'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 17 September 2013

विवेकाची हत्या


२० ऑगस्ट २0१३ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्याकुट्ट अक्षरांनी लिहिला जाईल. या दिवशी उगवत्या सूर्यासमोर डॉ.नरेंद्र दाभोलकर या प्रबोधन सूर्यास कायमचे ग्रहण लागले. दाभोलकरांसारख्या सेवाव्रतीची झालेली निघृण हत्या धक्कादायक तर आहेच पण ती महाराष्ट्राच्या इतिहासास लांछनास्पद आहे.या घटनेमुळे महाराष्ट्राची अपरिमित हानी झाली असून प्रबोधन, समाजसुधारणेच्या बाबतीत महाराष्ट्र किमान ३ दशके मागे गेला आहे.
आपला उत्तम चाललेला डॉक्टरी पेशा सोडून संपूर्णवेळ समाजकार्याला वाहून घेणे हे समाजाप्रती खरी आस्था, तळमळ असल्याखेरीज साध्य होत नाही. आणि ज्या लोकांना समाजाप्रती खरी आस्था, कळकळ असते, समाज उत्थानाचेच ज्यांचे ध्येय असते त्यांच्याकडूनच समाजप्रबोधनाचे असे महान कार्य घडते. डॉ.दाभोलकरांनी डॉक्टरी पेशा सोडला पण डॉक्टरचा रोगावर इलाज करणेहा पवित्र धर्म सोडला नाही.
जो धर्म, जो समाज जुन्या बुरसटलेल्या चालीरीतींना चिटकून राहतो त्याचे पतन होते; जो धर्म, जो समाज पाश्चात्त्य अंधानुकरण करतो त्यात न्यून निर्माण होते आणि जो धर्म, जो समाज आपल्यामध्ये कालानुरूप बदल करतो, प्रथा, रुढी, परंपरा यांच्या कालसंगत अन्वयार्थ लावतो आणि त्यानुसार आचरण करतो त्या समाजाचे उत्थान होते. डॉ.दाभोलकरांचा प्रबोधन पंथ असा प्रशस्त होता.
डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी लोकांच्या श्रद्धेला तडा जाईल असे वक्तव्य, वर्तन कधीही केले नाही. “देव आहे का नाही ?” या प्रश्नाचे उत्तर देखील त्यांनी नंतर जाहीरपणे देणे टाळले, पण अंधश्रद्धेवर कठोर आघात करण्याची एकही संधी सोडली नाही. किंबहुना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमध्ये जी अस्पष्ट, अरुंद सीमारेषा असते ती अधोरेखीत करण्याचे कार्य त्यांनी अविरत केले. अंधश्रद्धा निर्मूलन हे त्या महान कार्याचे नाव.
निश्चित विचार घेऊन एखादी चळवळ उभी करणे, कार्यकर्ते जोपासणे आणि मूल्यांपासून दूर न जाता ती चळवळ चालू ठेवणे हे काम सोपे नाही, परंतु डॉ. दाभोलकरांना हे साध्य झाले ते त्यांची समर्पित वृत्ती, ध्येयनिष्ठा आणि तात्त्विक अधिष्ठान यामुळेच. धर्माचा, श्रद्धेचा प्रश्न लोकांच्या भावनांशी निगडीत असतो त्यामुळे जपून वागावे लागते. डॉ. दाभोलकरांनी जे विचार मांडले, जी भूमिका घेतली ती बुद्धीवादाशी निगडीत होती. त्यामागे शास्त्रीय संशोधन होते. चिकित्सक अभ्यास होता. त्यांनी नुसतीच थिअरी मांडली नाही तर प्रात्यक्षिक देऊन भंपक बाबांच्या चमत्कारातील भोंदूगिरीचे पितळ उघडे करून दाखवले.
सततच्या अभ्यासामुळे, आपल्या भूमिका बुद्धीच्या कसोटीवर तपासून पाहण्याच्या भूमिकेमुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीस प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला. आणि या आत्मविश्वासातूनच ते चमत्कार सिद्ध करून दाखवणाऱ्यास २१ लाख रुपयांचे इनाम जाहीर करू शकले आणि हे आव्हान आजतागायत कोणीही स्वीकारलेले नाही. विद्यापीठात जोतिषशास्त्र अभ्यासविषय म्हणून लागू होण्याला त्यांनी विरोध केला तो बुद्धीवादी भूमिकेतूनच.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ कधीही नकारात्मक नव्हती आणि ती कायम सनदशील आणि लोकशाही मार्गाने चालवली गेली. या चळवळीने फॅसिस्ट प्रवृत्तीला आव्हान दिले आणि त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार मान्य करून खुल्या चर्चेचे आवाहन देखील केले. पण त्यांचे आव्हान स्वीकारण्याची कुवत आणि आवाहनाला प्रतिसाद देण्याची मानसिकता प्रतिगामी चळवळीत नव्हती.
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अंनिस कोणाच्या विरुद्ध होते ? ते त्या अपप्रवृत्तींविरोधात होते ज्या करणी करते म्हणून स्त्री ला विवस्त्र करून तिची धिंड काढण्याची शिक्षा देतात. जे स्त्रीला डाकिन ठरवून तिच्या डोक्यात खिळे ठोकण्याची शिक्षा देतात. जे स्त्री च्या पावित्र्याची परीक्षा घेण्यासाठी तिला लोखंडाचा तप्त तुकडा जिभेवर ठेवण्यास सांगतात आणि जीभ भाजली नाही तर ती पवित्र असा पावित्र्याचा अघोरी आणि अवास्तविक निकष ठरवतात. ते त्या भोंदू बाबांविरुद्ध होते जे लोकांच्या भोळेपणाचा, श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडतात, स्त्रियांचे लैंगिक शोषण करतात, ‘चमत्कारकरून मंत्र्यांसाठी, क्रिकेटपटूसाठी सोन्याची चेन काढतात आणि गरिबांसाठी साधा अंगारा काढतात. त्यांचा विरोध या अपप्रवृत्तींच्या भ्रष्ट अर्थकारणास, अनैतिक आचरणास आणि त्यापायी समाजाच्या होणाऱ्या अपरिमित हानीस आणि नैतिक अध:तनास होता.
१९९५ पासून जादूटोणा, अघोरी प्रथांविरुद्ध कायदा निर्माण व्हावा म्हणून त्यांनी दिलेला लढा हा त्यांच्या लोकशाही मूल्यांवरील निष्ठेचे प्रतिक आहे.भारतीय घटनेनेदेखील मूलभूत कर्तव्यांमध्ये विज्ञान निष्ठदृष्टीकोन स्वीकारण्याचे सूचित केलेले आहे. डॉ. दाभोलकरांनी आयुष्यभर घेतलेली भूमिका ही त्यांची घटनेशी बांधिलकी अधोरेखीत करणारी आहे.
पूर्णवेळ समाजकार्य करणाऱ्या लोकांस वैयक्तिक आयुष्यात अनंत अडचणींना सामोरे जावे लागते, आर्थिक ओढाताण सहन करावी लागते. यासाठी डॉ.दाभोलकरांनी सामाजिक कृतज्ञता निधीची स्थापना केली. या उपक्रमाअंतर्गत समाजसेवकांना काही निकषांवर ठराविक मानधन दिले जात असे. स्तरावरचा हा असा पहिला उपक्रम होता. या उपक्रमाची मांडणी जरी लक्षात घेतली तरी डॉ.दाभोलकरांमधील सहृदय माणसाचे दर्शन घडते.
डॉ.दाभोलकरांसारख्या समाजसुधारकांवर झालेली जहरी टीका, त्यांचा अपमान-अवहेलना महराष्ट्रात पूर्वापार चालत आलेली आहे. हा तो समाज आहे ज्याने ज्ञानेश्वरांना वाळीत टाकले, तुकारामाची हेटाळणी केली, शिवाजी महाराजांना क्षुद्र ठरवले, जोतिबा फुल्यांवर दगड मारले, सावित्री बाईंवर शेण फेकले, न्या.रानड्यांना बिस्किटे खाल्लीम्हणून प्राय:चित्त घ्यायला लावले, आगरकरांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली आणि उभी हयात समोरून भूमिका मांडणाऱ्या डॉ.दाभोलकरांवर मागून हल्ला केला. डॉ. दाभोलकरांची हत्या ही समाजातील विवेकाची हत्या आहे. पुरोगामित्वाची हत्या आहे.
ज्या समाजात प्रत्येक माणसाचा आत्मसम्मान, प्रतिष्ठा जपली जाईल, बुद्धीच्या निकषावर प्रत्येक भूमिका ठरवली जाईल, रुढी-प्रथा-परंपरा कोणाचा बळी घ्यायला वापरल्या जाणार नाहीत तर अभिजात संस्कृतीला अधिक समृद्ध करण्यासाठी त्यांचा उपयोग केला जाईल, जेथे धर्माच्या नावाखाली कोणाचे शोषण होणार नाही, श्रद्धेवर अंधश्रद्धा मात करणार नाही अशा निकोप, समृद्ध, सजग आणि सदैव जागरूक नवसमाजाची निर्मिती हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे स्वप्न होते. आणि हे स्वप्न उघडया डोळ्यांनी पाहिलेले असल्याने तेच त्यांचे ध्येय देखील होते.
ज्या मूल्यांचा ध्यास घेतला, निष्ठा ठेवली त्या मूल्यांची परीक्षा देण्याचे प्रसंग सामान्य माणसाच्या आयुष्यात क्वचित येतात. आणि या प्रसंगी कच खाल्ल्याने त्यांचा पराभव होतो. डॉ दाभोलकरांच्या आयुष्यात असे प्रसंग वारंवार आले आणि प्रत्येक प्रसंगातून ते तावून सुलाखून बाहेर पडले. प्रत्येकवेळी त्यांचा जय झाला असे नाही पण त्यांचा पराभव देखील कधीच झाला नाही.
त्यांचे मारेकरी पकडले जातील, जाणारही नाहीत. त्यांना शिक्षा व्हायची तेव्हा होईल, होणारही नाही. जादूटोणा विरोधी विधेयक पारित होईल होणार नाही. पण आता आपल्या सर्वांवर एक समाज म्हणून मोठी जबाबदारी आलेली आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकरांसारख्या प्रबोधनकारांनी, समाजसुधारकांनी दाखवलेल्या वाटेवर चालण्याची. असे आपण केले नाही आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभोअशी पोकळ, कृतीहीन प्रार्थना केली तर तो देखील एक भोंदूपणाच ठरेल.
डॉ.नरेंद्र.दाभोलकारांशी मी व्यक्तिश: केवळ १० मिनिटे बोललो आहे. तुम्ही पूर्णवेळ समाजकार्य करताना आर्थिक गरजा कशा पूर्ण करता?” या प्रश्नाचे इतर डॉक्टर लाईफ फेलोशिप वर असतात पण मी वाईफ फेलोशिप वर आहेअसे आपल्या पत्नीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे उत्तर त्यांनी दिले होते. त्यांच्या हत्येची बातमी टी.व्ही. वर पहिली आणि मन सुन्न झाले. या वेळी आठवलेल्या कवी ग्रेस यांच्या ओळी मात्र अश्रू रोखू शकल्या नाहीत

   हले काचपात्रातली वेल साधी
   निनादून घंटा जरा वाकल्या...
   खिळ्यांना कळेना कुठे क्रूस न्यावा
   प्रभूने अशा पापण्या झाकल्या..

 स्व. आणि कै हे शब्द त्यांना आवडले नसते. आणि हे शब्द त्यांच्या साठी नाहीत.
डॉ.नरेंद्र.दाभोकारांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
डॉ.नरेंद्र.दाभोलकर गेले नाहीत..डॉ.नरेंद्र.दाभोलकर जात नसतात..!

No comments:

Post a Comment