'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 1 August 2013

चॉकलेट पार्सल, ऑगस्ट २०१३

१/८/१३
प्रिय युवा मित्र,
            ‘शब्द’ हा माणसाने लावलेला मोठा शोध. जीवनातील एखाद्या वस्तूला किंवा अनुभवाला प्रतीक रूपाने शब्दाद्वारे प्रकट करणे ही माणूस प्राण्याची प्रचंड मोठी बौद्धिक उडी होती. त्यामुळेच भाषा, विचार व संस्कृती शक्य झालेत.
            शब्द प्रथम केवळ मौखिक होता. त्यामुळे शब्दांमधून ज्ञान पसरण्यावर मर्यादा होत्या. नंतर गटेनबर्गच्या छपाईमुळे तो शब्द छापता यायला लागला. त्याबरोबर शब्द व माहिती पसरण्याची गती व व्याप्ती हजारो पटींनी वाढली. वाचन व वाचक वाढले. आज आपण जे आहोत, जसे आहोत त्यात छापील शब्द या हनुमान उडीचा मोठा वाटा आहे.
            गेल्या वीस वर्षांत शब्दाने कागदाचा आधार सोडला, व तो इलेक्ट्रॉनिक झाला. तो इंटरनेट, कॉम्प्युटर व मोबाईल फोनची स्क्रीन याद्वारे प्रवाहित झाला. याचे परिणाम किती मोठे व व्यापक होतील हे तर अजून आपण पूर्ण बघितलेलेच नाहीत. रोज हे क्षितीज पुढे सरकते आहे.
            जगात इतकं लिहिलं गेलं, लिहिलं जातंय, पण त्यातला अब्जांश देखील आपण वाचू शकत नाही. मात्र ‘वाचाल तर वाचाल’ हे शब्दशः खरे आहे.
            निर्माणमधील युवा मित्रांनी काय वाचावे? पुस्तके तर जरूर वाचावीत. त्यांची चर्चा आपण शिबिरात करतोच. पण सोबत छोटे, सारगर्भ विविध विषयांवर सहज काय वाचावे?
            माझ्या वाचनात अलीकडे आलेले असे काही निवडक लेख दर महिन्यात तुम्हाला पाठवण्याचा विचार आहे.
            दर महिन्यात हे छोटेसे ‘चॉकलेट्सचे पार्सल’ तुम्हाला पाठवीन. बरेचदा चॉकलेट्स इंग्रजी असतील.
            चॉकलेट कसे वाटले? त्यातील विचारांबद्दल प्रतिक्रिया? जरूर परत पाठवा.
तुमचा
नायना
संलग्न: चॉकलेट पार्सल

*****
या पार्सलमध्ये काय पहाल?

गृत्समद: आजच्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे राहणाऱ्या गृत्स्मद ऋषींनी वेदिक काळात कापसाच्या लागवडीचा जगातला पहिला प्रयोग केला. गृत्स्मद ऋषींबद्दल आणि त्यांच्या प्रयोगांबद्दल हा विनोबांचा लेख !

The march of protest: एकामागून एक, सोशल मेडीयाच्या मदतीने थक्क करायला लावणाऱ्या वेगाने पसरलेली, मध्यमवर्गीय सर्वसामान्यांनी केलेली ही आंदोलने. त्यांची शक्तीस्थाने, मर्यादांसह Bird’s eye view दाखवणारा हा लेख...

Abused and wounded: हिमालय पर्वतरांग ही जगातली सर्वांत तरुण पर्वतरांग ! धूप, भूस्खलन, भूकंप, ढगफुटी इ. संकटांसाठी अतिसंवेदनशील. उत्तराखंडमधील बेताल पर्यटन, अशास्त्रीय बेकायदेशीर खाणकाम, जलविद्युत प्रकल्प, तसेच धरणे यांनी १६ जूनच्या विध्वंसक पुराला कसा हातभार लावला?  



1 comment:

  1. शब्द या विषयावरचे चिंतन खूपच आवडले. अनेक धन्यवाद.

    ReplyDelete