पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पदव्युत्तर शिक्षण व तेही पूर्ण
झाल्यावर PhD हे वाचून कुणाला काही वावगे वाटणार नाही. मात्र
हे पुढील शिक्षण का घेतोय याबद्दल स्पष्टता नसेल तर उच्च शिक्षणाचा फारसा उपयोग
होत नाही. रश्मी महाजनने (निर्माण ५) संवर्धन शास्त्र व शाश्वत विकास या विषयावर
संशोधन करण्यासाठी Ashoka
Trust for Research in Ecology and the Environment (ATREE) या संस्थेत PhD करता नुकताच प्रवेश घेतला. या निर्णयापर्यंत तिचा प्रवास कसा झाला हे जाणून
घेण्यासारखं आहे.
पर्यावरणशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना रश्मीला पर्यावरणाच्या
सामाजिक आणि सांस्कृतिक अंगाचा अभ्यास करण्याची प्रेरणा वाटू लागली. त्यानंतर तिने
Centre for science and
Environment (CSE) या संस्थेत एक महिन्याचा ‘Agenda for Survival’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. अभ्यासक्रमातील क्षेत्रभेटीदरम्यान
उत्तराखंडच्या कुमाऊं भागातील लोकांसोबत व संघटनांसोबत संवाद साधताना त्यांच्या
नैसर्गिक संसाधनांच्या, विशेषतः पाण्याच्या व्यवस्थापन पद्धतीचा तिच्यावर प्रभाव
पडला. पुढे जाऊन ‘गोमुख’ या संस्थेसोबत तिने एक वर्ष वैनगंगा खोऱ्यात पाणी
व्यवस्थापन व विकास यांचे एकत्रित नियोजन करण्याच्या दृष्टीने field coordinator काम केले. या प्रकल्पांतर्गत तिला १० दिवसांच्या
वैनगंगा यात्रेच्या निमित्ताने पाणीप्रश्नाच्या विविध अंगांबद्दल लोकांकडून आणि
तज्ञांकडून जाणून घेण्याची संधी मिळाली. हिवरेबाजार, सुखोमाजरी या
गावांच्या यशस्वी पाणीव्यवस्थापनाबद्दल, तसेच Dying wisdom, आज भी खरे है तालाब इ. पुस्तकांचे तिने वाचन
केले. दरम्यान याच क्षेत्रातील श्री. मनीष राजनकर, प्रा. विजय परांजपे इ. तज्ञांचे
मार्गदर्शन घेण्याची तसेच श्री. हिमांशु ठक्कर, श्री. राजेंद्र सिंह, परिणीता
दांडेकर इ. तज्ञांचे पाणीप्रश्नाबद्दल विचार ऐकण्याची संधी मिळत गेली. या सगळ्याचा
परिणाम म्हणून तिने या विषयात पुढे अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.
या संशोधनाच्या निमित्ताने पारंपारिक ज्ञान व
आधुनिक संशोधन यांची सांगड घालून गावच्या पाणीस्त्रोतांचे स्वतःच व्यवस्थापन
करण्यासाठी लोकांचे सक्षमीकरण करण्याचे तिचे ध्येय आहे. तिच्या पुढील प्रवासाकरिता
तिला शुभेच्छा!
No comments:
Post a Comment