नुकत्याच दोन मराठी कादंबऱ्या
वाचण्यात आल्या, आपण सर्वांनी वाचाव्या अशा :
'खेळघर' ले.रवींद्र
रुक्मिणी पंढरीनाथ; प्र. मनोविकास
'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट'
ले.आनंद विंगकर; प्र. लोकवांग्मय गृह
चवीसाठी दोन उतारे देतो.
१) (खेळघर)
"अरे पण इतका आटापिटा
करण्यापेक्षा कापूस किंवा असं काही का नाही लावत? त्यातून
भरपूर पैसा मिळेल. पैसा देऊन हवं ते विकत घेता येईल."
"अस नसतं मित्रादीदी. बाजारात
गेल्यावर ह्या गरीब माणसांची तिहेरी लूटमार होते."
"कशी काय?"
"नगदी पीक घ्यायचं म्हणजे स्पेशल बियाणं,
कीटकनाशकं आलीत. ती अव्वाच्या सव्वा किंमतीने विकत घ्यायला रोख पैसा
पाहिजे किंवा मग कर्ज काढायचं. ही पहिली लुबाडणूक. त्याचा तयार माल घेऊन तो
बाजारात येतो, तेव्हा इथला व्यापारी किंवा मधला दलाल त्याला
वजना-मापात, हिशेबात फसवतो, पाडून भाव
देतो. हा झाला दुसरा फटका. ह्या व्यवहारातून मिळालेला तुटपुंजा पैसा घेऊन तो
आपल्या गरजेच्या गोष्टी घ्यायला गेला की तिथे त्याची पुन्हा नागवणूक केली जाते. हे
टाळायचं असेल, तर आपण पिकवलेल्यातून आपल्या गरजा भागवायला
शिकलं पाहिजे."
"पण हे तर 'अभावाचे
तत्वज्ञान' झाले."
"अभावाचे नव्हे, निर्वाहाचे तत्वज्ञान"
माझ्या आठवणीनुसार नेमकं हेच
संभाषण तन्मय आणि मी यांच्यात झालं, आणि
त्यातूनच आपला कोरडवाहू गट घडला! (नंदा)
२) (अवकाळी....)
त्या कुणबिणीचं, मानासाठी म्हणा पाहिजे तर कुरवाडणीचं अन् तिच्या नवऱ्याचं काहीच
कसं नव्हतं या देशाच्या विकासात योगदान? त्यांच्यासारख्याच
इतर उपेक्षितांची मदत घेऊन मग हे मातीतून धान्य वेगळं कुणी केलं? पाखडलं, निवडलं, हातणी मारीत वाढवलं, पोत्यात भरून दिलं. उन्ह तावतायत म्हणून डोक्यावर धडपा
ठेऊन ही भांगलन कुणीकुणी केली? जातीनिहाय नाव येऊ द्यात त्यांची. तणातून वेगळा केलाय
भाजीपाला, जो रास्त दराशिवाय बाजारात विकला. ही शेरडं,
मेंढरं उनापावसात गाई, म्हशी कोणी राखल्या?
दुधं काढली बोटांना रट येईपर्यंत, जे फट(fat)
लावून तुम्ही घेतलंत. पाण्याहून कमी दाम दिलात.
खाण्यासाठी
म्हणून जे आहे सजीव, जे त्या सर्वांनी आपल्या श्रमांतून
निर्माण केलं, ते सर्व वगळलं
आपल्या जगण्यातून तर काय उरतं? अन् त्यालाच कसली ती किंमत नाही उरली. जे त्याने निर्माण केलं त्याच्यासाठी झालं ते दुष्प्राप्य.
गोडाऊनमध्ये साठवून करून ठेवलंत महाग. त्यातून मिळाले नाही वस्त्र, पोटभर
अन्न आणि इतर सर्व जे
जगण्यासाठी अनिवार्य आणि आवश्यक असेल. त्याच्या काबाडकष्टाची तुम्ही दखलच नाही
घेतलीत, म्हणालात आता मुक्त बाजार झाला. पैसे
फेकले की कुठूनही येते धान्य, भाजीपाला, फळे, दूध अन् पाक(pack) केलेलं
केंचुकी चिकन! गावात शेतात माळावर राबणाऱ्याची गरज नाही उरली. पिकवलं, नाही
पिकवलं तरी इथे अडतच नव्हतं
कुणाचं, इतकं त्याला निरुपयोगी करून टाकलंत.
त्याच्या राहत्या जागेवरून विस्थापित केलंत. हागणदारी अन् गटाराच्या कडेला नेऊन बसवलत, पार देशोधडीला लावलंत. आणि मी जो
त्यांच्या रक्तातला शिक्षण अन् नोकरीतून मध्यमवर्गीय
झालो, त्याने मातीची नाळ तोडून टाकली. विचारलं नाही कधी,
तू कशी आहेस वाहिनी? पोरंबाळ घेऊन का आलीस
गावावरून अन् जवळ केलेस हे प्लाटफॉर्म. फुका इभ्रतीच्या प्रतिष्ठेत लाजेनं मी
दाबून ठेवलं आपलं दुःख, व्यक्त नाही केलं चारचौघात. दाखवलं
की पेपरात होणाऱ्या रोजच्या आत्महत्त्यांशी माझा दुरूनही संबंध नाही.
गोष्टीत आत्महत्या
करणाऱ्या जोडप्यातल्या पुरुषाचा भाऊ हे स्वगत बोलतो. पण आपणही सगळे अखेर फारतर
काही पिढ्यांपूर्वी शिक्षण आणि नोकरीतून मध्यमवर्गी झालेलेच असू शकतो, मग आपण अंबानी किंवा ओबामा का असूनात!
तर, भाईयो और बहनो, जमल्यास दोन्ही पुस्तकं
वाचा.
तुमचा, नंदा
No comments:
Post a Comment