‘आपल्या
जिल्ह्यातून दारू जाहिरातींचे फलक हटवावेत कसे?’ या प्रश्नाची उकल करताना डॉ. सचिन
महाले (निर्माण ५) महत्त्वाच्या टप्प्यावर पोचला आहे. प्रश्नाची व्याप्ती
मोजण्यापासून सुरुवात, माहितीच्या अधिकाराचे हत्यार व या माहितीच्या आधारे
जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा यामुळे जळगाव जिल्ह्यातील सुमारे ८०% दारूच्या
जाहिरातींचे बॅनर निघाल्याचे सचिनने सांगितले.
“मी ज्या शाळेत
दहावीपर्यंत शिकलो तिच्या १०० मी. परिसरात २ बीअर बार आहेत. त्यांच्याबाहेर
लावलेले दारूच्या जाहिरातींचे फलक जणू मुलांना आकर्षित करण्यासाठी आहेत. गडचिरोली
जिल्ह्यात दारूबंदी असताना माझ्या भागात मद्यविक्रीचे फलकदेखील दूर का करता येऊ
नयेत?’ निर्माण ५.१ शिबिरानंतर असा विचार मनात घोळत असल्याचे सचिन म्हणाला. यासाठी
माहितीच्या अधिकारा अंतर्गत त्याने पुढील माहिती मागवली:
१.
जिल्ह्यात ठोक व किरकोळ
मद्यविक्रीची किती दुकाने आहेत?
२.
त्यातील नियमबाह्य व
नियमांतर्गत किती?
३.
दुकानांबाहेर लावण्यात
येणाऱ्या फलकांसाठी नियम काय आहेत?
४.
या नियमांचे उल्लंघन
करणाऱ्यास कोणत्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे?
२ महिन्यांनंतर
मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सुमारे २५% मद्यविक्री महिला व १८ वर्षांखालील
मुलींच्या नावाने होत होती. तसेच फलकांवरील जाहीरातींद्वारे माद्यविक्रीस प्रोत्साहन
देणे महाराष्ट्र देशी दारू नियम ‘१९७३’अंतर्गत नियमबाह्य आहे व मुंबई दारूबंदी
कायदा १९४९ मधील नियमांत त्यास शिक्षा आहे.
या पुराव्यांच्या
आधारे डॉ. संग्राम व डॉ. नुपूर पाटील यांच्यासोबत सचिनने जिल्हाधिकारी कार्यालयात
फलकांविरूद्ध निवेदन दिले. या मुद्याला प्रसार माध्यमांतून बरीच प्रसिद्धी मिळाली.
बार मालक भेटून गेल्यानंतरही आपल्या भूमिकेवर ठाम राहत १५ दिवसांनी पुन्हा निवेदन
दिले.
दारूबंदी अजून
दूर असली तरी जिल्ह्यातील सुमारे ८०% दारू जाहिरातींचे फलक निघणे ही सुरुवात
असल्याचे सचिन म्हणाला. दारूमुक्तीच्या दिशेने पाउल म्हणून तरूणांना व रुग्णांना
समुपदेशन करणे सचिनने सुरू केले आहे. त्याला त्याच्या कामासाठी शुभेच्छा!
dear sachin,
ReplyDeletegreat man!very good work ,Jalgaon nirman rocks