'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 17 September 2013

सिंहस्थ- कुसुमाग्रज

(डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी ही कविता पनवेलच्या व्याख्यानात वाचली होती)

व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर
संतांचे पुकार, वांझ झाले

रस्तोरस्ती साठे, बैराग्यांचा ढीग
दंभ शिगोशीग, तुडुंबला

बँड वाजविती, सैंयामिया धून
गजांचे आसन, महंता‌सी

आले खड्ग हाती, नाचती गोसावी
वाट या पुसावी, अध्यात्माची?

कोणी एक उभा, एका पायावरी
कोणास पथारी, कंटकांची

असे जपीतपी, प्रेक्षकांची आस
रुपयांची रास, पडे पुढे

जटा कौपिनांची, क्रीडा साहे जळ
त्यात हो तुंबळ, भाविकांची

क्रमांकात होता, गफलत काही
जुंपते लढाई, गोसव्यांची

साधू नाहतात, साधू जेवतात
साधू विष्ठतात, रस्त्यावरी

येथे येती ट्रक, तूप साखरेचे
टँकर दुधाचे, रिक्त तेथे

यांच्या लंगोटीला, झालर मोत्याची
चिलीम सोन्याची, त्याच्यापाशी

येथे शंभराला, लाभतो प्रवेश
तेथे लक्षाधीश, फक्त जातो

अशी झाली सारी, कौतुकाची मात
गांजाची आयात, टनावारी

तुज म्हणे ऐसे, मायेचे माइंद

त्यापाशी गोविंद, नाही नाही.

No comments:

Post a Comment