महाराष्ट्र आज अवेळी
पाऊस,
गारपी़ट आदि संकटांचा सामना करत आहे. दुष्काळ समोर आ वासून
उभा आहे. हातातोंडाशी आलेलं पीक नष्ट झाल्याने आणि पाण्याची सोय नसल्याने गरीब
अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूरांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
अशा परिस्थितीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा)
खेड्यातील शेतकरी वा मजूर या दोघांनाही आधार ठरु शकते.
'नरेगा' द्वारे बनवलेले मेळघाटमधील शेततळे |
सिंचनाच्या पुरेशा सोयीअभावी बहुसंख्य शेतकरी पावसाळ्यानंतर
आपली शेतजमीन पडिक ठेवतात आणि उत्पन्नाचे साधन नसल्याने शहरांकडे स्थलांतर करतात.
विहिरी,
तलाव यामध्ये काही प्रमाणात पाणीसाठा असतो परंतु तो
पिण्यासाठी राखून ठेवला जातो. कारण जानेवारीनंतर तोही अपुरा पडतो. अर्थात जर आडात
नाही तर पोहऱ्यात कुठून येणार...
पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होतो आहे. सिंचनाच्या
पुरेशा सोयीअभावी शेती क्षेत्रावर मर्यादा येत आहे. भूस्तरातील पाण्याची पातळी
नुसती कमी होत नसून पाणीसाठा नष्ट होत आहे. अशावेळी नरेगा मधून पाणलोट क्षेत्राचे
नियोजन फार उपयुक्त ठरु शकते. पाणलोटाची बहुतेक कामे नरेगा मधून करता येतात.
पावसाचे पडणारे पाणी जमिनीत आपण जास्तीत जास्त जिरवू शकलो तर वरील परिस्थितीमध्ये
सुधारणा होऊ शकते हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. यासाठी गावामध्ये जास्तीत जास्त
जलसंधारण व मृदसंधारणाची कामे होणे गरजेचे आहे आणि याची बहुतेकशी कामे शेतीउपयुक्त
व माणसांद्वारे करता येण्यासारखी आहेत. उदा. दगडीबांध, शेतबांध, मजगी, शेततळे, मातीनालाबांध, सीसीटी ईत्यादी शेतीला उपयोगी कामे झाल्याने शेतक-याला
त्याचा फायदा होतो आणि गावात उपलब्ध मनुष्यबळाला रोजगार उपलब्ध होतो. असा दुहेरी
फायदा नरेगामधून मिळू शकतो. आज
शहरामध्ये वाढती लोकसंख्या महत्वाचा प्रश्न आहे. त्याला एक कारण गावातून शहरात
होणारे स्थलांतर हेदेखील आहे. गावामध्ये रोजगार उपलब्ध झाल्यास होणारे स्थलांतर
कमी प्रमाणात होईल. गावामध्ये घर दार सोडून बाहेर जाण्याची कोणाचीही इच्छा नसते.
गुराढोरांकडे शेतीवाडीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे कधी कधी कुटुंबातील कर्ता पुरूष
शहराकडे जातो आणि इतर लोक गावातच रहातात. अशावेळी त्यांनाही नरेगाचा आधार मिळू
शकतो.
१९७२ च्या दुष्काळामध्ये रोजगार हमीने साथ दिल्याचे मी ऐकले
आहे,
परंतु मागील २ वर्षात रोहयोचा योग्य उपयोग करुन उत्पन्नात
वाढ झालेले शेतकरी मी पाहीले आहेत. त्यामुळे गावामध्ये नरेगा प्रभावीपणे राबवल्यास
त्याचा निश्चित फायदा संपूर्ण गावाला मिळू शकतो.
नरेगामधून गावामध्ये संसाधन किंवा मत्तानिर्मिती होवून
त्याचा उपयोग लोक चांगल्या प्रकारे करतात असे Indira Gandhi Institute of
Development Research (IGIDR) यांनी
केलेल्या अभ्यासातून सिध्द झालेले आहे. तसेच अनेक उदाहरणेही आहेत. नाशिक मधील
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वर्षाला सरासरी २३०० मिमी पाऊस कोसळतो. परंतु तालुक्यातील
अनेक गावांमध्ये जानेवारीनंतर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. बहुसंख्य शेतकरी
पाण्याअभावी जमीन पडीक ठेवतात आणि रोजगारा अभावी लोक नाशिक शहराकडे स्थलांतर
करतात. अशा गावांपैकी हांडपाडा हे गाव. या गावातील देवराम भोये या शेतकऱ्याने
नरेगातून शेतात शेततळे बांधायला घेतले. त्याची जागा अशी अभ्यासपुर्वक निवडली की
त्यामध्ये योग्य प्रकारे पाणीसाठा जास्त काळासाठी होवू शकेल. त्यामध्ये त्याने
मासेपालन करून लाखभर रुपयाचे उत्पन्न घेतलेच पण त्याच बरोबर सदर पाण्यावरती
पावसाळ्यानंतर भाजीपाल्याचे उत्पन्नही घेतले. हे एक नाही अशी अनेक उदाहरणे आहेत.
गावातील गरीब शेतकऱ्याच्या दृष्टीने शेतदुरूस्तीची कामे
महत्वाची असतात आणि दरवर्षी यासाठी शेतकरी पुष्कळ खर्च करतात. नरेगामधून शेतबांध
मजगीसारखी कामे काही खर्च न करता येतात. ऐरवी त्याचे कुटुंब स्वतच्या शेतात अशा
कामासाठी विनामोबदला राबत असते. कारण मोबदल्यापेक्षा ही कामे होणं त्यांच्या
उपजीविकेच्या दृष्टीने महत्वाचं असतं, परंतु जर नरेगामधून अशी कामे झाल्यास त्यांचे काम तर होतेच
पण त्या कामाचा योग्य मोबदला त्यांना मिळतो असा दुहेरी फायदा त्यांना मिळतो.
मेळघाटमधील धारणी तालुक्यात ‘नरेगा’अंतर्गत बनलेले सलग समतल चर |
ज्या ठिकाणी डोंगराळ भाग आहे तिथे पाणलोटाची माथा ते पायथा तंत्र
वापरुन कामे झाल्यास त्या परिसरातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होते यामध्ये सलग
समतल चर (सीसीटी), वॅट,
दगडी बांध, गॅबीयन बंधारा, मातीबंधारा, मातीनालाबांध, वृक्षलागवड अशा तऱ्हेच्या कामांचा समावेश होतो. सदर
कामांमुळे जमिनीची धूप थांबवण्याबरोबरच पाणी जमिनीत जिरवण्यास खूप मदत होते. अशी
कामे नरेगा मधून करुन आपण पडीक डोंगराळ जमिनीचा उपयोग करु शकतो. वृक्षलागवडी साठी
लागणारी रोपे तयार करण्यासाठी नर्सरी आणि लागवड केलेल्या झाडांची निगा राखण्यासाठी
मनुष्यबळाची तरतूद नरेगामध्ये आहे. वृक्षलागवडीमुळे पर्यावरण सुधारणा होण्यास मदत
होण्याबरोबरच लोकांच्या उत्पन्नात देखील वाढ होते.
मेळघाटमध्ये धारणी
तालुक्यात काही गावात अशाप्रकारे नरेगाची कामे प्रभावीपणे राबवली गेल्याने तेथील
स्थलांतर मोठया प्रमाणावर कमी झाले तसेच तेथील शेतीवरती त्याचा चांगला परिणाम
झाल्याचे दिसते. आपण तिथे गेल्यास तेथील गावामधील नरेगा राबवायच्या आधीची
परिस्थिती आणि नरेगा राबवल्या गेल्यानंतरची परिस्थिती तेथील स्थानिक लोक कथन
करतात. तेथील लोकांच्या जीवनमानात झालेला बदल तसेच तेथील जमिनीवरती झालेली नरेगाची
कामे आपण अनुभवू शकतो.
यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे आवश्यक आहे. कारण इतर
योजनांसारखी निधीची मर्यादा यात नाही. तुमच्या गावामध्ये जितके मनुष्यबळ उपलब्ध
आहे जितकी तुमच्या गावाला गरज आहे तितकी कामे तुम्ही नरेगा अंतर्गत करु शकता. तसेच
नरेगा राबवण्यासाठी फार मोठ्या प्रशासकीय कारभाराची आवश्यकता नाही. अतिशय सोप्या
पध्दतीने प्रभावीपणे नियोजन केल्यास पाणी आणि रोजगार या ग्रामीण भागाच्या प्रमुख
समस्यांच्या निवारण्यासाठी नरेगा मोठा वाटा उचलू शकते.
नरेगा बद्दल अधिक
माहितीसाठी: http://www.nrega.nic.in/
तुम्हाला काही प्रश्न
असल्यास, स्रोत: निखिल मुळ्ये, mulyenikhil@gmail.com
No comments:
Post a Comment