'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 30 April 2016

यू कॅननॉट चूज टू स्टे सोबर अॅंड टेस्ट इट टू!

            नंदा (खरे) काकांच्या बुजुर्ग मागदर्शनाखाली १७ तरुण-तरुणींनी मार्च महिन्यात विदर्भातील अतिप्राचीन जीवसृष्टीच्या, संकृतीच्या, आधुनिक विकासाच्या (?) भूभागातून परिक्रमा केली. ही सहल त्यांना कितीसाऱ्या गोष्टी शिकवून गेली आणि सोबतच सर्व मित्र मैत्रिणींचा मजेने काठोकाठ भरलेला स्नेह मेळावाही बनून गेली. हा शब्दबद्ध केलेला अनुभव गणेश बिराजदार (निर्माण ४) याच्याच शब्दात

            समोर पाच-दहा कामं रांग लावून आपली वाट पाहत उभी आहेत. महिन्यातले आठ-दहा दिवस आधीच काही-ना-काही कामांच्या निमित्तानं फिसच्या बाहेर जाणार आहेत हे माहीत आहे. नेमकं अशा वेळी कोणीतरी, “पुढच्या महिन्यात एका ट्रीपला येतोस का?” असं विचारल्यावर किमान थोडीफार सूज्ञता टिकून असलेल्या माणसानं काय करावं?
राईट! “हो!” म्हणून टाकावं!
***
            पृथ्वीची निर्मिती सुमारे साडेचार अब्ज वर्षापूर्वी झाली! आपल्यापैकी किती जणांनी हे वाक्य पूर्वी ऐकलेलं असेल? किमान तिसऱ्या यत्तेपर्यंत मजल मारलेल्या बहुतेक सर्वांनी! आयुष्यात पहिल्यांदा कधीतरी 'साडेचार अब्ज वर्ष' आकडा ऐकल्यावर कसं वाटलं होतं? आठवा! तोपर्यंत मी पुढची गोष्ट सांगून देतो!

            नागपूरहून निघालेल्या गाड्या आमच्या पहिल्या तासिकेसाठी पैनगंगा ओलांडून नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन थांबल्या. सारे जण खाली उतरून नंदाकाकांच्या मागेमागे पैनगंगेच्या पात्रात उतरलो. समोर साधारण अर्धा-एक इंचाच्या क्षितिजसमांतर रेषेत वेगळे ओळखू येतील अशा थरांनी बनलेला काळापट रंगाचा खडक. नंदाकाकांनी सर्वांना एकत्र बोलावलं आणि सुरूवात केली, हा शेल! स्तरित खडकाचा प्रकार. इथला हा खडक कसा तयार झाला असेल? तर नदीपात्रात वर्षानुवर्षे वाहून आलेला गाळ साचत राहिला. पुढे कधीतरी भारताच्या पश्चिमेला झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेला लाव्हारस यावर पसरला. हा गाळ आतमध्ये दबून राहिला आणि हा दाब व उष्णता यातून गाळाचे खडकात रूपांतर झाले. पुढे याच लाव्हारसातून तयार झालेल्या सर्वात वरच्या थरातील खडकाची झीज होऊन पुन्हा जीवसृष्टीला लायक परिस्थिती निर्माण झाली व नव्याने जीवसृष्टी वाढली. पण पश्चिम किनाऱ्यावरील हा ज्वालामुखीचा उद्रेक केवळ एकदा होऊन थांबला नाही. तो दर काही लाख वर्षाच्या अंतराने पुन्हा-पुन्हा सुमारे २०-२५ वेळा झाला असावा आणि प्रत्येक वेळी पुन्हा नव्याने जीवसृष्टी वाढून ज्वालामुखीच्या खाली गाडली जात राहिली. हा काळ म्हणजे काही लाख वर्षे गुणिले २० ते २५, बरं हा काळ म्हणजे त्या एकूण साडेचार अब्ज वर्षातील अगदी अलिकडची एक अष्टांश वेळ!
***
            पैनगंगेच्या किनाऱ्यावरून परत निघालो आणि पुढे एका ठिकाणी दुपारचं जेवण उरकून यवतमाळ जिल्ह्यातल्या मांगुर्डा या गावाकडे निघालो. काही वेळाने रस्त्याच्या काठावर एका ठिकाणी थांबलो. समोर दगडांच्या उभे ठोकळे असल्यासारख्या शिळा. काका म्हणाले, हा कॉलम्नर बसाल्ट! वेगवेगळे अग्निजन्य खडक कसे तयार होतात हे त्यामध्ये कुठले घटक आहेत आणि तो लाव्हा थंड कशा पद्धतीने झाला यावरून ठरते. लाव्हा जेव्हा तुलनेत सावकाश थंड होतो, तेव्हा आकुंचनाच्या प्रक्रियेतून त्याला उभ्या भेगा पडतात आणि उभे स्तंभ तयार होतात, तो हा कॉलम्नर बसाल्ट.
            त्याच रस्त्यावर, चालत, आम्ही थोडे रस्ता सोडून शेतात उतरलो. हातात एक काडी घेऊन काका म्हणाले, आत्ता जातोय तिथलं कोणी काहीही घेतलं तर या काडीने मार देईन. म्हटलं काका आहे काय तिथे? तर काकांचं उत्तर, “चला, गेल्यावर दिसेल!”
***
          
शेवटी त्या गूढगंभीर जागेत पोहोचलो. काकांनी एक दगड उचलून दाखवला. दगडावर शिंपल्याच्या आकाराचे ठसे! जीवाश्म! आणि असे बरेच दगड पडलेले आजूबाजूला. अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात, हे जीवाश्म २० ते २५ कोटी वर्षांपूर्वीचे असावेत. जीवाश्म मुख्यत: स्तरित, गाळापासून तयार झालेल्या खडकातच तयार होतात. विषेशतः नदीच्या मुखाशी! म्हणजे काय? तर आज भारताच्या मध्यस्थानी असलेला हा भूभाग कधीकाळी नदीच्या मुखाशी, समुद्राखाली असावा!
***
            जीवाश्म पाहून रोमांचित झालेले सर्वजण परत पहिल्या दिवशीच्या मुक्कामाच्या ठिकाणी निघालो. सृजन. ट्रीपच्या निमित्ताने येत असलेल्या मेलमधून योगिनी डोळके, अजय डोळके ही नावं वाचली. ट्रीपच्या वाटेत कुठेतरी असलेले, ओळखीच्या वर्तुळातील आणि या ट्रीपचं आयोजन करणाऱ्यांपैकी दोघं. त्यात अजय डोळकेंना अपघात झाल्याने पाय प्लास्टरमध्ये, त्यामुळे दोघेही ट्रीपला आमच्यासोबत असू शकणार नाहीत हे कळलं होतं. सृजन ही त्यांची संस्था, आणि आमचं पहिल्या रात्रीचं वास्तव्यस्थान. सृजनमध्ये सर्वजण उतरलो, थोडेफार निवांत झालो. आणि मग लगेच व्हीलचेअरवर एक पाय अधांतरी टांगलेल्या अवस्थेत अजयदादा बाहेर निघाले, आम्हाला त्यांचं काम दाखविण्यासाठी! समोरच्या पिवळट रंगाचा बुंधा असलेल्या बांबूच्या झांडांकडे बोट दाखवत त्यांनी सांगितलं, “हा बॅंबुसा व्हल्गॅरीस!” 'व्हल्गॅरीस' याच्यासाठी की, प्रचंड वाढतो. अगदी दिवसाला तीन फुट. इतका वेगाने वाढतो की, तो वाढत असलेला चक्क पाहता येईल. बांधाकामाचे लाकूड म्हणून वगैरे म्हणून अगदी निरूपयोगी, पण वाढतो भराभर त्यामुळे बायोमास म्हणून, तात्पुरत्या निवाऱ्यासाठी, इंधनासाठी उपयोगाला येतो. शिवाय भराभर वाढतो, त्यामुळे सुशोभीकरणासाठी बांधकाम व्यवसायिकांचा प्रिय. मग दुसरा, बॅंबुसा फलाना, अतिशय मजबूत, वॉल थिकनेस जास्त, त्यामुळे बांधकामात खूप उपयोगी. याला ८० वर्षांनी एकदाच फुलं आणि फळं येतात आणि मग त्याचं आयुष्य संपतं. हा तिसरा, याला आजपर्यंत फुलं आल्याची नोंद इतिहासात नाही. हा इंटरनोडल डिस्टंस खूप असलेला, सरळसोट, त्यामुळे हा खास बासरीसाठी वापरतात. हा बुद्धाज बेली, कारण याचा बुंधा ढेरीसारख्या सेक्शननी बनलेला आहे. हा खाण्यासाठी वापरतात, पण जपून, कारण विशेष काळजी न घेता खाल्ला तर जीवघेणा विषारी. अजयदादा सांगत चाललेत. एकामागून एक. बांबुच्या सुमारे ५६ प्रजातींचे जतन आणि अभ्यास, त्याचा प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न. एका माणसाने किती सौंदर्य निर्माण करून ठेवावं!

            हा फेरफटका झाल्यानंतर मावळतीला गप्पा मारण्यासाठी बसलो. अजयदादा सांगतात, भारत हा बांबू उत्पादनात दुसरा क्रमांक असलेला आणि बांबूच्या प्रजातींची प्रचंड विविधता असलेला देश. पण या प्रचंड बांबूचा मुख्यतः आपण एकमेव उपयोग करतो. तो म्हणजे त्याचा लगदा करून कागद निर्मितीसाठी वापर करणे, किंवा फारतर बांधकामासाठी वापरणे. पण चिनी लोकांनी बांबूवर खूप अभ्यास केलाय, त्याला वेगवेगळ्या पद्धतीने व्यवसायिक तत्वावर उपयोग करून घेतला आहे. त्या व्यवसायिक दृष्टीचा, अभ्यासाचा भारतात अभाव जाणवतो. आणि आत्ता, हळूहळू त्यांच्या बांबूप्रेमाचं मूळ लक्षात येत होतं.
***
अरे हा बघ स्लेट.”
अरे नाई. तो शेल. अजून काही काळ गेला तर त्याचं स्लेट मध्ये रूपांतर होईल.”
अरे पण याचा रंग वेगळा आहे.”
त्याचं कसं आहे माहीत आहे का? गाळ साचून खडक तयार झाला ना. आणि कधीतरी त्यात भेगा पडल्या आणि खालून लाव्हारस त्या भेगांमध्ये आला, त्यामुळे त्या भेगांमध्ये हा वेगळा खडक तयार झाला.”
अरे नाई, मला वाटतं नुसती धूळ लागली असेल त्याला, हा ग्रॅनाईट नाई वाटत मला.”
२४ तारखेला सकाळी नागपूरहून निघालो तेव्हा सोबत केवळ एक भूशास्त्रज्ञ होते. संध्याकाळपर्यंत ही संख्या १७ वर पोहोचली.
तर अशा पद्धतीने आपापल्या सोयीनी खडकांचं बारसं करत आणि मग नंदाकाकांची साक्ष काढत दुसऱ्या दिवशी जवळपास दिवसभर मांगुर्डा ते आलापल्ली प्रवास केला. संध्याकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात आलापल्ली येथे पोहोचलो.
***
            'ग्लोरी ऑफ आलापल्ली', आलापल्लीचे वनवैभव. १९५३ साली वनसंवर्धनाचे महत्त्व जाणून तत्कालीन अधिकाऱ्यांनी स्थापन केलेला १५ एकर चा संरक्षित जैवविविधता पट्टा. १९९९-२००० साली झालेल्या वनस्पती प्रजातींच्या मोजणीनुसार येथे सुमारे ८१ खुरट्या वनस्पती, ३३ प्रकारच्या वेली, ३४ झुडपे आणि ११ प्रजातीच्या गवतवर्गीय वनस्पती आढळून आल्या. विशेषतः साग मुबलक प्रमाणात आढळतो. अगदी ३ माणसांच्या कवेत मावणार नाहीत इतके मोठे, ३०० वर्षांपेक्षा जुने आणि ४० मीटरपर्यंत उंचीचे साग. ही सुंदर जागा बघितल्यानंतर माझ्यासाठी खरा धक्का म्हणजे रात्री कळलेला वनविभागाचा पराक्रम. जगातली जंगलं संपत चाललीत. अशा वेळी गडचिरोली सारख्या जागा थोडाफार दिलासा देतात. कारण किमान इथेतरी थोडंफार जंगल टिकून आहे. पण या जंगलांचं यावेळी नव्याने जाणवलेलं वास्तव भयभीत करणारं होतं. जंगलाची उत्पादकता कमी होते म्हणून आडजातीची झाडं नष्ट केली जातात. आडजातीची झाडं म्हणजे साग, बांबू अशी एकगठ्ठा विकून पैसा कमावता येणारी झाडं सोडून बाकी सारी. म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने जंगल नसलेली जागा आणि ही जंगलं यात जवळपास काही फरक नाही राहिला!
***
आऊटसोर्सिंग करप्शन (क्रियापद)
            एखादे काम करवून घेण्यासाठी संबंधित व्यक्तीला स्वतःच्या हाताने लाच न देता ती दुसऱ्या व्यवसाय-भागीदाराकरवी त्याच्याकडे पोहोचवणे.
***
            गडचिरोलीत आजपर्यंत फारसे उद्योगधंदे आले नाहीत. कारण? दळणवळण आणि एकंदर पायाभूत सुविधांच्या विकासाचा अभाव. जमशेदजी टाटांनी अगदी १९२७ साली सुरजागडला पोलाद कारखाण्यासाठी सर्वेक्षण केले. पण याच कारणामुळे त्यांना ते सोडून द्यावं लागलं आणि शेवटी तो आजच्या झारखंड राज्यात जमशेदपुरला झाला.
            विदर्भ आर्थिक विकास मंडळा (Vidarbha Economic Development Council, VED) ने नुकतीच खासदार अशोक नेतेंची भेट घेऊन खंत व्यक्त केली की कितीतरी क्षमता असूनही विदर्भाचा विकास झाला नाही. या विदर्भाला, गडचिरोलीला ही विकासाची संधी मिळाली पाहिजे. पण प्रदेशाचा विकास करायचा, तर त्या प्रदेशात राहणाऱ्या माणसांचं काय करायचं? गडचिरोलीलाच लागून असलेल्या छत्तीसगडमध्ये पोलाद उत्खननासाठी जमीन मिळणे गरजेचे होते. मात्र तेथील स्थानिक आदिवासी जमातींनी आपली जमीन, उपजीविकेची साधने, राहती घरे जाण्याच्या भीतीपोटी याला कडाडून विरोध केला. २००९ साली 'राज्य शेतकी संबंध आणि शेती सुधारणेतील अपूर्ण कामे' यासंबंधी अहवाल तयार करण्यासाठी भारत सरकारने नेमलेल्या समितीने आपल्या अहवालाच्या मसुद्यात असा आरोप केला की, हा विरोध मोडून काढण्यासाठी झालेल्या, 'सलवा जुडूम' नावाने कुप्रसिद्ध पूर्वनियोजित हत्याकांडाला टाटा, एस्सार या कंपन्यांनी पैसा पुरवला. या आरोपाच्या उत्तरादाखल 'सलवा जुडूम'शी आपला काहीही संबंध नाही असे 'फ्रंटलाईन' या नियतकालिकातून टाटा स्टीलने जाहीर केले. त्यानंतर ग्रामीण विकास मंत्रालयाने अंतिम अहवालातून हा आरोप वगळला.
            कोण खरं कोण खोटं, ह्या प्रश्नाचा निकाल खरतर खूप अवघड आहे. पण म्हणून हा प्रश्न आपण सहजपणे झटकून द्यावा इतका क्षुल्लकही नाही. याच कारखान्यांमधून येणारी वीज, गाड्या, आपल्याला देशाच्या प्रगतीसाठी अनिवार्य वाटत असतील, तर इथे राहत असणाऱ्या लोकांच होतं काय? या प्रश्नाची आपल्यावरही तितकीच जबाबदारी येते. नाही का?
***
           
तिसरा दिवस. पहिले ठिकाण, वडधम फॉसिल पार्क. ऐनवेळी कळलेले की नुकतेच वडधम गाव आणि वन विभागाने मिळून जवळच जीवाश्म सापडलेल्या जागेचे 'जीवाश्म उद्याना'त रूपांतर केले आहे. या जागेत जीवाश्म आहेत असं सुमारे ५०-६० च्या दशकापासून माहीत होतं, मात्र त्याकडे कोणाचं लक्ष गेलेलं नव्हतं. अगदी अलिकडे २०१३-१४ साली जुजबी उत्खनन करून जीवाश्म उद्यानाची जागा विकसित केलेली. तीही मोठ्या पातळीवरच्या सरकारी मदतीशिवाय, केवळ ग्रामपंचायतीच्या मदतीने उभी झालेली जागा. जागा किती मूल्यवान असावी? एकाच ठिकाणी २० ते २५ कोटी वर्षांपूर्वीचे डायनासोर, डायनासोरची अंडी, मासे आणि विषालकाय वृक्षांचे जीवाश्म आम्हाला पहायला मिळाले. पण इतकी दुर्लक्षित की अगदी विदर्भात आयुष्य घालवलेल्या आणि भूशास्त्रात विशेष रस असलेल्या नंदाकाकांनाही त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांच्यासह आम्हा सर्वांसाठी ग्रेट सरप्राईज! त्यापेक्षा मोठं सरप्राईज म्हणजे तिथं भेटलेली माणसं. एक उप वनसंरक्षण अधिकारी श्री. शुक्ला आणि दुसरे वनविभागाचेच श्री. नवघरे.
***
            इथून पुढे इंद्रावती आणि गोदावरीच्या संगमावर जायचं होतं. इंद्राला इंद्राणी सोबत स्वर्गातून इथं येण्याचा मोह झाला म्हणे. अगदी पुढच्या हजार वर्षात इंद्राचं यान इथं लॅंड झाल्याचे पुरावे मिळाले नाहीत तरी या गोष्टीवर विश्वास ठेवायला मी तयार आहे. इथल्या जंगलात फिरताना इंद्राला उदंती भेटली आणि इंद्र इंद्राणीला विसरून गेला. त्यामुळे रागावलेल्या इंद्राणीने इंद्र आणि उदंतीची कधीच भेट होणार नाही असा शाप दिला आणि ती इथेच नदी बनून वाहू लागली. ती नदी म्हणजे इंद्रावती. इंद्रावतीचं नशीब हे की, कदाचित नंतरच्या बहुतेक सांसारीक आणि संसारेच्छुक प्राण्यांनी या दंतकथेची धास्ती घेतली. खरंतर अधिक लोकप्रिय दंतकथा ही की काही रक्तपिपासू लोकांमूळे उठसुठ कुठल्याही कारणाशिवाय इथं निष्पाप लोकांचे प्राण जातात. निष्पाप लोकांचे प्राण जातात हे अगदीच खरंखुरं. पण रक्तपिपासू नेमके आहेत कोण आणि राहतात कुठे हे मात्र गूढ. पण काही असो, कुठल्यातरी दंतकथेच्या भितीने ही जागा 'पर्यटनस्थळ' होण्यापासून वाचली.

            खळाळतं स्वच्छसुंदर पाणी, वाळूच्या ढिगातून डोकं वर काढलेले काळेशार दगड आणि किनाऱ्याला पानगळीने अगदी रुक्ष झालेल्या झाडांमधून मोजून-मापून डोकावत असलेली पिवळ्या, हिरव्या, तपकिरी रंगाच्या छटा असलेली पालवी. नीरव शांतता. इथं येण्याचा इंद्राला मोह झाला असेल असं कोणी सांगितलं तर त्याच्याशी हुज्जत घालण्याइतकं अरसिक होववत नाही मला!
            आणि अशा मस्त वातावरणात अगदी अनोळखी माणसांनी बनवलेला मासे आणि भाताचा बेत. स्वर्गसुख.
***
            चौथा दिवस. चंद्रपुर. कोळशाच्या खाणींचं शहर. इथे घर बांधताना घरमालकाला लिहून द्यावं लागतं, की भूस्खलनामुळे घर खचलं, पडलं तर महापालिका त्याला जबाबदार असणार नाही. का? तर भूमिगत खाणी. बहुतेक शहर, परिसर खालून पोखरलेला. कोळसा काढण्याची, त्याच्यावर पैसा कमावण्याची जबाबदारी कंपन्यांची, पण कोळसा काढून झाला की, त्या बुजविण्याची जबाबदारी मात्र आम्ही ब्रम्हदेवाची मानतो (की महेशाची?). भद्रावतीजवळच्या एका गावाच्या बाजूला असलेली खाण पहायला गेलो. गाव आणि खाणीच्या जागेत जेमतेम ५-६ शे मीटरचे अंतर. तिथला एक गावकरी मित्र, सचिन सांगतो, खाणीत दगड फोडण्यासाठी स्फोट केले की दगड सरळ गावात, लोकांच्या घरावर येतात. त्याची पूर्वसूचना देण्याचीही तसदी घेतली जात नाही. घराच्या भिंतींना भेगा जातात. स्फोटांच्या भितीने शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. खाणीच्या प्रचंड खोलीमुळे आजूबाजूच्या भूगर्भातील सारे पाणी खाणीत जाते, त्यामुळे विहिरी कोरड्या पडत आहेत. नदीचे पाणी दूषित झाले आहे. गावचे गाव उध्वस्त झाले आहे. या गावात हे अनेक वर्षांपासून चालू आहे. गावातली सचिनसारखी माणसं आपल्याला न्याय मिळावा म्हणून शक्य असेल तो-तो दरवाजा ठोठावत आहेत. पण त्यातुन आज इतक्या वर्षानंतर ते स्वतःसाठी काहीही साध्य करू शकलेले नाहीत. कारण त्यांच्या विरोधात केवळ ती कंपनी नाही. त्या कंपनीला सगळ्या प्रकारची सूट देऊन देशाच्या विकासाची भाषा करणारं सरकार आहे. देशाच्या जीडीपी ची चिंता करणारे दीडशहाणे अर्थतज्ज्ञ आहेत. आणि काहीतरी मिळविण्यासाठी थोडफार गमवावंही लागतं, असलं शहाणपण उगाळणारे आपण सर्वजण आहोत. असेल खरं, पण एकदाचा प्रयत्न तरी करावा, हे 'थोडफार' म्हणजे नेमकं किती आणि ते कोणाला गमवावं लागतंय ते तपासून पाहायचा. सुरूवात म्हणून एक आकडा सांगतो, केवळ सन २००० पर्यंतच्या आकडेवारीनुसार कोळसा खाणींमुळे सुमारे १६ लाख लोक भारतात आपल्या राहत्या घराला मुकले आहेत. हे फक्त कोळशाच्या खाणींचं, आणि विस्थापनाचं . बाकी कशाकशाच्या खाणी असतात आणि विस्थापनाशिवाय काय काय होतं, पहा जरा, जमल्यास. आणि हो, केवळ आकडे ऐकून विस्थापन म्हणजे काय आणि ते आयुष्य कसं असतं याची अनुभूती नाही येणार. जमल्यास एखादावेळ लोणावळा, थायलंडची वाट वाकडी करून चंद्रपूरला भेट द्या. तिथली बकाल गावं आणि हतबल माणसांचे चेहरे पहा. त्यांनी बोलूच दिलं तर बोलून बघा त्यांच्याशी!
***
            आपण सगळी काम संपवून मग ट्रीपला जाऊ, असं नाही होत. किंवा ट्रीपला जाऊन केवळ इंद्रावती आणि आलापल्लीचं वनवैभव पाहू असंही नाही होत. भारतातील एकमेवाद्वितीय दुर्मिळ जीवाश्म जागेची परवड, आणि ती जपण्यासाठी धडपड करणारे, सुखावून जाणारे वनाधिकारी एकत्रच भेटतात. तिथल्या सामान्य माणसाशी संवाद साधून, जंगलाचं महत्त्व जाणून काम करणारा योगेश एकटा भेटत नाही, त्याच्यासोबत आडजातीची झाडं म्हणून पर्यावरणाच्या मुळाशी घाव घालणारा अतिशहाणा आणि हव्यासी मनुष्यस्वभावही पहावा लागतो. सचिनसारख्या माणसाला भेटणं, त्याला ऐकणं कितीतरी सुखावणारं, पण त्यासोबत खाणींनी हवालदील, हतबुद्ध झालेलं गावही पहावं लागतं. कारण हे सगळं घडत असतं म्हणून तर योगेश, श्री. शुक्ला, श्री. नवघरे, अजयदादा, योगिनीताई, सचिन, तिथं, तशा रूपात भेटतात.
            दगडांच्या प्रेमात पडणं असेल की झाडांचं वेड असेल, गाण्याचा ध्यास घ्यायचा असेल की चित्रांचा, धरणांनी आयुष्य उध्वस्थ झालेल्या माणसांना बघून पेटून उठणं असेल की, शेतीतल्या समस्यांनी पिळवटून जाणं असेल; इट इज लाईक एनी आदर ड्रग. यु कॅन नॉट चुज टू स्टे सोबर अॅंड टेस्ट इट टू. व्हाट यु कॅन चुज इज, कशाचा प्रेमात पडायचं? आणि किती? महत्वाचं आहे तोल न जाऊ देणं....पण गेलाच तर?... असल्या मोहात अनमोल आयुष्याची माती करायची?
            आजच्या तारखेला जगात सुमारे ८ अब्ज अनमोल आयुष्यं जगताहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार त्यातले सुमारे १०-११ लाख अनमोल जीव दरवर्षी नुसते, “हिंमत है तो 'पास' कर, वर्ना बर्दास कर,” म्हणत-म्हणत स्वर्गवासी होतात. आणि जवळपास १० लाख नुसते डास चावून. पॉप्युलेशन रेफरन्स ब्युरो  च्या आकडेवारीनुसार आजपर्यंत पृथ्वीवर सुमारे १०७ अब्ज अनमोल आयुष्यांनी जन्म घेतला असावा! ...कायचं 'अनमोल आयुष्य' घेवून बसले भाऊ!

स्रोत: गणेश बिराजदार, gsbirajdar516@gmail.com

No comments:

Post a Comment