अॅनिमल
फार्म म्हणजे जॉर्ज ऑरवेल ह्यांनी लिहिलेली, प्राण्यांच्या दुनियेत घडणारी एक
छोटीशी परंतु खूप मोठे वास्तव समजावून देणारी कथा!
ह्या कथेतील प्राणी
त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारून आपल्या मालकाला कायमचे पळवून
लावतात आणि अॅनिमल फार्म नावाचे स्वतंत्र राज्य स्थापन करतात. ह्या नव्या राज्याचे
नेतृत्व स्नोबॉल आणि नेपोलियन नावाच्या प्रभावशाली डुकरांच्या हाती येते. परंतु,
त्यांचे कायमच मतभेद होत असत. अशाच एका मतभेदात जेव्हा स्नोबॉलला इतर प्राण्यांचा
अधिक पाठींबा मिळतो तेव्हा चिडलेला नेपोलियन त्याच्यावर हिंस्त्र कुत्र्यांकरवी
हल्ला चढवतो. ह्या हल्ल्यानंतर स्नोबॉल तेथून कायमचा पोबारा करतो आणि नेपोलियनच्या
हाती अॅनिमल फार्मचे नेतृत्व येते.
हा नेपोलियन हळूहळू
लोकशाहीचे रुपांतर हुकुमशाहीत कसे करतो, हे त्या अॅनिमल फार्ममधील अज्ञानी
प्राण्यांच्या लक्षातही येत नाही. ‘स्क्विलर’ नावाचा नेपोलियनचा P.A. गोड बोलून, नेपोलियनच कसा योग्य
आहे हे पटवून देऊन प्राण्यांची दिशाभूल करत राहतो. जर एखाद्या प्राण्याच्या हे
लक्षात येऊन त्याने विरोध करण्याचा प्रयत्न केलाच तर हिंस्त्र कुत्री त्याचा फडशा
पडत. बेन्जामिन नावाच्या गाढवाला मात्र सारे काही काळात असूनही तो कायम तटस्थ
भूमिका घेत असतो.
ह्याच अॅनिमल फार्म मध्ये बॉक्सर
नावाचा एक अतिशय कष्टाळू घोडा आहे. आयुष्यभर तो ‘फार्म’ च्या विकासासाठी
नेपोलियनच्या आदेशाप्रमाणे घाम गाळत राहतो आणि जेव्हा त्याची काम करण्याची क्षमता
संपते तेव्हा नेपोलियनकरवीच त्याचा अंत होतो. बॉक्सरच्या अगदी विरुद्ध स्वभावाची
कामचुकार, स्वार्थी मोली नावाची घोडी काही काळानंतर प्राण्यांमधून पुन्हा
माणसांकडे जाते.

खरे
म्हणजे, ह्या कथेत जॉर्ज ऑरवेल यांनी प्राण्यांची रूपके वापरून त्या काळातील रशियन
राज्यक्रांती व समाजजीवनाचे चित्रण केले आहे. असे असले तरीही, हे रूपक आपल्यादेखील
इतिहासाला आणि वर्तमानालाही लागू पडते. ‘गल्ली ते दिल्ली’ पर्यंतचे राजकारण
आपल्याला ‘अॅनिमल फार्म’ मध्ये बघायला मिळते.
नेपोलियनसारखे केवळ स्वतःचे घर
भरणारे आणि जनतेला उपाशी ठेवणारे राज्यकर्ते, केवळ मतभेद आहेत म्हणून
स्नोबॉलसारख्यांच्या चांगल्या योजनांना ‘विरोधी पक्षाची’ भूमिका घेऊन अडवणूक
करणारे नेते, स्क्विलर सारखे जनतेची दिशाभूल करणारे आणि विकास हवा असेल तर
आम्हालाच निवडून देणे किती आवश्यक आहे, असे सांगणारे धूर्त पुढारी, आणि हिंस्त्र
कुत्र्यांच्या स्वरुपात झेड दर्जाची सिक्युरिटी घेऊन, दादागिरी आणि दमदाटीच्या
बळावर निवडून येणारे राजकीय नेते, हे आपल्यासाठी आता सवयीच्या गोष्टी झाले आहेत.
स्वतःला
सुशिक्षित समजणारे, पण स्वतः काहीही न करता केवळ राजकारणी लोक किती वाईट आणि
सामान्य जनता किती मूर्ख यावरच चर्चा झाडणारे बेन्जामिनसारखे गाढव किंवा भारतात
जन्म घेऊन, शिक्षण घेऊन, परदेशात स्थायिक होऊन त्या देशांमध्ये सेवा पुरवणारे मोली
सारखे लोक आपल्याला कायम भेटतच असतात. बॉक्सरप्रमाणे सक्षम असूनही आपली सगळी उर्जा
नेत्यांचे आदेश पाळण्यात खर्च करणारे किंवा मेंढ्यांप्रमाणे नेत्यांच्या नावाने
घोषणा देणारे, स्वतःच्या बुद्धिमत्तेचा जराही वापर न करणारे लोकही आपल्यातच आहेत.
प्रामाणिक कष्टांना जर डोळसपणाची साथ नसेल तर आपली फसवणूक होणारच.
ह्या
कथेतील प्राणी माणसांपासून सुटका करवून घेऊन खरच स्वतंत्र झाले का? पूर्वी दुसऱ्या
देशातून आलेल्या लोकांची आम्ही गुलामगिरी करत होतो. आता स्वतःच्याच देशातील
लोकांची गुलामगिरी करतो, याला स्वातंत्र्य म्हणणार का? देशाचे निर्णय घेणारे,
कायदे बनवणारे लोक वेगळेच, आणि कायद्यांचे पालन करण्यासाठी फक्त सामान्य जनता! आपण
जगत आहोत ती खरच लोकशाही, स्वतंत्रता आहे की फक्त आभास?
हालअपेष्टा असह्य झाल्याने अॅनिमल
फार्म मधील सामान्य प्राण्यांप्रमाणे आत्महत्या करणरे शेतकरी एकीकडे, तर दुसरीकडे अॅनिमल
फार्म मधील डुकरांप्रमाणे जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत नाव असणारे
लोक! कागदोपत्री किंवा आकडेवारीत दिसणारी आर्थिक प्रगती, प्रत्यक्षात मात्र
हालअपेष्टा सहन करणारी जनता... असे अनेक संधर्भ देता येतील.
ह्या
पुस्तकाची आणखी एक खासियत म्हणजे प्रत्येक वेळी हे पुस्तक वाचताना आपल्याला नवीन
अर्थ उमगतो. नवीन संदर्भ सुचतात... तर मित्रानो! ‘अॅनिमल फार्म’ हे पुस्तक जरून
वाचा आणि तुम्हाला समजलेले काही वेगळे अर्थ, संधर्भ असतील तर नक्की शेयर करा!
No comments:
Post a Comment