'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 28 April 2015

प्रयोगशील एक वर्ष.....

गेल्या एका वर्षात लहान मुला/मुलींना शिकवताना अद्वैत नि प्रणालीला आलेल्या अनुभवाची गोष्ट 

शिक्षण हा समाजाचा पाया मानला जातो. मात्र भारतीय समाज शिक्षणाविषयी फारसा सजग दिसत नाही आणि काही वेळा आर्थिक-सामाजिक परिस्थिती त्याला शिक्षणापासून दूर ठेऊ पहाते. ‘वर्धिष्णू- सोशल रिसर्च & डेव्हलपमेंट सोसायटी’ने ऑगस्ट-सप्टेंबर, २०१३ या काळात घेतलेल्या कचरा वेचकांच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणातून हीच बाब प्रकर्षाने पुढे आली.
मुळातच शहरातील लोकांना त्यांचे घर, रस्ते साफ तर हवे असतात मात्र हे साफ कोण करतं याविषयी त्यांना फारसे घेणे-देणे नसते. त्यांना कचरापेटीत आकंठ बुडालेला एखादा छोटा मुलगा पाहून वाईट तर वाटते पण कोण हे लोक? कसे जगत असतील हे? काय प्रश्न भेडसावत असतील यांना? आपण २ मिनिट देखील सहन करू शकत नाही अश्या घाणीत आणि वासात कसे काम करत असतील हे? असे प्रश्न मात्र पडत नाहीत. अशिक्षितता, सतत अस्वच्छ वातावरणात राहण्याने निर्माण होणारे आरोग्याचे गंभीर प्रश्न, अपुरा पैसा आणि व्यसने यामुळे दैनंदिन जीवनात त्यांना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते.
कचरा वेचकांना या परिस्थितीतून बाहेर काढून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करायचे असतील तर सर्वप्रथम त्यांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती समजून घ्यायला हवी. याच उद्दिष्टाने आम्ही वर्धिष्णूच्या माध्यमातून जळगावातील महानगरपालिका कर्मचाऱ्याव्यतिरिक्त कचरा वेचून आयुष्य जगणाऱ्या लोकांचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण केले. यावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे शिक्षण, आरोग्याचे प्रश्न तसेच व्यसने व रोजगार या मुद्द्यांवर काम करण्यास सुरवात झाली. याअंतर्गत कचरा वेचकांची तसेच एकूण असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची जास्त लोकसंख्या असलेल्या जळगावातील तांबापुरा वस्तीतील भिलाटी या भागात मुलां/मुलीसाठी आम्ही evening learning centre सुरु केलं.

२ जानेवारी, २०१५ ला या सेंटरला एक वर्ष पूर्ण झाले. १५ मुला/मुलींपासून सुरु झालेल्या या सेंटरला आज ७ ते १६ वयोगटातील सुमारे ३५ मुले/मुली दररोज संध्याकाळी ५ ते ७:३० या वेळेत शिकायला येत आहेत. अक्षर-अंक ओळख आणि याचबरोबर मूल्य-शिक्षण यांवर भर असलेल्या सेंटरमध्ये आम्ही गेल्या वर्षभरात विविध प्रयोग करून पहिले.
यांपैकी सगळ्या पहिला आणि मोठा प्रयोग म्हणजे एकाही विद्यार्थी-विद्यार्थिनीला रागवायचे नाही आणि मारायचे तर त्याहून नाही. मुळातच शिक्षक म्हणला की तो आपल्याला मारणारच ही भीती या सगळ्या चिमुरड्यांच्या मनात अगदी घट्ट घर करून बसलेली आहे. काही जणांचं शाळा सोडण्याचं कारणच ते आहे. अश्यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये विश्वासाचे आणि त्याहूनही प्रेमाचे नाते निर्माण होत नाही. मात्र हे सर मारत नाहीत हे लक्ष्यात आल्यावर सगळेच मनमोकळेपणे आमच्याशी बोलू लागले आणि एक जिव्हाळ्याचे नाते आमच्यात निर्माण झाले इतके की चौथीत शिकणाऱ्या एका छोट्या चिमुरडीने, “सर यापुढे मी तुमच्याशी कधीही बोलणार नाही. कट्टी.” अस एक पत्र मला दिलं आणि दुसऱ्या दिवशी माझ्याशी परत बोलायला लागली.
या सेंटरमध्ये कोणताही शिक्षक उभे राहून शिकवत नाही तर त्यांच्यातच बसून गप्पा मारत गोष्टी शिकवल्या जातात यामुळे शिक्षकाच्या उजव्या बाजूला एक जण तर डाव्या बाजूला दुसरा टेकून बसलाय, तर पाठीशी पाठ लाऊन आणखी कोणीतरी काहीतरी पाठ करण्याचा नाहीतर वाचण्याचा प्रयत्न करतोय अस चित्र आमच्या सेंटरमध्ये नेहमीच दिसतं.
पाठांतरावर शाळांमधून खूप भर दिला जातो. मात्र अनेकदा हे पाठांतर आणि घोकंपट्टी यात बराच फरक आहे. घोकून घोकून गोष्टी पाठ होतात मात्र त्या अनेकदा समजलेल्याच नसतात. शाळांमध्ये सगळ्यांना अ आ इ ई पासून ते अं अः आणि  क ख ग शिकवलं जात नाही तर घोकून घोकून पाठ करवलं जातं. लिहायचं देखील. यामुळे मुलांना अ आ इ ई म्हणता येतं, लिहिता पण येतं, पण अ पासून सुरु न करता एकदम ‘ल’ किंवा तश्याच दुसऱ्या शब्दावर बोट ठेऊन ते वाचायला सांगितलं तर ते मात्र त्यांना जमत नाही. अगदी सातवी-आठवीत जाणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनींना वाचता येत नाही याचं मुख्य कारण हेच आहे. याचसोबत आठवीपर्यंत विद्यार्थ्याला नापास करायचं नाही या शासनाच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होत आहे. एखाद्या विद्यार्थ्याने/विद्यार्थिनीने जर पेपर लिहिला नसेल तर तो त्यांच्या शिक्षकाला लिहावा लागतो. त्यामुळे आता परीक्षा म्हणजे शिक्षक फळ्यावर प्रश्न आणि उत्तर दोन्ही लिहून देतात आणि बाकीच्यांनी ते फक्त त्यांच्या उत्तर पत्रिकेत उतरवून घ्यायचं असत.
यांना वाचायला शिकवताना आम्ही सुरुवातीला क ख ग शिकवत असताना एखाद्या शब्दावर मधेच बोट ठेवून ते विचारायला सुरुवात केली आणि विद्यार्थ्यांमध्ये बदल होताना दिसू लागला. मग परत ‘क का की कु’ आणि मग ‘ख खा’ वर न जाता आधी ‘का खा गा’ हे शिकवले नंतर ‘कि खि गि’ शिकवेल व तसेच इतर शब्दांचे करत गेलो. यावेळी प्रत्येक प्रसंगी त्यांना गोष्टीची पुस्तके वाचायला दिली व आपल्याला येत असलेल्या शब्दांच्या खाली एक रेष मारून तो शब्द मोठ्याने म्हणायचा असे शिकवले.ज्यांना पूर्वी अगदी काहीच वाचता येत नव्हते अशी मुले/मुली आता हळू हळू का होईना पण वाचायला लागली आहेत.
याचबरोबर कोणताही निर्णय स्वतः न घेता प्रत्येक प्रसंगी त्यांच्यात चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला. याचं अगदी छोटं उदाहरण म्हणजे gathering नंतर बक्षीस द्याव की नाही यावर त्यांच्याशीच चर्चा करण्यात आली. द्यावं म्हणणारे आणि नाही द्यावं असं म्हणणारे दोन गट झाले. मग प्रत्येकाने स्वतःच मत व्यक्त केलं. मग अगदी मुळात तुम्ही आमच्यासाठी इतका खर्च केल्यावर उगीच बक्षिसावर पैसे वाया घालवू नका पासून ते सगळ्यांनी मेहनत घेतली आहे त्यामुळे एकालाच बक्षीस नको, मग द्यायचं असेल तर सगळ्यांना द्या. परत उपयोगात आणता येईल अश्या वस्तू द्या असे विचार पुढे येऊ लागले. या चर्चेतून मग मतदान म्हणजे काय? ते का होतं? त्याचे फायदे काय? हे त्यांना समजावून सांगितले गेले व या प्रश्नी मतदान घेण्यात आले. मात्र हे करताना बहुमताच्या बाजूने निर्णय न देता जोपर्यंत सार्वमत होत नाही तोपर्यंत निर्णय देण्यात आला नाही. मग त्यांनी एकमेकांना समजावले व सरते शेवटी मग सगळ्यांना वही, पेन, पेन्सिल, शार्पनर व खोडरबर देण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला.
यासारख्या अनेक छोट्या छोट्या प्रसंगातून सेंटर घडत आहे, सेंटरमधली मुलं/मुली घडत आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही देखील...
सेंटरची सुरुवात ही एखादे कार्टून अथवा छोटी फिल्म पाहून रोज केली जाते तर शेवट गाण्याने होतो. मध्येच जर सगळ्यांना मूड खेळण्याचा असला तर अभ्यास बाजून ठेवून खेळ खेळले जातात.
शिक्षणाविषयी या मुला/मुलींमध्ये प्रेम निर्माण व्हावे हा जरी या सेंटरचा उद्देश असला तरी मूल्य शिक्षण हा अत्यंत महत्वाचा गाभा आमच्या सेंटरचा आहे ज्यावर २ तासातला सर्वाधिक वेळ खर्च केला जातो. मुळातच कचरा वेचक मुला/मुलीमध्ये स्वच्छते विषयी जाणीव नसते. सतत घाणीत राहिल्याने वारंवार आजारी पडणे तसेच आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होतात. सुरुवातीच्या काळातच माझा डॉ. मित्र भूषण याने त्यांच्या वाढदिवसाला सेंटरमध्ये celebrate करताना मुलांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले व स्वच्छ हात-पाय कसे धुवावे ते शिकवले. यानंतर आम्ही सेन्टरमध्ये येतान व परत गेल्यावर सगळ्यांनी स्वच्छ हात पाय धुतले पाहिजेत असे सांगितले. आता सगळे  जण स्वच्छ हात-पाय धुवून सेंटरमध्ये येतात. इतकेच नाही तर दिवसभर शक्य असेल तेव्हा स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करतात.
अनेक नवीन नवीन अनुभवातून आम्ही शिकत आहोत. मात्र हे सहज झालं नाही. उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये मुलांना एक महिन्याची सुट्टी देण्यात आली. यानंतर ४०च्या वर विद्यर्थ्यांची गेलेली संख्या संख्या एकदम २/३ विद्यार्थ्यांवर आली. यानंतर सगळे पूर्ववत सुरू होण्यात बराच काळ गेला.
आज या सेंटरमध्ये कचरा कचरा वेचणाऱ्या मुला/मुलींसोबतच कनिष्ट मध्यम वर्गातली पण बहुतांश शाळेत जाणारी मुले/मुली येतात. सुरुवातील काही प्रसंगात जेव्हा यांना एकत्र करण्यात आले. तेव्हा कचरा वेचणारी मुले/मुली यांच्यात जाऊन बसली नाहीत. ती दूर दूर राहत होती. हा समाज आपल्याला स्वीकारणार नाही ही भावना यांच्या मनात घर करून राहिली आहे. तर दुसरीकडे ही इतर मुले देखील त्यांच्या जवळ जाण्यास घाबरत होती. आम्ही त्यांना समजावून सांगितले. ज्यांना या मुला/मुलींसोबत खेळायचे नव्हते त्यांना प्रसंगी बाहेर बसवण्यात आले, मात्र कचरा-वेचक मुला/मुलींना मात्र खेळात सहभागी करण्यात आले. हळू-हळू इतरांनी देखील त्यांना आपल्यात सामावून घेतले. आज या सगळ्यांची खूप छन गट्टी जमली आहे.
हळू-हळू गोष्टी बदलत आहेत. या संपूर्ण प्रवासात अनेक लोकांनी आम्हाला साथ दिली. अनेकांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेतून, तर अनेकांनी आर्थिक सहाय्य करून आम्हाला मदत दिली. माझ्यासोबत व माझ्या पत्नी प्रणाली सोबत शिकवणारे सुमित ठाकूर व इतर मित्र आज ही संपूर्ण व्यवस्था स्वतःची समजून त्यासाठी झटत आहोत. या सगळ्यांच्या मदतीने, मार्गदर्शनाने आज सुमारे ३५ मुला/मुलींचा आमचा एक मोठा परिवार तयार झाला आहे. त्यात दर आठवड्यात नवीन भर पडते आहे.
समांतर व्यवस्था निर्माण करणे हे आमचे नक्कीच उद्दिष्ट नाही, तर आहे ही व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. पुढील शैक्षणिक वर्षात तांबापुरा भागातील महानगरपालिका शाळेसोबत शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करत आहोत.
मात्र आज आम्ही अनेक आर्थिक अडचणींमुळे तांबापुरातील देखील एकाच भागात मर्यादित आहोत. अजून असे इतर भाग, वस्त्यांपर्यंत आम्हाला पोहोचायचे आहे. एक खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पण सगळ्या गोष्टी जमून येतील यावर आमचा ठाम विश्वास आहे. कोणीतरी म्हणलेच आहे ना,
‘मंजिले तो मिल ही जायेगी भटकतेही सही,
गुमराह तो वो हे जो घर से निकले ही नही!!’

स्रोत: अव्दैत दंडवते, adwaitdandwate@gmail.com1 comment:

  1. आपले पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा

    ReplyDelete