समाजात दारू कमी व्हावी
याबद्दल कोणाचेच दुमत नसते. मात्र कायद्याने दारूबंदी करून ती कमी होईल की नाही
याबद्दल सहसा मतैक्य होत नाही. मात्र या मतांच्या पलिकडे जाऊन प्रत्यक्ष आकडे काय
सांगतात? कोणाकडेही आज खात्रीलायक आकडेवारी उपलब्ध नाही.
त्यामुळे समाजातील दारू पिण्याचे प्रमाण, दारूवर होणारा खर्च
व दारूमुळे होणाऱ्या ठराविक दुष्परिणामांचे प्रमाण शोधण्यासाठी सर्चच्या
पुढाकाराने वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जिल्ह्यांत सर्वे करण्यात आला.
१ एप्रिल रोजी
चंद्रपुरात दारूबंदी लागू झाली. यामुळे वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली असा एकसलग दारूबंद
झोन तयार झाला. त्यामुळे दारूबंदी होण्यापूर्वीच मार्च महिन्यात या झोनचा बेसलाईन
डेटा मोजण्यासाठी या सर्वेची आखणी करण्यात आली. गोंडवाना विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ आणि NSS यांच्या सहकार्याने तिन्ही
जिल्ह्यांतील तब्बल ८,५०० कुटुंबांचा सर्वे करण्यात आला. NSS
विद्यार्थ्यांनी हा सर्वे केला, तर सर्चच्या
कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रशिक्षण व supervision केले.
त्यात निर्माणच्या प्रतीक वडमारे, निखिल आंबेकर, भूषण देव, रोहीत गणोरकर, पवन
राउत, प्रफुल्ल सुतार, रवींद्र चुनारकर,
केदार आडकर आणि निखिल जोशी यांचा सहभाग होता. त्यांना नायना,
योगेश दादा, संतोष भाऊ, तुषार
भाऊ व महेश भाऊंचे मार्गदर्शन लाभले.
या सर्वेत सहभागी झालेल्या प्रतीक वडमारेचे अनुभव त्याच्याच
शब्दांत...
‘गरिबी’ च्या प्रश्नावर काम करताना माझा नेमका रोल काय आहे?
या प्रश्नाच्या उत्तराच्या शोध घेत असता मी २७ फेब्रुवारी २०१५ रोजी
सर्चच्या व्यसनमुक्ती विभागात प्रोजेक्ट असोसियेट म्हणून रुजू झालो.
मार्च
महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात सर्च ने ‘दारू पिण्यावर
लोकांचा किती खर्च होतो?’ हे शोधण्यासाठी गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांमध्ये एक मोठा सर्व्हे हाती घेतला
होता. कामाच्या पहिल्याच महिन्यात माझ्याकडे गडचिरोलीतला वडसा तालुका, वर्ध्यातल्या हिंगणघाट तालुक्यातील शहरी भाग व चंद्रपूर जिल्ह्यातील
भद्रावती तालुक्यातील सर्व्हेच्या सुपरव्हिजनची जबाबदारी देण्यात आली!
हिंगणघाटात
मी आणि केदार सर्व्हेसाठी सोबत होतो. हिंगांघाटात असताना माझ्याकडे शहरी भागाच्या
सुपरव्हिजनची जबाबदारी होती, पण मी केदारला ग्रामीण
भागाच्या सुपरव्हिजन साठी पण मदत करत होतो. ग्रामीण आणि शहरी भागातले अनुभव फारच
वेगळे होते. शहरांमध्ये माणसे सर्व्हे साठी गेल्यावर दारात सुद्धा उभी करत नव्हती.
अगदी दारातूनच बोलत. काही काही जण तर दारूचं नाव ऐकताच लगेच कटवून टाकत. आणि याउलट
ग्रामीण भागातील लोकांचा प्रतिसाद हा खूपच प्रेमळ स्वरूपाचा होता. या अशा
अनुभवामुळे मी मनातल्या मनात कुठे तरी शहरातल्या लोकांना शिव्या घालायला लागलो.
खरं तर मी पण याच शहरी लोकांमधला एक प्राणी होतो. मग मला लहानपणापासूनचे प्रसंग
आठवायला लागले. कितीतरी वेळा मीही असच लोकांना दारातूनच कटवलेलं होतं. कारण काय?
तर मला लोकांशी बोलायला बोअर व्हायचं! अरे असं कारण असू शकतं का?
आपल्याला लोकांशी नीट बोलायची इच्छाही होत नाही म्हणजे आपण नक्की
काय गमावतोय? असाही प्रश्न पडला. केदार कडून मी या ३-४
दिवसात काय शिकलो? एका वाक्यात सांगायच झाल तर
हिंगणघाटातल्या या दिवसात केदार मला माणसांत राहायचं शिकवत होता असं मला वाटतं.
हिंगणघाटच्या सर्व्हेनंतर मंदार देशपांडेच्या गावी जाऊन त्याच नवीन घर पाहिलं,
त्याच्या बाबांची भेट झाली. वैचारिक पाया पक्का असणे हा काय प्रकार
असतो हे मंदार च्या बाबांना भेटल्यावर आणखी थोडफार समजलं.
या
सर्व्हेच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच विदर्भातल्या चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये गेलो. तिथली गावे पहिली. या सर्व प्रवासात इतके
दिवस ठराविक ठिकाणी राहून माझा जो एक भौगोलिक ‘कम्फर्ट झोन’
तयार झाला होता तो मी कुठे तरी थोड्याफार प्रमाणात तोडला. तो आणखी
तोडण्याची गरज जाणवू लागली. कदाचित त्यामुळेच असंही वाटल की मी structured वातावरणात काम करतोय. वैयक्तिक clarity साठी पुढे
कधीतरी आणखी दुर्गम अशा भागात काम करण्याचा विचार मनात आला. कदाचित त्यातून मला
आणखी स्पष्टता येईल असं वाटल. अर्थात या वाटण्यामागे विचार कमी आणि उत्साहच जास्त!
सर्चमध्ये
काम करायला येताना मला मजा वगैरे येईल असं काही चुकूनही माझ्या डोक्यात नव्हतं.
उलट मी येताना आता आपल्याला सामाजिक काम करायचं म्हणून एकदम धीरगंभीर चेहरा करून
आलो होतो. पण इथे दीड महिन्यापासून काम करताना मजा येतेय. ‘गरिबी’च्या प्रश्नावर काम करताना माझा नेमका रोल काय
आहे? या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं का? उत्तर आहे ‘नाही!’ पण
उत्तराच्या शोधात मी एक पाउल पुढे टाकलय असं आता १००% आत्मविश्वासाने नक्कीच म्हणू
शकतो...”
स्रोत:
प्रतिक वडमारे, pratikwadmare@gmail.com
No comments:
Post a Comment