'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 2 October 2013

हिंदु - मुसलमान

(प्रस्तुत लेख वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल परंधाम प्रकाशनाचे श्री. पराग चोळकर यांना धन्यवाद!)

      हिंदु-मुसलमानांचें ऐक्य शक्य आहे का असा मला प्रश्र्न विचारण्यांत आला. शक्य आहे एवढेंच नाहीं तर तें इष्ट हि आहे. फार विचारपूर्वक ह्या गोष्टीकडे पाहिले पाहिजे.
     आपण हिंदु आणि मुसलमान हिंदुस्थानांत एकोप्यानें राहावयास शिकत होतों. भाई सुंदरलाल ह्यांनी "भारत में अंग्रेजी राज्य" ह्या जप्त झालेल्या पुस्तकाला जी प्रस्तावना जोडली होतीत्या प्रस्तावनेंत त्यांनीं ही गोष्ट शेंकडों प्रमाणें देऊन सिद्ध केली होती. आपण एकमेकांशीं कसें जुळतें घेत चाललों होतो ह्याचा इतिहास आपणांस माहित नाहीं. साध्या साध्या गोष्टीहि आपण विसरून जातो. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे सुद्धां मुसलमानांशीं ऐक्य होतें. शिवाजी महाराजांच्या आरमारावर मुसलमान अधिकारी होते. परस्पर विश्र्वासाशिवाय ही गोष्ट शक्य होती का  ? शिवाजीचें धर्माशी वांकडे नव्हते. एका विविक्षित धर्माचे लोक सारे दुष्टच अशी त्याची भावना नव्हती. त्यानें स्वतःच्या धर्मांतील दुष्ट लोक दूर केले व दुस-या धर्मातील भले लोक जवळ केले.  मक्केला जाणा-या मुसलमान यात्रेकरूंच्या केसासही धक्का लागूं नये म्हणून तो जपे. शिवाजी महाराजानंतर पहिल्या बाजीरावाच्या काळांत चला. ह्या वेळेस हिंदुस्थानांतील हिंदु मुसलमान झगडत होते. बाजीरावाच्या निजामाबरोबरदिल्लीच्या बादशहाबरोबर लढाया होतच होत्या. तरी एक गोष्ट आपणांस दिसून येते. ज्यावेळेस नादीरशहा दिल्लीवर स्वारी करून आलात्यावेळेस बाजीरावाने दिल्लीच्या बादशहास पत्र लिहिले कीं मी तुमच्या मदतीस येतो. दिल्लीचा बादशहा हा मुसलमान होता तरी हिंदुस्थानांतीलच होता. हिंदुस्थानातील हिंदु मुसलमान एक होऊन परकी मसलमानांबरोबर झगडूं पहात होते. परंतु नादिरशहा लगेच परत गेला व बाजीराव नर्मदा तीरीं मरण पावला. तिसरा प्रसंग पानिपतचा. पानिपतची पळापळ सुरू होतांच मल्हारराव होळकर भाऊसाहेबांस म्हणाले,  चला आतां घोड्यावर बसून निघून जावे. फुकट जिवावर उदार होणें - यांत शहाणपण नाहीं. जगलों वांचलों तर फिरून शत्रुस काढून देऊं. परंतु आज हकनाक प्राणांस मुकणे बरें नव्हे.  परंतु भाऊराव काय बोलले. भाऊसाहेब म्हणाले,  आपण घोड्यावर बसून जाऊंपरंतु इब्राहिमखान गारदी व त्याचे १० हजार लोक ह्यांचे काय  ? ते पायदळ आहेत. ते मारले जातील. मेलो तरी पर्वा नाहीं. परंतु एकदां ज्यास मित्र म्हटले त्याला दगा देतां येत नाहीं.   मल्हाररावाने पळ काढण्याची सल्ला दिली व तो पळालाही. परंतु भाऊसाहेब तेथेंच धारातीर्थी मरण पावले. इब्राहिमखान व त्याची तुकडी मारली गेली. त्या पानपतच्या लढाईवर भाऊसाहेब व इब्राहिमखान ह्यांनी हिंदुमुसलमानांचे ऐक्य रक्ताने सांधले आहे. चौथा प्रसंग १८५७ सालचा. त्या धामधुमींत हिंदु व मुसलमान दोघेही सामील झाले होते. तिस-या शत्रुस हांकलून देण्यासाठीं उभयतः लढत होते.

     
हे चार प्रसंग मी सांगितले. हिंदु मुसलमान ह्या गेल्या हजार वर्षांत एकत्र आले. ते परस्पर भांडलेझगडले. परंतु त्यातून ऐक्याची संस्कृति निर्माण करीत होते. परस्पर संबंध गुण्यागोविंदाचे राखूं इच्छीत होते. मुसलमान राजांनी कितीतरी हिंदी कवींना आश्रय दिले होते. गुणी माणसांचा त्यांनीं गौरव केला होता. बाबर आत्मचरित्रात लिहितो,  हिंदुस्थानांत रहायचे तर गोवध करतां कामा नये. हिंदूंच्या भावना दुखवतां कामा नयेत.  एवढा टिपू आपण दुष्ट मानतो. परंतु टिपूने मोठा ग्रंथसंग्रह जमविला होता. त्यांत संस्कृत ग्रंथ होते. टिपु हिंदुंच्या देवांनाही नवस करी. आपणांस इतिहास एकांगी शिकवला गेला. आपण इँग्रजांनी जे इतिहास लिहिलेतेवढेच वाचले. त्या इतिहासांची आपण भाषांतरें केलीं. त्यांनी ज्या कल्पना फैलावल्यात्याच हिंदुमुसलमान उराशी धरून बसले. हिंदु व मुसलमान ह्यांची मनें परस्परांविरूद्ध होतील असेच इतिहास लिहिले गेले. दोघांची मनें ज्यामुळे एकत्र येतील असे प्रसंग दिले गेले नाहींतअशा गोष्टी दिल्या गेल्या नाहींत. शाळांतून जें इंग्रजांनी पढविले तेंच पोपटासारशे सत्य मानू लागलो. परंतु सुंदरलाल ह्यांनी ह्या सर्वांचा फार विचारपूर्वक व काळजीपूर्वक अभ्यास केला आहे. त्यांनीं स्वच्छ सांगितले कीं अलीकडची भांडणें हीं इंग्रज सरकारनें लावली आहेत.

     
चिंचवडच्या देवस्थानास निजामच्या राज्यांतून देणगी आहे. कामगांवकर दीक्षीत - पेशव्यांचे गुरू - ह्यांना दिल्लीचे मुसलमान मान देत व आजही निजामाच्या राज्यांत त्यांना इनाम आहे. मुसलमानांच्या मशिदीपीर मराठ्यांनी याप्रमाणेंच सांभाळले. अमळनेर येथे सखाराम महाराजांचा रथ निघतोतर पहिला नारळ मुसलमानांनीं द्यावयाचा असा प्रघात आहे   केवढी उदार दृष्टि व समन्वय. मुसलमानांच्या ताबूतांना हिंदू असाच मान देत. अशा रूढीअसे प्रघात उभय समाजांतील विचारवंतांनी पाहिले होते. दोन्ही समाजांनीं नीट राहिलें पाहिजे हें ते ओळखूं लागले होते.

     
परंतु आपण शिकलेले लोक विकृत दृष्टीचे झालो. आपण एकमेकांची उणी पाहूं लागलो. हें योग्य नव्हे. हिंदूंना अजून वाटतें की हिंदुस्थान हिंदूंचा. मुसलमान बाहेरचे आहेत. परंतु मुसलमान बाहेरचे असतील तर टिळक म्हणतात कीं हिंदू ही बाहेरचेच. मुसलमानांना हिंदुस्थानांत येऊन १३०० वर्षें झाली. तर त्याच्या आधी हजार दोन हजार वर्षें हिंदू आले. सारे बाहेरचेच. हिंदुस्थान हिंदूंचा आहेतो आतां मुसलमानांचाही आहेबाटलेले ख्रिस्ती व पारशी त्याचाही आहे. ज्याने हिदुस्थानांत घर केलेज्याला हा देश आपला वाटतो - त्याचे हे हिंदुस्थान आहे. रवींद्रनाथ म्हणतात,  "हिंदूस्थानांत सर्व धर्म आणून परमेश्वराला एक प्रयोग करावयाचा आहे. सर्वधर्म एकत्र येऊन गुण्यागोविंदानें नांदतातभिन्न भिन्न संस्कृति एकत्र येऊन सर्वांच्या संमिश्रणाने एक मधुर व अनंतरंगांची संस्कृति कशी निर्माण होते हें देवाला दाखवायचे आहे. म्हणून तो ह्या भूमीवर सारे लोक आणीत आहे. या मानवसागरांत नानाप्रकार तो आणून मिसळीत आहे. ही इतिहासाची दृष्टि घ्या. हें सूत्र धरा - म्हणजे सारें निराळें दिसूं लागेल."
     परंतु मुसलमान धर्म वाईटते लोक दुष्टत्यांच्यांत चांगुलपणा नाहीं असें आपण समजतो. चांगुलपणा व भलाई ही ईश्वराची देणगी विशिष्ट लोकांना नाहीं. आज मुसलमानी धर्माचे अनेक कोटि लोक जगांत आहेत. ते का सारे खटनट दुष्ट चांडाळ आहेत त्यांना का माणुसकी नाहींदया नाहीं त्यांच्यांत का दिलदारी नाहीं ?  महायुद्धांत शत्रुच्या कैद्यांना सर्वांपेक्षा चागल्या रीतीनें जर कोणी वागवले असेल तर तें तुर्कस्थानने होय. सा-या युरोपने ही गोष्ट कबुल केली. मुसलमान वाईट असते तर हें झाले असतें का ?  सारे मुसलमानबहुजन मुसलमान समाज वाईट आहे असें म्हणणे म्हणजे महान अहंकार होय. जो परमेश्वराचा - जर तुम्ही परमेश्वर मानीत असाल - अपराध आहे. तो प्रभुद्रोह आहे. जो ईश्वर कोट्यावधि लोक पै किमतीचे निर्माण करतोजो ईश्वर कोट्यावधि मानव पशुसम निर्माण करतोतो ईश्वर पै किंमतीचा होय. सारी जातच्या जात रद्दी ठरवणें हें तुम्हांस शोभत नाहीं. मुसलमान का सारे वाईट ?

     
ही दृष्टि सोडून द्या. त्यांच्या धर्माची उगीच निंदा नका करूं. महंमदालाटीका करून त्याला तुम्ही क्षुद्र ठरवूं पहाता -  महंमद म्हणजे केवढी थोर विभूती - २२ कोट लोक त्याच्या भजनी लागले आहेती विभूति का तुच्छ असेल - कार्लाईल महंमदाची स्तुति करतां करतां तल्लीन होतो. गिबनने आपल्या महान् इतिहासग्रंथांत महंमदाची अत्यंत स्तुति केली आहे. २५० वर्षांपूर्वीं सेलने कुराणाचें भाषांतर केले. तो अपबस्थानांत आलाकुराण पढला. २५ वर्षें त्यानें अभ्यास केलामनन केलें व नंतर भाषांतर केले. तरी तो प्रस्तावनेंत म्हणतो, - हें भाषांतर सर्वांगसुंदर नाहीं. हें अपूर्णच आहे. या भाषांतरानें मला समाधान नाहीं.- बर्नार्ड शा सध्यांचा महाज्ञानी व तपस्वी लेखक. तो महात्माजींस इंग्लंडमध्यें म्हणाला, - मी महंमदावर एक नाटक लिहिणार होतो. परंतु तें अर्धवट राहिले आहे. मात्र महंमदाचें चरित्र फार आवडते.- सेलकार्लाईलगिबनबर्नार्ड शा - हीं साधीं माणसें नाहींत. कार्लाईल म्हणजे ऋषि च तो. ह्या सर्वांना महंमदाची स्तुति करण्यांत धन्यता वाटते. ह्यांना का कोणी लांच दिली होती -

     
तुम्ही मघांशी शंका घेतलीत कीं महंमदाने ६० वे वर्षीं आठ वर्षांच्या मुलीशी लग्न केलें. परंतु या गोष्टीचा जरा विचार तर करा. संतति हा विवाहाचा एक उद्देश असतो. परंतु इतरही उद्देश विवाहांत असूं शकतात. केवळ संभोगच तेथें अभिप्रेत नसतो. कांहीं विवाह संभोगभावनाहीन असतात. प्रख्यात गुजराती कवि न्हानालाल यांचें जयाजयंती म्हणून एक सुंदर नाटक आहे. त्यांतील नायिकाअविवाहित राहिलें तर समाज नांवें ठवतो - एवढ्यासाठीं लग्न करते. लग्न झाल्यावर बहीणभावाप्रमाणें उभयतां राहतात. महंमदानें त्या लहान मुलीवर अनुग्रह केला असेल. तिच्या संरक्षणासाठीं स्वीकार केला असेल. तो परिग्रह केवळ कल्याण बुद्धीचा असेल. त्या मुलीचे नांव आयेषा. आयेषा हें नांव मुसलमान फार पावन मानतात. तें नांव मुद्दाम मुलींना ठेवतात. महंमदाच्या विवाहाचा समाजावर काय परिणाम झाला तें पाहिलें पाहिजे. त्या लग्नाचा वाईट परिणाम झाला नाहीं. महंमदाबद्दलचा आदर त्या विवाहानें कमी झाला नाहीं. महंमद हा जर व्यभिचारीस्त्रीलंपट व पागल असता तर त्याला अनुयायी मिळाले ऩसते. त्याच्या शत्रुंनी त्याची बदनामी लगेच केली असती. एखाद्याला तरवारीनें मारतां येत नाहीं. परंतु त्याचा बदलौकिक करूनत्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून त्याला नेस्तनाबूद करतां येते. तुम्ही महंमदाबद्दल अशा घाणेरड्या शंका कशा घेतां - मला फार वाईट वाटून राहिलें आहे. महंमदाचे नांव उच्चारतांच समाधि लागण्याची माझी मनःस्थिति होते. हा त्या थोर पुरूषाच्या चारित्र्याबद्दलची चर्चा मला अत्यंत दुःख देत आहे. १३०० शें वर्षांत असा महापुरूष झाला नाहीं. त्या वाळवंटांतील रानवट अरबांत केवढी भव्य स्फूर्ति त्यानें निर्माण केली - महंमदाचे मरणापासून ८० वर्षांचे आंत जिब्राल्टरपासून दिल्लीपर्यंत धर्म पसरला ज्यानें एवढी स्फूर्ति दिली  तो अपूर्व पुरुष असला पाहिजे. ईश्वरी देण्याचा पुरुष असला पाहिजे. विषयासक्त जीव असली जीवंत स्फूर्ति कसा देईल - जड जीव ह्याप्रमाणें राष्ट्र पेटवूं शकत नाहीं. त्या आठ वर्षांच्या मलीला कोणी त्राता नसेल. महंमद म्हणाला असेल - ये बेटा माझ्या घरीं रहा.- तो संबंध विषयासक्तीचा संभवतच नाहीं. मोठ्या लोकांमध्यें अपूर्वता असते. त्यांची नीति त्यांना झेपते. महंमद ६० व्या वर्षी आठ वर्षांच्या मुलीशीं लग्न लावतो म्हणून तुम्ही आम्ही तसें करावयाचे हें आपल्याला शोभणारे नाहीं. ..........महापुरुषाने जें केलें तें गर्ह्य नसतेपरंतु तें अनुकरणीय नसतें. त्यांना तें झेपलें. तुम्हां आम्हांस झेंपणार नाही. कृष्ण भोगी असून योगी होता. ब्रह्मचारी होता. आठ वर्षाच्या मुलीशी लग्न करून ही महंमद पवित्र वागला असेल. इतरांना हें सामर्थ्य नाहीं. आपणात अनेक मोह असतातअपार लालसा असते. रामकृष्ण परमहंस बावळटासारखे वागत. परंतु एवढे विवेकानंद त्यांच्याकडे आले- परंतु लज्जित होऊन निघून गेले का - उलट विवेकानंद त्यांच्या पायाची धूळ बनले. थोरांमध्यें अपार शक्ति असते. रामाने दगडांतून अहिल्या निर्माण केली. मी अक्षरशः खरें मानतो. आणि थोरांचे गुणदोष मी काय बघणार - माझ्या बारक्या हातांनीं त्यांचा तो तराजू उचलला तर पाहिजे - मी थोरांना शरण जावें. त्यांच्या चरित्रांतील ज्या गोष्टी समजत नसतीलविसंगत दिसत असतील त्या सोडून द्याव्या.

     
धर्म हा ज्ञानी पुरुषापासुन समजून घ्यावा. परधर्मीय लोक कृष्ण व्यभिचारी होता म्हणून म्हणतील. परंतु एकऩाथ त्या व्यभिचाराची गाणीं गातात व सद्गदित होतात. कृष्ण हा व्यभिचारी तमासगीर होता असे म्हणणा-यांपासुन धर्म समजून घ्यावा कीं एकनाथां पासून समजावून घ्यावा -

     
मुसलमानांतही थोर संत आहेत. मोठे लोक आहेत. त्यांच्यापासुन कुराणाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. धर्मग्रंथांतील वाक्यांचा अर्थ श्रद्धेने घ्यावा लागतो. कुराणांत दुस-यांस मारा असा उपदेश असेल तर तो का तुमच्या वेदांत नाहीं - तुमच्या वेदांतही अशीं शेंकडों वचनें आहेत.
                          -   
यो अस्मान द्वेष्टियं च वयं द्विष्यः
                                                            
तं जहि -
जो आमचा द्वेष करतो व आम्ही ज्याचा द्वेष करतोत्याला मार - अशीं वेदांत वाक्यें आहेत. परंतु धर्माचे हें सार नव्हे. हा गाभा नव्हे. खरा अर्थ ह्रदयाने समजतो. बुद्धीला ह्रदयाची जोड असल्याशिवाय शब्द अर्थ प्रसवत नाहींत. शब्दरूप कामधेनू जवळ वत्स होऊन जा. वेदामध्यें  - गोभिः सेवेत सोमं - असें वचन आहे. पाश्र्चिमात्य पंडित कीथ आपली केवळ बुद्धि घेऊन आला व - सोमांत गाय मिसळून म्हणजे गायीचें रक्त मिसळून तो प्याला - असा अर्थ त्याने ठोकून दिला. परंतु सायणाचार्य म्हणतात, - गोभिः नाम तासां पयोभिः  - गायी मिसळून म्हणजे गायींचें दूध मिसळून सोम प्यावा. सायणाचार्यांचा अर्थ किती सह्रदय व सुंदर आहे. एक केवळ बुद्धीनें गेला व गोभिः म्हणजे - तासां रक्तैः असें म्हणाला - दुसरा ह्रदयहि घेऊन गेलाव - तासां पयोभिः म्हणाला. केवढें अंतर -

     
मुसलमानांत जे थोर लोक असतीलधर्मनिष्ठ असतील त्यांच्या जवळ नम्रतेनें जाऊन शिका. साबरमतीला आश्रमांत ईमाम साहेब होते. ते मरणोन्मुख होते. आवाज नीट निघत नव्हता. तरी नमाज पढत होते. असे श्रद्धावान् लोक महंमदास थोर मानतात. त्यांना कुराणाचा अर्थ विचारा. आपणां परधर्मीयांस इतर धर्मिय साधूंची परीक्षा करण्याचा अधिकार नाहीं. आपण त्यांचे कौतुक करावेंनम्र व्हावे. आईनेंच मुलीचे दोष दाखवावे. सासूने आधीं सुनेला मुलीप्रमाणे वागवण्याची पराकाष्ठा करावी. परंतु तें करण्याचें सोडून ती दोषच दाखवीत सुटते. परधर्मीयास सहानुभूति नसते. सहानुभूतिशिवाय खरी परीक्षा होत नाहीं. परधर्मीय विभूतींचे चरित्र किती आदराने पाहिले पाहिजे. परधर्मीयांचे दोष पहाण्याचा माझा काय अधिकार - आधीं प्रेम करा मग दोष दाखवा. मनुष्य दोष दाखवावयाचा हक्क मिळवूं पहातोपरंतु प्रेम करण्याचा हक्क आधी मिळवला पाहिज. याची त्याला जाणीव नसते. मारण्याचा हक्क सर्वांना पाहिजे आहेपरंतु प्रेम करण्याचा कोणालाच नको आहे. परंतु मारण्याचा हक्क मिळवण्यासाठीं आधीं अपरंपार प्रेम करा. आई आधीं भरपूर प्रेम करतेम्हणून मुलाला मारतेही. तुम्ही सारे दोष काढूं इच्छितांमारू बघतां - परंतु हें योग्य नाहीं.

      
महंमद किती साधा होताकिती विनम्र -  हाताने कपडे शिवीजोडे शिवी. साधी कोरडी भाकर खाई व पाणी पिई. लोक त्याला म्हणत - कांहीं चमत्कार करा. - महंमद म्हणे - मी क्षुद्र मनुष्य चमत्कार काय दाखवूं - देवाची सृष्टि चमत्कारांनीं भरलेली आहे. या रखरखित वाळवंटांत गोड खजुरीचीं झाडे आहेत हा चमत्कार नाहीं का - तुमचीं गायीगुरें सायंकाळी तुमच्यावरच्या प्रेमाने घरीं परत येतातहा चमत्कार नाहीं का - समुद्राच्या वक्षःस्थलावर लहानशी होडी डुलते हा चमत्कार नाहीं का - आणि माझ्या सारखा अडाणी मनुष्य कुराण बोलतो हा चमत्कार नाहीं -

     
शिवाय त्या त्या काळांत नीतिही बदलत असते. नीतीच्या मर्यादा (Standards of Morality) ह्या बदलत असतात. उत्तररामचरित्रांत सीतेचा रामानें त्याग केल्यापासुन जनक मांस निवृत्त आहे असे दाखवले आहे. परंतु वसिष्ठ हा मांसाहारीच दाखवला आहे. वसिष्ठ आश्रमांत पाहुणा आला म्हणून कालवड मारला गेला असे वर्णन आहे. परंतु मांसाहारी वसिष्ठ शांतिसागर होता. त्याचे १०० मुलगे विश्र्वामित्रानें मारलेतरी वसिष्ठाची शांति ढळली नाहीं. आज आपण मांसाशन करीत नसलों तरी आपण दयावान् नाहींकिंवा शांतीचा बिंदुही आपणाजवळ नाहीं. आपण भातभाजी खाऊनही माणसांस मारावयांस धावतो - त्या प्राचीन काळांत त्यांनीं प्रयोग केले - हळुहळु मांसाशन सोडले. आपणांस ही आयती कमाई पूर्वजांची मिळाली. आणखी कांहीं हजार वर्षांनी दूध म्हणजेहि शारीरिक अन्नच - मांसाचेंच रूप  आहे असें कांहींजण म्हणतील व दूध सोडून देतील. २५ लाख वर्षांनी कृष्णाचे चरित्रमहात्माजींचे चरित्र वाचून लोक म्हणतील - ते तर दूध पीत होते - - कृष्ण दूध प्याय़ला तें त्याच्या काळांत गर्ह्य नाहीं. तो प्रयाग करीत होता. मासाशन सोडण्यासाठीं त्यानें दुधावर भर दिला. आजहि गर्ह्य नसेल. परंतु २५ लाख वर्षांनी कदाचित् गर्ह्य ठरेल. समाजपुरूष हळुहऴु मोठा होत जातो. मागच्या पिढीच्या खांद्यावर पुढची पिढी बसतेउंच होते व अधिक दूरचें बघते. मानवजात झगडतप्रयोग करीत पुढें जात आहे. तुकारामांचें चरित्र पहा ना. मरतांना त्यांची पत्नी गरोदर होती. ते मेल्यावर त्याच्या पत्नीस मुलगा झाला. ह्याचा अर्थ मरावयाच्या आधीं कांहीं महिने तुकाराम अत्यंत विरक्त झाले असतील. मरेपर्यंत त्यांचा झगडा चालला असेल.
याजसाठीं होता केला अट्टहास । शेवटचा दीस गोड व्हावा -
त्यांचा शेवटचा क्षण गोड झाला - प्रयत्नवादअभ्यासशरणागतिझगडा तुकारामाच्या अभंगांत सर्वत्र दिसतो. माणुस प्रयत्न करीत असतो. ग्रंथि सोडवीत असतो. मग एक दिवस एकदम सुटते. कालपर्यंत बद्ध व एकदम मुक्त -

     
थोरांच्या चरित्रांत असे झगडे असतात. काळाचीं बंधनें असतात. एपढा मोठा सोक्रेटीसपरंतु गुलाम जन्मजात असतो असें तो मानी. गुलामाचा मुलगा गुलामच असला पाहिजे असें तो प्रतिपादी. काळाचें बंधन ह्या बाबतींत तो झुगारुन देऊं शकला नाहीं. या सर्व गोष्टी लक्षांत घऊन तुम्ही या विभुतींकडे पाहीलें पाहिजे.

     
मघां एकानें शंका घेतली कीं कुराणांत स्वर्गाचें जे वर्णन केले ाहे तें फार भोगैकमय (लालुच दाखवणारे) आहे. कुराणांतील स्वर्गाचें वर्णन फार सुंदर आहे. - तेथें अनंत तारे चमकत आहेतसुंदर झरेवाहात आहेत. सुंदर फळांनीं लवलेले वृक्ष आहेत -  परंतु हें वर्णन म्हणजे लालुच नाहीं. अशीं वर्णनें तुमच्या धर्मग्रंथातूनही आहेत. - स्वर्गांत सुवर्णमंदिरें आहेततेथे सुंदर सरोवरें आहेतअश्र्वत्थवृक्षांतून तेथें सोमरसाचे झरे वाहात आहेत - इत्यादि वर्णनें वेदांत आहेत. परंतु हा अर्थवाद असतो. कुराणांतच हा दोष आहे आणि अन्यधर्मग्रंथांत तो नाहीं असें नाहीं.

     
कुराण हा थोर ग्रंथ आहे. दिव्य स्फूर्तीचा ग्रंथ आहे. कुराण या शब्दाचा अर्थ काय - कुराण म्हणजे ह्रदय पिळवटून निघालेला उद्गार. महंमदाच्या ह्रदयांतुन  निघालेले ते शब्द आहेत. अशा थोर विभुतिकडे व त्या थोर धर्मग्रंथाकडे विकृत दृष्टीने पहावयाचें सोडून द्या. नम्रपणानें अभ्यास करा तरच कळेल. Humility is the beginning of knowledge. नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे. - करी मस्तक ठेंगणा    लागे संतांच्या चरणा -- हाच ज्ञानार्जनाचा खरा मार्ग.  - तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्र्नेन सेवया -- प्रणिपातनमस्कार हें ज्ञानाचें पहिले साधन. नंतर नम्र प्रश्र्ननंतर सेवा - असे ज्ञानार्जनाचे मार्ग आहेत. परधर्माचें ज्ञान मिळवण्यासाठींप्रेमानेनम्रपणे व सहानुभुतीच्या दृष्टीने आपण पहावयास शिकले पाहिजे.
   
      
दुसरी गोष्ट म्हणजे आपण नेहमी सांगत असतो कीं मुसलमानांनी तरवारीच्या जोरावर धर्मप्रचार केला. परंतु हें संपूर्ण सत्य नाहीं- किंबहुना फार अल्प सत्य आहे. केवळ तरवारीच्या जोरावर जगांत कांहीं होत नाहीं. केवळ पशुबळ टिकाव धरते असे म्हणणे वाळूच्या पायावर टोलेजंग इमारत बांधता येते असे म्हणण्यासारखे आहे. टपोरा दाणा असतो त्यालाच अंकुर फुटतो. उकिरड्यावर आपण केर फेकतो. त्या केराबरोबर एखादा ज्वारीचा दाणा जातो. त्याला तेथे अंकुर येतो. परंतु तो कचरा मात्र सडतो. त्या दाण्यात सत्व होते. आजहि आपण म्हणतो कीं पाश्र्चिमात्य संस्कृति पाशवी बळावर विजयी होत आहे. परंतु ही वरची दृष्टि. आज जय मिळत असेल तर पाश्र्चिमात्यांच्या पुण्याईला व त्यागालाच मिळत आहे. जीवनाच्या जीवने ज्यांनी ज्ञानसंशोधनांला दिली असे जिज्ञासु भक्त पाश्र्चिमात्य संस्कृतीच्या पायांत गाडले गेले आहेत. त्यांचा उद्योगत्यांचे सहकार्यनियमितपणाकष्ट-संकटें हाल भोगण्याची तयारीएकेका गोष्टीचा ध्यास घेऊन त्याप्रीत्यर्थ जीवन देणे - हे पाश्र्चिमात्यांचे गुण जगांत मिरवत आहेत. हें जसे पाश्र्चिमात्य संस्कृतीचे तसेंच मुसलमानी धर्म प्रसाराचे. मुसलमानी धर्माचा प्रचार त्यागानेच झाला आहे.

     
मुसलमान सेनापति भर लढायींत प्रार्थनेची वेळ होताच गुढगे टेकून प्रार्थना म्हणूं लागत. शत्रु गोळी घालो वा खंजीर खुपसो. त्याला त्याची दरकार नसे. अशा गोष्टीं वाचा. ह्या सत्यकथा मी सांगून राहिलों आहे. ह्या अशा गोष्टीं विजेपक्षां जास्त लौकर जातात. सत्कीर्ति बिनपंख उडत जाते. ज्याप्रमाणे ती पोर्तुगीज स्त्री आपल्या पतीला म्हणाली, " त्या थोर सरदाराने मला बहीण मानून चोळी बांगडी देऊन पाठवले. अशा चिमाजी अप्पांशी लढून तुम्हांस जय कसा मिळेल दुष्मन खरा परंतु दाणा आहे." हें जसे ती म्हणालीत्या प्रमाणेच इतर हि राष्ट्रें म्हणूं लागली असतील कीं या अरबांबरोबर लढून कसा विजय मिळेल  हे तर रणांगणांत गुढगे टेंकून प्रार्थना करतात. ह्यांना भय ना धोका. हे देवाचे लोक आहेत.   शेंदडों मुसलमान संत झाले आहेत व त्यांनी मुसलमानी धर्म फैलावला आहे. एका मुसलमान संताच्या अंगांत बाण घुसला होता. परंतु तो काढता येईना. कारण जरा ओढूं लागतांच अत्यंत वेदना होत. तेव्हां एकजण म्हणालाथांबाप्रार्थनेच्या वेळेपर्यंत थांबा. हा साधु प्रार्थनेस बसला म्हणजे तो बाण आपण काढूं. प्रार्थनेची वेळ झाली. तो साधु प्रार्थनस बसला व ईश्र्वरात विलीन झाला. मंडळींनी तो बाण काढलापरंतु त्याला त्याची आठवणही नाहीं. असे अवलिये मुसलमानांत झाले व ते तत्कालीन ज्ञात जगांत सर्वत्र पसरले. जसे बुद्धाचे थोर शिष्य जगभर गेले. तसे इसलामी संत गेले. महाराष्ट्रांत मुसलमान संतांची नांवे हिंदु आपल्या मुंलाना ठेवीत. शहाजी हें नांव मुसलमान फकीराचे होते. मुसलमान साधूस नवस करीत. ह्या गोष्टीं लक्षांत घ्या. मुसलमान साधूंनी धर्मप्रसार केला. गांवो गांव दोहे म्हणतकलीमा पढत ते हिंडत होते. त्यासाठीं तर समर्थांनी मनाचे श्र्लोक काढले. लोकांना समजेल असा सुटसुटीत साधा धर्म त्या श्र्लोकांत त्यांनी दिला व ते श्र्लोक देऊन शेंकडो ब्रह्मचारी गांवोगांव पाठवले. हें ते मुसलमान फकीरांपासून शिकलेले. मुसलमान आले त्या वेळेस हिंदुस्थानांत साधुसंतांचा फार तुटवडा होता. साधू फार होते हा भ्रम आहे. तरवारी पेक्षा या फकीरांनीया मुसलमान संतांनी धर्म अधिक फैलावला आहे.
     हिंदुस्थानांत ख्रिश्र्चन लोक कोटीहुन जास्त आहेत. गेल्या शंभर वर्षांत मिशनरीनी तर तरवार नाहीं चालविली परंतु मिशनरी सेवा करतात. दवाखानेशाळा घालतात. तुम्ही हिंदुनी काय केले आहे तुमच्या महारोग्यांची शुश्रुषा प्राण फेंकावयास तयार राहून मिशनरी करतो. तुमच्या गरीब लोकांना त्यांचा आधार आहे. भिल्लगोंड वगैरे लोकांत तुम्ही अजून गेला नाहींपरंतु मिशनरी तेथे आहे. तो दवा देईलज्ञान देईलसंगीत ऐकवील व आपल्या पंथांतही त्यांना घेईल. तुम्ही परधर्मीयांस शिव्या देत बसा. शहरांतुन व्याख्याने देऊन मिशन-यांस शिव्या द्या. मिशनरी तुमच्या भावांचीतुम्ही टाकलेल्या भावांची सेवा करीत आहे.

     
मुसलमान फकीरांनी असेंच केले असेल. हिंदु धर्माने उपेक्षिलेल्यातुच्छ मानलेल्या अनेक जाति. त्यांना त्यांनी प्रेम दिले असेल. इस्लाम धर्मांतील समानता दाखवली असेल. दिल्लीच्या जुम्मा मशीदींत प्रार्थनेच्या दिवशी औरंगजेब उशीरा आला तरी त्याला शेवटीं दरवाजातच बसावे लागे. देवाच्या दरबारात सारे समान. तुमच्या देवाच्या दरबारात सारा श्रेष्ठ-कनिष्ठपणाचा सांवळा गोंधळ. कीर्तन चाललेले असतां मध्येच उशिरानें कोणी श्रीमंत आला तर "याइकडे या" असा ओरडा सुरू व्हायचा. देवाच्या दरबारांतही श्रेष्ठ कनिष्ठ भाव विसरू नका. तीं गांठोडी जवळ ठेवा. आणि हरिजनांस तर येऊंच देऊ नका. आणि असे हरिजन इतर धर्मांत गेले व इतरधर्मीयांची संख्या वाढली तर हे बाटवतातजुलमाने चोरून मारून मुलें पळवून बाटवतात म्हणून ओरड आहेच. अरेस्वतः कसे वागतां ते पहा. तुमच्या मध्यें स्त्रियांना मान नाहीं. स्त्रियांना पैतृक संपत्तीतइष्टेटींत वारसा नाहीं. गरीब स्त्रियांना कसला आधार आहे ?  हिंदु धर्मांत ज्यांना ना आता ना पाता - ते इतर धर्मांत जातात. त्यांना वाटते की हे धर्म बरे.

     
म्हणून केवळ तरवार किंवा केवळ बाटवा बाटवी असा हा सर्वस्वी प्रकार नाहीं. आपले अहंकारश्रेष्ठकनिष्ठभावसेवेविषयीं पराङमुखता या गोष्टी ह्या बद्दल जबाबदार आहेत. कोणी म्हणतो, "बंगालचे पहा. तेथे पूर्वी हिंदु शेकडा ५६ होते. ते आज शेकडा ४४ झालेपरंतु मुसलमान शेकडा ५६ झाले. हें काय बाटवा बाटवी शिवाय झाले ?" अरे पण जरा विचार करा. बंगालमधील बंगांली बाबू शिकून नोकरीसाठीं सा-या हिंदुस्थानभर पसरला आहे. नागपूरप्रांतांतसंयुक्त प्रांतांतब्रह्मदेशांत जिकडे तिकडे ते दिसतील. बंगाली लोक पर प्रांतांत खुप जात आहेत. शिवाय बंगाली हिंदूमध्यें जननसंख्या कमी आहे. व मरणसंख्या फार आहे. मुसलमानांत जननसंख्या जास्त आहे व मृत्युसंख्या कमी आहे. मुसलमान बहुधा खेड्यातच असतात. शहरांत राहून आयुष्य कमी होते. मुसलमान खेड्यातच आहेतते निरोगी आहेत. त्या मुळे त्यांची संख्या वाढत आहे. ते बंगालच्या बाहेरीही गेले नाहींत. ह्या गोष्टीमुळें हे प्रकार होतात. ते बाटवा बाटवीमुळे होतात असें नाहीं.

     
समानता ही मुसलमानी धर्माची व्यावहारिक देणगी आहे. हिंदुच्या ग्रंथांत समानता आहेपरंतु व्यवहारांत सारी विषमता. सारी शिवाशिवी. सारी स्पृश्यास्पृश्येंश्रेष्ठ-कनिष्ठपणाची बंडें. आम्ही शंकराचार्यांच्या अद्वैताचा वाद करूंपरंतु प्रत्यक्ष कोरडेच राहूं. आम्ही धर्म पचवला नाहींवेदांत जिरवला नाहीं. म्हणून आपला समाज दुबळा व भेकड आहे. आम्ही मुसलमानांच्या साठीं फार करतो - असें तुम्ही हिंदु प्रौढीने सांगतां. अरेतुम्ही काय करतां तुम्ही कांहीं करीत नाहीं. तुम्ही प्रेमशून्य आहांत. स्वतःच्या हिंदु बंधुवर तरी तुमचे प्रेम आहे का ज्याचें सख्ख्या भावावर प्रेम नाहीं तो परक्यांवर काय करणार तुम्ही मुसलमानांसाठीं काहीं करीत नाहीं. जें काहीं करीत असाल तें प्रेमाने नव्हे दुबळेपणानेभित्रेपणानेहिशेबीपणाने करीत असाल. म्हणून तें खरें करणें नव्हेखरें देणें नव्हे. खरें देणें हिशेबी नसते. प्रेम हिशेब पहात नाहीं. हिंदुजवळ प्रेम नाहींच मुळी. प्रेमाचे धडेही  मुसलमानाजवळून घ्या. तो प्रेमाची पहिली यत्ता तरी शिकला आहे. आपल्या बंधुंसाठीं  तरी तो उठेल. तुम्ही तेंही करणार नाहीं.

     
अद्वैताच्या गप्पा मारणारे तुम्ही. अरेजरा लाज धरा मनांत. अस्पृश्यांच्या बाबतींत तुम्हांला मुसलमानी धर्माने जागे केले आहे. मुसलमानी धर्माचे हे एक मोठे कार्य आहे. अस्पृश्यतेचे खूळ जर आपण काढले नाहीं तर हे मुसलमान होतील किंवा ख्रिस्ती होतील असा पेंच पडून आपण जरा जागे झालों आहोत. धर्मातील उदारपणामुळें नव्हे तर लोकसंख्या कमी होईल म्हणून आपण जागे झालो आहोत. परंतु लोकसेख्येच्या जरुरीने कां होईनाहा अन्याय दूर करण्याचा विचार कांहीं हिंदु करूं लागले हें सुचिन्हच म्हणावयाचे. मुसलमानी धर्माचा हा उपकार समजा. श्रेष्ठ-कनिष्ठपणाच्या भेदांनी तुम्ही स्वतःच्या बंधूंना घालवलेत. मुसलमानांनीं धर्मोपदेशानेप्रेमाने त्यांना जवळ केले. मुसलमानी धर्माचा प्रचार ह्या धर्मांतील थोरपणाने झाला. तुमच्या धर्मात अनुदारता शिरली म्हणून ह्रास झालाह्रास होत आहे. जोंपर्यंत ही अनुदारता जाणार नाहीं तों पर्यंत असाच ह्रास होत राहील. आज जगांतील सर्व धर्म ताजव्यात (तराजूत) घातलेले आहेत. धर्माचा तोल होत आहे. जो धर्म सर्वांस प्रेम देईलज्या धर्मात समानतासहिष्णुताकर्मशीलता व सेवा अधिकतो धर्म टिकेल. हिंदुधर्मानें अस्पृश्यता जर काढून टाकिली नाहींमुसलमान धर्मख्रिश्र्चनधर्म हे टाकाऊ असल्या शिव्या देणे जर सोडले नाहीं तर हिंदु धर्म जगातून नाहींसा होईल. तुमच्या संघठणांनी तो टिकणार नाही. संघठणे कशासाठीं लग्नाची जास्त सोय करणे म्हणजे संघठण ! असल्या संघठणांनी धर्माला तेज चढत नसते. धर्माची किंमत संघठणाने होत नसते. धर्मात सतेज व थोर पुरूष निर्माण झालेथोर व्यक्ति निर्माण झाल्या म्हणजे धर्माची किमत वाढते. आज महात्माजी आपल्या धर्मात आहेत. ज्या धर्मदुधावर पोसून महात्माजींसारख्यांस तेज चढतेज्या धर्मातून महात्माजींसारख्यांस प्रकाश मिळतोत्या धर्मांत कांहींतरी चांगुलपणाचा भाग असला पाहिजे असें जग म्हणते. महात्माजींसारखा पुरूष आपल्या धर्मांत असता तर किती बरें झाले असते असे पुष्कळ ख्रिस्ती धर्मोपदेशकांस वाटते! महात्माजी आपल्या धर्मांत यावे म्हणून पर्वतोपनिषदाच्या (सरमन ओन द माऊंट) प्रती दर वर्षीं त्यांच्या कडे पाठवण्यात येतात ! परंतु महात्माजी म्हणतात, "माझा धर्म मला पुरून उरणारा आहे. माझा धर्म मला प्रकाश देत आहे." महात्माजींसारख्या विभूतिमुळें हिंदुधर्माकडे जगाचे लक्ष साहाजिकच वळले.
संघटणे करून व मांस खाण्याचा प्रचार करून धर्माला तेज चढत नसते. संख्येवर धर्म अवलंबून नाहीं. हिंदुधर्मांत उदार व उदात्त विचार असतील तर ते जगांत राहतीलच. आज ग्रीक राष्ट्र नाहींम्हणून प्लेटोसोक्रेटिसएरिस्टोटल हे मेले नाहींत. होमर अमर आहे. युक्लिड अमर आहे. एकहि हिंदु राहिला नाहींतरी वेद - उपनिषदें राहतील. रामायण वाचलें जाईलमहाभारत गायिले जाईल. सुंदर विचार हा मरणार नाहीं. शेवटीं जगांत विचारच अमर व्हावयाचे आहेत. विचारांना पाणी घालून आपण वाढवावयाचे. आपलें जीवन ह्यासाठींच आहे. जीं उदात्त ध्येयें थोरांनीं दिलीं तीं जीवनघड्यातील पाणी घालून वाढवावयाचीं !  तेतीस कोटी किडे वाढले तरी काय होणार आहे ?  धर्म आचरणांत किती आणतात ?  मघां कोणी रागारागाने सांगितले कीं आम्ही भजन करीत जावे तर मुसलमान अंगावर धांवून येतात !  मुसलमान अंगावर आले तर तुम्ही काय करतां भजन सोडून मारायला धावतां किंवा पळतां भजन सोडतांयावरून भजन तुम्हाला नको होते. तें पाहिजे असतें तर मुसलमान मारावयास आला तरी तुम्ही सोडले नसते. लढाईतही मुसलमान गुढगे टेकीत. त्यावेळेस शत्रु मारायला येईल हा विचार ते करीत नसत. तुम्हांला भजन नको  असतेंतर भजनाचा हक्क पाहिजे असतो. बाकीचे सर्व व्यवहार फायद्यासाठीं करतां. अरेआतां हें भजन - हें सुद्धां फायद्यासाठींहक्कासाठीं होय ?  निदान भजन तरी परमार्थासाठींदेवासाठीं ठेवा. त्या भजनांतही हक्क कसले पाहतां धर्म म्हणजे का हक्क तुझे भजन चालू दे. तुला भजन प्रिय आहे ना तें बंद करूं नको. मारू दे मुसलमानाला लाठी. फुटूं दे तुझे डोकें. नारळ देवासमोर फोडतोसशेंदुर लावतोस देवालात्याचा प्रत्यय येऊं दे. नारळासारखे डोके अर्पण कर. शेंदरा सारखे लाल रक्त तुझे सांडू दे देवासाठीं. तूं भजन सोडू नको. टाळ वाजव व भजन चालव. तुम्ही म्हणाल, "आम्ही मरू". होय. मरा. असें दिव्य दृश्य दिसूं दे या भारतांत. असा एक मनुष्य दिसला तरी त्याचा अपार परिणाम होईल. एकतरी असा शांतपणें मरूं दे. भजनाला धरून मरूं दे. ती गोष्ट का फुकट जाईल तें मरण नव्हे. तें अमृत आहे. तें अमृत सा-या धर्माला कळा चढवील. तें मरण सर्व समाजाला तेज देईलपुष्टि देईल. तें मरण नव्हे. तेंच खरें जगणें. तोच खरा धर्म. अशा लोकांनीच धर्माला महत्व चढतें. मुसलमानी धर्म अशा पुरुषांनी च वाढवला. तुकाराम एकदां कीर्तन करीत असतां परचक्र आलेंतेव्हां ते काय म्हणाले,
                                 -  
आम्हांसी तों नाहीं मरणाचें भय  -मरणाचा डर उडवणेहें धर्माचे मुख्य काम आहे. आपल्या जवळ जर सत्य असेल तर तरवारीची जरुर नाहीं. खिशांत पैसे असतील तर भीक कोण मागेल सत्य हें भीक नाहीं मागत. सत्याला स्वतःचे सामर्थ्य नाहीं की काय सत्य कधी कधी गुरुवारीं किंवा शनिवारीकिंवा विसाव्या शतकांत असमर्थ असतें असें तर नाहीं दोन वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत सत्य दुबळे असते असें तर नाहीं सत्य हें स्वतःच्या बचावास समर्थ आहे. त्या सत्याचा बचाव करण्यासाठीं तुम्हाला तलवार घेण्याची जरूर नाहीं. तुम्ही भजनाचें सत्य सोडूं नका. तुम्ही मराल. परंतु ते मरणच धर्माला वाचवील. कधीं कधीं मरण हें जीवनप्रद असते व जीवन मरणप्राय असतें. तुम्ही मरालपरंतु समाज अमर आहे. तुमच्या मरणानें व श्रद्धेने समाजाला बाळसे चढेल. परंतु तुम्हाला पाहिजेत हक्कतुम्हांला पाहिजे लोकसंख्यातुम्हांला पाहिजे लग्नाची अधिक सोयतुम्हांला पाहिजेत कौंसिलांत अधिक सिटा !"  हा तुमचा धर्म ! परंतु हा धर्म नव्हे. धर्म म्हणजे थोर ध्येयांचे आचरण व त्यासाठीं बलिदान. तीं थोर ध्येयें तर वाढवण्याऐवजीं तुम्ही मारून टाकीत आहांत. मांसाशन सोडण्याचा महान् प्रयोग सर्व जगांत एकट्या हिंदुस्थानांत झाला. जोपर्यंत मनुष्य मांस खात आहेतोपर्यंत मनुष्य सुधारला असें कसें म्हणूं - त्यानें मांसाशन सोडले एवढ्यावरून तो पूर्ण झाला असें नाहीं. परंतु एक तरी त्यानें कमाई केली. ही कमाई आज गमवून बसा असें मोठमोठे सांगू लागले आहेत. मुसलमानांना तोंड देण्यासाठीं थोडे तामसी झाले पाहिजे असे ह्या पंडितांचे म्हणणे आहे. हिंदुधर्मात म्हणे तमोगुण नाहीं !  भांग घ्यादारु प्या व मांस खा आणि करा म्हणावें पराक्रम ! तेवढेंच आतां राहिले आहे. तमोगुण हा कार्य करीत नसून हानिच करतो. परंतु अविचाराने वाटेल तें बालत सुटले तर काय करावयाचे ?

     
तुमची दुसरी एक गोष्ट आहे कीं मुसलमान देवळे भ्रष्ट करतात. परंतु गड्यांनोजरा विचार तरी करा. मंदिरांची पवित्रता तुम्ही तरी काय ठेवली आहे - सर्व तीर्थक्षेत्रें म्हणजे प्रत्यक्ष नरक तुम्ही बनवले आहेत. व्यभिचार व पाप यांचा सर्वांत प्रचार जास्त मंदिरांत. तुमच्या मंदिरांतुन किती घाणकिती किळसवाणे तेथें प्रकार. तेथें कुणी हगतीलगायीगुरें हगतीलपांखरें हगतील. तेथें पानसुपारी खाऊन थुंकतील. तेथें विड्या ओढतील. तेथे पत्ते खेळत बसतील. तेथे सर्वांची कुटाळकी करीतील. मंदिराच्या आसपास काय व्यवस्था असते मंदिरांच्या भोंवती मुत्रांचे पाट असतात व विष्ठा पडलेल्या असतात. घरांपेक्षां मंदिरें गलिच्छ असतात. स्वतःपेक्षां देवाची प्रतिष्ठा तुम्ही कमी केली आहे. म्हसोबासोटोबाखेड्यांतील मारुतीचीं वगैरे देवालयें - त्यांच्या आजुबाजुची स्थिति पहा !  त्या मंदिरांबद्दल परधर्मीयांस कां पूज्यता वाटावीकां प्रसन्नता वाटावी ज्या मूर्तीसमोर सर्व मानव जाऊ शकत नाहीं ती देवाची का मूर्ति तो दगड. ती तुझ्या अभिमानाची प्राणप्रतिषठातुझ्या अहंकाराची प्राणप्रतिष्ठा. ती रामाची व कृष्णाची मूर्ति नव्हे. ती तुझ्या घमेंडीची मूर्ति. परमेश्र्वरच त्या मुसलमान बंधूच्या मनांत प्रेरणा देतो, " मला त्या कोंडवाड्यातून बाहेर फेंक. फेंक कुंपणांत. तेथून माझी सारी लेंकरें मी पाहीन."  परधर्मीयाने माझ्या मंदिराबद्दल व मूर्तीबद्दल पूज्यता कां दाखवावी काय मी तेथें पावित्र्य ठेवलें आहे काय स्वच्छता ठेवली आहे ?

     
त्याप्रमाणेंच गायींचा प्रश्र्न. मुसलमान म्हणे गायीला मारतात. अरेगायीला ही हीन दशा कोणी आणिली सा-या जगांत हिंदू सारखे गोघातकी कोणी नाहींत. तोंडाने म्हणतात गोमाता व दूधतुप खातात म्हशीचे. आईच्या दुधावर बहिष्कार तुम्ही घातला आहे. गायीची काळजी घेण्यास कोण आहे तिला ना चाराना वेळेवर पाणी. खेड्यापाड्यांत गायीचे दूध औषधासही मिळत नाहीं. गाय म्हणे माता ! काय मातेची दशा ! भूमातागोमाता ! सा-यांना माता म्हणतापरंतु त्याना लाथा मारतां ! हा दंभ आहेहा धर्म नव्हे. खाटीक हा उपकारकर्ता आहे. गायीला रोज उपासमारीने तिळतिळ तुम्ही हिंदु मारतां. तो एकदम तिला सोडवतो. खाटीक हा गायीचा मित्र आहे. गाय त्याला दुवा देत असेल व म्हणत असेल " सुटलें हिंदूच्या कचाटींतून." गायीला मुसलमान कां पूज्य मानील तुम्ही शतपट पूज्यता दाखवाल तेव्हां परधर्मीय थोडी तरी दाखवील. गायींचे मांस आज हिंदुस्थानांत सर्व मांसांत स्वस्त आहे. हा तुम्हां हिंदुंचा पराक्रम. गायीचेंच दूध पिईनगायीला जपेनमी उपाशी मरेन परंतु गायीला पोषीन - अशी गायीबद्दल भक्ति दुसूं दे - म्हणजे जगाला समजेल कीं हिंदु गायीला पूज्य मानतो. शाब्दिक पूज्यतेस किंमत नसते.

     
शिवाय मुसलमान गाय मारतोत्याचा इतिहास आहे. मुसलमानांत ही प्रथा कां पडली तिचा इतिहास माहीत असणें अत्यंत जरूर आहे. सत्य ज्ञानाने कल्पनांचें असत्कल्पनांचे धुकें उडून जाते. अरबस्थानांत महंमदाच्याही पूर्वी एक थोर साधु होऊन गेला. एके दिवशीं देवदूत इश्र्वराला म्हणाले, "प्रभोकशावरून रे तो साधु तुझा खरा भक्त आहे ?"  प्रभु म्हणाला,  "स्वतःला अत्यंत प्रिय असलेली वस्तुही तो मला अर्पण करील. मी मागावयाचा अवकाश." देवदुत म्हणाले, " प्रत्यक्ष परीक्षाच करा. सत्त्वपरीक्षेंत टिकतो कीं नाहीं तें पहा." प्रभु म्हणाला,  "ठीक."

     
त्या संताच्या स्वप्नांत परमेश्र्वर आला व म्हणाला, " गड्यातुला जी वस्तु अत्यंत प्रिय असेल ती तूं मला उद्या अर्पण कर."   सकाळीं तो साधु उठला व स्वप्नाचा विचार करूं लागला. माझी कोणती बरें अत्यंत प्रिय वस्तू ?  हो. ही माझी गोजिरवाणी गोड गायही मला प्राणाहून प्रिय आहे. जरा दृष्टिआड ती झाली तर मी कावराबावरा होतों. प्रभु ही का मागत आहे परंतु आसक्ति काय कामाची ?  देवासाठीं सारें दिलें पाहिजे. "  असा मनांत विचार करून त्या साधूने ती गाय मन कठोर करूनसत्त्व जाऊं नये म्हणून डोळ्यांत पाणी न आणतांमारिली व देवाला अर्पण केली. परंतु रात्री प्रभु पुनः त्याच्या स्वप्नांत आला व म्हणाला, - गड्यागायीपेक्षांहि अधिक प्रिय अशी वस्तु तुझ्याजवळ आहेती मला दे." सकाळीं साधु विचार करूं लागला, "गायीहून प्रिय काय बरें आहे ?  खरेंच. माझा मुलगा मला गायीहून प्रिय आहे. मुलासाठीं तिनें एखादे दिवशीं दूध दिलें नाहीं तर मी तिच्यावर रागावतो. प्रभु माझा मुलगा का मागतो परंतु दिला पाहिजे." तो साधु मुलाचा बळी द्यावयास तयार झाला. परंतु ईश्र्वराने वरच्यावर त्याचा हात धरला. प्रभु प्रसन्न झाला व म्हणाला, " तूं भक्तराज  आहेस. तूं धन्य आहेस." अशी ही कथा आहे.

     
गोवधाची चाल गायीवरीच्या प्रेमानें पडली आहे. त्या संताच्या त्या प्रसंगाची स्मृति म्हणून ती रूढी पडली. पुढें अरबस्थानांतील मुसलमान सर्वत्र पसरले. ते हिंदुस्थानांतही आले. आपण गाय कां मारतो ह्याचा इतिहास ते विसरले होते. रूढी तेवढी शिल्लक राहिली होती. हिंदुस्थानांत आल्यावर त्यांचे तें करणें हिंदूंच्या मनोभावना मुद्दाम दुखवण्यासाठीं आहेत असें हिंदू समजूं लागले. मुसलमानही तसेंच म्हणूं लागले.
खरें पाहिलें तर मुसलमान हिंदुस्थानांत आलेत्यांना आम्ही पचवून टाकिले पाहिजें होतें. शकहूण वगैरे जमातींना आम्ही आमच्यांत मिळवून घेतले होते. भगवान् बुद्धांच्या विचारालाही आपण मिळवून घेतलें. बुद्धधर्म हिंदुस्थानाबाहेर पसरलापरंतु हिंदुस्थानांत त्याचे नांव नाहींह्याचा अर्थ काय - ह्याचा अर्थ हाच कीं बुद्धधर्म ही हिंदुधर्मांतील च एक प्रचंड लाट होती. बुद्धाने ज्या सुधारणा सुचविल्या त्या हिंदुधर्मानें स्वीकारल्या. बुद्धाला आपण परका मानलें नाहीं. संग्राहक हिंदूंनीं त्याला अवतार केलें. कृष्णानंतर बुद्धावतार म्हणूं लागले. अमरकोशांत देवता कांडा मध्यें बुद्धाचीं नांवें दिलीं. चीनजपान जेथें मूळचा धर्मसमुद्र नव्हतातेथें बुद्घधर्माची लाटच समुद्र म्हणून झाली. परंतु हिंदुधर्मांत ती जिरून गेली. महंमदीय बंधू आलेत्यावेळेस असेंच झालें पाहिजे होतें. तो एक अकरावा अवतार मानला पाहिजे होता. तो एक पंथ म्हणून हिंदूधर्मांत राहिला असता. जसें वेदांतीजसे गाणपत्यजसें नाथपंथीतसें महंमदी. परंतु पूर्वजांची संग्राहकता आपण विसरलों. पुढें पुढें नानककबीरवगैरेंनीं हाच प्रयत्न केला. महंमदाला आपण मिळवून घेतले नाहींह्याचे एक कारण हें होतें की महंमद हा ह्या देशांतील नव्हता. भगवान् बुद्ध हे घरचेच सुधारक होते. तसें महंमदाचे नाहीं. महंमद भिन्न देशाचाभिन्न भाषेचाभिन्न संस्कृतीचा. परंतु तरी सुद्धां त्याला पचवून घेणें इष्ट होतें व तें हिंदुधर्मांलाच शक्य होतें. प्रेमाने व उदार दृष्टीने सारें पचवतां येते. धर्म हा भांडण्यासाठीं नाहींच मुळी. धर्माचें काम एक करणें हें आहे. अशक्य काय आहे - अशक्य कांहीं नाहीं. पुढें एक दिवस असा येईल कीं ज्या दिवशीं हिंदुधर्म असे नांव राहणार नाहीं. नांवांत काय आहे हिंदुधर्म हा अनेक संस्कृति मिळवून एक विशाल धर्म बनेल. त्याला विशिष्ट वर्गांचे नांव राहणार नाहीं. तोच खरा सनातन धर्मविश्र्वधर्म. तोच वेदधर्म. म्हणजे ज्ञानप्रधानविचारप्रधान धर्म. वेगळें राहण्यांत काय आहेरामतीर्थांना जपानमध्यें विचारण्यांत आले, " तुमचा धर्म कोणतातुम्ही कोणत्या देशाचे ?" त्यांनी किती सुंदर उत्तर दिलें, "टु डू गुड इज माय रिलिजनऍण्ड धिस वर्ल्ड इज माय होम"  हें विश्र्व माझे घर व जगाचें भलें करणें हा धर्म !  हें त्यांचे उत्तर. ते म्हणाले, " कोणत्या एका विशिष्ट नांवाने माझ्या धर्माला संकुचित करणें (टॅबू) मला आवडत नाहीं."  सर्वांनी जवळ राहूनप्रेमाने एकत्र येऊन आपापली वैयक्तिक बाढही करीत रहावयाचें. यांत विरोध नाहीं. हिंदूधर्म एका व्यक्तिला मानीत नाहीं. तरी बुद्धाचीं तत्त्वे आपण घेतली. त्यांची अहिंसा घेतलीत्यांचा संन्यास घेतला. परंतु सारे शैव मांसाहारी होते. परंतु ते निर्मांसाशन झाले. सा-या पंथांत मांसाशनिवृत्ति शिरली. शाक्तपंथीयांतही मांस खाणारे व मांस न खाणारे असे भेद पडले. बुद्धांच्या शिकवणीने खोल मूळ धरलें. आज हिंदुस्थानांत मांसाहारी लोक आहेत. परंतु अगदीं रोज मांसाशन करणारे हिंदु थोडे आहेत. त्या मांसाशन करणा-यांसही त्यांत प्रतिष्ठा वाटत नाहीं. तर जरा संकोचच वाटतो. आतां मांसाशन प्रकार रूढ करण्यासाठीं नवीन अवतार होत आहेत ! परंतु तें जाऊ दे. बुद्धधर्मीय नसूनही बुद्धाची शिकवण आपण घेतली. आपण सारे वारकरी पंथाचे नसूनही तुकाराम मानतो. हाच तर हिंदुधर्माचा विशेष आहे. आम्ही वेद मानूंउपनिषदें मानूंतुकाराम मानूंकबीर मानूंतसेंच महंमदखिस्तसोक्रेटिस यांनाहीं मानूं. फार थोर आहे ही दृष्टि. परंतु ही थोर दृष्टिच आज गमावून बसा असें कांहीं प्रतिपादीत आहेतत्याचें वाईट वाटतें.

     
शिक्षणशास्त्रातील एक महान् तत्त्व तुम्हांला सांगतो. शिक्षकानें मुलामधील दिव्यत्व नेहमी पाहिले पाहिजे. " तूं दगड आहेसगाढव आहेस " असें जर शिक्षक मुलाच्या कानी कपाळी ओरडेल तर तो मुलगा दगड नसूनही दगड होईल. जग जसें तुम्हाला हवें असेल तशी जगाबद्दल भावना करा. ही भावना ज्या मानानें तीव्र त्या मानाने यशाचा संभव अधिक. शिक्षण-शास्त्र शाळेंतच फक्त नसून सर्व जगांत तें अनुभवावयाचें असतें. सर्व जग म्हणजेच शाळा व आपण आमरण शिकणारेच असतों. तुम्ही मुसलमानांस सदैव वाईट म्हणत बसाल तर ते वाईट नसले तरी वाईट होतील. " तुम्ही बायका पळवणारेतुम्ही गुंडतुम्ही दुष्ट " असें सारखें तुम्ही म्हणत असतां. ह्याचा फार भयंकर परिणाम होऊन राहिला आहे. तुम्ही मुसलमानांस ह्या शिव्याशापांनी तसें बनवीत आहांत. ही गोष्ट सत्य आहे. शिक्षणशास्त्र याला पुरावा आहे. मुलगा सुधारावयास पाहिजे असेल तर - तूं चांगला आहेसतुला हें येईल. तूं वाईटमथ्थड नाहींस ! असें शिक्षकानें त्यास म्हटलें पाहिजे. तसेंच समाजांतही. तुम्ही एका जमातीला सारखें वाईट वाईट असेंच संबोधाल तर ती जात अधिकच वाईट होईल. म्हणून नेहमीं मंगल दृष्टि मनुष्याने ठेवावी. - मुसलमानही चांगले आहेत. ते चांगले होतील. त्यांच्यात शिक्षण येऊं दे. ते मनुष्यच आहेत. ते पशु नाहींत ! अशी भावना करा. परंतु हा खरा सुधारण्याचा मार्ग कोण अवलंबीत आहे - आम्हाला शास्त्रीय मार्ग नको आहेत. मारणारा पंतोजी ज्याप्रमाणे आज नालायक शिक्षक समजला जातोत्याप्रमाणें दुस-यास शिव्या देऊन किंवा मारून सुधारूं पाहणारे समाजशिक्षकही नालायक समाजशिक्षक ठरणार.

     
मघां एकजण म्हणाला कीं मुसलमानांची दृष्टि अरबस्थानइराण-अफगाणिस्थानाकडे असते. ते हिंदुस्थान आपले मानीत नाहींत. त्यांची काबाकडे दृष्टि. प्रार्थनेच्या वेळेस ते पश्र्चिमेकडे तोंड करितील. परंतु जरा विचार करा. एखादा मुसलमान पॅन-इस्लेमिझमचा भोक्ता दिसला तर हिंदुपदपादशाहीचीं स्वप्नें खेळवणारे कडवे हिंदु सुद्धां आपल्यात आहेत. हा सारा दुहाती कारभार आहे. मुसलमानाचें काबाकडे लक्ष असतेतर आपण महाराष्ट्रातीलही " काशी काशी " म्हणतों. बिचारे मुसलमान खेड्यापाड्यांत काम करीत असतात. त्यांना तुमचा पॅन-इस्लामिझम कांहीं माहीत नाहीं. कोणी शेका घेतात कीं मुसलमान चळवळींत कोठें पडतात आपल्या महाराष्ट्रातील मुसलमान चळवळींत कां पडले नाहींतअसा प्रश्र्न विचारणें ह्याला अर्थच नाहीं. तुमच्या येवलें तालुक्यांत ९५ हजार हिंदु आहेत. (त्यावेळेस) तर ५ हजार मुसलमान आहेत. सबंध येवलें तालुक्यातून ३६ हिंदु आले आहेत. या प्रमाणांत मुसलमान किती आले पाहिजे होते ? उगीच नांवें ठेवण्यात काय अर्थ तुम्ही काय मोठा पुरुषार्थ करीत आहांत पेशावरकडे पठाणांनी छातीवर गोळ्या घेतल्यापाठीवर नाहीं. मुलें कडेवर घेऊन पठाण स्त्रिया गोळ्या खावयास उभ्या राहिल्या. बंगाल व पेशावर प्रांतात जसा छळ झाला व चालला आहे तसा अन्यत्र नाहीं. पेशावर प्रांत म्हणजे चार जिल्हे. चार जिल्हे मिळून २५ लाख वस्ती आहे. त्या २५ लाखांतील बारा हजार तुरूंगात गेले. आपल्याकडे त्या प्रमाणांत प्रत्येक तालुक्यांतून ५०० गेले पाहिजे होते ! आणि पेशावर मधील लोक किती दिव्यांतून तेजाने चमकले ! कांहीं कल्पना करा. पंजाबपेशावरबंगाल तिकडे हजारों लोक तुरुंगांत गेले. बंगालमध्यें रामकृष्ण परमहंसविवेकानंद यांनी ही श्रद्धेची व त्यागाची ज्योत पेटवली आहे. बंगाली तरुण उत्कट देशभक्तीने रंगले आहेत. महाराष्ट्रांत हिशेबीपणा तेवढा आहे. कोणी म्हणतो, "एवढी परीक्षा होऊं दे. ही पदरांत पाडून घेतो." अरेकपाळकरंट्यापदरांत थोडे त्यागाचें व सेवेचे पुण्य पडण्याची संधी आली आहेती दवडून परीक्षेचे काय घेऊन बसला आहेस परंतु भावनाच सा-यांच्या मेलेल्या. शाळांतून जें शिक्षण मिळतें तें भावनाशून्य. शाळेंतून "नोकरीसाठीं अर्ज कसा करावा" हें नीट शिकवून घेतात ! सारें हिशेबीपणाचें शिक्षण. स्वातंत्र्याच्या युद्धांत मारले जातातकाटले जातातलंगडे होतातथोटे होतातछिन्नविच्छिन्न होतात ! गांवच्या गावे बेचिराख होतात. त्या मानाने आपणांस सध्यां काय त्याग आहे किती सोपे आहे सध्यांचे काम. परंतु त्यांतहि कुचराई. कोणी विचारतो, " तडजोड झाली तर दंड परत मिळेल का ? " वर आणखी तुला भोजन नको का अरे ही तर तुमची वृत्ती आहे. मुसलमान चळवळींत कां पडत नाहीं हें विचारण्याइतकी तुझी लायकी तरी आहे का काय पराक्रम दाखवलात पेशावरकडे चळवळ झाली त्यामानाने येथली कांहींच नाहीं. फुकाचा मोठेपणा व हिशेबीपणा यानें कार्य होत नाहीं. देवाचे भजन - तेंही हक्क म्हणून करणारे तुम्ही ! तुम्हांला का भावना आहे का उत्कटता आहे धर्म म्हणजे हिशेबस्वातंत्र्य म्हणजे हिशेब. हा केवळ हिशेबीपणा सोडून द्या व भावनांनी जरा पेटा !

     
आणि मुसलमान म्हणजे तरी कोण जे तुमच्या चळवळींत येत नाहींत व जे जास्त कडवे दिसतातते मुसलमान म्हणजे पूर्वींचे हिंदूच ! मुसलमान चळवळींत येत नाहींत ह्याचा अर्थ हिंदू चळवळीत येत नाहींत हाच अर्थ. अस्पृश्य वगैरे जातींतील हिंदु;  ज्यांना आपण दयाप्रेमसहानुभूति कांहीं दाखवले नाहींज्यांना ओ.......म् नमः शिवाय म्हणण्याचा अधिकार नसेअसे जे तुमचे दीन बंधू तेच मुसलमान झाले. श्रेष्ठ-कनिष्ठपणाच्या भावनेने तुम्हीच दवडलेत. आपल्याच बंधुंना तुम्ही मुसलमान केले व ख्रिस्ती केलें ! हिंदुनी अनुदारपणाने स्वबांधवांस मुसलमान व ख्रिश्र्चन होण्यास लाविले ! केवढें डोळ्यांत पाणी आणणारे व ह्रदयांत शल्याप्रमाणे घुसणारे दृश्य ! परंतु हें सत्य आहे. अजुन तरी प्रेम शिका. तुमच्यात प्रेमाचा बिंदुही नाहीं ही गोष्ट स्पष्टपणें समजून घ्या.

     
महाराष्ट्रांत कांहीं ठिकाणी मुसलमानास वठणीवर आणण्यासाठीं त्यांच्यावर बहिष्कार घालण्यांत आले आहेत. हिंदूंचे संघठन करून मुसलमानांस बहिष्कृत करण्याचे प्रयोग चालले आहेत. हें फार भयंकर आहे. अरेमहाराष्ट्रांत तरी मुसलमान इतके थोडे आहेत कीं त्यांची तुम्हांस कींव यावी. परंतु संघटने चालली आहेत - परंतु ह्याची विषमय फळें लौकरच चाखावी लागतील. बहाद्दरपूरता मुसलमानांवर बहिष्कार पडला. हिंदूंनी हिंदु गुंडांकडून मुसलमानांना त्राहि भगवान् करण्यासाठींसळो का पळो करण्यासाठीं त्यांचीं शेतें कापवलीआगी लावून देववल्या. मुसलमान बिचारे तेथून गेले. परंतु आतां ते हिंदु गुंड हिंदु जमीनदारांच्या शेतांतच आगी लावीत आहेत ! आग लावणें व लुटणें शिकवले तें आतां तुमच्यावरच त्याचा प्रयोग होऊं लागला आहे !

     
मुसलमानावर बहिष्कार घालणें म्हणजे त्याला कामावर न बोलावणेंत्याच्या दुकानावर माल न घेणें वगैरे. याचा परिणाम काय होईल मुसलमान अन्नास महाग होतील. ते तुमची शेतें कापतील व दुकानें लुटतील ! शेजारचा मनुष्य दरिद्री करणें यांत आपलेंच भयंकर नुकसान आहेहें मनुष्य लक्षांत घेत नाहीं. दरिद्री मनुष्य एकदां बिथरला म्हणजे ब्रह्मांडाला भारी होईल. तो रुद्र होईल व प्रलय करील. तुमचा शेजारी मुसलमान तुमच्या हितासाठीं म्हणून तुम्ही जगवला पाहिजे. त्याला भुकेकंगाल करणें म्हणजे स्वतःच्या मरणाची तयारी करणें होय.

     
नासिराबादचे मुसलमान म्हणे गुंड आहेत. गुंड आहेत म्हणजे काय ते शेतें कापून नेतात. कां नेतात मुसलमान गरीब आहेत. त्यांना शेती नाहीं. तुम्ही कामावर बोलवायचें नाहीं. मग पोटाचा तिसरा उपाय तो करतो. मुसलमानांस किंवा हिंदूंस ज्यांना शेती नाहीं त्यांना शेती देण्यात आली पाहिजे. भिल्ल सुद्धां अशीं शेतें कापून नेतात. १०० - १०० एकर एकटा मनुष्य बळकावणार ! हा अन्याय आहे. तुम्ही भिल्लमुसलमान;  ज्यांना जमीन नसेल त्यांना दिली पाहिजे. येणा-या स्वराज्यांत तें करावेंच लागणार आहे -

      
मुसलमान गरीब आहेत. त्यांना फार शेतीवाडी नाहीं. त्यांच्यांत शिक्षण नाहीं. त्यांच्या गरिबींत पुन्हां त्यांच्यावर बहिष्कार घालणार ! अशाने भलें काय होणार मुसलमान जवळचा भाऊच समजले पाहिजे. त्याचे धंदे आपण मारू नयेत. मुसलमान वाजंत्री हिंदूच्या लग्नांत वगैरे असतह्यांत ऐक्य व भूतदया असे. परंतु आतां मुद्दाम हिंदूंचा बॅंड संघट्टण म्हणून काढणें ह्यांत काय साधले सहज निघाला असता तर त्यांत वाईट नव्हते. परंतु मुसलमानास बोलवावयाचें नाहीं यासाठीं स्वतंत्र बँड काढणेंयासाठीं हिंदूनी कसाईपणा शिकणेह्यासाठीं बांगड्या भरण्याचा धंदा सुरू करणे हें वाईट. ह्यांतील हेतु वाईट आहे. मुसलमानास उपाशीं ठेवण्यात हिंदूंचे कल्याण नाहीं. १३०० वर्षें जा शेजारी राहिला तो आतां कोठें जाणार आहे त्याला उपाशी मारूं पहाल तर तो तुम्हांलाही सुखाने खाऊं देणार नाहीं.

     
फार दूरवर विचार करून गोष्टीं केल्या पाहिजेत. केवळ अमुक एक मुसलमान म्हणून त्याच्या दुकानावरचा माल न घेणें ह्यांत पाप आहे. वाईट मनुष्याच्या दुकानावरचा माल न घेण्याचे ठरवा. हें मी समजूं शकतो. जगांत सज्जन व दुर्जन हे दोन भाग मी समजूं शकतो. दुर्जनांशीं संबंध ठेवावयाचा नाहीं असें म्हटलें तर तें जरा शोभेल. मग तो दुर्जन हिंदु असो कीं मुसलमान असो. परंतु अमुक एक वर्गच्या वर्ग जेव्हां तुम्ही बहिष्कृत करतांतेव्हां माझ्या ह्रदयाला धक्का बसतो. - सर्वेषामविरोधेन ब्रह्मकर्म समारभे ! कोणाचाहि विरोध नको. ब्राह्मणानें ब्रह्मकर्माला प्रारंभ करण्यापूर्वी विरोध मालवले पाहिजेत. सर्वांचे प्रेविश्र्वास संपादन केलें पाहिजे. परंतु पोलिसांच्या पहा-यांत नाशिकच्या धनुर्धारी रामाला मिरवणार ! हें ह्यांचे ब्रह्मकर्म ! किति उथळ व पोरकट आपण झालों आहोंत.

     
मुसलमानास भाऊ माना. त्यालाही थोडी भाकर खाऊं दे. त्यांची भाषा शिका. त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करा. आज तेराशें वर्षें ते आपल्या शेजारी आहेतपरंतु त्यांचे कुराण आपण पाहिले का आपण इंग्रजी कविकादंबरीकार वाचतों. परंतु जवळचा भाऊतो रोज काय प्रार्थना करतो तें समजून घेतले नाहीं. मुसलमानास तुमच्याबद्दल कां आपलेपणा वाटावा. ईदच्या दिवशीं मुसलमान प्रार्थना करतांना " हिंदूंचे रक्षण करो "- असें हिंदुस्थानांत आधीं म्हणतात. अरेपूर्वींचे हिदु-मुसलमान भलेपणाने वागण्यास शिकत होते रे.....तुम्ही ती परंपरा पुढे चालवा. कुराणांतील दोन सुरे प्रेमानें म्हणा कीं मुसलमान प्रेमानें तुम्हांस मिठी मारतील. धर्म हा जोडतो - धर्माबद्दल प्रेम दाखवा. आस्थेने मुसलमानी संस्कृति शिकण्याचे किती जण मनांत आणतात मोहरमच्या सणाची किती हिंदूंस माहिती आहे ? सुफी पंथांतील कविता वाचा. वेदांत व भक्तिच तेथें आहे. - काबा कोणी फोडला तरी चालेलपरंतु दिलाची मशिद फोडूं नका - अशी थोर थोर वाक्यें त्यांचे संत बोलून गेले आहेत. जरा डोळे उघडा. मुसलमान तेवढा वाईट हा मारक मंत्र सोडा. मुसलमानही भले आहेत हा तारक मंत्र घ्या. एखादें फाटकें पुस्तक वाचून त्यावरून मुसलमानी धर्म व इस्लामी संस्कृति ह्यांवर निकाल देण्याच्या भानगडींत पडूं नका. खरी रसग्राही वृत्ति घेऊन जा. तुम्ही किती मुसलमानांच्या घरीं जाता तुम्ही आपल्या समारंभांना त्यांना बोलावता का तुम्ही त्यांच्या सणांत भाग घेतां का मैत्री जडावी कशी साहचर्य वाढवले पाहिजे. परिचय वाढवला पाहिजे. जर ते आपले मित्र झाले तर ते आपणांबरोबर कामें करितील. आणि नाहीं काम करावयास आले म्हणून काय झाले प्रीति ही निःस्वार्थ असावी. मैत्री ही निरपेक्ष असावी - My love must be ready to be deceived also. मला कोणी फसवीत नाहींमला सारे प्रेम देतातम्हणून मी त्यांच्यावर प्रेम करतों या म्हणण्यांत प्रौढी ती काय तो मला प्रेम देतो मी त्याला देतो. हा विनिमय झालाव्यवहार झाला. टोलस्टोयने एके ठिकाणी म्हटलें आहे " ज्याच्यावर आपण प्रेम करतोंत्याचें आपणांवर जितके प्रेम कमीतितका आपणांस अधिक आनंद वाटला पाहिजे. " To love our enemies is spiritual rapture. Enemy depersonalized is divine". जो आपणांवर प्रेम करीत नाहीं उलट द्वेष करतोत्याच्यावर प्रेम करावयास मिळणे याहून दिव्य आनंद कोणता शत्रुचें शत्रुत्व दूर करून त्याला पाहूं तर तो ईश्र्वरच दिसेल. हें वरचें पोषाख फेंकून द्या. हिंदु मुसलमान हीं वरची नांवेंवरचे कपडे. यांच्या वर का प्रेम करणार - यांतील मनुष्यत्व एकच आहे.

     
मुसलमानानें तुमच्यावर प्रेम केलें नाहीं तर त्याला आभागी समजा. प्रेमानें काय मिळालें याचा हिशेब नका मागूं. जगांत कांहींच फुकट जात नाहीं तर प्रेम का फुकट जाईल - -न हि कल्याणकृत् कश्र्चित् दुर्गतिं तात गच्छति - हें सागणा-या भगवान् श्रीकृष्णाचे ना तुम्ही अनुयायी - पावसाचा पडलेला थेंब फुकट जात नाहीं. त्याचा उपयोग होतच असतो. गणेश शंकर विद्यार्थी मेले. कोणी म्हणतात याने काय मिळालें - अरे५०० ची नुकसानी झाली असती ती ४५० झाली - त्याच्या मरणाने कांहीं तरी मंगल झालेच. परंतु असे आणखी निघाले पाहिजे होते.

     
मुसलमान सारेच वाईट आहेत असें तुमचें मत असेल तर घ्या सोटे. त्यांना सोटे घेऊं देतुम्हीही घ्या. तुमच्या दोघांच्या सोट्यांमध्यें मी माझ डोके घालीन व तडाखे सोसून मरून जाईन. तुम्ही विचाराल - असें कां करणार - - उत्तर हें कीं परमेश्र्वर प्रसन्न व्हावा म्हणून. माझे कर्तव्य करावें म्हणून. कोणाला प्रवृत्त किंवा निवृत्त करावे म्हणून नव्हे. मारामारी हें जसें तुमचे कर्तव्यतसें त्या मारामारीमध्यें पडून मरणें हें माझें कर्तव्य.

     
गांधींनीं मुसलमानांवर विश्र्वास ठेवला म्हणून त्यांना नांवें ठेवीत असतात. परंतु कल्याणकृत् मनुष्याचा तोटा होत नाहीं या श्रीकृष्णाच्या वचनावर त्यांची श्रद्धा आहे. तुमची नाहीं. तुमचा श्रीकृष्ण फक्त ओठावर आहे. तुकारामांनीं म्हटले आहेः - विश्र्वासाची धन्य जाती - - विश्र्वास ठेवून वागणारे लोक ते धन्य होत. मला जो फसवील त्यांत माझे नुकसान नसून फसवण-याचेंच नुकसान आहे. त्या तो अधःपात आहे. त्याची मी दया करीनकींव करीन. त्याच्यासाठीं प्रार्थना करीन. गांधींनीं विश्र्वास ठेलात्याचें त्यांना फळ मिळाले आहे. आज त्यांचे जितके मुसलमान मित्र आहेततितके कोणा हिंदू पुढा-याचे आहेत - म्हणे शौकत अल्लीनें फसविले - कोणा फसविलें नाहीं. भरपूर मित्र त्यांना आहेत. परंतु फक्त गांधींनींच मुसलमान मित्र जोडायचें कीं काय - आज जो लहानसा का होईना राष्ट्रीय पक्ष दिसत आहे तें गांधींच्या विश्र्वासाचेच फळ आहे. तरुण मुसलमान राष्ट्रीयवृत्तीचे होत आहेत. मेहेर अल्ली हेंच दाखवीत आहेत. परंतु एकटे गांधी काय करणार - तुम्ही सा-यांनी आग लावायचीतो बिचारा एकटा किती धडपडणार -

     
कोणी म्हणतात गांधींनी त्यांना शेंफारवून ठेविले. मुसलमान जागा वाटेल तितक्या मागतात. कौन्सिलांत इतक्या जागा त्यांना कशा देतां येतील -  मी सुद्धां गांधींप्रमाणें मुसलमानांस कोरा चेक लिहून देईन. सा-या सिटा त्यांना देईन. खरें स्वराज्य सिटांत राहणारच नाहीं. लोकांच्या व्यवहारांत कमीत कमी ढवळाढवळ जें सरकार करतें - तें स्वराज्य सरकार. उत्कृष्ट सरकार तेथें आहेजेथें तें कमींत कमीं ढवळाढवळ करतें. स्वराज्यांत बहुतेक गोष्टी लोकच गांवोगांव ठायीं ठायीं करितील. ज्या देशांतील स्वराज्य सिटांत आहे तेथें खरें स्वराज्य नाहीं.

     
पुरे आतां ही चर्चा. माझी विचारसरणी तुम्हांला दिसली. माझा दृष्टिकोन कळला. तुम्हांला पटलें तर पहा. मुसलमानअस्पृश्यसा-यांच्या घरीं जा. त्यांचीं सुखदुःखें पहात जा. त्यांच्या सुखदुःखांत भागीदार व्हा. त्यांना कधीं जेवावयास बोलवा. सणावारीं त्यांना प्रेमानें आमंत्रण द्या. ज्याला आपण दुजेपणानेपरकेपणाने मानतों त्याला जवळ घेऊनच पुढील मंत्र म्हणावयाचा असतोः

         -  
ओ....म् सहनाववतुसहनौ भुनक्तुसहवीर्यं करवावहै
             
तेजस्वि नावधीतमस्तु - ओ.....म् शांतिः शांतिः शांतिः  -अशाप्रकारें प्रेम वाढवामैत्री जोडा. चर्चा करा. विचारविनिमय करा. संस्कृतिपरिशीलन करा. धर्मांतील संदेश घ्या. समाजांत दिलजमाई या मार्गानें होईल.

              एष पंथाय विद्यते अयनाय - नो इतरः
              
हाच जाण्याचा मार्ग आहेदुसरा नाहीं.

विनोबा (शब्दांकन: साने गुरुजी)

तुम्हाला 'हिंदु-मुसलमान' हा लेख आवडला का?

No comments:

Post a Comment