आपण जेव्हा एका
डॉक्टरकडून दुसऱ्या स्पेशालिस्टकडे, लॅबवाल्याकडे व फार्मसीमध्ये जातो, डॉक्टरांनी
सांगितलेल्या साऱ्या तपासण्या करून घेतो, सारी औषधे विकत घेतो, तेंव्हा ‘आपल्याला
लुटत तर नाही आहेत ना?’ असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. नुकतेच निर्माण
५.२ब (वैद्यकीय) शिबिरात एक वादळी सत्र झालं डॉ. सोपान कदम यांचं. महाराष्ट्रातील
दोन मोठ्या शहरांतील खासगी व्यवसायाची स्थिती डॉ. सोपानना पाच वर्षे खूप जवळून
पहायला मिळाली. खासगी वैद्यकीय व्यवसायामागचे अर्थकारण डॉ. सोपानना कसे दिसले?
वाचूया त्यांच्याच शब्दांत...
माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि माणसाच्या आजूबाजूला
खूप चांगल्या-वाईट गोष्टी घडत असतात. त्यापैकी एक वाईट गोष्ट म्हणजे कामाबद्दल कमिशन
घेणे. पूर्वी कोणीही कोणाचे काम हे मदत किंवा कर्तव्य म्हणून करत असे. जसाजसा काळ
बदलला, शहरीकरण झाले, पैशांचे महत्त्व वाढले. माणसांचे राहणीमान उंचावले आणि गरजा
वाढल्या. प्रत्येक गोष्ट पैशांत मोजली जाऊ लागली. पैसा मानाचा मानबिंदू झाला तसे
कमी वेळेत व कमी श्रमामधे पैसे मिळवण्यासाठी प्रत्येक कामामधे पैसे घेण्याची पद्धत
सुरु झाली.
कमिशन घेण्याची पद्धत प्रत्येक क्षेत्रात आहे, जसे घर,
जमीन खरेदी-विक्री. मंदिरासमोर फुलांच्या दुकानात गिऱ्हाईक पाठवले तर कमिशन मिळते.
बांधकाम क्षेत्रात, घर भाड्याने घेणे देणे, लग्न जमवणे, एका वकीलाने केस दुसऱ्या
वकीलाला देणे असे अगदी लहानापासून ते मोठ्या
क्षेत्रांत कामाच्या बदल्यात कमिशन सुरु आहे. यावर कळस म्हणजे ज्या क्षेत्राला ‘नोबल’
लोकांचे क्षेत्र म्हणतात ते वैद्यकीय क्षेत्रसुद्धा कमिशन पद्धतीखाली आले आहे व
वाढत आहे. मी या क्षेत्रातील फार जास्त काही सांगू शकणार नाही; पण जे मी पाहिले, अनुभवले,
ऎकले आणि माझी गरज होती म्हणून केले व करायला लावले मी ते आज तुमच्यासमोर मांडणार
आहे.
कमिशन घेणे आणि देणे या वाक्प्रचाराला वैद्यकीय
भाषेमधे कट प्रॅक्टिस म्हणतात. कट म्हणजे काय, तर आपल्या वाईट कामाचा रितसर वाटा
घेणे. मी आज आपल्यासमोर दोन मोठ्या शहरांतील कट प्रॅक्टिसबद्दल बोलणार आहे.
कट प्रॅक्टिसची खरी सुरुवात होते पेशंट रेफर करण्यातून.
पेशंट रेफर करणे पूर्वी चांगल्या उद्देशाने होत असे. पूर्वीच्या काळी फॅमिली डॉक्टर
असल्यामुळे त्यांना कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या आजारांचा इतिहास माहीत असायचा.
फॅमिली डॉक्टरचे रुग्णाशी खूप जवळचे सबंध असायचे. त्यामुळे रुग्णाचा वेळ, पैसा वाचावा,
त्याला योग्य उपचार मिळावे व फ़ॉलोअप करणे सोपे व्हावे म्हणून फ़ॅमिली डॉक्टर पेंशटला
रेफर करत असे. पण जशी जशी वैद्यकीय क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढली आणि सेवेऎवजी नफा
कमावणे हा उद्देश झाला, ह्या ‘नोबल’ व्यवसायाचे बाजारीकरण झाले व कट प्रॅक्टिसचा
रोग वैद्यकीय क्षेत्राला लागला.
कट प्रॅक्टिस कशी चालते? हा सरळ सरळ व्यवहार असतो. एखाद्या
डॉक्टरने (व्यक्तीने) एखादा रुग्ण जर दुसऱ्या डॉक्टरकडे उपचारासाठी पाठवला, तर
त्या रूग्णाचा उपचार झाल्यानंतर जी काही रक्कम तो रुग्ण दुसऱ्या डॉक्टरांना देईल,
त्या रक्कमेतील काही वाटा पहिल्या डॉक्टरला (व्यक्तीला) रुग्ण पाठवला म्हणून देणे
याचा अर्थ म्हणजे कट देणे असा होय. कट प्रॅक्टिसचे दर शहर, शहराचा परिसर, रुग्ण
पाठवणाऱ्याचे शिक्षण, ज्या डॉक्टरकडे रुग्ण जातात त्याचे शिक्षण, रुग्णालयाचे
बांधकाम, सुविधा यावर आकरले जाते. मी ज्या शहरात काम केले, तिथे रुग्ण पाठवणाऱ्या
व्यक्तीप्रमाणे कट खालीलप्रमाणे:
· जी.पी. - ३० ते ३५ %
· डिग्री नसलेले लोक - ३५ ते ४० %
· जीप ड्रायवर - १२ ते १५ % [आर्थो, न्युरो,
मेडीसीन]
· अॅम्बुलन्स ड्रायवर - १२ % [मेडीसीन,
बालरोग, स्त्रीरोग]
· सरकारी नर्स,वार्ड बॉय,कर्मेचारी -१० % [जाण्यायेण्याचे
भाडे]
कट प्रॅक्टिसचा व्यवहार कसा पार पाडला जातो? बहुतेक
लहान-मोठे हॉस्पिटल्स व डॉक्टर हे एक पी.आर.ओ. कामाला ठेवतात. पी.आर.ओ. म्हणजे पब्लिक
रिलेशन ऑफिसर.
पी.आर.ओ. काय काम करतो ? तो शहरातील व आजूबाजूच्या
खेड्यातील जी.पी.ची भेट घेउन आपल्या हॉस्पिटलची माहिती त्यांना देतो व “तुम्ही
पेंशट पाठवा, हिशोबाचे मी बघून घेतो. पेशंट असला की मला फोन करा” असे सांगून व्यवहाराला सुरुवात करतो.
पी.आर.ओ. काय माहिती गोळा करतो?
पी.आर.ओ. जी.पी.चे नाव, पत्ता, घरचा पत्ता, डिग्री, दवाखाना
कधी सुरु केला [त्याच काळात आजूबाजूला इतर कोणी दवाखाना सुरु केला आहे व त्याची प्रॅक्टिस
कशी आहे], जात, धर्म, वय, गाव, कोठे शिकला आहे इ. माहिती जमा करतो. डॉक्टरकडे येणारा
पेशंट कसा आहे? लहान मुले / महिला, त्याचा आर्थिक स्तर - श्रींमत आहे की गरीब
यावरुन ह्या जी.पी.वर किती लक्ष द्यायचे हे ठरते. तसेच एखादा डॉक्टर कोणाकडे पेशंट
पाठवतो व तिथेच का पाठवतो? त्याला किती कट भेटतो? किती पार्ट्या भेटतात? कट हा
प्रत्येक पेशंट डिस्चार्ज झाल्याबरोबर द्यावा लागतो की दोन–तीन पेशंट मिळून दिला
तरी चालतो? हिशोब दाखवावा लागतो का नाही? तसेच त्याचे छंद किंवा व्यसने - दारु
पिणे, क्रिकेट, पर्यटन इ. ही माहितीदेखील गोळा केली जाते. तसेच डॉक्टरांचे दुसऱ्या
हॉस्पिटलसोबत संबंध कसे आहेत? दुसऱ्या हॉस्पिटलबाबत त्यांना काही वाईट अनुभव आहे
का? असेल तर तो अनुभव इतर जी.पी.ना सांगून त्यांना आपल्या हॉस्पिटलकडे वळवून घेणे व
तसा अनुभव आपल्या हॉस्पिटलमध्ये येणार नाही याची पी.आर.ओ. काळजी घेतो.
याबद्दल मी आपल्याला एका बालरोग तज्ञाचा अनुभव सांगतो.
ह्या बालरोग तज्ञाचे एक हॉस्पिटल आहे. त्यांच्याकडे एका जी.पी.ने रुग्ण पाठवला होता. रुग्णाला हॉस्पिटलमधून सुट्टी
झाल्यावर रुग्णाला बिल देण्यात आले. रुग्णाचे नातेवाईक बालरोग तज्ञाकडे बिल कमी
करुन घेण्यासाठी आले असता, त्या बालरोगतज्ञाने त्या जी.पी.ला फोन केला व मोबाईलचा
लाउड स्पिकर ऑन ठेवला. बालरोगतज्ञ जी.पी.ला म्हणाले “तुमचे पेंशट बिल कमी करुन
मागत आहेत, मग तुमच्या पैशांचे काय करायचे?” जी.पी.ला नातेवाईक बोलणे ऎकत आहेत हे
माहित नव्हते. त्यामुळे जी.पी. बालरोग तज्ञाला म्हणाला “मला ते काही माहित नाही.
मला माझे पैसे पाहिजेत.” यामुळे रुग्णाचे नातेवाईक जी.पी.वर खूप रागवले व त्यांनी
जी.पी.ला शिव्या दिल्या. त्यामुळे जी.पी. खूप चिडला व त्यांनी ही गोष्ट जी.पी.
संघटनेला कळवली. त्यामुळे सर्व जी.पी.नी त्या बालरोगतज्ञाकडे रुग्ण पाठवणे बंद
केले. सहा महिन्यांत बालरोगतज्ञाचे हॉस्पिटल बंद होण्याची वेळ आली. मग पी.आर.ओ. ने
मधस्थी करुन एक पार्टी आयोजित केली व त्या बालरोग तज्ञाने सर्वांसमोर त्या जी.पी.ची
माफी मागतली आणि प्रकरण मिटवण्यात आले.
एखाद्या जी.पी. चा रुग्ण चुकून दुसऱ्या हॉस्पिटलला गेला
तरी त्या जी.पी.ला क़ट मिळतो. याचे कारण तो जी.पी. इतर डॉक्टरांनासुद्धा हा अनुभव
सागंतो व त्यामुळे नवीन जी.पी. सुद्धा त्या हॉस्पिटलकडे रुग्ण पाठवायला सुरुवात
करतात.
कट प्रॅक्टिसमध्ये पी.आर.ओ. सोबत हॉस्पिटल मधील इतर
कर्मचारीसुद्धा सहभागी असतात, जसे- जुन्या सिस्टर, जुन्या आयाबाई, घरच्या ग़ाडीचा ड्रायवर, आर.एम.ओ. व रिसेप्शनिस्ट
सुद्धा कट प्रॅक्टिस पार पाडण्यात हॉस्पिटलला मदत करतात. उदा. जुन्या सिस्टर
रुग्णाची माहिती काढतात की हा रुग्ण कोणाच्या सांगण्यावरून आला आहे. कारण रुग्ण
वैद्यकीय क्षेत्रातील माहिती असलेल्या व्यक्तीचा सल्ला घेतात.जसे –मेडिकल
दुकानदार, लॅब टेक्नीशिअन, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, अॅम्बुलन्स ड्राइव्हर, गावातील पुढारी लोक, गावातील वैद्यकीय क्षेत्रात
शिकणारा विद्यार्थी इ. मग जुन्या सिस्टर ह्या लोकांना सांगतात, ‘पुढच्या वेळेस
नवीन रुग्णाला घेउन आलात तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ’ किंवा ‘मला फक्त फोन करा, मी
डॉक्टरना सांगून तुम्हाला पैसे मिळवून देते.’ आयाबाई सुद्धा अशाच प्रकारे काम
करतात. घरच्या ग़ाडीचा ड्राइव्हर इतर रुग्ण घेऊन येणारे ड्राइव्हर, अॅम्बुलन्स ड्रायवर यांना या
साखळीत ओढतो. हॉस्पिटल मधे आर.एम.ओ. म्हणून काम करणारा डॉक्टर आपल्या मित्रांना सांगतो
की तुम्ही पेशंट पाठवा मी तुम्हाला कट मिळवून देतो. पुढे हाच आर.एम.ओ. त्याचा छोटा
दवाखाना टाकतो व ते ह्या हॉस्पिटलचे extension
center होते.
हॉस्पिटल कटचे पैसे रुग्णाकडून कसे वसूल करतात?
[१] बेड चार्ज वाढवून –जर रुग्ण रेफर होऊन आला असेल तर रेफर करणाऱ्या डॉक्टरनुसार
बेड चार्ज ठरवला जातो (जर रुग्णाची शस्त्रक्रिया असेल तर आधीच पैसे वाढवून सांगितले
जातात)
[२] रुग्णाच्या गरजेपेक्षा जास्त तपासण्या करणे, जसे –रक्ताच्या तपासण्या करणे
कारण रक्त तपासाणीच्या एकूण पैशांच्या ४०% ते ५०% लॅबवाल्याकडून मिळतात. तेच पैसे
जी.पी.ला क़ट म्हणून देण्यासाठी वापरतात. तसेच रेडिओलॉजी तपासण्यांमधून २०% मिळतात.
ह्या तपासण्या वारंवार फक्त कटचे पैसे वसूल करण्यासाठी केल्या जातात.
[३] औषधीमधून – हॉस्पिटलला ज्या औषध कपंनीच्या औषध विक्रीतून जास्त फायदा
मिळतो, असे महागडे गरजेपेक्षा जास्त औषध रुग्णाकडून फक्त आपल्याच हॉस्पिटलच्या फार्मसीमधून
मागवले जाते. ते थोडेच वापरून रुग्णाला/नातेवाईकांना कळू न देता पुन्हा वॉर्डबॉय, आया, सिसटर यांच्यामार्फत हॉस्पिटलच्या फार्मसीत
जमा होते.
[४] रुग्णाला डिस्चार्ज लवकर दिला जात नाही. भरपूर बिल झाले की मगच डिस्चार्ज
दिला जातो.
[५] व्हिजिटिंग डॉक्टरला बोलावून त्याचे पैसे रुग्णाकडून वसूल केले जातात.
त्यातील थोडे पैसे व्हिजिटिंग डॉक्टरला देऊन व बाकीचे हॉस्पिटलवाले ठेवून घेतात.
[६] जर रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असेल तर आधीच जास्तीचे बिल वासूल करुन
घेतले जाते किंवा बिल वाढवून सांगितले जाते.
[७] जर हॉस्पिटलचीच लॅब असेल तर पैसे पूर्ण तपासण्याचे घ्यायचे व तपासण्या अर्ध्याच
करून रिपोर्ट दिले जातात.
क्रमशः
No comments:
Post a Comment