एक होता कार्व्हर- वीणा गवाणकर
खरंतर 'एक होता कार्व्हर' हे
पुस्तक लहानपणी मी तीन- चार वेळा वाचलंय... पण तेंव्हा मी ते ‘माझ्या छोट्या
दोस्ताची मोठी गोष्ट’ म्हणून वाचायचे... यावेळेस मात्र ‘त्याच्या जीवनातून एखादा
नवीन दृष्टीकोन मिळावा, मला माझ्यासाठी एखादी दिशा कळावीच’,
या हेतूने ते पुस्तक वाचायला घेतलं..आणि .... !!!!!
ही गोष्ट आहे जॉर्ज कार्व्हर नावाच्या काळ्या
मुलाची ज्याचं स्वप्न असतं की 'आपण इतकं शिकावं, इतकं शिकावं की एक दिवस कुठल्याच
शिक्षकाने शिकवावं असं ज्ञान उरणार नाही, आणि मग या सृष्टीचा
विधाता त्याचं रहस्य आपल्यापुढे उलगडून ठेवेल!' आणि
म्हणूनच की काय, हा जॉर्ज कार्व्हर जीवन शिक्षणाचे उत्तम उदाहरण ठरला! जॉर्ज वयाच्या केवळ दहाव्या वर्षी शिक्षणासाठी आपलं गाव
‘डायमंड ग्रोव्ह’, आपले मालक (आणि पालकही!) ‘मोझेस आणि सूझन
कार्व्हर’ या सगळ्यांना सोडून एकटाच नीओशो गावात गेला. दिवसभर शाळा आणि त्यानंतर
पोटाचा प्रश्न मिटवण्यासाठी मिळतील ती कामं तो करायचा..
त्याचं शिक्षण हे असंच चाललं होतं, जिथून जसं मिळेल तसं. पण त्यामुळे त्याची ज्ञानलालसा
अधिकच वाढत होती. त्यासाठी पडतील ते कष्ट उपसायला तो सदैव तयार असे. कामधंदा करून
पैसे मिळवायचे; मग शाळेत नाव घालायचं. शिकत असताना पैसे
संपले की शाळा सोडायची. परत काम करायचं. या खटाटोपात कालापव्यय होत होता; पण त्यामुळे संपूर्ण स्वावलंबन त्याच्या अंगी रुजलं.
आपले प्रश्न आपणच सोडवायचे, आपल्या जबाबदाऱ्या आपणच पार
पाडायच्या. अवलंबून राहणार कोणावर?
शिवाय स्वतःच्या भरवशावर समाजात
वावरताना ‘सहकार्याचे’ महत्त्व त्याला समजलं, तेंव्हाच्या समाजाची स्थिती त्याला दिसत होती.
‘आपल्या शिक्षणाचा आपल्या बांधवांना उपयोग झाला पाहिजे’ अशी त्याची
मनापासून इच्छा होती. म्हणूनच अंगी अनेक कलागुण उपजतच
असतानाही त्याने कृषिशास्त्राचा अभ्यास केला व
पदव्युत्तर शिक्षण Mycology या विषयातून घेतले... नंतर काही
काळ स्वतःच्याच कॉलेजमध्ये तो वनस्पतीशास्त्र शिकवत
होता....
इ. स. १८६५ च्या
डिसेंबर महिन्यात निग्रोंच्या स्वातंत्र्याला अधिकृत मान्यता देण्यात आली. पण आता पुढे काय? इतके वर्ष गुलाम म्हणून वावरत असल्याने त्यांच्यात कुटुंबव्यवस्थाच नव्हती. भविष्यासाठी कसलीही
तरतूद केलेली नसायची.. या स्वातंत्र्यामुळे कसलाच ठावठिकाणा नसलेला हा समाज मुक्त
म्हणून रस्त्यावर आला. अन्न, वस्त्र निवाऱ्यासाठी
बहुतेक सारे आपल्या जुन्या मालकाकडे परतले.
त्यात शिक्षण, स्वातंत्र्य म्हणजे शारीरिक कष्टांतून मुक्तता एवढाच अर्थ
त्यांनी लावला होता. दैनिक गरजा भागवण्यासाठी श्रम केले पाहिजेत हेच त्यांना पटत
नव्हतं.
‘आपल्याला
नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग कसा घ्यावा’ याची जाणीव करून द्यायच्या हेतूने, त्यांना स्वावलंबी, स्वयंप्रज्ञ
बनवण्याच्या हेतूने ४ जुलै १८८१ रोजी Tuskegee Normal and
Industrial Institute for Negroes उदयास आली. टस्कीगी
संस्थेत सुरु असलेले उद्योग हे त्यांच्या गरजांतून पुढे आले होते. (उदा. शाळेची
इमारत ही विद्यार्थ्यांनीच स्वतः बनवलेल्या विटांतून बांधली होती.)
आत्मोन्नतीबरोबर
समाजोन्नतीही साधावी, या उदात्त ध्येयाच्या पायावर ही
संस्था उभारली होती.
अशा या संस्थेत डॉ. कार्व्हर
शेतीतज्ञ प्राध्यापक म्हणून दाखल झाले.. तिथे त्यांनी त्यांच्या अचाट कामगिरीने
आपल्या बांधवांच्या अनेक समस्यांचे निराकरण केले.
अशा या माझ्या दोस्ताच्या
जीवनातून मी हे विचार घेतले. :-
1.
स्वावलंबन
2.
जीवन शिक्षण
3.
समाजाप्रती
कर्तव्य
4.
कर्तव्याला
समर्पण. .
तुम्हीही हे पुस्तक जरूर वाचा!
No comments:
Post a Comment