचे आरोग्यसेवेसाठी दवाखाना हे प्राधान्य नाही. म्हणजेच आव्हान
खूप मोठे. याच PHC
त पवन मिल्खेने (निर्माण ३) उत्तम काम केले होते. पवनने
निर्माण केलेल्या सदिच्छांची, तसेच लोकबिरादरी प्रकल्प
(हेमलकसा) यांची दिग्विजयला खूप मदत होईल. (दिग्विजय प्रतिक्रियांसाठी उपलब्ध होऊ शकला नाही.)
***
या सर्वच धाडसी मित्रमैत्रिणींना पुढील एक वर्षाच्या प्रवासात खूप शिकायला
मिळो आणि पुढील आयुष्यात या वर्षाचा खूप उपयोग होवो अशा शुभेच्छा!
No comments:
Post a Comment