९-१८ ऑगस्टदरम्यान वैद्यकीय मुलांसाठी निर्माण ५.२ ब शिबीर संपन्न झाले. ४ दिवस गडचिरोलीच्या
आदिवासी व गैर आदिवासी गावातील एका ठराविक वैद्यकीय समस्येच्या व्याप्तीचे
निरीक्षण करून शिबीर संपेपर्यंत ही समस्या सोडवण्यासाठी नियोजन करणे व हे नियोजन
करण्यासाठी मदत करू शकतील अशा सत्रांचे आयोजन हे या शिबिराचे सूत्र होते.
जगजीत सिंगांच्या ‘गरज बरस प्यासी धर्तीपर फिर पानी दे
मौला’ या गझलेने शिबिरास सुरुवात झाली. शिबिरार्थ्यांनी गत सहा महिन्यांतील आपापले अनुभव, कृती व
अनेक प्रसंगातून झालेले स्वत:चे शिक्षण इतरांसोबत शेअर केले. गावात जाण्याआधी सर्वांच्या मनात अनेक प्रश्न डोकावत होते. सर्वांची पाच गटात विभागणी करून त्यांना मलेरिया, हागवण, गरोदरपणा, तंबाखूचे व्यसन आणि सर्जरी असे आरोग्यविषयक पाच विषय देण्यात आले. गटात बसून सर्वांनी आपण कसा ह्यांचा अभ्यास करू ह्याची आखणी केली व शिबिरार्थी गावांकडे रवाना झाले. गावांतून परत आल्यावर शिबिरार्थ्यांनी
एका प्रार्थनेनंतर गावातले मजेशीर अनुभव व मार्मिक निरीक्षणे सर्वांसोबत शेअर करून
शिबिराचा उत्साह वाढवला.
श्री. मिलिंद बोकीलांनी शिबिरार्थ्यांच्याच गावांतील अनुभवांचा आधार घेत खेड्यातीलसमाजरचना व त्यामागची जडणगडण समजावून सांगितली. योगेश दादाने (डॉ. योगेश कालकोंडे)
त्याच्या
छोट्याशा गावापासून अमेरिका व तिथून परत शोधग्राम हा प्रवास सर्वांसमोर सादर केला. विद्यार्थीदशेपासूनच प्रमाण मानल्या गेलेल्या
गोष्टींना/रिवाजांना प्रश्न विचारणे योगेश दादाच्या प्रवासातून वारंवार ठळकपणे
समोर येत होते. इतर प्रभावी सत्रांमध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो अम्मांच्या मुलाखतीचा. अम्मांचा नीडरपणा खूप भावल्याचे
शिबिरार्थ्यांनी नमूद केले. ‘एका प्रश्नाचा प्रवास’ या सत्रात
नायनांनी नवजात मृत्यूचा प्रश्न त्यांना दिसला
कसा, तो मोजला कसा, त्यावर उपाययोजना कशी केली, ती कशी राबवली व त्याचा गडचिरोली व
इतरही राज्यांत/देशांत बालमृत्यूदरावर काय परिणाम झाला यावर विस्तृत मांडणी
केली. आरोग्यदूत काजूबाईंनी ‘नवजात बाळाला आरोग्यसेवा कशी द्यावी’ हे तरुण
डॉक्टरांना शिकवले तेव्हा तरुण डॉक्टरांनी
काजूबाईंना मनापासून दाद दिली.
कोणतीही समस्या
सोडवताना तिचे मोजमाप महत्त्वाचे. सर्चच्य श्री. संतोष सावळकर व श्री. महेश देशमुख
यांनी अनुक्रमे तंबाखू व बालमृत्यूची समस्या कशी मोजली याचे सादरीकरण केले. तसेच
समस्या सोडवण्याचे विविध मार्ग सर्चमध्ये काम करणारे निर्माणचे तरुण डॉक्टर्स
वैभव, सुजय व विक्रम यांनी त्यांच्या अनुभवाच्या आधारे सादर केले. या काही
सत्रांचा व जगभरातील संशोधनांचा आधार घेत रात्रभर जागून सर्व शिबिरार्थ्यांनी आपापल्या विषयांची सादरीकरणांची तयारी केली. पिंपळातच दोन घटका विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रत्यक्ष सादरीकरणे झाली, तेव्हा नायनांनी प्रत्येक सादरीकरण खूप बारकाईने ऐकून प्रत्येकाला मार्गदर्शन केले.
नवजात बाळाचे उपचार तरुण डॉक्टरांना शिकवताना काजूबाई |
सादरीकरण करताना शिबिरार्थ्यांचा एक गट |
या आरोग्याच्या समस्या गावागावांत मोठ्या प्रमाणावर आहेत. शिबिरात स्वाध्याय
करता करता खऱ्याखुऱ्या आयुष्यातही या समस्या सोडवण्याची प्रेरणा मिळो ही
शिबिरार्थ्यांना शुभेच्छा!
सोच समझ वालो को थोडी नादानी दे मौला ।
ReplyDeleteनिर्माणच्या कजुबाईचे सेशन मला खूप काही शिकवून गेले . तो प्रसंग बघितल्या वर मला एकच प्रसंग आठवला तो म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि धर्म परिषद .
संत ज्ञानेश्वर महाराजांनी धर्म परिषदेसमोर ज्या प्रमाणे रेड्याच्या मुखातून वेद म्हणवले ,ते म्हणवताना तर मी पहिले नाही ,पण नयनांनी वैद्यकीय पंडितांच्या समोर कजुबाईच्या मुखातुन "जीवन रक्षणाचे वेद "म्हणवून घेण्याचा मी प्रत्यक्ष साक्षी आहे .
-भूषण देव.