निर्माल्य रथ |
गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही नागपूर निर्माण गटाने
गणेश विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य संकलन मोहीम आयोजित केली होती. यावेळी मोठे
लक्ष्य नजरेसमोर ठेवता दोन प्रयोग करण्यात आले. पहिला प्रयोग म्हणजे ‘निर्माल्य रथ’.
गणेशोत्सव सुरु झाल्यापासूनच लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याकरता
निर्माल्य रथाचा प्रयोग करण्यात आला. एकूण पाच निर्माल्य रथांसोबत निर्माणींनी घरोघरी
फिरून लोकांना पर्यावरण रक्षणाविषयी माहिती दिली तसेच निर्माल्य गोळा करून त्याचे
योग्य व्यवस्थापन केले.
दुसरा प्रयोग म्हणजे यावेळी अंबाझरी आणि सोनेगाव या दोन
ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन आणि निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती.
एकूण ७० निर्माणींनी या मोहिमेत सहभाग घेतला. दोन्ही ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने कृत्रिम विसर्जन स्थळ
तयार करण्यात आले होते. कृत्रिम विसर्जन स्थळांमध्येच गणेशमूर्तींचे विसर्जन
करण्याचे आवाहन निर्माणींतर्फे करण्यात आले आणि या आवाहनाला लोकांनी चांगला
प्रतिसाद दिला. अंदाजे ७००० गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम विसर्जन स्थळांमध्ये
करण्यात आले. याचबरोबर, १४ टन निर्माल्यही लोकांकडून गोळा करण्यात आले. या
निर्माल्याचे फुलं-पानं, प्रसाद, नारळ, प्लास्टिक इ. गटात वर्गीकरण करण्यात आले.
हे निर्माल्य ‘निसर्गविज्ञान मंडळ, नागपूर’ येथे देण्यात आले व त्यापासून २ टन खत
तयार करण्यात आले.
निर्माल्य संकलना दरम्यान नागपूर निर्माण गट |
लोकांसोबत संवाद साधणे, पर्यावरण रक्षणाविषयी माहिती
देणे, निर्माल्याचे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण करणे, योग्य पद्धतीने कचरा
व्यवस्थापन करणे इ. अनेकच बाबतीत निर्माणींचे शिक्षण झाले. या संपूर्ण मोहिमेचे आयोजन
रंजन पांढरे (निर्माण ४) आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केले होते. या गटाची मेहनत आणि
नागपूर महानगरपालिका व जनतेच्या सहकार्यामुळे पर्यावरणाची हानी बऱ्याच प्रमाणात टाळता
आली. सतत कृतीशील राहणाऱ्या या गटाचे अभिनंदन आणि पुढील उपक्रमांसाठी निर्माणतर्फे
शुभेच्छा!
No comments:
Post a Comment